श्रीहरिकोटा : भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक बेट व देशातील महत्त्वाचे रॉकेट क्षेपण केंद्र. ते आंध्र प्रदेश राज्याच्या आग्नेय कोपऱ्यात आहे. १३° २९’ ते १३° ५९’ उ. अक्षांश व ८०° ११’ ते ८०° २१’ पू. रेखांशांदरम्यान विस्तारलेल्या या बेटाची दक्षिणोत्तर जास्तीत जास्त लांबी ५६ किमी. व पूर्व-पश्चिम रूंदी ९.५ किमी. आहे. चेन्नई (मद्रास)पासून उत्तरेस सु. १०० किमी.वर तमिळनाडू राज्याच्या सरहद्दीजवळ असलेल्या या बेटामुळे पुलिकत सरोवर बंगालच्या उपसागरापासून वेगळे झाले आहे. नेल्लोर जिल्ह्यात याचा समावेश होतो. पूर्वेस बंगालचा उपसागर, पश्चिमेस पुलिकत सरोवर, दक्षिणेस कोरोमंडल कालवा व उत्तरेस दुगराझुपटनम्‌जवळील अरूंद खाडी यांनी हे वेढलेले आहे. सस.पासून अगदी कमी उंचीचा भूभाग व गाळाच्या संचयनाने बनलेला लांब किनारा असलेल्या या बेटावर वाळूमिश्रित मृदा व जळाऊ लाकडाचे जंगल असून येथील लाकूड चेन्नई बाजारपेठेत विकीस जात असे. येथील हवामान फारसे उत्साहवर्धक नाही. पूर्वी येथे हत्ती रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळत होता. पुलिकत सरोवराच्या किनारी भागात भात व काही प्रमाणात रागीचे उत्पन्न घेतले जाते. येथे बहुतांश येनाडी जमातीची वस्ती आढळते.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारा (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन-इस्रो) केल्या जाणाऱ्या अंतराळ संशोधनासाठी जी केंद्रे उभारण्यात आली, त्यांपैकी ‘ शार (एस्एच्एआर्) सेंटर ’ची स्थापना श्रीहरिकोटा येथे करण्यात आली आहे. १९७० मध्ये हे केंद्र कार्यान्वित झाले. एएस्एल्‌व्ही, पीएस्एल्‌व्ही यांसारख्या उपग्रहवाहक मोठया यानांच्या क्षेपणासाठी हे क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. निरीक्षण उपकरणयुक्त रॉकेटांची निर्मिती व क्षेपण हा या केंद्राचा मुख्य उद्देश असून, पहिल्या निरीक्षण उपकरणयुक्त रॉकेटचे क्षेपण ऑक्टोबर १९७० मध्ये येथून करण्यात आले. भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केलेल्या एस्‌एल्‌व्ही-३ या रॉकेटच्या साहाय्याने पहिल्या ‘रोहिणी ’ उपगहाचे क्षेपण या केंद्रावरून १८ जुलै १९८० रोजी झाले आणि या मालिकेतील पुढील क्षेपणेही येथूनच करण्यात आली. येथे विशेषत: निरीक्षण उपकरणयुक्त रॉकेटच्या विविध स्वरूपाच्या चाचण्या घेण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, क्षेपणासाठी लागणाऱ्या ‘ रॉकेट प्रॉपेलंट ’ (प्रचालक द्रव) या इंधनाच्या उत्पादनाचा ‘ स्प्रोब ’ (एस्‌पीआर्ओबी) हा प्रकल्पही उभारण्यात आला आहे. उपग्रह सोडण्यासाठी रशियाच्या सहकार्याने जीएस्एल्व्ही (जिऑसिंकॉनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल)सारख्या नवीन मोठया यानांच्या विकसनाची तयारीही या केंद्रावर करण्यात आली आहे. १९९६ पासून पीएस्एल्व्ही(पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल)च्या साहाय्याने आय्आर्एस् (इंडियन रिमोट-सेन्सिंग सॅटेलाइट)ची क्षेपणेही या केंद्रावरून करण्यात येत आहेत. एप्रिल २००७ पर्यंत हवामान, दूरसंदेशवहन, कृषी, शैक्षणिक विकास यांसाठी तसेच पृथ्वीची त्रिमितीय छायाचित्रे घेण्यासाठी व व्यापारी तत्त्वांसाठी विविध उपग्रह येथून प्रक्षेपित करण्यात आले आहेत.

चौंडे, मा. ल.