हिमविदर : हिमनदीतील किंवा जमिनीवरील दुसऱ्या हिमराशीत पडलेल्या उघड्या व जवळजवळ उभ्या दिशेतील भेगेला (फटीला) हिमविदर म्हणतात. हालचालीने निर्माण होणाऱ्या ताणामुळे हिमविदर निर्माण होते. हिमविदर २० मी. पर्यंत रुंद, ४५ मी. पर्यंत खोल आणि शेकडो मी. लांब असू शकते. हिमनदीच्या दीर्घ अक्षाच्या संदर्भातील त्यांच्या स्थानांनुसार बहुतेक हिमविदरांना नावे दिली जातात. अशा प्रकारे संकोची ताण असलेल्या क्षेत्रांत (उदा., हिमनदी रुंद दरीतून अरुंद दरीत जाताना) अनुदैर्घ्य (समांतर) हिमविदरे निर्माण होतात. ही हिमविदरे हिमनदीच्या प्रवाहाला जवळजवळ समांतर असतात. हिमनदीची दरी अचानक रुंद झाल्यास हिमविदर हिमनदीच्या दोन्ही किनाऱ्यांकडे विस्तार पावते. ताण प्रतिबल असलेल्या क्षेत्रांत अनुप्रस्थ (आडवी) हिमविदरे तयार होतात. दरीच्या तळाचा उतार एकदम तीव्र झालेला असल्यास हिमनदीच्या रुंदीच्या आडव्या दिशेत हिमविदरे तयार होतात. जेव्हा हिमनदीचे मध्यवर्ती क्षेत्र तिच्या बाह्य कडांपेक्षा पुष्कळ अधिक गतीने हलत असते, तेव्हा किनारी भागात सीमांत वा सीमावर्ती हिमविदरे निर्माण होतात. माथाभेग किंवा हिमाद्रिशीर्षविदरहिमगव्हर व हिमनदीचे शीर्ष यांच्या दरम्यान तयार होते. हिमनदीच्या अंतिम सीमेलगत अनेक हिमविदरे एकमेकांना छेदू शकतात. यामुळे बर्फाची खडबडीत (दातेरी) शिखरे तयार होतात. त्यांना हिमविदर-तीव्र कटक (तीक्ष्ण शिखरे) म्हणतात. हिमविदरावर बर्फाच्या थराचा पूल तयार होऊन ते झाकले जाऊ शकते. असे बर्फाच्या पातळ थराने झाकलेले हिमविदर गिर्यारोहकांच्या दृष्टीने धोकादायक व घातकही ठरू शकते. जेव्हा हिमनदी कमी उताराच्या क्षेत्रावरून वाहते, तेव्हा हिमविदरे झाकली किंवा मिटली जाऊ शकतात.

गोडसे, एम्. व्ही.