राजस्थान राज्य : भारतातील एक घटकराज्य. भारताच्या वायव्य भागात असलेल्या या राज्याच्या पश्चिमेस व उत्तरेस पाकिस्तान, उत्तरेस व ईशान्येस भारतातील पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश ही राज्ये, पूर्वेस व आग्नेयीस मध्य प्रदेश राज्य आणि नैर्ऋत्येस गुजरात राज्य आहे. अक्षवृत्तीय विस्तार २३° ३’ ते ३०° १२’ उ. आणि रेखावृत्तीय विस्तार ६९° ३०’ ते ७८° १७’ पू.यादरम्यान. क्षेत्रफळ ३,४२,२१४ चौ. किमी. लोकसंख्या ३,४२,६१,८६२ (१९८१) पूर्व-पश्चिम लांबी ८५० किमी. व दक्षिणोत्तर रुंदी ७८४ किमी. क्षेत्रफळाच्या बाबतीत मध्य प्रदेश राज्याच्या खालोखाल राजस्थानचा देशात दूसरा क्रमांक लागतो. राजस्थानची १,०७० किमी. लांबीची पश्चिम सरहद्द ही भारत-पाकिस्तान या दोन देशांदरम्यानची आंतरराष्ट्रीय सरहद्द असून तिने राजस्थानातील गंगानगर,बिकानेर,जैसलमीर व बारमेर हे जिल्हे, पाकिस्तानातील बहावलपूर,खैरपूर व मीरपूर खास या जिल्ह्यांपासून अलग केले आहेत.जयपूर (लोकसंख्या ९,७७,१६५ – १९८१) ही राजस्थानची राजधानी होय.

भूवर्णन : प्राचीन प्रवाह अपक्षरण चक्र व अलीकडील वाळवंटी अपक्षरण चक्र यांमुळे राजस्थानची भूमी बनलेली आहे. प्राकृतिक दृष्ट्या राजस्थानचे वायव्य व आग्नेय असे दोन भाग पाडता येतात. हे दोन भाग ईशान्य-नैर्ऋत्य दिशेत पसरलेल्या अरवली पर्वतरांगेने पाडलेले आहेत. भारताचा विस्तीर्ण मैदानी प्रदेश व मध्यवर्ती उच्चभूमीचे प्रदेश या दोन प्रमुख विभागांमध्ये राजस्थानचा समावेश होतो. ‘पश्चिमी वालुकामय मैदान’ म्हणून ओळखला जाणारा अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील व वायव्येकडील भाग म्हणजे भारतीय मैदानी प्रदेशाचा पश्चिमेकडील विस्तारित प्रदेश आहे, तर अरवली पर्वताच्या पूर्वेकडील व आग्नेयीकडील प्रदेश हा मध्यवर्ती उच्चभुमीच्या उत्तरेकडील भागात मोडतो. राजस्थानमधील या दोन्ही प्राकृतिक विभागात विविध प्रकारचे भूविशेष आढळून येतात.

राज्यामध्ये आढळणाऱ्या भूमिस्वरूपांनुसार प्रमुख चार प्राकृतिक विभाग पाडले जातात व त्या प्रत्येकाचे आणखी उपविभागही दाखविले जातात : (१) पश्चिमेकडील वालुकामय मैदानी प्रदेश, (२) अरवली पर्वतश्रेणी व डोंगराळ प्रदेश, (३) पूर्वेकडील मैदानी प्रदेश, (४) आग्नेयीकडील राजस्थान पठार(हदोती पठार).

(१) अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील व वायव्येकडील प्रदेशाने राज्याचा बराचसा भाग व्यापलेला आहे. प्रदेशाची पूर्व सीमा ५० सेंमी. पर्जन्यरेषेने सीमित केलेली असून, पश्चिम सीमा भारत-पाकिस्तान दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीने, उत्तर सीमा पंजाबने, तर नैर्ऋत्य सीमा गुजरात राज्याने मर्यादित केलेली आहे. बहुतांश प्रदेश वालुकामय, ओसाड व विरळ लोकसंख्येचा आहे. अगदी पश्चिम भागातील वाळवंटामध्ये वालुकागिरी आढळतात. बारमेर, जैसलमीर व बिकानेर जिल्ह्यांत मोठमोठे वालुकागिरी आहेत. त्यांच्या पूर्वेकडील खडकाळ प्रदेशात वालुकागिरी आहेत. त्यांच्या पूर्वेकडील खडकाळ प्रदेशात वालुकागिरी आढळत नसून तेथे मात्र भूपृष्ठावर उघडे पडलेले खडक दिसतात. गाळाच्या खडकांमुळे या भागात भूमिगत पाणी सापडते. याच्या पूर्वेस निमओसाड प्रदेश असून, त्यामध्ये दक्षिण भागात लूनी नदीचे खोरे व उत्तर भागात दिडवाना, सांभर व इतर खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. २५ सेंमी. पर्जन्यरेषेला अनुसरून या प्राकृतिक विभागाचे दोन उपविभाग पडतात : (अ) वालुकामय ओसाड मैदान(मरुस्थली) व (ब) निमओसाड मैदान (राजस्थान बागड).

यांपैकी वालुकामय ओसाड मैदानाने मारवाड मैदानाचा बराचसा भाग व्यापला असून, त्यात बिकानेर, जैसलमीर,चुरू या जिल्ह्यांचा तसेच नागौर, बारमेर व जोधपूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागांचा समावेश होतो. या प्रदेशाच्या पश्चिम भागातील वालुकामय व ओसाड वाळवंटी प्रदेश म्हणजे थरचे वाळवंट. या प्रदेशात वाळूचे विस्तीर्ण पट्टे असून अधूनमधून खडकाळ भागही दिसतात. या भागात वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे गोलाकार स्कंधशिला, टॉर्स, गुहा,गोलाकार विवरे इ. व वाहत्या पाण्यामुळे निर्माण झालेले भूविशेष आढळतात. त्याचप्रमाणे वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे अन्वायाम वालुकागिरी, बारखान व अनुप्रस्थ वालुकागिरी यांची निर्मिती झालेली आढळते.

मरुस्थली प्रदेशाच्या पूर्वेस ईशान्य-नैर्ऋत्य दिशेत निमओसाड संक्रमक मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची पश्चिम सीमा २५ सेंमी. च्या समपर्जन्यरेषेने, तर पूर्वेकडील सीमा अरवली पर्वतश्रेणीची पश्चिम कड व ५०सेंमी. समपर्जन्यरेषेने सीमित केली आहे. या मैदानी प्रदेशाच्या पूर्व भागात वाळूचे संचयन झालेले असून, त्यातून प्राचीन खडकांचे माथे वर आलेले दिसतात. या मैदानी प्रदेशाचे (अ) लूनी खोरे (गोडवार पट्टा), (ब) अंतर्गत जलविकास मैदानी प्रदेश (शेखावती पट्टा) व (क) उत्तरेकडील घग्गर मैदान असे तीन उपप्राकृतिक विभाग पाडले जातात.

(२) अरवली पर्वतश्रेणी व डोंगराळ प्रदेश : अरवली ही राज्यातील प्रमुख पर्वतश्रेणी आहे. ईशान्येस दिल्लीपासून ते नैर्ऋत्येस गुजरातच्या मैदानी प्रदेशापर्यंत पसरलेल्या या पर्वतश्रेणीची एकूण लांबी सु. ६९२ किमी. आहे. तीपैकी राजस्थानच्या ईशान्य भागातील खेत्रीपासून नैर्ऋत्य भागातील खेडब्रह्मपर्यंतची तिची लांबी सु. ५५० किमी. आहे. मौंट अबूपासून अजमीर (अजमेर) पर्यंतची मुख्य, सलग व स्पष्ट अशी श्रेणी आहे. अजमीरच्या ईशान्येस या श्रेणीत अनेक तुटक खंड आढळतात. अरवली श्रेणीच्या वायव्येस राज्याचा सु. तीन-पंचमांश भाग, तर आग्नेयीस दोन-पंचमांश भाग येतो. अरवली पर्वतश्रेणी हा देशातील एक प्रमुख जलविभाजक आहे. गंगा नदीप्रणालीतील अनेक नद्या येथून उगम पावतात. अरवलीचा राजस्थानच्या हवामानावर तर परिणाम झाला आहेच त्याशिवाय पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशाच्या पूर्वेकडे होणारा विस्तारही थोपवून धरलेला आहे. अरवली ही एकेकाळी सर्वांत उंच असलेली व जगातील एक प्राचीन घडीची पर्वतश्रेणी समजली जाते. पर्वतश्रेणीची रुंदी सर्वत्र सारखी आढळत नाही. पर्वतश्रेणीचे मोठ्या प्रमाणावर खनन झालेले असले, तरी १,२२५ मी. पेक्षा अधिक उंचीची शिखरे अजूनही तिच्यात आहेत. राज्याच्या नैर्ऋत्य भागात अरवलीचा मुख्य भाग येतो. बबई (७८० मी.), खो (९२० मी.), रघुनाथगड (१,०५५ मी.) व तारागड (८७३ मी.) ही या श्रेणीतील मुख्य शिखरे आहेत. नैर्ऋत्य भागातील मौंट अबू येथील गुरुशिखर (१,७२७ मी.) हे राज्यातील सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतश्रेणीतच उदयपूरच्या वायव्य भागात १,२२५ मी. उंचीचे ‘भोरट पठार’ आहे. उष्ण व कोरड्या हवामानामुळे अरवली पर्वतश्रेणीतील ग्रॅनाइट, शिस्ट, स्फटिकमय खडकांना वैशिष्ट्यपूर्ण असे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. अरवलीच्या ईशान्येस विखंडित टेकड्यांच्या प्रदेश आहे. दिल्लीच्या दक्षिणेस असलेल्या या टेकड्यांची उंची सस.पासून ३०६ मी., तर सभोवतालच्या प्रदेशापेक्षा ६० ते ९० मी. असलेली आढळते. या टेकड्यांत स्फटिकमय खडक आढळतात.

(३) पूर्वेकडील मैदानी प्रदेश : हा प्राकृतिक विभाग अरवली पर्वतश्रेणीच्या ईशान्येस, पूर्वेस व आग्नेयीस असून, त्याची आग्नेय सीमा विंध्य पठाराने सीमित केलेली आहे. अरवलीच्या पूर्वेकडील हा प्रदेश मेवाड म्हणून ओळखला जातो. हा प्राकृतिक विभाग सुपीक असून त्यात डोंगररांगा, टेकड्या, रुंद दऱ्या, सुपीक टेबललँड, खडकाळ प्रदेश, सुपीक मैदानी प्रदेश, अरण्ये अशी नैसर्गिक विविधता आढळते. बनास खोरे व चप्पन मैदान असे या मैदानी प्रदेशाचे दोन उपविभाग पडतात. उदयपूरच्या पूर्वेकडील उदयसागर येथून भारतातील प्रचंड जलोत्सारण पट्टा पूर्व दिशेत गेलेला आढळतो. या जलोत्सारण पट्ट्याच्या उत्तरेस मेवाड व बनास मैदान तर दक्षिणेस चप्पन मैदान आहे. बनास मैदानाचा उतार पूर्वेकडे व ईशान्येकडे आहे. बनास व त्याच्या दक्षिणेकडील मेवाड मैदानाचे जलवाहन चंबळची उपनदी बनास व तिच्या उपनद्या करतात. खारी, सोद्रा, मोशी व मोरेल ह्या बनास नदीच्या डाव्या तीरावरील तर बेराच, बाजेन व गोलवा ह्या उजव्या तीरावरील प्रमुख उपनद्या या भागातून वाहतात. येथील जमीन खडकाळ व पातळ थराची आहे. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७३ सेंमी. आहे. नीस आणि ग्रॅनाइट खडकयुक्त रचनेच्या या प्रदेशात वेगवेगळे अपक्षरणजन्य भूविशेष निर्माण झालेले असून पश्चिम भागात नद्यांमुळे गाळाचे संचयन झालेले आढळते.

जलोत्सारण पट्ट्याच्या दक्षिणेस असलेल्या चप्पन मैदानाने आग्नेय उदयपूर, बांसवाडा व चितोडगढ या जिल्ह्यांचा दक्षिण भाग व्यापलेला आहे. या मैदानी प्रदेशाचे जलवाहन खंबायतच्या आखातातून अरबी समुद्राला मिळणाऱ्या मही नदीने केलेले आहे. मही व तिच्या उपनद्यांचे येथील ढाळमान दर चौ. किमी.ला ८ ते १२ मी. आहे. जास्त ढाळमानामुळे या नद्यांनी जलोत्सारण पट्ट्याच्या दक्षिणेकडील नीसयुक्त मैदानात बरेच खनन केलेले आढळते. त्यामुळे उत्तरेकडील मेवाडच्या मैदानापेक्षा या दक्षिणेकडील मैदानी प्रदेशातील भूमिस्वरूपात वेगळेपणा आढळतो. खननकार्य अधिक झालेले असून तेथे एकाकी टेकाडे पहावयास मिळतात. हा प्रदेश ‘बागर’ या स्थानिक नावाने ओळखला जातो. या विभागात बांसवाडा व डूंगरपूरमधील डोंगराळ प्रदेशाचाही समावेश होतो.

(४) आग्नेयीकडील राजस्थान पठार किंवा हदोती पठार : राज्याचा पूर्वेकडील चंबळ खोऱ्याचा प्रदेश या पठाराने व्यापलेला आहे. मेवाड मैदानाच्या आग्नेयीस असलेल्या ह्या प्रदेशाचा विस्तार पूर्वेस राजस्थान सरहद्दीच्याही बाहेर मध्य प्रदेश राज्यात झालेला दिसतो. या पठारी प्रदेशांच्या बहुतांश भागाचे जलवाहन चंबळ व तिच्या उजव्या तीरावरील काली सिंध, पारवान व पार्वती या उपनद्यांनी केलेले आहे. प्राकृतिक दृष्ट्या या पठारी प्रदेशाचे (अ) विंध्य कड्यांचा प्रदेश व (ब) दख्खनचे लाव्हा पठार, असे दोन ठळक विभाग पडतात. यांपैकी उत्तरेस बनास व चंबळ या नद्यांच्या दरम्यान असलेल्या विंध्य कड्यांच्या किंवा तीव्र उताराच्या प्रदेशाची (स्कार्पलँड) सरासरी उंची ३५० ते ५८० मीटरच्या दरम्यान आहे. या विभागात वालुकाश्म खडकरचना आढळते. पूर्वेकडे बुंदेलखंड भागातही या प्रदेशाचा विस्तार झालेला आहे.

दख्खनच्या लाव्हा पठाराचा राजस्थानातील प्राकृतिक विभाग पठार (खडकाळ) किंवा ‘अपरमाळ’ (अधिक उंचीचे पठार) या नावाने ओळखला जातो. हा रुंद व खडकाळ पठारी प्रदेश असून, त्याच्या तुटलेल्या कडांमुळे वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. येथील नद्यांच्या खोऱ्यांत शिलारसापासून बनलेल्या काळ्या जमिनीचा जाड थर आहे. खननकार्यामुळे वरचा थर झिजून त्याखाली असलेला प्राचीन भूप्रदेश उघडा पडलेला आहे. चंबळ व तिच्या काली सिंध व पार्वती या उपनद्यांनी मिळून या भागात त्रिकोणाकृती जलोढीय खोऱ्याची निर्मिती केलेली आहे.

मृदा : राज्यात वालुकामय, करडी व तपकिरी वालुकामय, तांबडी व पिवळी, लोहमय तांबडी, मिश्र तांबडी व काळी, मध्यम काळी व गाळाची मृदा असे मुख्य सात प्रकार आढळतात. राज्याचा सर्वाधिक प्रदेश वालुकामय मृदेने व्यापलेला आहे. अरवलीच्या पश्चिमेस पाकिस्तान सरहद्दीपर्यंतचा भाग वाळू, टेकाडे व जमिनीच्या पृष्ठभागावर आलेल्या खडकांनी व्यापलेला आहे. हा संपूर्ण पट्टा नापीक आहे. येथील मृदेत ९० ते ९५%  वाळू व ५ ते ७%माती असते. अरवलीच्या पश्चिम बाजूवर बारमेर, जालोर, जोधपूर, सिरोही, पाली, नागौर, सिकार व झुनझुनू या जिल्ह्यांत करडी व तपकिरी वाळवंटी मृदा आढळते. या मृदेची सुपीकता पूर्वेस आणि ईशान्येस वाढत जाते. ही मृदा लवणयुक्त व अल्कधर्मी असून, तीत फॉस्फेटचे प्रमण अधिक आढळते. उदयपूर, भिलवाडा व अजमीर जिल्ह्यांच्या पश्चिम भागांत तांबडी व पिवळी मृदा एकत्रितपणे आढळतात. यांत कार्बोनेट व ह्यूमसचे प्रमाण फारच कमी असते. या मृदेची ओलावा टिकवून धरण्याची क्षमता चांगली असते. उदयपूर जिल्ह्याच्या मध्य व दक्षिण भागांत तसेच डूंगरपूर जिल्ह्याच्या सर्व भागांत लोहयुक्त तांबडी मृदा आढळते. प्राचीन स्फटिकमय व रूपांतरित खडकांपासून ही मृदा तयार झालेली आहे. काळ्या मृदेपेक्षा या मृदेत चुनखडी, पोटॅश, लोह, फॉस्फरस, नायट्रोजन व ह्यूमस यांचे प्रमाण सामान्यपणे कमी असते. या मृदेची वेगवेगळ्या भागांतील खोली व सुपीकता यांत बरीच भिन्नता दिसते. उदयपूर, चितोडगढ, डूंगरपूर, बांसवाडा व भिलवाडा या जिल्ह्यांच्या पूर्व भागांत मिश्र तांबडी व काळी मृदा आढळते. राज्याच्या आग्नेय भागातील कोटा, बुंदी व झालवाड जिल्ह्यांत मध्यम काळी मृदा आढळते. तिची खोली अधिक आहे. तीत सेंद्रिय कार्बन व नायट्रोजन यांचे प्रमाण मध्यम असते. खालचा थर कॅल्शियमयुक्त असतो. राज्याच्या ईशान्य भागातील मुख्यतः अलवर, भरतपूर, जयपूर व सवाई माधोपूर जिल्ह्यांत व गंगानगर जिल्ह्याच्या मध्य भागात गाळाची मृदा आढळते. मृदा तांबड्या रंगाची असून तीत चुनखडी, फॉस्फोरिक अम्ल व ह्यूमस यांचा अभाव असतो. मृदेचा पोत चिकणमाती ते वालुकामय लोम स्वरूपाचा असतो. या मृदेत गहू, तांदूळ, कापूस, तंबाखू अशी विविध पिके काढली जातात.

खनिजे : राजस्थान हे भारतातील खाणकामाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. सुरुवातीला खाणकाम व्यवसाय केवळ बांधकामाच्या दगडापुरताच मर्यादित होता. नंतर अभ्रकाच्या उत्पादनास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषतः संस्थानांच्या विलीनीकरणानंतर, इतरही खनिजांच्या उत्खननास सुरुवात झाली. बांधकामाचे रंगी-बेरंगी दगड, रस्त्यासाठी वापरण्याची खनिजे, वैदूर्य, बेंटोनाइट, कॅल्साइट, चिनी माती, लिग्नाइट, जिप्सम, जस्त, शिसे, चुनखडक, फेल्स्पार, मँगॅनीज, मीठ, अभ्रक, चांदी, तांबे, टंगस्टन ही राज्यातून मिळणारी प्रमुख खनिजे आहेत. कोळसा व लोहधातुक यांचा येथे अभाव आहे.

नद्या व सरोवरे : अरवली पर्वत व भारतीय महाजलविभाजकाचे स्थान यांचा परिणाम राजस्थानच्या नदीप्रणालीवर झालेला आढळतो. भारतीय महाजलविभाजकामुळे राज्यातील नद्या बंगालच्या उपसागराला मिळाणाऱ्या व अरबी समुद्राला मिळणाऱ्या अशा दोन गटांत विभागल्या गेल्या आहेत. हा जलविभाजक प्रामुख्याने अरवली पर्वताच्या मुख्य श्रेणीला अनुसरून, सांभर सरोवरापासून दक्षिणेस अजमीरपर्यंत व तेथून पुढे उदयपूर शहराच्या नैर्ऋत्य भागापर्यंत पसरलेला आहे. तेथूनही पुढे पश्चिमेस, आग्नेयीस वा दक्षिणेस विस्तार आढळतो. अरवलीच्या पश्चिम व दक्षिण भागांचे अरबी समुद्राला मिळणाऱ्या छोट्याछोट्या नद्यांनी जलवाहन केले आहे. लूनी, सुक्री, बनास, साबरमती व मही ह्या त्यांपैकी महत्त्वाच्या नद्या आहेत. यांतील बहुतेक नद्या राजस्थानमधून दक्षिणेकडे गुजरात राज्यात वाहत जातात. या जलविभाजकाच्या पूर्व भागात बनास नदी पूर्वेस वहात जाऊन चंबळ या यमुना नदीच्या उपनदीला मिळते. बनासच्या खारी, मोशी व मोरेल या डाव्या तीरावरील, तर बेराच, बाजासेन व गोलवा उजव्या तीरावरील मुख्य उपनद्या आहेत.

राजस्थानचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सु. ६०% प्रदेशात अंतर्गत नदीप्रणाली असून, ती प्रामुख्याने अरवलीच्या पश्चिम भागात आढळते. या भागात कांती, सोद्रा, साहिबी, बराह व लूनी या नद्यांची खोरी आढळतात. या सर्व खोऱ्यांमधील नद्यांचे पाणी वाळवंटी प्रदेशातच आटून गेलेले दिसते. पूर्वी बिकानेरच्या उत्तर भागातून घग्गर नदी वहात असे. आज मात्र तिचे पात्र वाळवंटात लुप्त झालेले दिसते. अजमीरजवळील अनासागर येथे उगम पावणारी लूनी हीच या भागातील महत्त्वाची नदी. ती उगमानंतर अरवलीच्या पश्चिमेकडील जोधपूर, बारमेर व जालोर या जिल्ह्यांतील निमओसाड प्रदेशातून ३२ किमी. नैर्ऋत्येस वाहते. उगमाकडील जलवाहनक्षेत्र केवळ ३२ चौ. किमी. आहे. पुष्कर दरीतून वाहत आलेली एक छोटी उपनदी मिळाल्यानंतर लूनी नदीचे खोरे रुंदावलेले दिसते. नदीचे एकूण जलवाहनक्षेत्र ३४,६८८·४० चौ. किमी. आहे. वर्षातील बहुतांश काळ नदीचे पात्र कोरडे असते. केवळ पावसाळ्यातच नदीला पाणी असते. परंतु तेही पात्रातील वाळूच्या संचयनामुळे अनेक ठिकाणी अडते. अरवलीच्या पश्चिम उतारावरून वहात येणारे लाखारी, धुलिआ, सुक्री, जवाई, जोजरी, सागई यांसारखे डोंगराळ प्रदेशातील अनेक लहान प्रवाह लूनीला डावीकडून येऊन मिळतात. बालोत्रापर्यंतचे नदीचे पाणी गोड आहे. परंतु त्यानंतर पुढे कच्छच्या रणापर्यंतचे पाणी अधिकाधिक खारट बनत जाते. जोधपूर जिल्ह्यात नदीच्या पात्राची रुंदी अधिक वाढलेली दिसते.

राजस्थानच्या दक्षिण व पूर्व भागांत, तसेच अरवलीच्या दक्षिण, आग्नेय व पूर्व भागांत पर्जन्यमान ८० सेंमी. असल्यामुळे तेथे काही महत्त्वाचे प्रवाह आढळतात. ⇨चंबळ हीच त्यांतील आणि राज्यातील सर्वांत मोठी व वर्षभर पाणी असणारी नदी आहे. बनास, काली सिंध, कुराई व पार्वती ह्या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. राज्यात चौरासीगढपासून कोटापर्यंत चंबळ नदी ११३ किमी. अंतर निदरीतून वहात जाते. कोटापासून पुढे गेल्यावर नोनेरा गावाजवळ काली सिंध ही प्रमुख उपनदी तिला येऊन मिळते. तेथून पुढे ४८ किमी. वर पार्वती ही उपनदी मिळते. येथपासून पुढे ती राजस्थान व मध्य प्रदेश राज्यांच्या सरहद्दीवरून सु. २४१ किमी. वाहते. जयपूर जिल्ह्यात उगम पावणारी बाणगंगा नदी भरतपूर व धोलपूरमधून सामान्यपणे पूर्वेस वाहत जाऊन यमुनेला मिळते.

बनास ही नदी मेवाड मैदानाच्या मध्यातून वाहते. बेराच, कोठारी, खारी, धुंड व मोरेल ह्या बनासच्या प्रमुख उपनद्या आहेत. अरवलीतील कांक्रोळी व नाथद्वार यांदरम्यानच्या जलवाहनक्षेत्रात कुंभालगड किल्ल्याजवळ उगम पावून मंडलगडपर्यंत ती पूर्वेस वाहते. त्यानंतर टोंकपर्यंत ती ईशान्येस वाहते. तेथून ती पुन्हा पूर्वेस वळते व शेवटी दक्षिणेस काटकोनात वळून चंबळला मिळते. नदीचे वरचे खोरे डोंगराळ व जास्त पर्जन्यमानाचे आहे.

येथील महत्त्वाचे ⇨सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. दिडवाना हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून राज्यात कृत्रिम सरोवरे खूप आहेत. त्या दृष्टीने उदयपूर जिल्हा महत्त्वाचा आहे. उदयपूरच्या आग्नेयीस ४८ किमी. व समुद्रसपाटीपासून २९४ मी. उंचीवर जयसमंद हे विस्तीर्ण तसेच निसर्गसुंदर असे कृत्रिम सरोबर आहे. राणा दुसरा जयसिंह याने १६८५ ते १६९१ यांदरम्यान, बारमाही वाहणाऱ्या गोमती नदीवर बांधलेल्या भव्य धरणामुळे हे सरोवर निर्माण झाले आहे. उदयपूरच्या ईशान्येस ६० किमी. वर राजसमंद सरोवर आहे. १६६२ ते १६७९ या काळात राणा पहिला राजसिंह याने बांधून घेतलेल्या धरणामुळे ते तयार झाले आहे. याशिवाय पिचोला व फत्तेसिंह ही जिल्ह्यातील दोन जुनी व सुंदर सरोवरे आहेत. अर्नोराजा किंवा अनाजी यांनी ११३५ ते ११५० या काळात बांधलेले अनासागर सरोवर तसेच पुष्कर, विशालसागर व फॉयसागर (फॉय या ब्रिटिश कार्यकारी अभियंत्याच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेले नाव) ही अजमीर जिल्ह्यातील महत्त्वाची व सुंदर सरोवरे आहेत. जोधपूरमधील बालसमंद व सरदारसमंद, अलवरमधील जयसमंद ही उल्लेखनीय सरोवरे आहेत. मौंट अबू येथे नखी तलाव असून त्यामुळे मौंट अबूच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.

हवामान : सामान्यपणे अरवलीच्या पश्चिम भागात इतर वाळवंटी व अर्धवाळवंटी प्रदेशांप्रमाणे जास्त तपमानकक्षा, दीर्घकालीन तीव्र दुष्काळी परिस्थिती, वेगवान वारे व कमी सापेक्ष आर्द्रता अशी हवामानाची परिस्थिती आढळते. हिवाळे अगदी थंड असतात. अनेक ठिकाणी हिवाळ्यात तपमान गोठणबिंदूखाली जाते व हिमतुषार निर्माण झालेले दिसतात. याउलट उन्हाळ्यात अतिभयंकर उष्णता असते. पश्चिम राजस्थानचा ओसाड प्रदेश हा भारतातील सर्वांत उष्ण हवामानाचा प्रदेश आहे. अरवलीच्या पूर्वेस व दक्षिणेस तपमान व पर्जन्याचे वितरण यांत खूपच तफावत आढळते.

डिसेंबर ते फेब्रुवारी हिवाळा असतो. जानेवारीत सर्वांत कमी तपमान असते. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड पश्चिमी वाऱ्यामुळे राज्याच्या वायव्य भागात तपमान कधीकधी गोठणबिंदूच्या खाली २° ते ५° से. जाते. मार्चच्या मध्यापासून तपमानात वाढ होऊ लागते. एप्रिल ते जून उन्हाळा ऋतू असून मे महिन्यात सर्वाधिक तपमान असते. राजस्थानच्या बहुतांश भागात मे महिन्यातील तपमान ४०° ते ४२° से. असते. कोरडी हवा, निरभ्र आकाश व वालुकामय मृदा यांमुळे सूर्यांस्तानंतर उष्णतेने विकिरण अत्यंत जलद गतीने होऊन रात्रीचे तपमान एकदम घटते. होरपळून काढणारी उष्णता व उष्ण वारे यांमुळे दिवसा हवा कमालीची असह्य असते. अधूनमधून येणाऱ्या धुळीच्या वादळांमुळे तपमान एकदम कमी होते. उन्हाळ्यात कधीकधी झंझावात व त्याबरोबर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे होरपळून काढणाऱ्या उष्णतेपासून तात्पुरता का होईना आराम मिळतो.

मोसमी वारे सुरू झाल्यावर आणि त्यांबरोबर येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे राज्याच्या दक्षिण भागातील तपमान कमी होते. परंतु उत्तरेकडील वाळवंटी प्रदेशात तपमान जास्तच असते. पूर्वीपेक्षा ते थोडेसे कमी झालेले असते. सप्टेंबरच्या मध्यापासून मोसमी वारे थांबल्यानंतर पुन्हा उष्णता वाढलेली असते. ही स्थिती ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राहते.

राजस्थानामधील पर्जन्याचे वितरण फारच असमान झालेले दिसते. अरवली टेकड्यांच्या पश्चिमेकडील भागापेक्षा पूर्वेकडील भागात पर्जन्यमान अधिक असते. पश्चिम राजस्थानमध्ये पाऊस फारच कमी पडतो. नैर्ऋत्येकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांपासून येथे थोडा पाऊस मिळतो. जगातील काही कोरड्या प्रदेशांमध्ये याची गणना होते. येथील वेगवेगळ्या ठिकाणांचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १७ सेंमी. ते ३७ सेंमी. यांदरम्यान आढळते. पावसाचे ढग या उष्ण वाळवंटी प्रदेशात पोहोचण्यापूर्वीच काठेवाड पर्वतश्रेण्या व अरवलीच्या उतारांवरील भागांत त्यांतील बाष्प संपलेले असते. नैर्ऋत्य भागातील अरवली उच्चभूमीच्या प्रदेशात तसेच आग्नेय राजस्थानमध्ये पावसाचे प्रमाण खूपच अधिक असते. राजस्थानच्या दक्षिण भागातही पुरेसा पाऊस पडतो. उदयपूर, कोटा व झालवाड येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान अनुक्रमे ६३·६१ सेमी., ७८·५६ सेंमी. आणि १०८·९३ सेंमी. आहे. मध्य भागात-साधारणतः अजमीर ते जयपूर यांदरम्यानच्या प्रदेशात-पर्जन्यमान फारच अनियमित आढळते. वार्षिक पर्जन्यमान अजमीर येथे ५२ सेंमी. व जयपूर येथे ५९·७९ सेंमी. आहे. वायव्येकडे आणि उत्तरेकडे पर्जन्यमान कमीकमी होत गेलेले दिसते.

वनस्पती व प्राणी : राज्याचे १२·७% क्षेत्र वनाच्छादित आहे. पश्चिमेकडील वालुकामय ओसाड प्रदेशात अतिशय तुरळक वनस्पती आढळतात, तर अरवलीच्या पूर्वेकडील व आग्नेयीकडील प्रदेशात मिश्र पानझडी व उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये आढळतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस राज्यातील त्यावेळच्या संस्थानांनी वनसंवर्धनाच्या वेगवेगळ्या योजना आखलेल्या होत्या. वालुकामय भूमी व अल्प पर्जन्यमान यांमुळे वाळवंटी प्रदेशात केवळ खुरट्या व काटेरी वनस्पती आढळतात. अगदी पश्चिमेकडील २० सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्य असलेल्या जैसलमीर, बारमेर आणि बिकानेर जिल्ह्यांत व गंगानगर जिल्ह्याच्या काही भागात काटेरी वनस्पती तुरळक प्रमाणात आढळतात. काही ठिकाणी गवताळ भाग दिसतात. मौंट अबूच्या परिसरात भरपूर पर्जन्यवृष्टी होत असल्याने तेथे दाट वनश्री आढळते. येथील १,०७० ते १,३७५ मी. उंचीच्या व साधारण १५० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये आढळतात. या प्रकारच्या अरण्यांखालील क्षेत्र बरेच कमी आहे. राज्याच्या दक्षिण भागात-बांसवाडा वन विभागात-साग वृक्षांचे प्रमाण सर्वाधिक (६०% ते ९०%) आहे. अरवली टेकड्यांच्या आग्नेय भागात घावडा वृक्षांचे प्रमाण बरेच असून, जळाऊ लाकूड म्हणून व लोणारी कोळसा तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. उदयपूरच्या बहुतांश भागात तसेच कोटा, बुंदी, चितोडगढ व सिरोही जिल्ह्यांच्या काही भागांत मिश्र पानझडी अरण्ये आहेत. अलवर, चितोडगढ, उदयपूर, सिरोही, अजमीर, जोधपूर व जयपूर या जिल्ह्यांच्या काही भागांत सालई वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. नद्यांच्या खोऱ्यांत व काळ्या सुपीक जमिनीच्या प्रदेशात पळस वृक्ष अधिक आहेत. साग वृक्षांच्या प्रदेशातही हा वृक्ष आढळतो. जोधपूर, जयपूर व अजमीर जिल्ह्यांतील २५ ते ५० सेंमी. पर्जन्याच्या प्रदेशात, उंचसखल भागांत टेकड्यांच्या उतारांवर उष्णकटिबंधीय काटेरी वनस्पती पहावयास मिळतात.

लेखक : चौधरी, वसंत

इतिहास : अतिप्राचीन काळी या राज्याच्या मारवाड प्रदेशात समुद्र असावा, असे भूगर्भतज्ञांचे मत आहे. लूनी नदीच्या खोऱ्यात मध्याश्मयुगातील अवशेष सापडले आहेत. उदयपूरजवळील आहाड नदीकाठच्या उत्खननात तांब्याची हत्यारे, मृत्तिकापात्रे, भगवान-पुऱ्याजवळ विटांची घरे इ. अवशेष सापडले. घग्गर नदीकाठी आणि ⇨कालिबंगा येथील उत्खननांतील अवशेषांवरून येथे हडप्पापूर्वकाळी वस्ती हाती, असे सिद्ध झाले आहे. त्यावरून सु. ३७०० वर्षांपूर्वी येथे सुसंस्कृत मानव राहत होता असे दिसते.

ऋग्वेदात मरू (माखाद) आणि मत्स्या (जयपूर, भरतपूर) यांचा उल्लेख आहे, तर महाभारतात त्याखेरीज कुरू जाङ्गल-मद्र जाङ्गल (उत्तर आणि वायव्य राजस्थान), शाल्ब (अलवर), शूरसेन (ईशान्य राजस्थान) आणि शिबी (मेवाड) या जनपदांचा उल्लेख आहे. शतपथ ब्राह्मण, अंगुत्तरनिकाय  इ. ग्रंथांतही मत्स्यप्रदेशाचा उल्लेख आहे. ग्रीक लेखक शूरसेन जनपदाचा उल्लेख करतात परंतु राजस्थानच्या निश्चित इतिहासाला प्रारंभ मौर्यकाळापासूनच होतो. सम्राट अशोकाचे दोन शिलालेख बैराट (जयपूर जिल्हा) येथे सापडले आहेत. त्यांवरून या प्रदेशाचा अंतर्भाव त्याच्या साम्राज्यात होत असावा. मौर्यांचा ऱ्हास झाल्यावर मालव, अर्जुनायन, यौधेय या जमातींनी येथे वर्चस्व मिळविले आणि गणराज्ये स्थापन केली. इ. स. पू. २०० च्या सुमारास बॅक्ट्रियन ग्रीकांनी चितोडजवळील मध्यमिका नगरी जिंकली. त्यांची नाणी मेवाडात सापडली आहेत. इ. स. दुसऱ्या ते चौथ्या शतकापर्यंत राजस्थानच्या काही भागात शकांचा अधिकार होता. शक नरेश रूद्रदमनच्या गिरनार शिलालेखात (इ. स. १५०) मरुभूमीचा उल्लेख असून त्यात यौधेयांचा पराभव केला असे म्हटले आहे. यानंतरच्या कुशाणांच्या स्वाऱ्याना यौधेयांनी प्रतिकार केला. चौथ्या शतकाच्या अखेरीपासून सहाव्या शतकापर्यंत मगधाच्या गुप्त सम्राटांचे राज्य या भागात होते. सहाव्या शतकाच्या मध्यास नैर्ऋत्य भागात मंदसोरच्या यशोधर्म्याने आणि जोधपूर भागात हरिश्चंद्राने गुर्जर-प्रतीहारांची सत्ता स्थापन केली. सातव्या शतकाच्या पूर्वार्धातील राजस्थान हा गुर्जर, वधारी, वैराट आणि मथुरा या चार भागांत विभागलेला ह्यूएनत्संग या चिनी प्रवाशाला आढळला. सातव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत राजपुतांचे प्रमुख वंश या प्रदेशात आले. सातव्या शतकात गुहिलोत (सिसोदिया), आठव्या शतकात प्रतीहार, चाहमान (चौहान), भाटी (जैसलमीरचे), दहाव्या शतकात परमार, सोळंकी या वंशांनी राजस्थानच्या वेगवेगळ्या भागांत सत्ता प्रस्थापिली. कच्छवांनी बाराव्या शतकाच्या सुरुवातीस अंबरला, तर कनौजच्या राठोडांनी तेराव्या शतकाच्या प्रारंभी मारवाडातून सत्ता स्थापली.

या वेगवेगळ्या राजपूत घराण्यांनी आठव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत गुर्जर-प्रतीहारांचे सामंत या नात्याने इस्लामी आक्रमणाला तोंड दिले, त्यात मंडोरचे प्रतीहार, शाकंभरी (अजमीर) आणि नाडोलचे चाहमान, मेवाडचे गुहिलोत व दिल्ली भागात वर्चस्व स्थापणारे तोमर प्रमुख होत. दहाव्या शतकाच्या अखेरीस गुर्जर-प्रतीहारांची सत्ता क्षीण झाली आणि शाकंभरीचे चाहमान स्वतंत्र झाले. अकराव्या व बाराव्या शतकांमध्ये चाहमान, गुजरातचे चालुक्य आणि माळव्याचे परमार यांत राजस्थानावरील वर्चस्वासाठी संघर्ष चालू राहिला. या संघर्षात नाडोलचे चाहमान, अबूचे परमार व मेवाडच्या गुहिलोतांचा भाग दुय्यम पण महत्त्वाचा होता. चाहमानांनी गझनीकडून होणाऱ्या मुसलमानी स्वाऱ्याना शौर्याने तोंड दिले, तरी संघटित प्रतिकाराच्या अभावामुळे गझनीचा महमूद यशस्वी झाला. राजस्थानमध्ये इस्लामचा चंचुप्रवेश मुहम्मद घोरीमुळे शक्य झाला. दिल्लीच्या तोमर राजपुतांचा पराभव करून शाकंभरीचे चाहमान प्रबल झाले होते. त्यातल्या तिसऱ्या पृथ्वीराजाचा मुहम्मद घोरीने तराईच्या लढाईत संपूर्ण पराभव केला (१९९१). तेराव्या व चौदाव्या शतकांत कुत्बुद्दीन ऐबक, अल्तमश, अलाउद्दीन खल्जी यांनी चितोड जिंकले. राणी पद्मिनीने जोहार केला (१३०३) तथापि दिल्लीच्या सुलतानांना हे किल्ले आपल्या ताब्यात फार काळ ठेवता आले नाहीत. त्यांच्यामुळे राजस्थानभर राजपुतांची सत्ता विखुरली एवढेच. चौदाव्या शतकात राजस्थानला दिल्लीच्या सुलतानांपेक्षा माळवा आणि गुजरात येथे स्थापन झालेल्या मुसलमान सत्तांकडून जास्त धोका होता. त्यांच्याशी सतत युद्धे करून मेवाडच्या ⇨राणा कुंभाने सिसोदियाचे महत्त्व वाढविले. राणा संगाने (कार. १५०९–२८) या सुलतानांचा पराभव करून राजस्थानचा बराच भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला. त्याने दिल्लीच्या इब्राहीम लोदीचाही पराभव केला होता.

राणा संगाची सत्ता परमोत्कर्षाला पोचली असता इब्राहीम लोदीविरुद्ध पानिपतची (पहिली) लढाई जिंकून (१५२६) बाबरने दिल्ली हस्तगत केली आणि फतेपुर सिक्रीजवळच्या लढाईत विशिष्ट युद्धपद्धतीने राणा संगाचाही पराभव केला (१५२७). एव्हापासून मेवाडला संरक्षक पवित्रा घ्यावा लागला पण मोगल सत्ता राजस्थानात लगेच स्थिर झाली नाही. गुजरातच्या बहादुरशाहने संधी साधून चितोडवर चढाई केली (१५३२). राणी कर्मवतीने हुमायूनची मदत मागितली, पण तो स्वस्थच राहिला. हुमायूनच्या शेरशाहबरोबर लढाया चालू असता मारवाडच्या मालदेवाने जोधपूर राज्य भरभराटीस आणले. हुमायूनचा पराभव केल्यावर शेरशाहने मारवाडवर आक्रमण केले पण त्याचे वर्चस्व अल्पकालीन राहिले. मोगल सत्ता राजस्थानवर स्थापण्याचे काम अकबराचे. त्यासाठी त्याने प्रथम अजमीर, कालिंजर, चितोड, रणथंभोर असे महत्त्वाचे किल्ले जिंकले. बुंदीशी सन्माननीय तह केला. अंबर (जयपूर), जोधपूर, बिकानेर, जैसलमीर या राजघराण्यांशी सोयरिकी केल्या. राजपुतांच्या शौर्याचा आणि कर्तृत्वाचा साम्राज्य विस्तारासाठी आणि शासनासाठी उपयोग करून घेतला. अंबरचे घराणे यामुळेच भरभराटीला आले. मेवाडचा राणाप्रताप मात्र याला अपवाद ठरला आणि त्याने निकराने लढा चालू ठेवला. पुढे हळदीघाटाच्या लढाईत (१५७६) त्याचा पराभव झाला तरी मृत्यू पूर्वी (१५९७) मेवाडचा बहुतेक भाग परत मिळवण्यात राणाप्रताप यशस्वी झाला होता. त्यानंतर जहांगीरने मेवाडवर मोगली वर्चस्व स्थापण्यात यश मिळवले (१६२४). जहांगीर आणि शाहजहान या दोघांच्याही माता राजपूत असल्यामुळे राजपूत मोगल संबंधांचा परस्परसंस्कृतींवर परिणाम झाला आणि काही काळ राजस्थानला राजकीय स्थैर्य लाभले. औरंगजेबाने इस्लाम धर्माचा पुरस्कार करणारे धोरण अंगीकारले. शिवाजींबरोबरच्या संघर्षात तसेच काबूल, कंदाहारकडील लढायांत मिर्झा राजा जयसिंह, महाराणा जसवंतसिंह यांचा त्याने उपयोग करून घेतला पण जझिया कर लादून राजपुतांचे शत्रुत्व ओढवून घेतले. जसवंतसिंहाच्या मृत्यूनंतर (१६७८) त्याने लगेचच मारवाडवर आक्रमण केले. दुर्गादास राठोडच्या नेतृत्वाखाली मारवाडने सतत पंचवीस वर्षे संग्राम केला. सुरुवातीला मेवाडच्या राजसिंहानेही त्यात भाग घेतला पण १६८१ मध्ये तह केला. या युद्धात औरंगजेबाचा मुलगा शाहजादा अकबर हा काही काळ राजपुतांना मिळाल्यामुळे औरंगजेबाची बाजू प्रारंभी लंगडी पडली आणि अखेर मारवाड स्वतंत्रच राहिले.

अठराव्या शतकात मोगल सत्तेच्या अपकर्षाबरोबरच राजपूत राज्यांच्या आपापसांतील संघर्षामुळे ऱ्हासाला सुरुवात झाली. जयपूरचा सवाई जयसिंग, मारवाडचा अभयसिंग इत्यादींनी मोगल दरबारात आपले वर्चस्व ठेवले, तरीसुद्धा गृहकलह, सत्तास्पर्धा आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केलेल्या लढाया यांमुळे एकूण राजपुतसत्ता निर्बल झाली आणि पहिल्या बाजीरावाच्या आक्रमक धोरणापुढे ही राज्ये टिकाव धरू शकली नाहीत. १७२४ पासूनच मराठ्यांच्या मेवाड-मारवाडवर स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या माळव्यात अंमल बसल्यावर राजपूत राज्यांवर अंमल गाजवायला त्यांना संधी मिळाली. १७३४ मध्ये बुंदीच्या राज्याने सवाई जयसिंगाविरुद्ध मल्हारराव होळकरांची मदत घेतली. मराठ्यांच्या वाढत्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी राजपूत राज्यांनी एकजूट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण आपसांतील दुहीमुळे तो फसला. यानंतर अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत शिंदेहोळकरांनी राजस्थानवर स्वामित्व गाजविले. मारवाड, मेवाड, जयपूर या प्रमुख राज घराण्यांतील गादीच्या तंट्यांमुळेच मराठ्यांचा राजस्थानात सहजासहजी प्रवेश झाला. तंटे मिटविण्यासाठी शिंदे होळकरांनी खंडण्या उकळल्या. या अंतःकलहाचा फायदा घेऊन जाटांनी भरतपूरला तर माचेडीचा जमीनदार प्रतापसिंग नारूकाने अलवरला स्वतंत्र राज्ये स्थापन केली. तिसऱ्या पानिपतच्या लढाईनंतर (१७६१) जयपूरच्या माधोसिंगने डोके वर काढायचा प्रयत्न केला पण तो होळकरांमुळे सफल झाला नाही. पुढे अठराव्या शतकातच महादजी शिंद्यांच्या कवायती फौजांपुढेही राजपूत राजे टिकाव धरू शकले नाहीत. मेवाडची राजपुत्री ⇨कृष्णाकुमारीसाठी राजपूत राज्यांत झालेल्या कलहाने कळस गाठला आणि अमीरखान पेंढाऱ्याला लुटालुटीला वाव मिळाला. परिणामतः एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला राजपूत राज्यात शिरकाव करण्याचे निमित्त मिळाले. याचवेळी शिंद्यांचा पराभव झाल्याने इंग्रजांना संधी मिळाली (१८०३). राजस्थानच्या रणभूमीत यशवंतराव होळकरने इंग्रजांविरुद्ध दाखवलेले युद्धचातुर्यही तात्कालिक स्वरूपाचे ठरले (१८०३-४) कारण अलवर-भरतपूरने कंपनीशी तह केलेच होते (१८०३) लॉर्ड हेस्टिंग्जने आक्रमक धोरण आखून प्रथम टोंकचे संस्थान पेंढाऱ्यासाठी निर्माण करून त्यांचा बंदोवस्त केला (१८१७) बाकीच्या संस्थानांशी हळूहळू तह करून इंग्रजांनी खंडणीच्या मोबदल्यात त्यांच्या संरक्षणाची हमी घेतली. गादीचे तंटे मिटवणे, सुव्यवस्था इ. निमित्ताने कंपनीच्या फौजांचा राजपूत संस्थानांत आपापतः हस्तक्षेप होत राहिला (भरतपूर –१८२६, बुंदी –१८३०, करौली –१८३३, जोधपूर –१८३९, उदयपूर – १८४१). कोट्याचा राजा आणि मंत्री यांच्यातील संघर्ष कंपनी सरकारने झालवाड हे स्वतंत्र संस्थान निर्माण करून मिटविला (१८३८). १८५७ च्या उठावात नासिराबाद, जोधपूर, मेवाड, कोटा इ. संस्थानांतील शिपायांच्या बंडाळ्या संस्थानिकांच्या मदतीने इंग्रजांनी मोडून काढल्या. ⇨ राणीच्या जाहीरनाम्यानंतर १८३२ मध्ये ब्रिटिशांनी सर्व संस्थानांना नव्या सनदा करून देऊन दत्तकाचा अधिकार मान्य झाला. ब्रिटिश शासनाने शांततेबरोबर सुव्यवस्थेची व मांडलिक संस्थानांच्या संरक्षणाची हमी घेतली.

पहिल्या जागतिक महायुद्धात या संस्थानांतून इंग्रजांना आर्थिक व सैनिकी मदत मिळाली. जाट-राजपूत सैनिकांना आधुनिक जगाचा त्यामुळे परिचय झाला पण व्हाइसरॉयचा एजंट-जनरल, त्याच्या हाताखालचे रेसिडेंट एजंट इ. ब्रिटिश अधिकाऱ्यांची संस्थानांवरील मगरमिठी पक्की होत गेली. १९२१ मध्ये उदयपूरच्या महाराजांना तडकाफडकी पदच्युत करण्यात आले. त्याच वर्षी स्थापन झालेल्या नरेंद्र-मंडळाचा फायदा फक्त अलवर-बिकानेरने घेतला. खालसा मुलुखातल्या वृत्तपत्रांतून संस्थानांच्या बेजबाबदार कारभारावरील टीकेची मुस्कुटदाबी करण्यासाठी कायदा मंजूर झाला (१९२२). या संदर्भातील बटलर कमिटीने प्रजेची गाऱ्हाणी नोंदवूनसुद्धा घेतली नाहीत (१९२९). १९३५ च्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या स्वायत्त संघराज्यात राजपूत संस्थाने नव्हती. १९३० नंतर हळूहळू बऱ्याच संस्थानांतून प्रजामंडळे स्थापन झाली, त्यांना फारसे अधिकार नव्हते. तरीही विसाव्या शतकातील खालसा भागातील राजकीय जागृतीचे वारे राजस्थानला लागले. १९१५ च्या अगोदर विजयसिंग पाठक, अर्जुनलाल सेठी इत्यादींनी सशस्त्र चळवळीचा अयशस्वी प्रयत्न केला. बिजोलिया (उदयपूर) जहागिरीतील किसानांनी चळवळ करून वेठबिगार पद्धती बंद पाडली. राजपुताना-मध्यभारत सभेने तरुण राजस्थान, नवीन राजस्थान अशी काही नियतकालिके चालविली पण ती अल्पकालीन ठरली. ही नियतकालिके आणि राजस्थान सेवा संघ (१९२१) यांमुळे राजकीय जागृती झाली. मारवाड हितैषी सभा राजस्थान सेवा संघाला संलग्न होती. आर्यसमाज, राजस्थान सेवामंडल (१९३० – ३५) इत्यादींमुळे जनतेला हक्कांची जाणीव होण्यास मदत झाली. संस्थानी प्रजेच्या चळवळीत प्रत्यक्ष हस्तक्षेप करावयाचा नाही, असे काँग्रेसचे सर्वसाधारण धोरण होते तथापि १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाचा राजस्थानवरही परिणाम झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७ मध्ये काही स्थावरजंगम मिळकत कायम ठेवून आणि तनख्यांच्या नेमणुका मान्य करून भारतीय संघराज्यात विलीन व्हायला संस्थानिकांनी मान्यता दिली.

पहा : गुहिलोत घराणे; चाहमान घराणे; प्रतीहार घराणे; राजपुतांचा इतिहास.

लेखक : कुलकर्णी, ना. ह.

राजकीय स्थिती : राजस्थान राज्याची जडण-घडण अनेक माजी राजपूत संस्थानांचे एकीकरण करून झाली आहे. या प्रक्रियेला स्वातंत्र्यानंतर जवळजवळ आठ वर्षे लागली. सुरुवातीस १८ मार्च १९४८ रोजी अलवर, भरतपूर, धोलपूर आणि करौली या चार संस्थानांचा मत्स्यसंघ स्थापन करण्यात आला. नंतर बांसवाडा, बुंदी, डूंगरपूर, झालवाड, किशनगढ, कोटा, परताबगढ, शाहपुरा आणि टोंक या नऊ संस्थानांचा आणि लोवा-कुशालगढच्या जहागिरी मिळून राजस्थान संघ अस्तित्वात आला (२५ मार्च १९४८). त्यानंतर उदयपूर या संघात सामील झाले. त्यामुळे त्यास राजस्थानची संयुक्त संस्थाने हे नाव देण्यात आले. पुढे बिकानेर, जयपूर, जैसलमीर व जोधपूर ही क्षेत्रफळ व उत्पन्नाने मोठी असलेली संस्थाने या संयुक्त संस्थानांत सामील झाली (१९४९). तेव्हा संयुक्त संस्थाने व मत्स्यसंघ मिळून बृहद्राजस्थानची निर्मिती करण्यात आली (२५ एप्रिल १९४९). त्यात सिरोही १९५० मध्ये अंतर्भूत झाले आणि नंतर १९५६ च्या राज्यपुनर्रचना अधिनियमानुसार अजमीर, अबू तहसील (मुंबई शाखा) आणि सुनेल तप्पा (मध्य भारतातील एक संस्थान) यांचा बृहद्राजस्थानात अंतर्भाव करण्यात आला. सिरोंज हा उपविभाग मध्य प्रदेशात समाविष्ट करण्यात येऊन उर्वरित सर्व भागास राजस्थान हे नाव देण्यात आले.

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच येथील शासनयंत्रणा आहे. विधिमंडळ एकसदनी (विधानसभा) असून त्यात २०० लोकनिर्वाचित सदस्य असतात. राज्यात २७ महसुली जिल्हे असून त्यांचे ८४ उपविभाग पाडले आहेत. त्यांची पुन्हा २०३ तहसिलांत विभागणी केली आहे (१९८५).

स्वातंत्र्योत्तर काळात जमीनदारी नष्ट व्हावी आणि वेठबिगार पद्धतीला आळा बसावा, म्हणून काही खास अधिनियम करण्यात आले. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची पंचायत राज ही योजना राबवणारे राजस्थान हे भारतातील पहिले घटक राज्य आहे. पंचवार्षिक योजनांमुळे राज्यात औद्योगिकरणाबरोबर विद्युतीकरण, शिक्षण, आरोग्य, पाटबंधारे, समाजकल्याण आदी क्षेत्रांत प्रगती झाली आहे तथापि प्राकृतिक दृष्ट्या राजस्थानचा फार मोठा प्रदेश वाळवंटाने व्यापला आहे आणि अनियमित पर्जन्यमानामुळे वारंवार येणाऱ्या दुष्काळ व अवर्षणाला राज्याला तोंड द्यावे लागते. या प्रश्नांशिवाय आदिवासींचे कल्याण, निर्वासितांचे पुनर्वसन आदी काही महत्त्वाच्या समस्या आहेत.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून राज्यात काँग्रेस पक्ष अधिकारावर आहे तथापि मध्यंतरीच्या काळात काही राजे-महाराजांनी जनसंघ, भारतीय क्रांती दल यांसारख्या पक्षात सामील होऊन काँग्रेसला विरोध केला परिणामतः १९६७ नंतरच्या दोन निवडणुकांत काँग्रेसचे बहुमत धोक्यात आले, पण पक्षांतर करण्याच्या प्रवृत्तीमुळे काँग्रेसची सत्ता टिकून राहिली. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव करून सत्ता काबीज केली परंतु त्यानंतरच्या निवडणुकांत पुन्हा काँग्रेस पक्षाने बहुमत मिळविले. मार्च १९८५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत २०० सदस्य असलेल्या या विधानसभेत पक्षोपक्षांचे बळ पुढील प्रमाणे आहे : काँग्रेस (इं) –११३, भारतीय जनता पक्ष –३९ जनता पक्ष –१०, डीएमकेपी –२७, कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) –१, स्वतंत्र – ९ व रिक्त १.

लेखक : देशपांडे, सु. र.

आर्थिक स्थिती : शेती व पशुपालन हे राज्यातील व्यवसाय आहेत. जलसिंचनाच्या पुरेशा सोयींअभावी बहुतांश शेती अनियमित व अपुऱ्या पावसावरच अवलंबून आहे. राज्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्र २६६ लक्ष हे. होते (१९८४). १९५० –५१ मध्ये राज्यातील ११·६ लक्ष हे. क्षेत्र जलसिंचनाखाली होते, ते १९८३-८४ मध्ये ३९·५६ लक्ष हे. झाले १९८४-८५ मध्ये ते ४२ लक्ष हेक्टरपर्यंत जाईल अशी अपेक्षा होती. राज्यात दुष्काळाची परिस्थिती तर नेहमीच आढळते. एकूण जलसिंचित क्षेत्रापैकी ३ लक्ष हे. क्षेत्र भाक्रा कालव्याखाली, २ लक्ष हे. चंबळ कालव्याखाली व ४·५ लक्ष हे. क्षेत्र राजस्थान कालव्याखाली होते (१९८४). राजस्थान कालवा प्रणाली प्रमुख असून तिच्या मुख्य कालव्याची लांबी १८९ किमी. व उपफाट्यांची एकूण लांबी २,९५० किमी. आहे. १ मार्च १९८४ अखेर या कालव्यावर एकूण ४१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. १९४७ पासूनच महत्त्वाचे जलसिंचन प्रकल्प हाती घेतले गेले आहेत. कोटा बंधारा व राणा प्रतापसागर हे दोन्ही प्रकल्प राजस्थान व मध्य प्रदेश यांनी एकमेकांच्या सहकार्याने उभारलेले आंतरराज्यीय प्रकल्प आहेत. इंदिरा गांधी कालवा (राजस्थान कालवा) पूर्ण झाल्यानंतर तो एक जगातील सर्वांत लांब कालवा ठरणार आहे.भाक्रा नानगल प्रकल्प, गांधीसागर धरण, जवाहर सागर व बिआस हे प्रकल्प राजस्थानमधील शेतीला जलसिंचन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. राजस्थान राज्यातील मही नदीवरील प्रकल्पांमुळे त्या राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळाला आहे. याशिवाय इतरही काही लहान व मध्यम प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. मार्च १९८६ अखेर राज्यात २,८९,५७४ नलिकाविहिरी खोदण्यात आल्या. त्यामुळे राजस्थानातील जलसिंचनाखालील क्षेत्रात बरीच वाढ झालेली आहे.

जलसिंचन सोयींचा विकास, जमीन सुधारणा पद्धतींचा अवलंब, मृद्संधारण, बांध-बंदिस्ती, सुधारित बी-बियाणे, खते, यांत्रिक अवजारे यांचा वापर इत्यादींमुळे एकेकाळच्या रुक्ष, ओसाड व वालुकामय राजस्थानमधील शेतीत बरीच सुधारणा झालेली दिसते. राज्यात पाच व्यक्तींच्या कुटुंबासाठी कमाल जमीन धारणा मर्यादा १२·१४ हेक्टर असून पाचपेक्षा अधिक व्यक्तींना प्रत्येकी २·४२ हे. व जास्तीतजास्त २४·२८ हे. इतकी कमाल जमीन धारणा मर्यादा आहे. ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, गहू, सातू, तेलबिया, कापूस, ऊस, तंबाखू ही राज्यातील प्रमुख पिके आहेत. १९८३-८४ मध्ये काही प्रमुख कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार टनांमध्ये) : अन्नधान्ये ८,५४० कडधान्ये २,२७२ तेलबिया ९५४ गूळ १,७१५ कापूस ५,९६,००० गाठी.

शेती व्यवसायानंतर पशुपालन हा राजस्थानमधील दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळेच राज्यातील पशुपालन विकासावर अधिक भर दिला जातो. त्याचाच भाग म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनाकाळात काही ठिकाणी गुरांचे दवाखाने उघडण्यात आले. अलवर, बस्सी व नागौर येथे पशुप्रजनन केंद्रे स्थापन करण्यात येऊन बिकानेर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. बिकानेर येथे भारतीय उंट प्रजनन केंद्र (१९५९) असून राज्यात इतरत्र नागौरी, हरयाणा, मेवात, राठी व गीर जातींच्या गुरांची प्रजनन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मात्र पाणी आणि चारा यांचा तुटवडा ह्या राज्यातील पशुपालन व्यवसायापुढील महत्त्वाच्या समस्या आहेत. इतर राज्यांच्या मानाने राजस्थानमध्ये गुरे, शेळ्या, मेंढ्या व उंट यांची संख्या जास्त आहे. नागौरी, संचोरी, थर पारकर (मिलानी), राठी, हरयाणा व माळवी ह्या गुरांच्या उत्तम समजल्या जाणाऱ्या जाती मूळ राजस्थानमधीलच आहेत. नाली, चोकला, माग्रा, जैसलमीरी, मारवाडी ह्या येथील मेंढ्यांच्या प्रमुख जाती असून, लोकर उत्पादनासाठी त्या महत्त्वाच्या आहेत. जमना पारी, बारबेरी, सिरोही, अलवरी ह्या शेळ्यांच्या महत्त्वपूर्ण जाती असून दूध व मांस या दोन्ही उत्पादनांच्या दृष्टीने त्यांना महत्त्व आहे. जैसलमीरी, बिकानेरी, मेवाडी, मेवाती ह्या येथील उंटांच्या, तर मारवाडी व काठेवाडी ह्या घोड्यांच्या जाती प्रसिद्ध आहेत. मेंढ्या ही येथील लोकांची प्रमुख संपत्ती असून देशातील एकूण मेंढ्यांच्या संख्येपैकी सु. २१% मेंढ्या राजस्थानमध्ये आहेत. तसेच देशातील लोकर उत्पादनापैकी सु. ४५% लोकर उत्पादन ह्या राज्यातून होते. १९८३ मध्ये राज्यात १,३४,६६,४७४ गुरे १,५३,८९,१०० मेंढ्या १,५३,९७,९९३ शेळ्या ७५,२८,२८७ उंट ४५,३८१ घोडे व खेचरे आणि ६०,३४,७४३ म्हशी होत्या.

खनिज उत्पादनाच्या बाबतीत राजस्थानचा देशात सहावा क्रमांक लागतो. कोळसा, लोहखनिज व खनिज तेल यांचे साठे मर्यादित असले, तरी इतर वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ ४० खनिजे येथे सापडतात. देशातील जस्त, पाचू व रत्ने यांचे जवळजवळ सर्व उत्पादन एकट्या राजस्थान राज्यातून होते. देशातील ७६% चांदी, ८४%ॲस्बेस्टस,९४% जिप्सम, ८२% शंखजिरे, ६८% फेलस्पार, ५०% कॅल्साइट व १२% अभ्रक यांचे उत्पादन राजस्थानमधून होते. १९८५-८६ मध्ये राज्यातून ३०,५६७ कोटी टन जिप्सम व १,७२,९८९ टन फॉस्फेटी खडकाचे उत्पादन झाले. राज्यातील खाणकाम व्यवसायाच्या विकासासाठी  शासन प्रयत्नशील आहे. अरवली पर्वताच्या २६ किमी. लांबीच्या सोंडेच्या भागात तांब्याचे विस्तृत साठे सापडले आहेत. खेत्री व दरिबा येथील तांब्याच्या खाणी विशेष महत्त्वाच्या आहेत. येथील तांब्याचे उत्पादन वाढविले, तर भारताची तांब्याची बहुतांश गरज भागेल. बिकानेर जिल्ह्यातील पलना येथे लिग्नाइटचे साठे आहेत. अभ्रक उत्पादनात बिहारखालोखाल राजस्थानचा दुसरा क्रमांक लागतो. भिलवाडा हे अभ्रकाचे उत्पादन करणारे प्रमुख केंद्र आहे. वैदूर्य उत्पादनात राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो. झवार विभागात जस्त, शिसे व चांदी, तर जयपूर विभागातील मोनिझो येथे लोहखनिज मिळते. राज्यात काच कारखान्यात लागणारी वाळू मोठ्या प्रमाणावर मिळते. तसेच मुलतानी माती, कायनाइट, मँगॅनीज, बेंटोनाइट ही उत्पादनेही महत्त्वाची आहेत. राजस्थानमधील अनेक डोंगररांगांमध्ये बांधकामाचा दगड मोठ्या प्रमाणावर सापडतो. येथे उच्च प्रतीचा संगमरवरही मिळतो. किशनगढ भागातून गुलाबी संगमरवर, जैसलमीर भागातून पिवळा, अजमीरमधील खाणीतून हिरवा व जयपूर भागातून काळा संगमरवर मिळतो. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या तांबड्या दगडाचे तसेच पीठ तयार करण्यासाठी लागणाऱ्या दगडाचे येथील उत्पादनही मोठे आहे. जोधपूर आणि भांक्री येथून छतासाठी वापरला जाणारा दगड मिळतो. राज्यातील चुनखडीचे उत्पादनही महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या खनिजांचे एकूण उत्पादन १८० कोटी रुपये किंमतीचे झाले (१९८३).

खनिज संपत्ती भरपूर असली, तरी खनिजाधारित उद्योगधंदे मात्र फारसे नाहीत. बरीचशी खनिज उत्पादने राज्याबाहेरच पाठविली जातात. खेत्री, उदयपूर, अजमीर, कोटा, लखेरी, चितोडगढ, सवाई माधोपूर, धोलपूर, दौसा ही खनिज उत्पादनांवर आधारित उद्योगधंद्यांची आणि जयपूर व सवाई माधोपूर ही अभियांत्रिकी उद्योगाची प्रमुख केंद्रे आहेत. कागद व काच कारखान्यांत लागणाऱ्या सोडियम सल्फेटचा उत्पादन प्रकल्प दिडवाना येथे उभारण्यात आलेला आहे. सोडियम सल्फेट उत्पादनाच्या दृष्टीने दिडवाना या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला फार महत्त्व आहे. सांभर, दिडवाना येथे उभारण्यात आलेला आहे. सोडियम सल्फेट उत्पादनाच्या दृष्टीने दिडवाना या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला फार महत्त्व आहे. सांभर, दिडवाना व पचपाद्रा सरोवरांमधून मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.

कृषिउत्पादनांवर आधारित उद्योगधंदेही राज्यात मर्यादितच आहेत. एकूण लोकर उत्पादनापैकी काही लोकर परदेशांस, तर काही इतर राज्यांकडे निर्यात केली जाते. स्थानिक रीत्या लोकरीपासून गालिचे, कांबळी इ. वस्तू तयार केल्या जातात. येथील लोकरीची प्रत विशेष चांगली नसते. या व्यवसायाच्या विकासासाठी राज्यात काही प्रशिक्षण केंद्रे स्थापन केलेली आहेत. बिकानेर, जयपूर, जोधपूर, नागौर, नवलगढ, पाली, चितोडगढ, चुरू ही लोकर व्यवसायाची महत्त्वाची केंद्रे आहेत. राज्यातील हाडे, कातडी व चामडयाचे उत्पन्न उल्लेखनीय आहे. काही ठिकाणी हाडांचे पीठ करण्याचे कारखाने उभारले आहेत. बहुतांश कातडी व चामडी निर्यात केली जातात आणि थोडीबहुत स्थानिक रीत्या कमावली जातात. टोंक येथे कातडी कमावण्याचा मोठा व्यवसाय आहे.

लाकडापासून खेळणी तयार करण्याचा उद्योग राज्यात अनेक ठिकाणी आहे. उदयपूर, सवाई माधोपूर व करौली ही त्यासाठी प्रसिद्ध आहेत. जंगलवेष्टित कोटा व झालवाड या पर्वतश्रेण्यांमध्ये आढळणाऱ्या खैर वृक्षापासून कात मिळविला जातो. तेथेच बिडी तयार करण्यासाठी लागणारी पाने मिळतात. त्यावर आधारित बिडी तयार करण्याचा व्यवसाय मुख्यतः कोटा व टोंक येथे आढळतो. वनस्पतींपासून अत्तर तयार करण्यासाठी वापरले जाणारे खस तसेच लाख, डिंक इ. पदार्थ मिळविण्याचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. अरण्यांवर आधारित वरील सर्व व्यवसाय कुटिरोद्योग स्वरूपाचे आहेत.

सुती वस्त्रे, लोकरीचे कापड, साखर, सिमेंट, काच, सोडियम, ऑक्सिजन ॲसिटिलीकरण, कीटकनाशके, जस्त प्रगलन, रसायने, गोलक धारवा, रेल्वे डब्बे, पाण्याचे व विजेचे मीटर, गंधकाम्ल, दूरचित्रवाणी संच, कृत्रिम धागे, फरशी पॉलिश, स्पिरिट, मधनिर्मिती हे येथील प्रमुख उद्योग आहेत. याशिवाय कॉस्टिक सोडा, कॅल्शियम कार्बाइडे, तांबे वितळविणे हे इतर महत्वाचे उद्योग आहेत. कशिदायुक्त पादत्राणे व चामड्याच्या थैल्या, पाण्याच्या बाटल्या, हातमागावरील कापड, खादी, कापड छपाई, लाकडी खेळणी, कृषी अवजारे, हातकागद इ. लघुउद्योगही येथे आहेत. संगमरवरावरील कोरीवकाम, लोकरी गालिचे,जड-जवाहीर, भरतकाम, चामड्याच्या वस्तू, मातीची भांडी, कोरीवकाम केलेल्या पितळी वस्तू हे येथील हस्तव्यवसाय आहेत. राज्यात ८,२३३ नोंदणीकृत कारखाने १,२२,३०४ लघुउद्योग व १७१ औद्योगिक वसाहती होत्या (१९८६). जयपूर, मेरकपुरा (अजमेर), भिलवाडा, उदयपूर, पाली, सिकर, जैसलमीर, जोधपूर, बिकानेर, भरतपूर, कोटा, अलवर व टोंक ही औद्योगिक वसाहतीची प्रमुख केंद्रे आहेत.

राज्यातील प्रतिष्ठापित विद्युत्निर्मितीक्षमता सु. १,८०३ मेवॉ. होती (१९८७). सर्व जलविद्युत्शक्ती ही आतंरराज्य प्रकल्पांपासून निर्माण होते. विद्युत्निर्मितीच्या दृष्टीने भाक्रा-नानगल, चंबळ, गांधीसागर, राणा प्रतापसागर हे जलविद्युत्निर्मिती प्रकल्प व कोटा येथील अणुवीजनिर्मिती केंद्र हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. १९५१ मध्ये राजस्थान मधील विद्युतीकरण झालेली केवळ ४३ खेडी व नगरे होती. १९८७ च्या अखेरीस सु. २९,४०९ खेडी व २,८९,५७४ विहिरी यांचे विद्युतीकरण झाले होते.

भिलवाडा, चुरू, राजगढ,मालपुरा व पाली ही व्यापारदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे असून ती समुद्र किनाऱ्याशी तसेच उत्तर भारतातील मोठ्या शहरांशी जोडण्यात आलेली आहेत. राजस्थानमधील हस्तकला वस्तूंना बाहेरही खूप मागणी असते. जयपूरची पितळी भांडी, संगनेरचे ठसे, मकरान येथील संगमरवरी वस्तू, उदयपूरच्या चामड्याच्या वस्तू, जोधपूर व जयपूरचे सुशोभित बूट व कातडी बॅगा, मेर्त व जयपूरच्या हस्तिदंती वस्तू, जोधपूरच्या पाण्याच्या बाटल्या व नाथद्वार येथील चांदीचा मुलामा दिलेल्या वस्तू यांना भारतातच नव्हे, तर परदेशांतही मोठी मागणी असते. जयपूरचा जवाहीर बाजार तर विशेषच प्रसिद्ध आहे. विविध प्रकारचे मौल्यवान खडे, रत्ने, पाचू, लाल माणिक, संगमरवरी देव-देवतांच्या मूर्ती यांची निर्मिती व व्यापार यांसाठी जयपूर हे भारतातील प्रसिद्ध ठिकाण आहे. बिकानेर, पाली व बेआवर ही लोकरीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. कातडी, चामडी, हाडे, गुरे, शेळ्या, मेंढ्या यांचीही राज्यातून निर्यात केली जाते. अलीकडच्या काळातील शेतीविकासामुळे राज्यातून तेलबिया, तेल, कापूस इ. उत्पादनांची दुसऱ्या राज्यांना निर्यातही केली जाते. खनिज संपत्तीच्या बाबतीत राज्य समृद्ध असल्यामुळे बरीचशी खनिजेही निर्यात केली जातात. लोखंड, कोळसा, चहा, कॉफी, सुकी फळे, तयार कपडे, कापूस, तंबाखू, कमावलेली कातडी, कापड, बंदुकीच्या पिशव्या इत्यांदीची राजस्थानमध्ये आयात केली जाते.

राजस्थानमध्ये ४८,४२२ किमी. लांबीचे रस्ते असून, २,५२१ किमी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते (१९८४). मोटारवाहनांची संख्या ५,५४,३८८ होती (१९८५). जोधपूर, मारवाड, उदयपूर, अजमेर, जयपूर, कोटा, बिकानेर व सवाई माधोपूर ही राज्यातील प्रमुख लोहमार्ग स्थानके आहेत. जयपूर, जोधपूर, कोटा, व उदयपूर येथे विमानतळ आहेत. राज्याच्या पश्चिम भागात वाहतुकीसाठी उंटांचा अधिक वापर केला जातो. राजस्थान पत्रिका, राष्ट्रदूत, नवज्योती, न्याय,अधिकार, कुक, यंग लीडर, जलतेदीप, अमर राजस्थान, तेज, सोशालिस्ट समाचार ही येथील प्रमुख दैनिक वृत्तपत्रे आहेत.

लोक व समाजजीवन : राजस्थानची एकूण लोकसंख्या ३,४२,६१,८६२ असून लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १०० आहे.राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण ९२३:१,००० असे आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार राज्यात २,३०,९३,८९५ हिंदू १७,७८,२७५ मुस्लिम ५,१३,५४८ जैन ३,४१,१८२ शीख व ३०,२०२ ख्रिश्चन होते. पूर्वीपासून राजस्थानात अनेक राजपूत राजघराणी होती. राठोड, भाटी, चौहान, कछवाहा , पवार सोळंखी, पडिहार, तंवर, झाला अशा राजपुतांच्या अनेक शाखा आहेत [⟶ राजपुतांचा इतिहास]. या प्रदेशातील महाजन किंवा मारवाडी हे लोक मुख्यतः व्यापारी आहेत. जाट हे राजस्थानच्या उत्तर व पश्चिम भागातील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. राजस्थानात गावोगावी ठाकूर, ठिकाणदार व जहागीरदार यांचे गड व कोट आढळतात. गायन, वादन व नृत्य करणारे कलावंत आणि ज्योतिषीही राजस्थानात मोठ्या संख्येने आहेत. भिल्ल, ग्रासिया, कठोडी, मीन, रबारी, मेव, मेर, सहरिया इ. अनेक आदिवासी जमातींची वस्ती या राज्यातील डोंगराळ व जंगली भागात आढळते. राजस्थानी लोकांचा पोशाख रंगीबेरंगी व आकर्षक असतो. येथील मारवाडी पगडी व जोधपुरी कोट विशेष प्रसिद्ध आहेत. राजस्थानी स्त्रियांची वेशभूषाही बरीच भडक असते. प्रत्येक मंगल कार्यात स्त्रिया मेंदी लावतात, कारण ती शुभशकुनी मानली जाते.

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक देशी संस्थानांत विभागल्या गेलेल्या या प्रदेशाचे ⇨ राजपुताना हे नाव होते. या प्रदेशातील बहुतेक सर्व जातीजमाती राजपूत लोकांशी आपला संबंध जोडतात. राजपूत लोकांचा व राजांचा प्रदेश म्हणून याचे ‘राजपुताना’ असे नाव पडले व त्याचेच पुढे ‘राजस्थान’ असे रूपांतर झाले. या प्रदेशाचे नाव ‘रायस्थान’ असेही होते. कर्नल टॉड या इंग्रज इतिहासकाराने राजस्थान असा शब्दप्रयोग केला. पौराणिक काळात हा प्रदेश पारियात्र मंडल म्हणून मानला जाई. नर्मदेच्या उत्तरेला असलेल्या पहाडी प्रदेशाचे प्राचीन नाव पारियात्र होते. काही तज्ञांच्या मते पारियात्र पर्वताचा विस्तारित भाग म्हणजे अरवली पर्वतराजी असून, त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेला प्रदेश म्हणजे पारियात्र मंडल होय.

राज्यातील साक्षरतेचे प्रमाण २४·३९% आहे (१९८१). राज्यात २४,३६० प्राथमिक शाळा, ८,३०७ माध्यमिक शाळा व ७२३ उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. महाविद्यालयांची संख्या १५९ व त्यांतील विद्यार्थी संख्या १,६८,३४५ आहे (१९८३-८४). राज्यात राजस्थान विद्यापीठ, जयपूर (स्थापना १९४७) जोधपूर विद्यापीठ(१९६२) व उदयपूर विद्यापीठ (१९६२) ही विद्यापीठे आहेत. यांशिवाय राजस्थानमध्ये चार कृषी महाविद्यालये, एक पशुचिकित्सा व पशुवैद्यक महाविद्यालय, सहा अभियांत्रिकी महाविद्यालये, तीन आयुर्वेद महाविद्यालये, दहा तंत्रनिकेतने या शैक्षणिक संस्था आहेत. हिंदी व राजस्थानी ह्या राजस्थानमधील प्रमुख भाषा आहेत. राजस्थानीच्या अंतर्गत मेवाती, ढूंढांडी, मालवी, बागडी, मारवाडी इ. बोलीभाषा आहेत. राजस्थानच्या विभिन्न बोलींमध्ये मारवाडी बोलीतील लोकसाहित्य सर्वांत अधिक आहे. राज्यात १,२८५ रुग्णालये व दवाखाने, २४८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ६३ आयुर्वेद रुग्णालये, २ निसर्गोपचार रुग्णालये व १११ प्रसूतिगृहे आहेत (१९८३-८४).

दिवाळी, दसरा, होळी, गणगौर, तीज, आखातीज, राखी पौर्णिमा, वसंतपंचमी, जन्माष्टमी, रामनवमी, सतीपूजन, पुष्कर उत्सव, कपिल मुनींचा उत्सव (कोलायत), रामदेवजी उत्सव, वीरपुरी उत्सव, ख्वाजा मुईनुद्यीन चिश्ती उरूस हे राजस्थानातील प्रमुख सण व उत्सव आहेत. गणगौर हा राजस्थानातील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा स्त्रियांचा स्थानिक उत्सव आहे. उपवर मुली आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून आणि सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यवृद्धी व्हावी म्हणून गणगौरीचा पूजोत्सव साजरा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते चैत्र शुद्ध तृतीयेपर्यंत असा अठरा दिवस हा उत्सव चालतो. जयपूरमध्ये हा उत्सव फारच थाटामाटात साजरा केला जातो. तो पाहण्यासाठी दूरदूरचे लोक त्यावेळी जयपूरला येतात. तीज हासुद्धा राजस्थानातील स्त्रियांचा प्रमुख उत्सव असून तो श्रावण शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो. त्या दिवशी गौरीच्या प्रतिमेची पूजा करतात. सतीपूजन हे राजस्थानात मोठ्या प्रमाणात पाळले जाणारे स्त्रिंयांचे एक महत्त्वाचे व्रत आहे. ते भाद्रपद अमावस्येला पाळले जाते. झुनझुनू या गावी सतीमातेचे एक मोठे मंदिर आहे. तिची पूजा करण्यासाठी हजारो स्त्रिया तेथे जमतात. काही स्त्रिया घरोघरी सतीची पूजा करतात. इतिहासकाळात ज्या हजारो स्त्रियांनी शील रक्षणासाठी जोहार केला, त्यांची स्मृती या व्रताच्या रूपाने राजस्थानी स्त्रियांनी कायम ठेवली आहे. ‘सोझी’ नावाचा एक कुमारिकांचा उत्सव राजस्थानात पितृपक्षात पाळला जातो. कार्तिक महिन्यात अजमीरजवळील पुष्कर येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळे येथे गुरांचा मोठा बाजार भरतो. तसेच उंटांच्या गाडीच्या शर्यती हे एक महत्वाचे आकर्षण असते. बिकानेरच्या नैर्ॠत्येस आठ किमी. वर कोलायत सरोवर असून, कार्तिकी पौर्णिमेला तेथे कपिल मुनींचा मोठा उत्सव भरतो. जैसलमीर जिल्ह्यातील पोखरणजवळ भाद्रपद महिन्यात रामदेवजी साधूंचा उत्सव साजरा केला जातो. मंदोर येथे ऑगस्टमध्ये स्थानिक थोर व्यक्तींच्या स्मरणार्थ वीरपुरी उत्सव भरत असतो. त्यात सर्व जातिजमातींचे लोक सहभागी होतात. अजमेर येथील शेख मुईनुद्यीन चिश्ती यांचा उरूस बराच मोठा असतो.

संगीत, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प या कलांची राजस्थानी परंपरा बरीच जुनी आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारी मंदिरे, मूर्ती, राजप्रासाद व चित्रे म्हणजे एक बहुमोल सांस्कृतिक ठेवा आहे. राजस्थानातील राजदरबारांत संगीताला नेहमीच मानाचे स्थान मिळत असे. त्यामुळेच संगीत शास्त्रावर राज्यात अनेक चांगले ग्रंथ निर्माण झालेले आढळतात. राजस्थानात लोकनृत्याचे विविध प्रकार वेगवेगळ्या भागांत प्रचलित आहेत. त्यातील घूमर, झूमर, डंडिया, गींदड, गैर, धूमरा, गौरी व भवाई हे प्रकार फारच लोकप्रिय आहेत. घूमर हे राजस्थानातील स्त्रियांचे एक प्रसिद्ध सामूहिक नृत्य असून, राजस्थानी समाजाच्या वेगवेगळ्या थरांत हे वेगवेगळ्या रूपांनी प्रचलित आहे. होळी, गणगौर, दिवाळी इ. उत्सवांत तसेच लग्नासारख्या मंगल समारंभात राजस्थानी स्त्रिया हे नृत्य करतात. नृत्याच्या वेळी स्त्रिया घागरा नेसतात. गुजरातमधील गरबा नृत्याशी घूमर हे नृत्य मिळतेजुळते आहे. जैसलमीर, बिकानेर व मेवाड या भागांत हे नृत्य विशेष रूढ आहे. झूमर हे नृत्य बुंदीकोटा भागातील खेड्यापाड्यांत अधिक प्रमाणात चालत असून, हाडौती राजपूत स्त्री-पूरुष  मिळून हे नृत्य करतात. डंडिया हे समूहनृत्य प्रामुख्याने मोठ्या नगरांतील पुरुष करतात. गींदड नृत्य सर्व जातीचे लोक होळीच्या सणात करतात. त्यात सोंगे आणतात व गाणी गातात. गैर व घूमरा ही भिल्लांची नृत्ये आहेत. वालर नृत्य गरासिया लोक करतात. गौरी हे भिल्लांचे नृत्य -नाट्य असून भस्मासुराच्या कथेशी ते निगडित आहे. भवाई लोकांचे नृत्य-नाट्य विशेष प्रसिद्ध आहे. हे लोक अत्यंत कुशल नर्तक असतात. ‘कथक’ हा शास्त्रीय नृत्यप्रकार राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात रूढ आहे. कथक नृत्य शिक्षणासाठी जयपूर कथक विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. गोरबंध, चरखो, हिचकी हे राजस्थानातील प्रमुख सांधिक गायन प्रकार आहेत.

राजस्थानात ख्याल हे लोकनाट्य विशेष प्रसिद्ध आहे. नौटंकी, रम्मत, स्वांग, सांगीत, तमाशा, रासधारी, तुर्राकलंगी हे सर्व ख्यालाचेच भिन्नभिन्न प्रकार आहेत. यात गाण्यापेक्षा अभिनयाला अधिक प्राधान्य असते. ख्यालाची आख्याने पौराणिक, ऐतिहासिक व प्रेमकथात्मक असतात. ख्याल हा लोकनाट्याचा प्रकार प्रामुख्याने वीरपूजेच्या उद्देशाने निर्माण झालेला आहे. रामलीला व रासलीला हे लोकनाट्याचे प्रकारही राजस्थानात लोकप्रिय आहेत.

राजस्थानातील कळसूत्री बाहुल्यांचा किंवा कठपुतळ्यांचा खेळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कठपुतळ्यांची निर्मितीही राज्यातच मोठ्या प्रमाणावर केली जाते. कठपुतळ्यांच्या खेळासाठी उदयपूर येथील ‘लोककला मंडळ’ विशेष प्रसिद्ध आहे.

चित्रकला ही राजस्थानातील एक महत्त्वाची कला आहे. राजस्थानातील मंदिरे व राजप्रासाद यांच्या भिंती, पुराणे व महाकाव्ये यांतील प्रसंगांच्या चित्रांनी सुशोभित केलेल्या होत्या. त्यातूनही राधाकृष्णाचा लीलाविहार हा त्यातील प्रमुख विशेष होय. रागरागिणींची चित्रे हे राजस्थानी चित्रकलेचे दुसरे वैशिष्ट्य आहे. राजस्थानी चित्रकलेतून आकाराला येणारी कोणतीही स्त्री अप्रतिम सुंदर असते व तिचे डोळे मृगनयन किंवा मीननयन असतात. राजस्थानी मूर्तिकलेची परंपरा फार जुनी आहे. राज्यातील स्थापत्यकलेची परंपरा मौर्य कालपर्यंत मागे नेता येते. अनेक प्राचीन मंदिरे वा त्यांचे अवशेष राज्यात ठिकठिकाणी आढळतात. या प्रदेशात मुसलमानी सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर जागोजागी राजवाडे, गड व कोट यांची रचना अधिक प्रमाणात [⟶ राजपूत कला] झालेली दिसते. सतराव्या व अठराव्या शतकांत राजस्थानात अनेक वैष्णव मंदिरे निर्माण झाली. राजस्थानची राजधानी जयपूर हे भारतातील मूर्तिकलेचे प्रमुख केंद्र आहे. येथील बहुतेक मूर्ती संगमरवरी आहेत.

लेखक : चौधरी, वसंत

भाषा-साहित्य : राजस्थानी ही  इंडो-आर्यन भाषासमूहातील एक भाषा असून, राजस्थानप्रमाणेच ती मध्य प्रदेशातील काही भागांतही बोलली जाते. गुजराती-राजस्थानी या भाषेचा आद्य कालखंड १०३० ते १६३० असा मानला जातो. मध्ययुगीन राजस्थानी वाङ्मय भक्तिमार्गी आहे. आजही त्याचा प्रभाव टिकून आहे. मीराबाई, दादू इत्यादींनी राजस्थानी भाषेचा प्रभाव असलेल्या ब्रज भाषेत रचना केली. राजस्थानी बोली अनेक असून त्याचे वर्गीकरण केलेले आढळते. [⟶ राजस्थानी भाषा].

राजस्थानी साहित्य परंपरेत लोकसाहित्याचा प्रवाह महत्त्वाचा आहे. तथापि आधुनिक राजस्थानी साहित्य हे राजस्थानात जरा उशिराच, म्हणजे विसाव्या शतकातच निर्माण होऊ लागले. काव्याचा अपवाद वगळता इतर आधुनिक साहित्यप्रकार हे फारसे विकसित होऊ शकले नाहीत. स्वांतत्र्योत्तर काळात राजस्थानी साहित्यनिर्मितीवर हिंदी साहित्यनिर्मितीचा विशेष प्रभाव आढळतो. [⟶ राजस्थानी साहित्य].

लेखक : कापडी, सुलभा

महत्त्वाची स्थळे : राजस्थानचा संघर्षपूर्ण इतिहास, तेथील समाजाचा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आणि वेगवेगळ्या कलांना मिळत गेलेले उत्तेजन यांमुळे राजस्थानात अनेक इतिहासप्रसिद्ध स्थळे व किल्ले, भव्य व वैभवशाली राजप्रासाद, मंदिरे इ. वास्तू ठिकठिकाणी पहावयास मिळतात. राज्यात प्राचीन व मध्ययुगीन काळातील वास्तुशिल्पाचे अनेक नमुने आहेत. आज हीच ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत. राजधानीचे ठिकाण असलेले जयपूर (लोकसंख्या ९,७७,१६५–१९८१), जोधपूर (५,०६,३४५), अजमीर (३,७५,५९३), कोटा (३,५८,२४१), बिकानेर(२,५६,०५७), उदयपूर (२,३२,५८८), अलवर (१,४५,७९५), गंगानगर (१,२३,६९२), भिलवाडा (१,२२,६२५), भरतपूर (१,०५,२३९), सिकार (१,०२,९७०) ही एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे आहेत. त्यांशिवाय जैसलमीर, पाली, चित्तोडगढ, बांसवाडा, बारमेर, डूंगरपूर, बुंदी, चुरू, मौंट अबू ही उल्लेखनीय ठिकाणे असून ती पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. १९८४-८५ मध्ये सु. २·६० लक्ष परदेशी पर्यटक व ३३ लक्ष अंतर्गत पर्यटक ह्यांनी राजस्थानला भेट दिली.

गुलाबी नगरी (पिंक सिटी)म्हणून ओळखले जाणारे जयपूर हे तर पर्यटकांचे विशेष आकर्षक ठिकाण आहे. राजा जयसिंगाने याची स्थापना केल्यामुळे याला ‘जयसिंगाची नगरी’ किंवा ‘विजयाची नगरी’ असे संबोधले जाते. कलाकुसरीच्या वस्तुनिर्मितीसाठी ते देशात प्रसिद्ध आहे. शहरात गुलाबी रंगाच्या अनेक सुंदर वास्तू तसेच सभोवतालच्या टेकड्यांवर किल्ले आणि मनोरे पहावयास मिळतात. जयपूर शहरातील सिटी पॅलेस (१७२८), जंतर-मंतर, शहराच्या प्रशस्त वेशी, हवामहल, प्राणिसंग्रहालय व उद्यान, रवींद्र रंगमंच, रामबाग राजप्रासाद किंवा न्यू पॅलेस, मोती डुंगरी किंवा पर्ल पॅलेस, राजस्थान विद्यापीठ, तसेच जयपूरजवळील नाहरगढ किल्ला, सिसोदिया राणीचा बाग, रामगढ सरोवर व १० किमी. अंतरावरील अंबर (राजस्थानची पूर्वीची राजधानी) ही पर्यटकांची प्रमुख आकर्षक ठिकाणे आहेत.

जोधपूर येथील किल्ला (१४५९), मोती महाल, उमदभवन, फूल महाल, हीरोज हॉल हे राजप्रासाद, मंडोर बाग, राजस्थान राज्य अकादमी व संग्रहालय ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. अजमीर हे हिदूंचे तसेच मुस्लिमांचेही महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. ख्वाजा मुईनुद्यीन चिश्ती यांचा दर्गा, शाहजहानची मशीद, अढाई दिनका झोपडा ही जुनी परंतु सुंदर इमारत, तारागढ, मेयो महाविद्यालय, अनासागर तलाव, सुभाष बाग, ११ किमी. वरील हिंदूंचे पवित्र क्षेत्र असलेले पुष्कर सरोवर व तेथील सावित्रीचे मंदिर, ब्रह्मदेवाचे मंदिर ही अजमीरमधील मुख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. बिकानेर येथील किल्ला, अनुप महाल, करण महाल, फूल महाल, शीश महाल, लालगढ राजप्रासाद, जैन मंदिरे, संग्रहालय तसेच बिकानेरपासून १० किमी. वरील शासकीय उंट प्रजनन केंद्र, आठ किमी.वरील देवीकुंड, ३२ किमी. वरील गजनेर वन्य प्राणी अभयारण्य ही महत्त्वाची व प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाराणा उदयसिंह याने पिचोला तलावाकाठी वसविलेल्या उदयपूर शहराला  ‘शुभ्रनगरी’ किंवा ‘सिटी ऑफ सनराइज’ म्हणूनही ओळखले जाते. तेथील सिटी पॅलेस व त्यातील माणिक महाल, मोती महाल, बारी महाल, शीश महाल , काच महाल आणि त्याच्या चौथ्या मजल्यावरील बगीचा, पिचोला तलावातील दोन बेटांवरील जगनिवास व जगमंदिर हे दोन राजप्रासाद. सहेलियों-की-बारी ही बाग,गुलाबबाग,फतेह सागर जगदीश मंदिर, सज्जनगढ इ. प्रेक्षणीय आहेत. उदयपूरपासून ४८ किमी. अंतरावर नाथद्वार हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र असून, तेथील श्रीकृष्ण मंदिर उल्लेखनीय आहे. जैनांचे वृषभदेव मंदिर उदयपूरपासून दक्षिणेस ६४ किमी. आहे.

अलवर येथील किल्ला, विनयविलास महाल (सिटी पॅलेस),अरबी व फार्सी भाषांतील प्राचीन हस्तलिखिताचा संग्रह असलेले संग्रहालय, राजा वख्तवार सिंग (१७८१–१८१५) याचे स्मारक, फतेह जंगची कबर, भरतपूर येथील किल्ला, त्यातील राजप्रासाद व संग्रहालय आणि भरतपूरपासून पाच किमी. अंतरावरील केवलदेव घाना पक्षी-अभयारण्य जैसलमीर येथील ९९ बुरुजांचा किल्ला अष्टपदीचे मंदिर, प्राचीन जैन मंदिरे, वेगवेगळ्या भाषांतील प्राचीन हस्तलिखिताचा संग्रह असलेले संग्रहालय, बुंदी येथील तारागड (१३४२), राजप्रासाद (१५८०), नवलसागर तलाव, छत्रमहाल किंवा मनोऱ्यांचा राजप्रासाद, चित्रमहाल, फूलमहाल, शिकारबुर्ज, सुख महाल, मोती महाल, राणीजी-की-बावडी, केशरबाग, चितोडगढ येथील किल्ला, राणा कुंभाचा राजवाडा, शिवमंदिर, पद्मिनी राजवाडा, पट्ट राजवाडा, कालिकामंदिर, तसेच डीग येथील गोपाळभवन (१७५०), सूरज भवन, पुराना महाल हे राजप्रासाद व डीग किल्ला ही प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत.

अरवलीच्या दक्षिण भागात, सिरोही जिल्ह्यात मौंट अबू (१,२२० मी.) हे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आणि प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे. तेथील रामकुंड, गोमुख मंदिर, नखी सरोवर, सनसेट पॉइंट, अरवलीतील सर्वोच्च गुरुशिखर(१,७२७ मी.), ट्रेव्हर तलाव, कलापूर्ण अशी प्रसिद्ध दिलवाडा जैन मंदिरे व त्यांतील–विशेषतः आदिनाथ आणि नेमिनाथ मंदिरे, बेडकाकृती ‘टोड रॉक’ खडक व १० किमी. अंतरावरील अचलगढ ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. यांशिवाय राज्यात पशु-पक्ष्यांची काही अभयारण्ये तयार केलेली आहेत. राज्यात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. (चित्रपत्र १०, ३५).

संदर्भ :

  • Anand, Uma, Guide to Rajasthan, New Delhi, 1975.
  • Beny, Roloff; Matheson, S. A. Rajasthan : Land of Kings, London, 1984.
  • Misra, V. C., Geography of Rajasthan, New Delhi, 1967.
  • Pal, Dharm, Rajasthan, New Delhi, 1968.
  • Pal, H. B., The Temples of Rajasthan, Jaipur, 1969.
  • Sharma, Dasharatha, Rajasthan: Through the Ages,Vol, I. Bikaner, 1966.
  • Todd, James, Annals and Antiquities of Rajasthan, 2, Vols., London, 1914.
  • जोशी, महादेवशास्त्री, राजस्थान, पुणे, १९६३.

लेखक : चौधरी, वसंत

भरतपूरचे संगर्हालय, एक दृश्य.
प्रसिद्ध लालगढ राजप्रासाद, बिकानेर.
जवाहर निवास : सुंदर वास्तुकलेचानमुना, जैसलमेर.
लालगढ राजप्रासादाचे प्रवेशद्वार : सुंदर नक्षीकामाचा नमुना, बिकानेर.
राजा मानसिंग संग्रहालय.
जंतरमंतर : जयपूरची प्रसिद्ध वेधशाळा.

KH - 14 - P - 10 - 1

गव्हाच्या शेतात काम करणारी भिल्ल कन्या.
अमर विलास राजवाड्यातील मयूर शिल्पांकित चौकट, उदयपूर