सँता बार्बरा बेटे: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यालगतचा पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह. लोकसंख्या ९०,८९३ (२०१०). दक्षिण कॅलिफोर्नियाच्या पॅसिफिकमहासागर किनाऱ्यापासून पश्चिमेस ४० ते १४५ किमी. अंतरापर्यंतच्या भागात वायव्य-आग्नेय दिशेने सु. २४० किमी. लांबीच्या प्रदेशात ३३° उ. ते ३४° ३०’ उ. व ११८° प. ते १२१° प. यांदरम्यान या बेटांचा विस्तार आहे. याद्वीपसमूहास ‘चॅनेलबेटे’ असेही म्हटले जाते. आठ प्रमुख बेटांचा व काही द्वीपकांचा मिळून हा द्वीपसमूह बनला आहे. उत्तरेकडील सँता बार्बरा व दक्षिणेकडील सँता कॅटलिना असे या द्वीपसमूहाचे दोन गट पडतात. उत्तरेकडील गट सु. ३२ ते ४८ किमी. रुंदीच्या सँता बार्बरा खाडी (चॅनेल) मुळे मुख्य भूमीपासून अलग झाला आहे. या गटात सान मीगेल (सु. १३ किमी. लांब), सांता रोझा (२७ किमी.), सांता क्रू झ (सु. ३७ किमी.) या बेटांचा आणि ॲनकॅप या लहानलहान द्वीपकांचा समावेश होतो. दक्षिणेकडील सँता कॅटलिना गट सान पेद्रो चॅनेलमुळे मुख्य भूमीपासून अलग झाला आहे. या गटात सँता बार्बरा (सु. २.४ किमी.), सान नीकोलस, सँता कॅटलिना (३५ किमी.) व सान क्लेमँते (३३.६ किमी.) या बेटांचा समावेश होतो. सँता कॅटलिना व सान क्लेमँते या बेटांदरम्यान औटर सँता बार्बरा चॅनेल आहे. सांताक्रू झ (क्षेत्रफळ २५४ चौ. किमी.) हे द्वीपसमूहातील सर्वांत मोठे बेट आहे.

भूरचनेच्या दृष्टीने ही बेटे ओबडधोबड व डोंगराळ आहेत. येथील भूगर्भरचना मुख्य भूमीवरील किनाऱ्यावर आढळणाऱ्या पर्वतश्रेण्यांशी निगडित आहे. कमी उंचीच्या पर्वतीय प्रदेशाचे उघडे पडलेले माथे म्हणजेच ही बेटे होत. सागरी अपृष्ठवंशी प्राणी व प्लाइस्टोसिन काळातील महाकाय हत्ती यांच्या अश्मास्थी या बेटांवर आढळतात. ही सर्व बेटे भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. द्वीपसमूहातील सर्वाधिक उंचीचे शिखर (७५३ मी.) सांताक्रूझ बेटावर आहे. बेटांदरम्यान असणाऱ्या महासागरी द्रोणी व गर्तांची खोली १,८२९ मी. पेक्षाही अधिक आढळते. किनाऱ्यावर सर्वत्रच सागरी गुहा आढळतात. हवामान भूमध्य सागरी प्रकारचे असून, उन्हाळे उबदार व हिवाळे सौम्य असतात. वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींसाठी ही बेटे प्रसिद्घ असून सु. ८३० वनस्पतिप्रकार येथे आढळतात. सांताक्रूझ व सँता कॅटलिना बेटांवर वनाच्छादन आहे. जलसिंह व सीलचे समूह तसेच पक्ष्यांचे थवे वारंवार या बेटांकडे येत असतात.

एके काळी सँता बार्बरा बेटांवर कॅनलिनो इंडियनांचे वास्तव्य होते. आज त्यांचा निर्वंश झालेला दिसतो. इ. स. १५४२ मध्ये पोर्तुगीज समन्वेषक व मार्गनिर्देशक ह्‌वान रॉद्रिगेथ काब्री यो याने या बेटांचा शोध लावला. त्याचे दफन येथेच केल्याचे म्हटले जाते. या बेटांवर लोकसंख्या विरळ आहे. मोठ्या बेटांवर मेंढ्या व गुरेपालन केले जाते. द्वीपसमूहाच्या सभोवतालच्या सागरी प्रदेशात हौशी मासेमारी केली जाते. १९६९ मध्ये सँता बार्बरा खाडीमधील तेलविहिरीतून मोठ्या प्रमाणावर झालेल्या तेल गळतीमुळे उत्तरेकडील बेटांदरम्यानच्या २,०७२ चौ. किमी. सागरी क्षेत्रावर तेलाचा थर पसरल्यामुळे तेथील जलीय जीवसृष्टीची फार मोठी हानी झाली होती. ॲनकॅप, सान मीगेल, सँता बार्बरा, सांताक्रूझ व सांता रोझा या बेटांचा चॅनेल आयलंड्स नॅशनल पार्कमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सँता कॅटलिना हे या द्वीपसमूहातील महत्त्वाचे तसेच आर्थिक दृष्ट्या विकसित बेट आहे. कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून हे ३५ किमी. अंतरावर आहे. याची लांबी ३५ किमी., रुंदी २ ते १३ किमी. व क्षेत्रफळ १९२ चौ. किमी. आहे. ओरिसाबा हे या बेटावरील सर्वोच्च शिखर (६४८ मी.) असून ते वनाच्छादितआहे. प्रशासकीय दृष्ट्या हे बेट लॉस अँजेल्स परगण्याचा एक भाग आहे. सन १९१९ मध्ये विल्यम रिंगले यांनी हे बेट विकत घेऊन त्यावर खेळ, मनोरंजन व पर्यटनविषयक सुविधांची उभारणी केली. सृष्टिसौंदर्यामुळे पर्यटन हा येथील अतिशय महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. बेटांच्या दंतुर किनाऱ्यावर अनेक ठिकाणी पुळणी, सागरीबागा, लहानखाड्या, सागरीगुहा, उडणाऱ्या माशांचा येथील वावर, सीलचे कळप व फळ्या टाकून केलेले पायरस्ते इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. काचेचे तळ असलेल्या बोटींमधून सागरी सफर, खोल सागरातील हौशी मासेमारी यांचा पर्यटक आनंद घेतात. ॲव्हलॉन हे एकमेव मोठे शहर सँता कॅटलिना बेटावर असून ते कॅसीनोसाठी प्रसिद्घ आहे. सान क्लेमँते बेटावर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे नौसेना प्रशिक्षण केंद्र आहे. सान मीगेल बेटाची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून त्याच्यावर वसाहत नाही. या बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठे सागरी हत्ती व जलसिंह आढळतात.

कुंभारगावकर, य. रा.