लखनौ : उत्तर प्रदेश राज्याची राजधानी व लखनौ जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ८,९५,७२१ महानगर १०,०७,६०४ (१९८१ जनगणना). हे नवी दिल्लीच्या आग्नेयीस ४३५ किमी. व कानपूरच्या ईशान्येस ७७ किमी. अंतरावर गोमती नदीच्या मुख्यतः उजव्या तीरावर वसले आहे. रस्ते व लोहमार्ग यांचे महत्त्वाचे प्रस्थानक धान्ये, तेलबिया, ऊस व साखर यांची मोठी व्यापारपेठ, औद्योगिक व शैक्षणिक केंद्र तसेच उद्यानांचे शहर म्हणून लखनौची मोठी ख्याती आहे.

लखनौ शहराच्या स्थापनेविषयी काही आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार येथे रामबंधू लक्ष्मणाचा जन्म झाला व त्यानेच पुढे मोठेपणी हा प्रदेश विस्तारला. त्या वेळी या प्रदेशाचे नाव ‘लक्ष्मणपुरा’ असे होते पुढे याचेच अपभ्रष्ट रुप ‘लखन’ वरून ‘लखनऊ’ झाले असावे. मुस्लिम सांप्रदायिकांच्या मते लखनौ तेराव्या शतकात बिजनोरच्या शेखांनी (सरदारांनी) वसविले. त्यांनी तत्कालीन निष्णात अभियंता ‘लखना पासी’ याच्याकरवी एक किल्ला उभारला. या अभियंत्याच्या नावावरून हा किल्ला ‘किला लखना’ म्हणून ओळखला जाऊ लागला. कालांतराने या किल्ल्याच्या परिसरात वस्ती झाली व हिचेच पुढे ‘लखनौ’ असे नामांतर झाले. परंतु ही आख्यायिका वादग्रस्त समजली जाते. लक्ष्मण हा शेष नागाचा अवतार मानण्यात येत असल्याने लखनौ हे नाग जातीच्या लोकांचे सुप्रसिद्ध तीर्थस्थान आहे.

लखनौच्या नावामागे आणखीही एक कथा सांगितली जाते. हरदोई ही प्रल्हादपिता हिरण्यकश्यपूची राजधानी होती. भगवान विष्णूने नृसिंहाचे रूप घेऊन हिरण्यकश्यपू या दुष्ट राजाचा वध करून प्रल्हादाला मुक्त केले आणि गोमती नदीत आपली नखे व हात यांचे प्रक्षालन केले. त्यावरून या प्रदेशाचे नाव ‘नखलव’ असे पडले आणि त्याचेच पुढे ‘लखनौ’ असे भ्रष्ट रूप झाले.

या प्रदेशात अकराव्या आणि बाराव्या शतकांत राजपूत येऊन राहिले. जौनपूर राजांच्या अंमलाखाली असलेले हे शहर बाबराने १५२८ मध्ये जिंकून घेतले. त्याचा नातू अकबर याच्या कारकीर्दीत लखनौ हे अयोध्या प्रांताचा एक भाग बनले. १७७५ मध्ये अयोध्येचा नबाब आसफउद्दौला याने आपली राजधानी फैजापूरहून येथे आणली व शहर शोभिवंत बनविले. लखनौ ही १७७५ ते १८५६ पर्यंत अवध (अयोध्या) संस्थानाची राजधानी होती. १८५७ च्या उठावानंतर लखनौ इंग्रजांच्या ताब्यात आले.


इतिहासप्रसिद्ध रूमी दरवाजा, लखनौ.

हे शहर महत्त्वाचे औद्योगिक केंद्र समजले जाते. येथे कागद, पादत्राणे, रसायने, गालिचे व सतरंज्या, सुगंधी द्रव्ये व अत्तरे, वीजउपकरणे व औषधी साहित्य, सिगारेटी व तंबाखू, दुर्बिणी व सूक्ष्मदर्शक यंत्रे, तांबा-पितळ भांडी व उपकरणे, चांदीच्या वस्तू, किनखाबी वस्त्रे इत्यादींच्या उत्पादनांचे कारखाने असून, कापूस व तेलबिया यांच्या गिरण्या, साखर कारखाने, मोठ्या रेल्वे कर्मशाळा, प्रशीतन संयंत्रे आहेत. येथील हस्तोद्योगांमध्ये चर्मवस्तू, भरतकामाच्या कलाकुसरीच्या वस्तू आणि नमुने, तसेच मृत्स्नाशिल्पे विपुल प्रमाणात आढळ्तात. लखनौचे पान, सुपारी, तंबाखू व चंदन यांचे आगळे वैशिष्ट्य आहे. येथील जरकाम आणि रेशीम वस्त्रे (‘चिकन’ कापड), चांदीचे दागिने तसेच काचेच्या बांगड्या अतिशय प्रसिद्ध आहेत.

लखनौ हे प्रेक्षणीय वास्तूंसाठी ख्यातनाम आहे. मोती महाल, मुबारक मंझिल, शहा मंझिल इ. प्रेक्षणीय इमारती गाजिउद्दीन हैदरने बांधल्या. नबाब आसफउद्दौलाने बांधलेल्या ‘बडा इमामबारा’व ‘छोटा इमामबारा’ ह्या दोन्ही वास्तू अभिजात मुस्लिम कलावास्तू म्हणून विख्यात आहेत. गोमती नदीच्या पश्चिमेस जुन्या शहरभागात ‘बडा इमामबारा’ ह्या वास्तूत मोहरमचा सण मोठ्या धामधुमीने साजरा करण्यात येतो. ही वास्तू १७८४ मध्ये नबाब आसफउद्दौलाने दुष्काळग्रस्तांच्या साहाय्यार्थ पांढऱ्या संगमरवरामध्ये बांधली. या वाड्याच्या मुख्य दिवाणखान्याचे छत १५ मी. उंचीवर असून अत्यंत शोभनीय आहे. हे छत स्तंभरहित असे बांधण्यात आले असल्यामुळे ते स्थापत्यशास्त्रदृष्ट्या अजोड मानण्यात येते. या छतावरून सबंध लखनौ शहराचे विलोभनीय दृश्य पहावयास मिळते. गोमतीच्या पश्चिमेकडील बाजूसच ‘छोटा इमामबारा’ ही आणखी एक प्रेक्षणीय इमारत आहे. ती नबाब मुहम्मद अली शाह याने बनविल्याचे सांगितले जाते. या वाड्यामधील हंड्या व दीपदाने वाड्याच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. यांशिवाय गोमतीच्या समांतरमार्गावरील ‘रेसिडेंसी’ ही ब्रिटिशांनी १८०० मध्ये कार्यालनीय वापराकरिता बांधलेली, तथापि १८५७ च्या उठावामध्ये बरीचशी नष्ट झालेली, मोठी इमारत आहे. सांप्रत या वास्तूतील पूर्वीची तळघरे, भोजनगृहे तसेच अतिथिगृहे पहावयास मिळतात. येथील बाग गुलाबांसाठी प्रसिद्ध आहे.


लखनौमध्ये अनेक रमणीय व आकर्षक उद्याने आहेत. गुलाब पुष्पांचे ताटवे, विस्तीर्ण हिरवळी मैदाने व अनेक शोभिवंत कारंजी यांनी सजलेला ‘सिकंदर बगीचा’ पर्यटकांना आकृष्ट करतो. ही बाग वाजिद अली शाह ह्या लखनौच्या अखेरच्या नबाबाने आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ बांधली. १९५३ पासून मात्र ही बाग भारतीय वैज्ञानिक औद्योगिक अनुसंधान परिषदेने वनस्पतिविषयक संशोधनार्थ आपल्या ताब्यात घेतली. ‘बनारसी उद्याना’त ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ नावाचे प्राणिसंग्रहालय असून त्यामध्ये नैसर्गिक पार्श्वभूमीवर पशुपक्ष्यांचे संवर्धन करण्यात येते. यात हत्ती, चित्ते, वाघ वानर इ. वन्य प्राणीही जतन केले जातात. ‘दिलखुश बाग’ पूर्वी अयोध्येच्या नबाबांचे मृगयाक्षेत्र होते तेथे एक किल्लाही बांधलेला होता. तथापि अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये या बागेची शोभा आणि सौंदर्य नष्ट करण्यात आले. सांप्रत येथे अनेक भग्नावशेष असून ही बाग पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

याशिवाय शहरात छतर मंझिल, रूमी दरवाजा, नासिरुद्दीनची वेधशाळा, जामा मशीद या प्रेक्षणीय वास्तू आहेत आधुनिक इमारतींमध्ये राजस्थानी शैलीत बांधलेले लखनौ रेल्वे, स्थानक, विधान भवन इत्यादींचा अंतर्भाव होतो.

लखनौ हे एक प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र मानले जाते. येथे पन्नासांवर माध्यमिक विद्यालये व २४ महाविद्यालये (पैकी सात महिला महाविद्यालये) आहेत. देशातील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालय (किंग जॉर्जेस वैद्यकीय महाविद्यालय, स्था. १९११) याच शहरात आहे. लखनौ विद्यापीठाचे (स्था. १९२१) ग्रंथालय ‘रवींद्रनाथ टागोर ग्रंथालय’ या नावाने प्रसिद्ध आहे. यांशिवाय शहरात भारतीय संगीताचे शिक्षण देणारे ‘भातखंडे भारतीय संगीत विश्वविद्यालय’ दार-उल-नाद्‌वा ही मुस्लिम धर्मशास्त्र अध्ययनसंस्था, केंद्रीय औषधी संशोधन संस्था, पुरावनस्पतिविज्ञान संस्था, बांधकाम संशोधन संस्था, वस्तुसंग्रहालये, सार्वजनिक ग्रंथालय इ. विशेष प्रकारच्या संस्था आहेत.

लखनौचे सांस्कृतिक जीवन आपले स्वतःचे असे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहे. नबाबांच्या काळापासून लखनौचे मुशायरे (कविसंमेलने) व जलसे (गाण्याच्या बैठकी-मैफली) प्रसिद्धी पावले आहेत. लखनौच्या अत्तरांनी तेथील सामाजिक व सांस्कृतिक जीवन सुगंधित केले आहे. येथे वेगवेगळ्या हंगामात विविध अत्तरांचे उत्पादन (उदा., थंडीच्या दिवसांत हीनाचे तर उन्हाळ्यात वाळ्याचे) करण्यात येते. यांशिवाय गुलाब, केवडा, रातराणी या फुलांचीही अत्तरे कविसंमेलने-शेरशायरी यांचे विषय बनलेले आढळतात.

शास्त्रीय संगीतातील ‘दादरा’ ही लखनौची देणगी मानली जाते. येथील भातखंडे भारतीय संगीत विश्वविद्यालय गाण्यांच्या मैफलींसाठी ख्याती पावले आहे. कथ्थक नृत्यशैलीचे ‘लखनौ घराणे’ साऱ्या भारतात ख्यातकीर्त आहे. लखनौ घराण्याच्या कथ्थकांमध्ये लयकारी, लालित्य व उत्कट भावदर्शक यांचा प्रत्यय येतो. येथेच बिंदादीन महाराज यांची हवेली असून तेथे भारतातील बहुतेक विख्यात नर्तकांनी आपली हजेरी लावली आहे. नबाब आसफउद्दौलाच्या काळात अनेक शायरांनी-कलावंतांनी या शहराचा आश्रय घेतला होता. उर्दू भाषेचे लखनौ स्वरूप दिल्लीच्या उर्दू भाषेपेक्षा निराळे व अधिक शुद्ध समजले जात असून ‘लखनवी उर्दू’ ही दिल्लीच्या उर्दूपेक्षा अधिक कर्णमधुर वाटते.

कथ्थक नृत्याची रुणझुण (नृत्यझंकार) व ठुमरीचे बोल यांनी लखनौ शहर सदैव गुंजारत राहिले आहे. ठुमरी गायकीच्या पाच ढंगापैकी ‘लखनौ ढंग’ सादर करणारे सनदपिया, कदरपिया, अख्तरपिया, बिंदादीन महाराज, कालिकाप्रसाद, ललनपिया, बेगम अख्तर इ. प्रसिद्ध गायक-गायिका लखनौचे कथ्थक घराणे व त्याचे प्रतिनिधी श्रीधर महापात्र, मुहम्मद हनीफ त्याचप्रमाणे उपन्याससम्राट मुन्शी प्रेमचंद, महाकवी ‘निराला’, अमृतलाल नागर, आधुनिक युगाचे प्रथितयश साहित्यिक यशपाल, भगवतीचरण वर्मा हे लखनौचे कीर्तिस्तंभ मानले जातात.

गद्रे, वि. रा. सावंत, प्र. रा.