नौगाँग : (१) आसाम राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५६,५३७ (१९७१). हे गौहातीच्या पूर्व ईशान्येस सु. १२० किमी. अंतरावर व गौहाती–दिब्रुगड या राष्ट्रीय महामार्गावर ब्रह्मपुत्रेच्या कलांग उपनदीकाठी वसले आहे. गौहाती–सिलघाट लोहमार्गावरील सेंचोआ हे याचे जवळचे (४·८ किमी.) लोहमार्गस्थानक होय. १८९७ च्या भूकंपात शहर बरेच उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेजारील दलदलीचा भाग उंचावला जाऊन पावसाळ्यात शहर काही दिवस पाण्यातच होते. हे तांदूळ, ताग, मोहरी, चहा, लाख यांच्या व्यापाराचे केंद्र असून चहावरील प्रक्रिया करण्याचा व्यवसायही येथे चालतो. व्यापार करणारे बहुतेक लोक मारवाडी आहे. शहराचा परिसर आकर्षक असला, तरी हवामान मुख्यतः उष्ण व रोगट आहे. १८९४ पासून येथे नगरपालिका आहे. तंत्र व परिचारिका विद्यालय, प्राथमिक व माध्यमिक शाळा व गौहाती विद्यापीठाशी संलग्न असलेली दोन महाविद्यालये येथे आहेत.

सावंत, प्र. रा.

(२) मध्य प्रदेश राज्याच्या छत्तरपूर जिल्ह्यातील एक शहर. लोकसंख्या उपनगरांसह ११,४५९ (१९७१). हे मध्य प्रदेश–उत्तर प्रदेश राज्यांच्या सरहद्दीला जवळ असून छत्तरपूरच्या वायव्येस सु. २५ किमी. वर छत्तरपूर–झांशी रस्त्यावर आहे. ब्रिटिशांच्या वेळी हे बुंदेलखंड एजन्सीचे एक प्रमुख केंद्र होते. हे एक महत्त्वाचे नागरी आणि लष्करी छावणीचे ठिकाण असून १८४३ पासून येथे असलेल्या लष्करी छावणीचा विस्तार १८६९ मध्ये करण्यात आला. रसायने, औषधे व मद्यनिर्मिती या उद्योगधंद्यांचे आणि धान्य, कपडे, साखऱ, तेलबिया इत्यादींच्या बाजारपेठेचे हे केंद्र आहे. शहरात शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक व माध्यमिक शाळा, अवदेश प्रतापसिंग विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय, अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन या शैक्षणिक संस्था आहेत.

चौधरी, वसंत