ब्रेस्त : फ्रान्सचे अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील एक प्रमुख बंदर. लोकसंख्या १,९०,८१२ (१९७५). फ्रान्सचे वायव्येकडील प्रवेशद्वार मानले गेलेले हे निसर्गरम्य शहर फीनीस्तेर विभागात पेनफेल्द नदीमुखाशी वसलेले आहे. हे व्यापारी केंद्र असून अद्ययावत नाविक तळामुळे विशेष प्रसिद्ध आहे. गॅलो-रोमन काळापासून याचा उल्लेख आढळतो. हे बंदर तिन्ही बाजूंनी भूवेष्टित असून सुरक्षित व मोक्यावर असल्यामुळे रीशल्य या मुत्सद्याने येथे लष्करी छावणी व शस्त्रागार उभारले व शहराची रचना केली (१६३१). चौदाव्या लूईने येथील नाविक क्षेत्रात सुधारणा केल्या. त्याच्या राज्यत्यागाच्या सुमारास मार्शल दे व्होबां याने शहराभोवती तटबंदी करून येथे एक किल्ला बांधला (१६८३). त्यावेळेपासून अटलांटिकवरील एक प्रमुख नाविक तळ म्हणून ब्रेस्तला महत्त्व प्राप्त झाले. फ्रेंच व ब्रिटिश यांच्यात या शहराच्या हक्कासाठी लढाया झाल्या. १६९४ मध्ये फ्रेंचांनी ब्रिटिशांनी ब्रेस्तमधून परतविले. परंतु १७९४ मध्ये ब्रिटिशांनी लॉर्ड होवे याच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांचा येथे पराभव केला. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन सैन्याने येथूनच प्रवेश केला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने हे जिंकून घेऊन येथे पाणबुड्या व युद्धनौका यांचा तळ उभारला.

युद्धोत्तर काळात ब्रेस्तची झालेली हानी भरून काढण्यासाठी शहराची योजनाबद्ध पुनर्रचना करण्यात आलेली आहे. येथे व्यापारासाठी वेगळे बंदर केलेले असून जहाजबांधणी, यंत्रसामग्री, विद्युत्-साहित्य, खते, रसायने, कागद इ. उद्योग विकसित झालेले आहेत. येथील फ्रेंच नाविक अकादमी (१८३०) प्रसिद्ध आहे तसेच विद्यापीठ, महासागरविज्ञान संशोधन केंद्र, जुना महाल, विहार स्थळ इ. उल्लेखनीय आहेत.

ओक, द. ह. गाडे, ना. स.