शैलभित्ति : समुद्रात किंवा समुद्रकिनाऱ्यालगत निर्माण होणाऱ्या खडकांच्या चिंचोळ्या, लांबट रांगेला शैलभित्ती म्हणतात. सामान्यत: शैलभित्ती म्हणजे खडकनिर्मात्या जीवांचा कटक असून तो समुद्रतळापासून जवळजवळ जलपृष्ठापर्यंत पसरलेला असतो.

शैलभित्तींचे खडक सर्वसाधारणपणे जीवांच्या किंवा एकेकाळच्या जीवांच्या कठिण भागांपासून बनलेले असतात. सर्व उबदार समुद्रांमध्ये अशा जीवजन्य (जैव) शैलभित्ती तयार होतात. अशा भित्ती निर्मिणारे सामान्य प्राणी व वनस्पती पुढील होत : ⇨ पोवळे (प्रवाळ),कॅल्शियम कार्बोनेट स्रवणारी शैवले, खडकाला चिकटून वाढणारे मृदुकाय (मऊ शरीराचे) प्राणी, हायड्रोझोआ, ऑयस्टर, ॲनेलीड व स्पंज. या जीवांमार्फत कॅल्शियम कार्बोनेट, फॉस्फेट, सिलिका इत्यादींचे निक्षेप (साठे) स्रवले जातात. गत भूवैज्ञानिक काळात बायोझोआ, किनॉइड, बॅकिओपॉड व स्ट्नोमॅटोपोरॉइड या जीवांच्या अवशेषांपासून शैलभित्ती बनल्या होत्या. अशा शैलभित्ती पुष्कळदा सध्याच्या महासागरापासून आत जमिनीवरील गाळाच्या खडकांत जडवल्यासारख्या आढळतात.

वाळूचे दांडे (वरंबे) नैसर्गिक रीतीने संयोजित (चिकटून घट्ट) होऊन बाझीलच्या किनाऱ्याला अनुसरून, तसेच इतरत्रही शैलभित्ती बनल्या आहेत. या भित्तींचे खडक अजैव उत्पत्तीचे असतात. समुद्राप्रमाणे सरोवरे, जलवाहतुकयोग्य मोठया नदया इ. जलाशयांतही शैलभित्ती असतात. त्यांचे खडक लगतच्या जमिनीवरील खडकांसारखे असतात.

प्रवाळशैलभित्ती : पोवळे व कॅल्शियम कार्बोनेट स्रवणारे संबंधित जीव यांच्यापासून या शैलभित्ती बनतात. सर्वाधिक आढळणाऱ्या या शैलभित्ती आकारमानानेही सर्वांत मोठया व व्यापक आहेत. चार्ल्स डार्विन यांनी या भित्तींचे अनुतटीय, रोधक व कंकणद्वीप हे तीन मुख्य प्रकार वर्णिले होते. समुद्रतळाच्या मोठया प्रमाणात होणाऱ्या अखंड अधोगमनातून शैलभित्तींचे हे प्रकार बनल्याचे त्यांचे मत होते.

प्रवाळशैलभित्ती हे अनेक सागरी जीवांचे स्वाभाविक निवासस्थान असते. उदा., मासे, कृमी, अष्टपाद, खेकडे, शेवंडे, तारामीन आणि विविध प्रकारच्या वनस्पती. पॅसिफिक आणि हिंदी महासागरांतील अनेक बेटे प्रवाळशैलभित्तींची बनलेली असून त्यांवर हजारो माणसे रहातात. अन्न, निवाऱ्यासारख्या जीवनोपयोगी साधनांशिवाय येथे खोबऱ्याचे मोठया प्रमाणावर उत्पादन होते. ओशन, नाऊरू इ. बेटांवर फॉस्फेटाचे समृद्घ साठे असून खतासाठी ते वापरतात. जीवाश्मांनी (शिळाभूत जीवावशेषांनी) बनलेल्या शैलभित्तींचे सच्छिद्र खडक हे खनिज तेलाचे साठे बनू शकतात. अशा शैलभित्ती ६० कोटी वर्षांपूर्वीपासूनच्या असून आधीच्या काळात पोवळ्याव्यतिरिक्त इतर जीवांच्या शैलभित्ती अधिक प्रमाणात तयार झाल्या होत्या.

उत्पत्ती व प्रकार : किनाऱ्याविरूद्घ दिशेत असलेली अनुतटीय शैलभित्ती समुदतळाचे अधोगमन व तिची वरच्या दिशेतील वाढ यांमुळे ती कंकणद्वीपाव्दारे किनाऱ्यापासून अलग होऊन रोधक शैलभित्ती निर्माण होते. अधोगमन व वाढ या दोन्ही गोष्टी अखंडपणे चालू राहिल्यास पूर्वीची सर्व जमीन ⇨खारकच्छाखाली झाकली जाऊन ⇨कंकणद्वीप निर्माण होऊ शकते आणि त्याच्या सभोवती परिघीय कंकणद्वीप शैलभित्ती बनते. कंकणद्वीपातील खारकच्छ गाळाने भरल्यावर शैलभित्तीची वरील दिशेतील वाढ व सपाटीकरण होऊन मंच शैलभित्ती क्वचित बनते.

शैलभित्तींचे हे उघडया समुद्रातील खोलवरून वर आलेले असे मुख्य प्रकार आहेत. यांशिवाय शांत व उथळ पाण्यातील शैलभित्ती, जटिल शैलभित्तिसमूह, शैलभित्ती-पट्ट, भिंगाकार शैलभित्ती, टेकाडे, शिखरे इ. प्रकारच्या शैलभित्ती आढळतात. [→ प्रवाळद्वीपे व प्रवाळशैलभित्ति].

अनुतटीय शैलभित्ती : बेटाच्या किंवा खंडाच्या जमिनीच्या थेट किनाऱ्याला जोडलेल्या अथवा किनाऱ्याच्या सीमेभोवतीच्या शैलभित्तीला हे नाव देतात. ही प्रवाळाप्रमाणे इतर जीवांचीही असू शकते. सामान्यपणे हिचे (१) फरशीसारखा अरूंद (वा रूंद) सपाट पृष्ठभाग व (२) समुद्राकडे तीव उतार असलेला भाग असे दोन भाग पडतात. या शैलभित्ती किनाऱ्यालगत व उथळ पाण्यात आढळतात. किनारा व ही शैलभित्ती यांच्यामधील खारकच्छ अरूंद व उथळ असते. या शैलभित्तींची रूंदी ४०० ते २,५०० मी. असून त्यांचा विस्तार समुद्राच्या बाजूस झालेला आढळतो. या शैलभितींचा पृष्ठभाग व पुरोभाग यांवर शैवले, पोवळे, कॅल्शियम कार्बोनेट स्रवणारे इतर जीव यांची मोठया प्रमाणावर वाढ होते. चार्ल्स डार्विन यांच्या शैलभित्तींच्या आदर्श विकासातील ही प्रथम कमांकाची भित्ती आहे. मात्र जीवाश्म व भित्तिविकासाचा आधुनिक अभ्यास यांच्यावरून हिच्या आधी किंवा नंतर शैलभित्तीचा अधिक जटिल प्रकार विकसित झालेला असणे गरजेचे नसते, असे दिसून आले आहे.

रोधक शैलभित्ती : बेटाच्या वा खंडांच्या किनाऱ्याला समांतर असलेली ही शैलभित्ती खारकच्छाव्दारे किनाऱ्यापासून अलग झालेली असते. प्रवाळांच्या वा अन्य जीवांच्या रोधक शैलभित्तींचा खारकच्छाकडील उतार सामान्यपणे मंद, तर समुद्राकडील उतार एकदम उभा असतो. अनुतटीय शैलभित्तींपेक्षा या समुद्रकिनाऱ्यापासून अधिक दूर असतात. यांनी समुद्रकिनाऱ्यादरम्यान तयार झालेले खारकच्छ बरेच मोठे (रूंदी २.५-१६ किमी.) आणि अधिक खोल (३५-७५ मी.) असते. रोधक शैलभित्तींची रूंदी ६ ते ९०० मी. असून त्या पुष्कळच लांब असतात. मात्र नदीमुखांदरम्यान त्या अनेक ठिकाणी तुटल्याने खंडित झालेल्या असतात. यामुळे खारकच्छातून खुल्या समुद्रात वाहतूक करणे शक्य होते. वरील दिशेतील अखंड वाढीव्दारे त्यांची निर्मिती होते. या वाढीच्या काळात कोणत्या तरी अवस्थेत समुद्रतळाचे अधोगमन किंवा पाण्याची वाढती पातळी ही गरजेची गोष्ट असावी, असे मत आहे.ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य (क्वीन्सलँड) किनाऱ्यालगतची ⇨ ग्रेट बॅरिअर रीफही सुप्रसिद्घ प्रवाळ-शैलभित्ती रोधक शैलभित्ती असल्याचे तिच्या नावावरूनच उघड होते.

पहा : कंकणद्वीप खारकच्छ प्रवाळद्वीपे व प्रवाळशैलभित्ति.

संदर्भ : 1. Darwin, C. The Structure and Distribution of Coral Reefs, 1976.

2. Fagerstrom, J. A. The Evaluation of Reef Communities, 1987.

3. Guilcher, A. Coral Reef Geomorphology, 1988.

4. Schroeder, J. Purser, B.H., Eds., Reef Diagenesis, 1986.

5. Sorokin, Y. I. Coral Reef Ecology, 1994.

ठाकूर, अ. ना.