लेबानन : (अल्‌-जुम्हूरिया अल्‌-लुब्नानिया). भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील एक आशियाई देश. आशिया खंडाच्या अगदी पश्चिम भागात असलेल्या या देशाच्या उत्तरेस व पूर्वेस सिरिया, दक्षिणेस इस्राएल आणि पश्चिमेस भूमध्य समुद्र असून जगातील सर्वांत लहान सार्वभौम राष्ट्रांपैकी हे एक आहे. देशाचे एकूण क्षेत्रफळ १०,४०० चौ. किमी. व लोकसंख्या ३५,००,००० (१९८४ अंदाज) असून दक्षिणोत्तर लांबी २१५ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ३२ ते ८८ किमी आहे. लेबाननची एकूण सरहद्द ६५६ किमी. लांबीची असून तीपैकी भूमध्य समुद्रकिनारा १९५ किमी. लांबीचा आहे. देशाचा अक्षवृत्तीय विस्तार ३३ ४’, ते ३४ ४१’, उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार ३५ ६’, ते ३६ ३६’, पूर्व यादरम्यान आहे. बेरूत (लोकसंख्या ७,०२,०००-१९८० अंदाज) ही लेबाननची राजधानी आहे. येथील प्रमुख पर्वतश्रेणीवरून देशाला लेबानन हे नाव पडले आहे.

भूवर्णन : लेबाननची भूमी मुख्यतः पर्वतीय आहे. भूरचना जटिल व विविधतापूर्ण आहे. त्यामुळे अगदी थोड्या अंतरातसुद्धा भूमिस्वरूप, हवामान, जमीन व वनस्पतिजीवन यांमध्ये खूपच बदल झालेला आढळतो. देशाची निम्म्यापेक्षा जास्त भूमी ९०० मीटरपेक्षा अधिक उंचीची आहे. देशाचे पूर्व-पश्चिम दिशेने पुढीलप्रमाणे प्रमुख चार प्राकृतिक विभाग पडतात : (१) किनारी मैदान, (२) लेबानन (अरबी-जेबेल लुब्नान), (३) अल्‌-बिका खोरे व (४) अँटी लेबानन व हरमान पर्वतश्रेण्या.

भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर सु. २०९ किमी. लांबीचे सपाट व अरुंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. याच्या बहुतांश भागात अलीकडच्या काळात नद्यांनी गाळाचे संचयन केलेले दिसते. किनाऱ्यावर अर्धचंद्राकृती मैदानांची मालिका निर्माण झालेली असून प्रत्येक मालिका पूर्वेकडील लेबानन पर्वतरांगेच्या सोंडींनी वेढलेली आहे. त्या सोंडी पुढे समुद्रात गेलेल्या दिसतात. समुद्रकड्यांनी अनेक ठिकाणी हे मैदान खंडित झालेले आहे. या मैदानी भागात विविध प्रकारची फळे पिकवितात. लेबाननमधील महत्त्वाची शहरे याच मैदानी प्रदेशात आढळतात.

किनारी मैदानाच्या पूर्वेस, किनाऱ्याला समांतर अशी लेबानन ही ओबडधोबड स्वरूपाची घडीची पर्वतश्रेणी असून नैसर्गिक रीत्या निर्माण झालेल्या गढ्यांच्या ह्या मालिका आहेत. उत्तरेस केबीर नदीपासून दक्षिणेस लिटानी नदीपर्यंत सु. १६० किमी. लांबीची ही पर्वतश्रेणी आहे. तिची पूर्व-पश्चिम रुंदी सु. १०-१५ किमी. असून समुद्रसपाटीपासून उंची दोन ते तीन हजार मी. पर्यंत आढळते. समुद्रकिनाऱ्यापासून ४० किमी. च्या आतच ह्या रांगा आहेत. कर्नट एस्‌ सौदा हे देशातील सर्वोच्च शिखर (३,०८८ मी.) याच श्रेणीत आहे. जेबेल सॅनिन (२,६२८ मी.) हे यातल दुसरे महत्त्वाचे शिखर आहे. लेबानन पर्वतात चुनखडक, वालुकाश्म व चिकण माती यांचे जाड थर आढळतात. पूर्व-पश्चिम असलेल्या खोल दऱ्या व घळ्यांमुळे ही श्रेणी काही ठिकाणी खंडित झालेली आहे. काही ठिकाणच्या निदऱ्या अतिशय खोल आहेत. या प्रदेशाचा पूर्वेकडील उतार अधिक तीव्र स्वरूपाचा आहे. पूर्वेस बिका खेड्याच्या बाजूस काही ठिकाणी ९०० मी. उंचीचे भिंतीसारखे उभे कडे आहेत. या भूमिस्वरूपाचा परिणाम देशाच्या इतिहासावर झालेला आहे. या प्रदेशात गनिमी कारस्थानांना आळा घालणे मध्यवर्ती शासनाला फारच खर्चाचे व जिकिरीचे होऊन बसते. पूर्वी अधिक उंचीचे उतार सीडार वृक्षांनी आच्छादलेले होते परंतु गतशतकात फार मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्यामुळे आज त्यांतील फारच थोडे वृक्ष शिल्लक राहिले आहेत. या पर्वताच्या उतारांवर तयार केलेल्या पायऱ्यापायऱ्यांच्या जलसिंचित शेतीहून फलोत्पादन घेतले जाते.

पश्चिमेकडील लेबानन आणि पूर्वेकडील ॲटी लेबानन व हरमान पर्वतश्रेण्यांच्या दरम्यान १० ते २६ किमी. रुंदीचे व १८० किमी. लांबीचे बिका हे सपाट व सुपीक खोरे आहे. बिका खोऱ्याच्या उत्तर भागाचे ओराँटीस नदीने, तर दक्षिण भागाचे लिटानी नदीने जलवाहन केलेले आहे. या खोऱ्यात अनेक प्राचीन शहरांचे अवशेष पाहावयास मिळतात. अपुरा पाऊस असला, तरी दुसऱ्या महायुद्धकाळापासून उभारण्यात आलेल्या जलसिंचन प्रकल्पांमुळे येथे शतीविकास चांगला घडवून आणला आहे.  या खोऱ्यात मुख्यतः भाजीपाला पिकविला जातो.

देशाच्या पूर्व सरहद्‌द्दीवर लेबानन पर्वताला समांतर अशा अँटी लेबानन व हरमान या पर्वतश्रेण्या पसरल्या आहेत. अँटी लेबानन रांगेची उंची २,६५८ मीटरपर्यंत, तर हरमान रांगेची उंची २,८१४ मीटरपर्यंत आढळते. दक्षिण भागातील मौंट हरमान हे यातील प्रमुख शिखर आहे. अनेकदा ती एकच रांग मानली जाते. प्रत्यक्षात त्या दोन स्वतंत्र रांगा असून बारड नदीच्या निदरीमुळे त्या एकमेकींपासून अलग झाल्या आहेत. लेबानन पर्वतापेक्षा ह्या श्रेण्या कमी उंचीच्या व कमी जटिल आहेत. यांत सच्छिद्र चुनखडकाचे जाड थर आहेत.

लिटानी (लांबी १४५ किमी.), ओराँटीस व इब्राहिम या देशातील मुख्य नद्या आहेत. नद्यांना हिवाळ्यात अधिक पाणी असते. लिटानी नदी अनेक खोल निदऱ्यांमधून वहात जाऊन भूमध्य समुद्राला मिळते. लिटानी व ओराँटीस यांचा जलविभाजक हा रोमन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या बालाबाक गावाजवळ आहे. लेबानन पर्वताच्या पश्चिम उतारावर ९०० ते १,५०० मी. उंचीच्या प्रदेशात पुष्कळ झरे आढळतात. त्यांचा या उंचीपर्यंतच्या प्रदेशातील शेतीसाठी चांगला उपयोग होतो. पूर्व उतारावर मात्र पाऊसही कमी पडतो व महत्त्वाचे झरेही नाहीत. त्यामुळे लेबानन आणि पूर्वेकडील अँटी लेबानन व हरमान पर्वतांमधून बिका प्रदेशाकडे फारच कमी नद्या वहात येतात. अँटी लेबानन व हरमान पर्वतांत जो थोडाबहुत पाऊस पडतो, ते पावसाचे पाणी जलभेद्य चुनखडीच्या प्रदेशात झिरपून पूर्व पायथ्याजवळील सिरियन प्रदेशातून वाहू लागते. ओराँटीस व लिटानी नद्यांचे शीर्षप्रवाह जरी बिका खोऱ्यात असले, तरी या सुपीक खोऱ्याच्या जलसिंचनासाठी या नद्यांचा अजून पुरेसा उपयोग करून घेतलेला दिसत नाही. किनारी मैदानात मात्र शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकतो.

हवामान : लेबानन मुख्यतः भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात येतो. उंचसखलपणा आणि पश्चिमी वारे यांचा देशाच्या हवामानावर परिणाम झालेला दिसतो. प्रदेशनिहाय हवामानात खूपच भिन्नता आढळते. पूर्वेकडील पर्वतउतार, टेकड्या व दऱ्यांपेक्षा भूमध्य सागरकिनाऱ्यावरील हवामान अधिक आर्द्र असते. मध्यपूर्वेच्या मानाने येथे पाऊस भरपूर पडतो. वार्षिक पर्जन्यमान किनाऱ्यावर ९० सेंमी., पर्वतीय प्रदेशात १३० ते १५० सेंमी., बिका प्रदेशात ३८ सेंमी. पेक्षा कमी असते. अँटी लेबानन व हरमान पर्वतांत बिका खोऱ्यापेक्षा थोडा अधिक पाऊस पडतो. वर्षातील ८०% पाऊस नोव्हेंबर ते मार्च या काळात प्रामुख्याने डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांत होतो. उन्हाळा हा कोरडा ॠतू असतो. मात्र किनारी प्रदेश आर्द्र असतात. हिवाळ्यात पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टी होते. वार्षिक सरसरी तापमान वेरूत येथे २१ से. असून तेथील हिवाळ्यातील तापमान १३ से., तर उन्हाळ्यातील तापमान २८ से. असते. किनारी प्रदेशात सरासरी तापमान जानेवारीमध्ये १३ से. व जूनमध्ये २९ से. असते.

वनस्पती व प्राणी : प्राचीन व मध्ययुगीन कालखंडांत लेबाननमध्ये दाट अरण्ये होती व येथून लाकडाची, मुख्यतः सीडारची, बांधकाम व जहाजबांधणीसाठी निर्यात केली जात असे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे आज नैसर्गिक वनस्पतींखालील क्षेत्र बरेच कमी झालेले दिसते. तरीही वनस्पतिजीवन समृद्ध असून वनस्पतींच्या सु. २,५०० जाती देशात आढळतात. उपोष्ण कटिबंधीय व वाळवंटी प्रकारांपासून ते अल्पाइन प्रकारांपर्यंत वनस्पतिप्रकार आढळतात. सखल प्रदेशात ऑलिव्ह, अंजीर आणि द्राक्षांच्या बागा पुष्कळ आढळतात. अधिक उंचीवर सीडार, मॅपल, जूनिपर, फर, सायप्रस, कॅरोब, ओक व पाइन हे मुख्य वृक्षप्रकार आढळतात.

शिकारीमुळे अनेक वन्य प्राणी मारले गेले आहेत. हरिण, कोल्हा, अस्वल, कुरंग, ससा, रानमांजर, साळिंदर, मार्टेन, रानउंदीर, खार, सरडा, साप इ. विविध प्रकारचे प्राणी देशात पुष्कळ आढळतात. कस्तूर, नाइटिंगेल, तितर, कोकिळ, कबूतर, सुतारपक्षी, गिधाड, घुबड, पाणकावळा, गरुड, घार, बहिरी ससाणा, पाणकोळी, बदक, बगळा, हंसक (फ्लेमिंगो) हे पक्षी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. आफ्रिका व यूरोप यांमधील अनेक स्थलांतरित पक्षी लेबाननमध्ये आढळतात.


इतिहास व राजकीय स्थिती : लेबाननच्या इतिहासावर मुख्यतः देशाच्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम झालेला दिसतो. पर्वतीय प्रदेशामुळेच सभोवतालच्या जुलमी सत्तेतून येथील अल्पसंख्य जमातींचे अस्तित्व टिकून राहू शकले. समुद्रसान्निध्यामुळे प्राचीन काळी लेबाननच्या सीडार आणि स्प्रूसच्या जंगलांतील उत्पदनांच्या निर्यातीसाठी व्यापारी मार्ग उपलब्ध झाले. तसेच टॉलेमी व रोमन यांच्या काळात येथील तांबे व लोखंड यांच्या व्यापारासाठी संधी उपलबध झाली. लेबानन म्हणजे प्राचीन फिनिशियन लोकांची मातृभूमी होय. लेबानन व सिरिया हे पूर्वीपासून फिनिशियाचा एक भाग म्हणून एकत्र होते (इ.स.पू. १२००-१०००). त्यानंतर हे दोन्ही प्रदेश रोमन साम्राज्यात विलीन झाले. इ. स. सातव्या शतकात लेबाननचा काही भाग अरबांनी जिंकला. मॅरोनाइट ख्रिश्चनांचीही सत्ता दीर्घकाळ येथे राहिली. धर्मांतर आणि स्थलांतर यांमुळे येथे इस्लामचा हळूहळू प्रसार वाढत गेला, तरीही ख्रिश्चनांचेच प्राबल्य राहिले. अकराव्या शतकात ड्रूझिझांनी लेबानन पर्वताच्या दक्षिणेस आणि सिरियात आपले बस्तान बसविले. लेबाननच्या काही भागांवर धर्मयोद्धे, मंगोल हल्लेखोर व इतरांची तात्पुरती सत्ता होती. त्यामुळे ऑटोमन साम्राज्यांतर्गत मध्यपूर्वेचे एकीकरण होईपर्यंत येथील व्यापार घटला. 

सोळाव्या शतकात तुर्कांच्या ऑटोमन साम्राज्याचा हा एक भाग बनला. या काळात लेबाननला अधिक स्वायत्तता होती. ऑटोमन अधिकाऱ्यांनी मौंट लेबानन भागातील जिल्हे त्यांचे मूळ अमीर व शेख यांच्याकडे सुपूर्त केले. माआन कुळातील फक्र अद्‌ दीन (१५८६-१६३५) याने स्वायत्त लेबाननची योजना मांडली. पश्चिम युरोपशी व्यापारी व लष्करी करार केले आणि देशात ख्रिश्चन मिशनरींच्या कार्याला प्रोत्साहन दिले. १६९७ मध्ये शीहाब घराण्याने या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १७८८ ते १८४० दरम्यानचा मधला काही कालावधी वगळता मौंट लेबाननवर शीहाब घराण्यातील दुसरा बशीर याची सत्ता होती. त्याने आपल्या सत्तेचा विस्तार केला व एक प्रबळ राज्य बनविण्यात यश मिळविले. १८३२-४० या काळात सिरियावर ईजिप्तचा ताबा असताना लव्हॅंट प्रदेशात यूरोपियनांनी प्रवेश केल्यामुळे लेबानन आंतरराष्ट्रीय राजकारणात ओढला गेला. ख्रिश्चन व ड्रझिझ यांच्यातील वैर शिगेला पोहोचले. १८४०-४१ मध्ये ब्रिटिशांनी स्वारी करून ईजिप्शियनांच्या ताब्यातून लेबाननला सोडविण्याचा आणि दुसरा बशीर याला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला या वादात फ्रान्सही ओढला गेला. त्यामुळे धार्मिक वादावर तात्पुरता तोडगा काढण्यात अडचणी आल्या. विभागलेले शासन काम करू शकत नव्हते. धार्मिक वैमनस्यातून आर्थिक उदासीनता शिगेला पोहोचली. ड्रझिझंना आपल्या सत्तेचे महत्त्व कमी होत असल्याचे दिसू लागले. त्यामुळे १८६० मध्ये ख्रिश्चनांविरुद्ध त्यांनी मोठा हल्ला चढविला. परंतु आपल्या उच्छेदाची भीती वाटू लागल्याने यूरोपच्या मध्यस्थीची विनंती करण्यात आली, त्यावेळी प्रमुख सत्तांनी सिरियन सागरात लढाऊ गलबतांचा ताफा पाठविला व फ्रेंचांनी मौंट लेबाननमध्ये लष्कर धाडले. यूरोपीय दडपणाखाली ख्रिश्चनांना अनुकूल असे नवीन शासन स्थापन करण्यासाठी ऑटोमन शासनाने आंतरराष्ट्रीय आयोगास संमती दिली. त्यामुळे १८६४ मध्ये स्वतंत्र ख्रिस्ती राज्यपाल नेमून मौंट लेबानन या स्वायत्त प्रांताची निर्मिती झाली. हा राज्यपाल जरी ऑटोमन शासनाचा नोकर असला, तरी त्याला आपल्या सार्वभौम शासनाबरोबरच्या यूरोपीय संघर्षात यूरोपियनांच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावे लागे.

पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याने जर्मनीच्या बाजूने प्रवेश केल्याने ते मित्रराष्ट्रांच्या वेढ्यात अडकले होते. या काळात या प्रदेशात सर्वत्र भुकेचे साम्राज्य पसरले व लेबाननची भरभराट संपुष्टात आली. १९१८ पूर्वी सामान्यपणे हा सिरियाचाच एक भाग समजला जाई. युद्धाच्या अखेरीस मित्र राष्ट्रांच्या सैन्याने हा देश आपल्या ताब्यात घेतला व अरबांच्या मदतीने तुर्कांना लेबाननमधून हाकलून दिले. तुर्कांच्या पराभवामुळे ऑटोमन साम्राज्य बरखास्त करण्यात आले. मित्रराष्ट्रांच्या १९२० मधील बैठकीत राष्ट्रसंघाचा महादेश म्हणून सिरियाचा कारभार फ्रान्सकडे देण्यात येऊन त्यात मौंट लेबानन, बेरूत व सायडन यांसारख्या काही शहरांचा व जिल्ह्यांचा आणि पूर्वेकडील बिका खोऱ्याचा समावेश करण्यात आला. फ्रेंचांनी सिरिया वेगळा काढून बाकीच्या प्रदेशाला ग्रेटर लेबानन (ग्रॅंड लिबान) असे नाव दिले. त्याचेच पुढे लेबानीज रिपब्लिक झाले. पारंपारिक मौंट लेबाननच्या चौपट मोठा हा प्रदेश होता. त्यात मुस्लिम लोकसंख्याही सामावून घेण्यात आली. १९२३ मध्ये राष्ट्रसंघाने लेबानन आणि सिरिया विश्वस्त (महादिष्ट) प्रदेश म्हणून रीतसरपणे फ्रान्सकडे दिले. मॅरोनाइट यांनी या निर्णयाचे स्वागतच केले. त्यामुळे नंतरच्या २० वर्षांपर्यंत मॅरोनाइटांना हे फायद्याचेच ठरले. फ्रेंच प्रशासन त्यामानाने कर्तव्यदक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीत सार्वजनिक उपयोगाची कामे व दळणवळण सुविधा वाढल्या, शिक्षणाचा प्रसार झाला व्यापारी केंद्र म्हणून बेरूतची भरभराट झाली. परंतु रेशीम उद्योग कमी झाल्याने व जागतिक आर्थिक मंदीमुळे शेतीचे महत्त्व कमी झाले. दरम्यानच्या काळात अधिक स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली. १९३६ मध्ये फ्रॅंको-लेबानीज यांच्यात स्वातंत्र्य व परस्पर मैत्री करार करण्यात आला त्याला फ्रेंच शासनाने मान्यता दिली नाही. लोकसंख्येच्या बाबतीत मॅरोनाइटांचे बहुमत होऊ शकले नाही. ख्रिश्चन व मुस्लिम यांची लोकसंख्या जवळजवळ सारखी राहिली. तत्पूर्वीच्या काळात एक मोठा गट निर्माण झाला. त्याला बृहत्‌-सिरिया किंवा अरब राज्याचा भाग हवा होता. वेगवेगळ्या गटांमधील तणाव कमी करण्यासाठी १९२६ मध्ये असे ठरविण्यात आले की, प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष मॅरोनाइट, पंतप्रधान सुन्नी व विधिमंडळाचा सभापती शिया पंथीय असेल.

लेबानन १९४० मध्ये व्हिशी सत्ताधिकाऱ्यांच्या ताब्यात आला परंतु १९४१ मध्ये अँग्लो-फ्री फ्रेंच यांच्या संयुक्त सैन्याने लेबानन व सिरिया आपल्या ताब्यात घेतले. फ्री फ्रेंच प्रतिनिधींनी २६ नोव्हेंबर १९४१ रोजी लेबाननच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि १९४३ मध्ये प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. त्याला ब्रिटिश शासनाने मान्यता दिली. १९४३ मध्ये त्यांनी निवडणुका घेतल्या. त्यांत राष्ट्रवाद्यांनी विजय मिळविला व त्यांचा नेता शेख बीशारा अल्‌ कूरी याने लेबाननच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली व १९५२ मध्ये राजीनामा देईपर्यंत राज्य कारभार केला. नव्या शासनाने फ्रेंच प्रभाव असलेल्या संविधानात काही दुरुस्त्या केल्या. मात्र त्याला फ्रेंचांनी विरोध केला. १९४३ मध्ये जेव्हा प्रबल राष्ट्रवादी शासनाची स्थापना झाली, तेव्हा फ्रेंचांनी हस्तक्षेप करून राष्ट्रध्यक्ष बीशारा अल्‌ कूरी व त्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ यांना अटक केली. त्यामुळे देशात सरकारविरोधी बंड निर्माण झाले. ग्रेट ब्रिटनने ताबडतोब मध्यस्थी करून शासनाची पुनःस्थापना केली. लेबाननमध्ये धार्मिक व सांस्कृतिक भिन्नता खूपच होती. प्रजासत्ताकाची स्थापना झाली, तेव्हा परस्परांमधील वैर टाळण्यासाठी सत्तासमतोलाच्या प्रश्र्नावर वेगवेगळ्या गटांमध्ये समझोता झाला. १९४३ मधील एका अलिखित राष्ट्रीय ठरावानुसार कार्यकारी व वैधानिक कार्यात ख्रिश्चन व मुस्लिमांचा सहभाग ६ : ५ अशा प्रमाणात ठेवण्यात आला. जानेवारी १९४४ मध्ये लेबाननच्या संपूर्ण स्वायत्ततेची घोषणा करण्यात आली. १९४५ मध्ये ग्रेट ब्रिटन व फ्रान्स या दोहोंनी आपल्या फौजा काढून घेण्याचा करार मान्य केला. त्यामुळे १९४६ मध्ये लेबाननला संपूर्ण स्वातंत्र्य मिळू शकले. लेबानन संयुक्त राष्ट्रांचा व अरब लीगचाही सदस्य बनला.


लेबाननच्या बाबतीत १९५०-१९७० हा काळ आर्थिक व राजकीय दृष्ट्या सामान्यतः स्थैर्याची म्हणून ओळखला गेला. १९५२ पासून लेबाननला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडून वाढती मदत मिळू लागली. तसेच पाश्चिमात्य व्यापारी लोकांचे आगमन आणि तेलाचे वाढते स्वामित्वशुल्क यांचा देशाला खूपच फायदा झाला. १९४८, १९६७ व १९७३ च्या अरब-इझ्राएल युद्धांत लेबाननने तटस्थतेची भूमिका घेतली. १९५७ मध्ये चेंबर ऑफ डेप्युटीजच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा देशात अशांततेची परिस्थिती निर्माण झाली. मुस्लिम गटांमध्ये संघर्ष सुरू झाले. त्यांची विचारसरणी अरब राष्ट्रवादाकडे  झुकलेली होती व ईजिप्त आणि सिरियाशी त्यांची विशेष जवळीक होती. १९५८ मध्ये नागरी विक्षोभ खूपच वाढला. मुस्लिम-ख्रिश्चन गटांमध्ये संघर्ष सुरू झाले. त्यामुळे जुलै १९५८ मध्ये जनरल फुआद काहाब यांनी अमेरिकेकडून लष्करी मदत मागितली. ताबडतोब अमेरिकेने १०,००० सैनिक बेरूतमध्ये पाठविले. शांतता प्रस्थापित होईपर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंत ते सैन्य देशात राहिले. दरम्यानच्या काळात चेंबरने काहाब यांची सशस्त्र बलाचा कमांडर म्हणून निवड केली. त्यांचीच पुढे राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली.  ते १९६४ पर्यंत सत्तेवर राहिले. त्यानंतर चार्लस्‌ हॅलो (१९६४-७०) व सुलेमान फ्रांजिया (१९७०-७६) हे सत्तेवर आले. ऑक्टोबरमध्ये अमेरिकन फौजा काढून घेण्यात येऊन सार्वजनिक सुरक्षिततेची पुनःस्थापना करण्यात आली. 

लेबाननमधील ख्रिश्चन व मुस्लिम यांचे वेगवेगळे गट अनेक वर्षे ऐक्य व सहिष्णुता ह्या भावनांनी एकत्र नांदत आलेले आहेत. अरब-इझ्राएल युद्धात देशाने कधीही सक्रिय सहभाग घेतलेला नाही. परंतु, सु. १,८६,००० पॅलेस्टिनी अरब जेव्हा मुस्लिम निर्वासित म्हणून दक्षिण लेबाननमध्ये आले व तेथून त्यांनी इझ्राएलविरोधी कारवाया सुरू केल्या, तसेच इझ्राएलवर बहिष्कार घालणाऱ्या अरब धोरणाला लेबानने पाठिंबा दिला, तेव्हापासून मात्र देशात धार्मिक दंगली उसळू लागल्या. परिणामतः प्रादेशिक संघर्षात लेबानन ओढला गेला. १९६४ मध्ये पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेची (पीएल्‌ओ) स्थापना करण्यात आली. १९८२ च्या मध्यात पीएल्‌ओचे नेतृत्व ट्यूनिसकडे जाईपर्यंत बेरूत हेच त्यांचे मुख्य ठाणे होते. पीएल्‌ओच्या गनिमी कारवायांचे तळ देशात ठेवण्यास लेबाननने दिलेली परवानगी व तेथून इझ्राएलवर होणारे हल्ले यांमुळेच इझ्राएलने लेबाननमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. २६ डिसेंबर १९६८ रोजी दोन बंदूकधारी अरब अतिरेक्यांनी अथेन्स येथे इझ्राएलच्या प्रवासी विमानावर गोळ्या झाडल्या. त्यांत एकजण मरण पावला. त्यामुळे दोनच दिवसांनी इझ्राएलच्या सैन्याने बेरूत विमानतळावर अचानक हल्ला करून १३ विमाने निकामी केली. इझ्राएलविरोधी गनिमी कारवाया करणाऱ्या पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यावरून देशात दोन तट पडले. वेगवेगळ्या जमातींत संघर्ष वाढत गेले. राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि मध्यपूर्वेतील एक प्रसिद्ध व्यापारी व वित्तीय केंद्र म्हणून असलेले लेबाननचे महत्त्व कमी झाले.

मध्यपूर्वेकडील संघर्षामुळे १९६० च्या दशकातील उत्तरार्धात आणि १९७० च्या दशकातील पूर्वार्धात लेबाननच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाले. लेबाननच्या भूमीवरून हजारो शस्त्रास्त्रधारी पॅलेस्टिनींच्या इझ्राएलविरोधी अनेक गनिमी कारवाया चालू होत्या. परंतु शासनाला या कारवाया रोखताही आल्या नाहीत किंवा त्यांच्यावर प्रतिहल्लाही करणे शक्य झाले नाही. ऑक्टोबर १९६९ मध्ये लेबाननचे लष्कर व पॅलेस्टिनी कमांडो यांच्यात युद्ध सुरू झाले. गनिमी कारवाया रोखण्यासाठी १९७० मध्ये इझ्राएलने लेबाननच्या भूमीवर अनेक वेळा हल्ले केले. १९७०-७१ मध्ये अनेक गनीम जॉर्डनमधून दक्षिण लेबाननमध्ये आले. तेथील निर्वासित छावण्यांमधून त्यांनी इझ्राएलविरोधी कारवाया सुरू केल्या त्यामुळे इझ्राएलने दक्षिण लेबाननमधील खेड्यांवर हल्ले चढविले. पुन्हा १९७२ मध्ये लेबानन लष्कर आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध झाले. मे १९७२ मध्ये पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी इस्राएलविरोधी अतिरेक्यांनी तेल आवीव्हच्या लॉर्ड या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला, तसेच सप्टेंबर १९७२ मध्ये म्यूनिक येथे इझ्राएली ऑलिंपिक संघातील ११ खेळाडूंची हत्या केली. लेबाननने या घटनेची जबाबदारी नाकारली परंतु इझ्राएलच्या सैन्याने अतिरेक्यांच्या शोधासाठी लेबाननमध्ये आपले सैन्य घुसविले. त्यात अनेक नागरिक मारले गेले. एप्रिल १९७३ मध्ये इझ्राएलने बेरूतवर हल्ला करून तीन पॅलेस्टिनी नेत्यांची हत्या केली. मेमध्ये संपूर्ण देशभर लेबानी लष्कर पॅलेस्टिनी यांच्यात मोठ्या प्रमाणावर युद्ध भडकले. ते तीन आठवड्यांपर्यंत चालले. ऑक्टोबर १९७३ मध्ये अरब-इझ्राएल युद्धात इझ्राएली विमानांनी बेरूतजवळच्या महत्त्वपूर्ण रडार केंद्राचा विनाश केला, तरी लेबाननने त्या युद्धात भाग घेतला नाही किंवा दक्षिण लेबाननमध्ये चालू असेलल्या पॅलेस्टिनी गनिमी कारवायांत हस्तक्षेपही केला नाही. इझ्राएलने मात्र दक्षिण लेबाननवरील हल्ले तसेच चालू ठेवले. एप्रिल व मे १९७४ मध्ये पॅलेस्टिनींनी लेबाननच्या गावांवर सतत हल्ले करून अनेक लोकांना ठार मारले व शेकडो लेाकांना जखमी केले. उजव्या विचरसरणीच्या ख्रिश्चनांनी समस्या सोडविण्याचे शासनाचे प्रयत्न अपुरे असल्याबद्दल धिक्कार केला, परंतु डाव्या विचारसरणीच्या मुस्लिमांनी पॅलेस्टिनींचा बचाव केला आणि दोन्हीही घटकांनी खाजगी सेना उभारली.

या दोन गटांत १९७५ च्या सुरुवातीच्या काळात अधूनमधून होणाऱ्या हिंसक घटनांचे पर्यवसान नागरी युद्धात झाले आणि त्यात मॅरोनाइट ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम व इतर ख्रिश्चन गट उजव्या विचारसरणीचे विरुद्ध पॅलेस्टिनी गनीम व इतर डाव्या विचाराचे अरब दल, असे संघर्ष शिगेला पोहोचले. अठरा महिन्यांच्या अशा संघर्षात सर्व गटांचे मिळून सु. एक लाख लोक मारले गेले व सु. सहा लाख लोक निर्वासित बनले. मुस्लिम डावी आघाडी व पॅलेस्टिनी यांचा संपूर्ण विजय रोखण्यासाठी एप्रिल १९७६ मध्ये सिरियाच्या सैन्याने लेबाननमध्ये गुप्त प्रवेश केला व मुख्यतः बिका खोऱ्यातील प्रदेशावर कब्जा मिळविला. सौदी अरेबिया व इतर अरब देश यांच्या मदतीने युद्धविराम घडवून आणला आणि ऑक्टोबरपर्यंत युद्ध थांबविण्यात आले. या युद्धामुळे लेबाननच्या आर्थिक नुकसानीबरोबरच केंद्र शासनही दुर्बल बनले आणि प्रभावी सत्ता सिरियन, पॅलेस्टिनी व सु. तीस प्रांतिक लोकसेनांकडे राहिली. ख्रिश्चन फलॅंजस्ट यांनी आपली सत्ता पूर्व-मध्य लेबाननवर स्थापिली. उजव्या गटाचा लेबानन लष्करी अधिकारी मेजर साआद हद्दाद यांनी इझ्राएल, पॅलेस्टिनी मुक्ती संघटना (पीएल्‌ओ) व इतर डाव्या विचाराच्या मुस्लिमांच्या मदतीने दक्षिण सरहद्द प्रदेशावर कब्जा मिळविला, तर सिरियन लष्कराने उत्तर व पूर्व लेबानन आपल्या ताब्यात घेतला.


मार्च १९७८ मध्ये पॅलेस्टिनी राष्ट्रीय मुक्ती आघाडीच्या फौजांनी इझ्राएलवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इझ्राएली दक्षिण लेबाननमध्ये घुसले व पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. इझ्राएली लष्काराने दक्षिण लेबाननमधील ‘पीएल्‌ओ’ चे लष्करी तळ उद्‌ध्वस्त केले. परंतु संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने लेबाननमधून इझ्राएली लष्कर काढून घेण्यास सांगितले व तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची अंतरिम फौज (UNIFIL) पाठविण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रांच्या फौजा लेबाननमध्ये आल्या, तेव्हा इझ्राएलने आपल्या फौजा काढून घेतल्या. ‘पीएल्‌ओ’ने उत्तर इझ्राएलवर व बिका खोऱ्यामधील सिरियाच्या विमानविरोधी क्षेपणास्त्र साठ्यांवर रॉकेटमारा चालूच ठेवला. त्यामुळे इझ्राएलने जून १९८२ मध्ये लेबाननवर जबरदस्त हल्ला चढविला. त्यातूनच मोठे युद्ध भडकले. दक्षिण लेबाननच्या बहुतांश प्रदेशावर इझ्राएलने ताबा मिळविला. त्याने ताबडतोब ‘पीएलओ’ चे दक्षिण भागातील तसेच किनाऱ्यावरील टायर व सायडन येथील तळ उद्‌ध्वस्त करून सिरियन क्षेपणास्त्रसाठे निकामी केले. पॅलेस्टिनींची छावणी असलेल्या व मुस्लिम लोकसंख्या अधिक असलेल्या बेरूतमधील पश्चिम विभागाला इझ्राएली सैन्याने वेढा घातला व सहा हजारांपेक्षा अधिक पॅलेस्टिनी सैनिकांना पकडून ताब्यात घेतले. सप्टेंबरच्या मध्यात तर शेकडो पॅलेस्टिनींना ठार मारण्यात आले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या राजदूताने युद्धविरामाचे अनेक पर्याय मांडले, परंतु ते मानले गेले नाहीत. तेव्हा इझ्राएल, पीएल्‌ओ व सिरिया यांनी तात्पुरता युद्धबंदी करार केला. १ सप्टेंबरला चौदा हजारांवर पॅलेस्टिनी व सिरियन सैनिक ह्यांना बेरूतमधून जहाजाने हलविण्यात आले. या युद्धात लेबाननचे १९,००० पेक्षा अधिक लोक ठार व ३०,००० पेक्षा अधिक जखमी झाले. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच बहुराष्ट्रीय शांतिसेना बेरूतजवळ येऊन दाखल झाल्या. यांत ब्रिटिश, फ्रेंच व इटालियन सैनिक आणि अमेरिकन आरमाराचा समावेश होता. 

या शस्त्रसंधीमुळे तात्पुरती का होईना, शांतता प्रस्थापित झाली. १४ सप्टेंबरला लेबाननच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष म्हणून ऑगस्टमध्ये निवडून दिलेल्या वशीर गेमाएल या फलॅंजस्टच्या नेत्याची पूर्व बेरूतमधील मुख्य कार्यालयात झालेल्या बाँबस्फोटात निर्घृण हत्या झाली. त्यानंतर लगेचच पॅलेस्टिनींचा सततचा अडथळा पूर्णपणे मोडून काढण्यासाठी इझ्राएलच्या सैन्यतुकड्या पश्चिम बेरूतकडे वळल्या. फलॅंजस्ट लष्कराला साब्रा आणि शातिला निर्वासित छावण्यांमध्ये येण्याची परवानगी मिळाली. यावेळी सु. ६०० पॅलेस्टिनींची कत्तल झाली. या हत्येमध्ये फलॅंजस्टमधील काहींचा प्रत्यक्ष हात होता त्यामुळे अशा राजकीय दृष्ट्या नाजूक प्रश्नांच्या चौकशीला तोंड देणे लेबानी शासनाला अशक्य झाले. १९८३ च्या सुरुवातीला इझ्राएली व सिरियन सैन्यांच्या ताब्यात लेबाननचा बराच मोठा भाग होता. डिसेंबर १९८२ मध्ये लेबानन व इझ्राएल यांच्यात बोलणी सुरू होऊन अमेरिकन परराष्ट्रसचिव जॉर्ज शुल्ट्‌झ यांनी तयार केलेल्या मसुद्यानुसार १७ मे १९८३ रोजी एका बारा कलमी करारावर सह्या झाल्या. त्यांनुसार परस्पर-वैर-भावना संपुष्टात आणण्याचे ठरविण्यात आले तसेच तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व विदेशी फौजा लेबाननमधून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सिरियाने मात्र या करारास मान्यता दिली नाही तसेच बिका खोऱ्यात व उत्तर लेबाननमध्ये असलेले आपले ४७,००० सैनिक काढून घेण्यास नकार दिला. परिणामतः इझ्राएलनेही आपले दक्षिणेतील लष्कर काढून घेण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात चौफ पर्वतात ड्रूझिझ व फलॅंजस्ट सैन्यांत जोरदार लढाई सुरू झाली. बेरूतमधील अमेरिकन राजदूतावासावर एप्रिल १९८३ मध्ये बाँबहल्ला झाला. २३ ऑक्टोबरला बेरूत विमानतळावर अमेरिकन बराकीत झालेल्या बाँबस्फोटामुळे सुमारे २४० नौसेना अधिकारी मारले गेले. त्याच दिवशी याच प्रकारच्या बाँबस्फोटामुळे फ्रेंच छत्रीधारीसेना बराकीतील सु. ५८ व्यक्ती ठार झाल्या. नोव्हेंबरमध्ये प्रमुख लेबानी राजकीय घटकांची समेट घडवून आणण्याबाबतची परिषद झाली. दरम्यान पॅलेस्टिनी पाठिंब्यावरील जहाल सिरियन व पीएल्‌ओचे अध्यक्ष यासर अराफत यांच्याशी निष्ठा असलेले गनीम यांच्यात युद्ध सुरू झाले. ट्रिपोली येथे पराजय झाल्यानंतर अराफत यांनी डिसेंबरमध्ये लेबाननमधून माघार घेतली. एका तात्पुरत्या तहानुसार संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षणाखाली अराफत यांस आपल्या ४,००० पाठिराख्यांसह ट्रिपोली सोडून जाण्याची परवानगी देण्यात आली. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर ९१८३ पर्यंत जिनीव्हा येथे राष्ट्रीय समेट परिषद झाली. तीत लेबाननमधील वेगवेगळे पक्ष सहभागी झाले होते. यावेळी मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात शासनामध्ये प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले.

अमिन गेमाएल शासनाची स्थिती १९८४ च्या सुरुवातीपासूनच बरीच खालावली. जानेवारीमध्ये लेबाननचा काही भाग परकीय फौजांच्या ताब्यात होता. फेब्रुवारी १९८४ च्या पूर्वार्धात पहिल्यापेक्षाही अधिक तीव्र युद्धस्थिती निर्माण झाली. ५ फेब्रुवारीला सुन्नी मुस्लिम पंतप्रधान वाझान यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. त्यानंतर अल्पावधीतच अमेरिका, ग्रेट ब्रिटन व इटली या देशांनी लेबाननमधील आपल्या शांतिसेना काढून घेण्याचा निर्णय घेतला परंतु अमेरिकेचे सिरियावरील हवाई व तोफांचे हल्ले चालूच राहिले. मार्चच्या सुरुवातीस सिरियाच्या व मुस्लिम फौजांच्या सततच्या दबावामुळे गेमाएल शासनाने फौजा काढून घेण्याचा आधीच्या मेमध्ये इझ्राएलशी केलेला करार रद्द केला. याच महिन्यात कोणत्याही पुरेशा निर्णयाप्रत न पोहोचता लेबानी समेट परिषद बरखास्त करण्यात आली.

एप्रिल १९८४ मध्ये राष्ट्राध्यक्ष गेमाएल यांनी ख्रिश्चन व मुस्लिम यांना समान प्रतिनिधित्व देणाऱ्या लेबानी राष्ट्रीय संयुक्त मंत्रिमंडळाच्या योजनेस सिरियाचे राष्ट्राध्यक्ष आस्साद यांनी मान्यता दिली. तीनुसार रशिद कारामी यांची पंतप्रधानपदी निवड झाली. त्यांनी १० मंत्र्यांचे मंत्रिमंडळ बनविले. माजी राष्ट्राध्यक्ष फ्रांजिया यांनी मात्र मंत्रिमंडळास तीव्र विरोध दर्शविला. सर्व धार्मिक गटांचे संयुक्त सैन्यदल स्थापण्यासंबंधीची सिरियाने मांडलेली बेरूतची सुरक्षा योजना जुलै १९८४ मध्ये स्वीकारण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीपासून बंद असलेले बेरूत बंदर व विमानतळ वाहतुकीस खुले करण्यात आले. परंतु ही सुरक्षा योजना विशेष यशस्वी होऊ शकली नाही. वेगवेगळ्या धार्मिक गटांमधील वाद पुन्हा सुरू झाले. नोव्हेंबर १९८४ मध्ये सिरियाने दुसरी सुरक्षा योजना मांडली. तीनुसार सुरुवातीला संपूर्ण बेरूत लेबानी लष्कराच्या ताब्यात घेऊन त्यांनतर शासनाचे अधिकारक्षेत्र उत्तरेस ट्रिपोलीपर्यंत, दक्षिणेस इझ्राएलव्याप्त प्रदेशापर्यंत व पूर्वेस चौफ पर्वतापर्यंत वाढवावयाचे असे ठरले होते परंतु पूर्वकडील विस्तारास ड्रूझिझ लष्कराने विरोध केला.

सप्टेंबर १९८४ मध्ये स्थापन झालेल्या इझ्राएलच्या राष्ट्रीय संयुक्त शासनाने लेबानन शासनाशी बोलणी करून लेबाननमधून सैन्य काढून घेतले. मार्च १९८५ च्या पूर्वार्धात दूरगामी विचार करून लेबाननमधील मुस्लिमांना अधिक राजकीय व संविधानात्मक अधिकार देणाऱ्या सिरियन सुरक्षा योजनेला राष्ट्राध्यक्ष गेमाएल यांनी मान्यता दिली. मात्र इतर गटांनी तिला विरोध दर्शविला. इझ्राएलने सायडनमधून आपले लष्कर काढून घेतल्यानंतर मार्च १९८५ मध्ये ख्रिश्चन लष्कराने पॅलेस्टिनी निर्वासित छावण्यांवर व शहरातील मुस्लिम प्रदेशावर हल्ले चढविले. लेबाननमधील यादवी संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने ड्रूझिझ, अमल व लेबानी लष्कर अशा तीन प्रमुख गटांच्या नेत्यांची डिसेंबर १९८५ मध्ये दमास्कस येथे परिषद झाली तथापि शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही. सप्टेंबर १९८६ मध्ये मंत्रिमंडळाची (राष्ट्राध्यक्ष गेमाएल वगळता) नागरी युद्ध समाप्तीसंबंधात व शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी बैठक झाली. मे १९८७ मध्ये पंतप्रधान रशिद कारामी यांनी राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ कोसळले. १ जून रोजी कारामी प्रवास करीत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये बाँबस्फोट होऊन त्यात ते मारले गेले. ऑक्टोबरमध्ये हुसेनी यांची राष्ट्राध्यक्षपदावर निवड करण्यात आली. मात्र अद्याप लेबाननमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित झालेले आढळत नाही.


राष्ट्रीय सभेतील संख्याबळ १९४३ मधील राष्ट्रीय ठरावानुसार धार्मिक आधारावर ठेवण्यात आले. १९३२ च्या जनगणनेनुसार तीत ख्रिश्चन-मुस्लिमांच्या ६:५ या प्रमाणानुसार ख्रिश्चन प्रतिनिधी ५३ व मुस्लिम प्रतिनिधी ४५ असत. तसेच राष्ट्राध्यक्ष मॅरोनाइट ख्रिश्चन पंतप्रधान सुन्नी मुस्लिम व राष्ट्रीय सभेचा अध्यक्ष शिया मुस्लिम असावा, असे ठरविण्यात आले होते. विधानमंडळाने सहा वर्षांसाठी निवडून दिलेले राष्ट्राध्यक्ष तसेच राष्ट्राध्यक्षांनी निवडलेले व विधानमंडळाला जबाबदार असणारे पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या हातात कार्यकारी सत्ता असते. वैधानिक सत्ता सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने चार वर्षांसाठी निवडलेल्या ९९ सभासदांच्या राष्ट्रीय सभेकडे (१९७९ पर्यंतचे चेंबर ऑफ डेप्युटीज) असते. १९६० च्या निर्वाचक सुधारणा कायद्यानुसार विधानमंडळाची अभिधान रचना ठरविण्यात आली. तीनुसार मॅरोनाइट ३०, सुन्नी २०, शिया १९, ग्रीक ऑर्थडॉक्स ११, ग्रीक कॅथलिक ६, ड्रूझिझ ६, आर्मेनियन ऑर्थडॉक्स ४, आर्मेनियन कॅथलिक १, प्रॉटेस्टंट १ व इतर १ प्रतिनिधी असतात. १९७५-७६ मधील युद्ध आणि त्याच्या परिणामांमुळे विधानमंडळाची मुदत दर दोन वर्षांनी वाढविण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष म्हणून अमिन गेमाएल यांनी २३ सप्टेंबर १९८२ रोजी अधिकार ग्रहण केले. वशीर गेमाएल या आपल्या भावाची हत्या करून त्यांनी ही सत्ता मिळविली. ७ ऑक्टोबर १९८२ रोजी १० सदस्यांचे मंत्रिमंडळ नेमण्यात आले. त्यात ४ मुस्लिम (२ सुन्नी व २ शिया), ५ ख्रिश्चन (२ ग्रीक ऑर्थडॉक्स, २ मॅरोनाइट व १ ग्रीक कॅथलिक) आणि १ ड्रूझ धर्मीय सभासद होता. 

लेबाननमधील वेगवेगळे राजकीय पक्ष व विशिष्ट धार्मिक गट यांची हातमिळवणी असल्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या स्थापनेस यश मिळालेले दिसत नाही. ख्रिश्चन व मुख्यतः मॅरोनाइट ख्रिश्चन हा प्रमुख राजकीय गट असून तो लेबाननच्या स्वतंत्र प्रवाहाच्या बाजूचा, यूरोपशी निगडित आणि इस्लाम व सर्व अरबवादविरोधी आहे. मुस्लिम गट हा सभोतालच्या अरब प्रदेशांशी निगडित, तर ख्रिश्चनविरोधी आहे. मुख्यतः ख्रिश्चन सभासद असलेला ‘नॅशनल लिबरल पार्टी’ व ‘फलॅंजस्ट’ हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. प्रोग्रेसिव्ह सोशलिस्ट पार्टी, बाथ पार्टी व लेबानी कम्युनिस्ट पार्टी यांसारखे अनेक डावे पक्ष आहेत. पीएल्‌ओच्या छत्राखाली वेगवेगळ्या पॅलेस्टिनी गनिमी संघटना एकत्र आल्या असून त्या १९६५ पासून लेबाननच्या राजकीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत.

राज्यकारभाराच्या दृष्टीने लेबाननची विभागणी (१) बेरूत, (२) उत्तर लेबानन, (३) दक्षिण लेबानन, (४) बिका व (५) मौंट लेबानन अशा पाच प्रांतांमध्ये (मुहफझत) करण्यात आलेली आहे. मुहफझतची विभागणी पुन्हा जिल्हा (अकदिय), नगरपालिका व खेडी यांत केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने राष्ट्राध्यक्षांनी काढलेल्या हुकूमनाम्यानुसार प्रांतांच्या गव्हर्नरांची व जिल्ह्याच्या प्रमुखाची नियुक्ती करण्यात येते. बहुतांश खेड्यांत अजूनही ज्येष्ठ लोकांचे किंवा कुटुंबप्रमुखांचे ग्राममंडळ असते अथवा एखाद्या घराण्याकडून कारभार पाहिला जातो.

न्यायव्यवस्था : सर्वोच्च न्यायिक अधिकार न्यायखात्याच्या मंत्र्यांकडे असून त्यांच्याकडून न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. देशात ५६ प्रथम वर्ग न्यायालये आहेत. त्यांत एक न्यायाधीश असून तोच दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही गुन्ह्यांच्या न्यायदानाचे काम पाहतो. ११ वरिष्ठ अपील न्यायालये असून त्यांत प्रत्येकी तीन न्यायाधीश असतात. त्यांपैकी ४ कॅसेशन न्यायालये, ३ दिवाणी व १ फौजदारी न्यायालय आहे. ६ व्यक्तींचे राज्यमंडळ प्रशासकीय खटले चालविते. ९ न्यायाधीशांचे ‘कोर्ट ऑफ जस्टिस’ हे खास न्यायालय राज्य सुरक्षाविषयक घटनांचे काम पाहते. इस्लाम, ख्रिश्चन व ज्यू यांची धार्मिक न्यायालये असून त्यांत लग्न, मृत्यू, वारसा व इतर वैयक्तिक बाबी हाताळल्या जातात.

संरक्षण : लेबाननच्या लष्करात २१,००० सैनिक होते (१९९०). यामध्ये ख्रिश्चन प्रभाव असून फलँजस्ट पक्षाशी जवळीक आहे. नौसेनेकडे ४ किनारी गस्तनौका व ५०० अधिकारी होते (१९८९). हवाईदलात ५० विमाने, ८०० सैनिक, ५ हंटर जेट बाँबफेकी विमाने, ९ मिराज – ३ लढाऊ विमाने व १ मिराज तसेच इतर लढाऊ विमाने होती. प्रशिक्षणासाठी १ मिराज आणि ५ बुलडॉग विमाने आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांची व संघटनांची स्वतंत्र लोकसेना दले आहेत. मार्च १९८४ मध्ये सिरियन व इझ्राएली सैन्यांनी आणि पॅलेस्टिनी गनिमी सैन्याने लेबाननची भूमी जिंकली होती. काही काळ संयुक्त राष्ट्रांची अंतरिम फौजही लेबाननमध्ये होती. सप्टेंबर १९८२ मध्ये ठेवण्यात आलेल्या बहुराष्ट्रीय शांतिसेना १९८४ मध्ये काढून घेण्यात आल्या.

लेबानन २४ ऑक्टोबर १९४५ पासून संयुक्त राष्ट्रांचा सनदी सभासद असून तो प. आफ्रिका आर्थिक आयोगाशी (इसीडब्ल्यूए) व अप्रादेशिक विशेष अभिकरणांशी संबंधित आहे. तसेच यूएन्‌आरडब्ल्यूए व युनिफिल यांचा यजमान देश आणि अरब लीगचा संस्थापक सदस्य देश आहे. तसेच ग्रूप-७७ चाही हा सभासद देश आहे.

आर्थिक स्थिती : लेबानन हे प्राचीन काळापासून एक पिढीजाद व्यापारी राष्ट्र आहे. येथील कृषिक्षेत्र तुलनेने मोठे, तर औद्योगिक क्षेत्र लहान, परंतु विकसित आहे. यादवी युद्धापर्यंत पर्यटन व्यवसायही विशेष विकसित झालेला होता. १९७५ पर्यंत खाजगी उद्योगक्षेत्रात शासनाचा किमान हस्तक्षेप, हे लेबाननच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते. यादवी युद्धापासून मध्यवर्ती शासन दुबळे बनल्यामुळे आर्थिक बाबतीत स्थानिक सेनेचा हस्तक्षेप अधिक वाढला. १९७५-७६ मधील युद्ध, १९८२ मधील इझ्राएलचे आक्रमण व त्यानंतरची अस्थिर परिस्थिती यांमुळे लेबाननची फार मोठी आर्थिक हानी होऊन अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांत खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. व्यापार, सार्वजनिक सेवा, औद्योगिक व कृषी क्षेत्रांची उत्पादनक्षमता या सर्व क्षेत्रांचे अतिशय नुकसान झाले.

लेबाननचे १९७५-७६ मधील युद्धामुळे ५ महापद्म डॉलर किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आणि आर्थिक व्यवसाय ७० टक्क्यांनी कमी झाले. परंतु वेगवेगळ्या राजकीय गटांना मिळणारे परदेशी गुप्त अर्थसाहाय्य, परदेशांतील लेबानी कामगार व कंपन्या यांच्याकडून देशात येणारा पैसा तसेच जागतिक बॅंक, अमेरिका व अरब राष्ट्रे यांच्याकडून मिळणारी अधिकृत आर्थिक मदत, यांमुळे लेबानन आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित राहू शकला. १९८२ च्या युद्धाचा परिणाम राजकीय अस्थिरतेत तसेच आर्थिक विकासावरही झाला.

यादवी युद्धापूर्वी १७% लोक शेतीव्यवसायात गुंतलेले होते आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी सु. १०% उत्पन्न या व्यवसायापासून मिळत होते. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ ३८% क्षेत्र शेतीखाली आहे. ओसाड आणि ओबडधोबड भूमिस्वरूपामुळे हे क्षेत्र वाढविता येत नाही. तरीही अनुकूल हवामान व झऱ्यांपासून होणारा पुरेसा पाणीपुरवठा यांमुळे पर्वतउतारांवर व किनारी प्रदेशात सखोल शेतीपद्धतीचा अवलंब करून विविध उत्पादने घेणे शक्य झाले आहे. किनाऱ्यावरील जलसिंचित मैदानी कृषिक्षेत्रातून बाजाराभिमुख भाजी-पाला, केळी, लिंबूवर्गीय फळे यांचे उत्पादन घेतले जाते. पर्वतपायथ्याकडील टेकड्यांमध्ये ऑलिव्ह, द्राक्षे, तंबाखू, अंजीर, बदाम ही उत्पादने घेतली जातात. अधिक उंचीच्या प्रदेशात (सु. ४५५ मी.) सप्ताळू, जरदाळू, अलुबुखार व चेरी यांची लागवड, तर ९०० मी. उंचीच्या प्रदेशात सफरचंद व नासपती यांची लागवड केली जाते. अल्‌ बिका खोऱ्यात साखर बीट, अन्नधान्य व भाजीपाला पिकविला जातो.


कृषी उत्पादन १९७५-७६ मधील युद्धामुळे, तर प्रामुख्याने लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन १९८२ मधील इझ्राएल-सिरियन युद्धामुळे घटले. लेबाननच्या कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने १९६४ ते १९७३ या काळात ‘व्हर्दर योजना’ राबविण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत मृद्‌संधारण व विकास, अल्पभूधारकांना कृषी अवजारे पुरविणे, पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण, शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य या कार्यक्रमांवर विशेष भर दिलेला होता. देशातील महत्त्वाच्या लिटानी नदी जलसिंचन प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. परंतु १९७५-७६ व १९८२ च्या युद्धांमुळे त्याला खीळ बसली. देशातील १९८८ मधील अंदाजे कृषी उत्पादने पुढीलप्रमाणे होती (उत्पादन हजार टनांत) : लिंबूवर्गीय फळे ३५४, बटाटे २१०, द्राक्षे १५९, साखर बीट ४, सफरचंद ८०, टोमॅटो १३० (१९८६), गहू १९, केळी २३ व ऑलिव्ह ७५. चरस हे कृषी उत्पादन जरी बेकायदेशीर असले, तरी त्याचे उत्पादन वाढत गेलेले आढळते. १९७५ मध्ये त्याचे उत्पादन केवळ १०० टन होते, ते १९८१ मध्ये सु. २,००० टनांपर्यंत गेले. अल्‌ बिका खोऱ्यातून चरस उत्पादन करून किनाऱ्यावरील बंदरांतून त्याची बेकायदेशीर रीत्या निर्यात केली जाते.

युद्धांमुळे पशुधनाचेही खूपच नुकसान झाले. १९८८ मध्ये देशातील अंदाजे पशुधन पुढीलप्रमाणे होते : शेळ्या ४,७०,००० मेंढ्या १,४१,००० गुरे ५२,००० डुकरे २२,००० घोडे २,००० गाढवे ११,००० खेचरे ४,००० व कोंबड्या ११० लक्ष (१९८६). देशाच्या गरजेपेक्षा मांस व दुधाचे उत्पादन कमी असल्यामुळे त्यांची आयात केली जाते. मात्र लेबाननमधून कोंबडीचे मांस व अंडी अरब राष्ट्रांच्या बाजारपेठांत मोठ्या प्रमाणावर पाठविली जातात. अन्न व शेती संघटनेच्या अंदाजानुसार देशातील १९८६ मधील पशुधन उत्पादन पुढीलप्रमाणे होते (उत्पादन हजार मे. टनांत) : बीफ व व्हील १५, मेंढ्या व कोकरांचे मांस ९, शेळीचे मांस ४, कोंबडीचे मांस ५५, गाईचे दूध ९२, मेंढीचे दूध १६, शेळीचे दूध ४२, चीज ११.२ व कोंबड्यांची अंडी ५५.

माशांची आयात कमी करून आणि मासे हवाबंद डब्यात भरण्याच्या उद्योगात रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन लेबानन शासन मासेमारी व्यवसायाच्या विकासास उत्तेजन देत आहे. तरीही या व्यवसायाच्या बाबतीत विशेष प्रगती झालेली नाही. १९८६ मध्ये एकूण १,६०० टन मासे पकडण्यात आले.

देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सु. १,००,००० हे. म्हणजेच ८% क्षेत्र अरण्याखाली होते (१९८८). बहुतांश अरण्ये देशाच्या मध्यवर्ती भागात असून त्यांत पाइन व ओक वृक्ष सर्वाधिक आहेत. काही जुनाट सीडार वृक्षही पहावयास मिळतात. अधिक उंचीच्या प्रदेशात सीडार वृक्षांची लागवड केलेली आहे. देशाचे १९८५ मधील औद्योगिक लाकूड उत्पादन २५,००० घ. मी. मृदू लाकूड २२,००० घ. मी. व रुंदपर्णी वृक्षांचे कठीण लाकूड उत्पादन ११,००० घ. मी. झाले.

खनिजे व ऊर्जा : खनिजसाठ्यांच्या अभावामुळे देशात खाणकाम व्यवसाय फारच मर्यादित प्रमाणात चालतो. लोहखनिज, पायराइट, तांबे, बिट्युमिनी शेल, लिग्नाइट, मीठ, अस्फाल्ट, फॉस्फेट, बांधकामाचा दगड, चुनखडी, चिकणमाती, काचनिर्मितीसाठी आवश्यक वाळू ही खनिज उत्पादने देशात मिळतात. १९८४ मधील मीठ उत्पादन ५,००० मे. टन होते. रुमानियन तेलकंपनीला १९७५ मध्ये पश्चिम बिका खोऱ्यात तेलाचे साठे आढळून आले आणि १९७९ मध्ये लेबानन शासनाने समुद्राच्या अपतट भागात तेलसाठे सापडल्याचे घोषित केले. मात्र अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे ह्या शोधकार्यात किंवा उत्पदनाच्या दृष्टीने विशेष प्रगती होऊ शकली नाही.

देशातील एकूण विद्युत्‌ उत्पादनापैकी जलविद्युत्‌ व औष्णिक वीज यांचे उत्पादन साधारण निम्मेनिम्मे आहे. १९८६ मध्ये २,२७० कोटी किवॉ.ता. वीज उत्पादन झाले. लिटानी नदीवरील जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प हा देशात सर्वांत मोठा आहे. त्याच्यामुळे विद्युत्‌ निर्मितीबरोबरच सिंचित क्षेत्रातही बरीच वाढ झाली आहे.

उद्योग : बेरूतचे विकसित बंदर व विमानतळ, देशाची मुक्त अर्थव्यवस्था व विदेश विनिमय पद्धती, अनुकूल व्याजदर, स्वित्झर्लंडप्रमाणे बॅंकव्यवहारांची गुप्तता, यांमुळे देशातील व्यापार व सेवा व्यवसायांची विशेष प्रगती झालेली होती. अन्नप्रक्रिया, वस्त्रनिर्माण, सिमेंट, तेलशुद्धीकरण, अधातू खनिज उत्पादनप्रक्रिया व निर्मिती हे देशातील महत्त्वाचे उद्योग आहेत. यादवी युद्धात सु. २५० कारखान्यांचे नुकसान झाले. इझ्राएली आक्रमण व नागरी क्षेत्रांवरील बाँबहल्ला यांमुळे १९८२ मध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन खूपच घटले होते. देशातील १९८४ मधील अंदाजे औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे होती (उत्पादन हजार मे. टनांत) : ऑलिव्ह तेल १०, कागद व कागदी फलक ४५, फॉस्फेट खते ४.७, चुनकळी २०, सिमेंट ८००. यांशिवाय मद्य ५०,००० हेक्टोलिटर सिगारेटी २० कोटी, प्लायवुड ३४,००० घ. मी. व वीज उत्पादन १३५.५ किवॉ.ता. झाले.

देशातील दोन प्रमुख तेलशुद्धीकरण कारखाने ट्रिपोली व सायडनजवळील झहरानी येथे असून दोन्हींची मिळून प्रतिदिनी ५०,००० पिंपे तेल शुद्ध करण्याची क्षमता आहे. ट्रिपोली कारखान्यात इराकमधून जहाजाने आणलेल्या तेलावर परिष्करण केले जाते, तर झहरानी कारखान्यात सौदी अरेबियातून ट्रान्स-अरेबियन पाइपलाइन कंपनीच्या नळमार्गाने आणलेले तेल शुद्ध केले जाते. १९७९ मध्ये या तेलशुद्धीकरण प्रकल्पांतून ८९.०८ कोटी लि. इंधन तेल व ५६.३२ कोटी लि. गॅसोलीन उत्पादन झाले. १९८८ मध्ये हे दोन्ही कारखाने पूर्णपणे कार्यक्षम नसल्याने देश तेलाच्या आयातीवरच अवलंबून होता. देशात १९८४ मध्ये पुढीलप्रमाणे खनिज तेल उत्पादने झाली (उत्पादन हजार मे. टनांत) : जेट इंधन १०, रॉकेल १०, पेट्रोल ११०, ऊर्ध्वपातित इंधन तेल १९०, शेष इंधन तेल ४०० व द्रवरूप पेट्रोलियम गॅस १५. बेरूत येथे १९६२ मध्ये ‘नॅशनल काउन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च’ या मंडळाची स्थापना झाली. राष्ट्रीय विज्ञान धोरण निश्चित करून मूलभूत व उपयोजित संशोधन कार्यास गती देण्याचे कार्य हे मंडळ करते. या मंडळाचे जूनीया येथे सागर संशोधन केंद्रही आहे.

व्यापार हे लेबाननच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे क्षेत्र आहे. विदेशी तसेच स्थानिक ठोक व किरकोळ व्यापारांतून लेबाननला फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. मात्र काही शेजारी देशांनी संरक्षक जकात धोरणाचा अवलंब केल्यामुळे ह्या क्षेत्राचे महत्त्व थोडे कमी झाले. बेरूत हे मध्यपूर्वेतील एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. सामान्यपणे ज्या व्यापाऱ्यांना आयात परवाना आहे व विक्रीचे विशिष्ट व्यापारचिन्ह प्राप्त झाले आहे, तेच वस्तूंचे वितरण करतात. स्थानिक व परदेशी पुरवठा व्यवहारांशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या लहानलहान व्यापारी पेढ्यांचा विकास झालेला आढळतो.


लेबाननच्या विदेश व्यापाराबाबतची माहिती क्वचितच विश्वासार्ह असते. कारण चलनपरिवर्तन वेगवेगळ्या दरांनी केले जाते आणि अनोंदणीकृत व्यापाराचे प्रमाण मोठे आहे. लेबाननच्या एकूण आयातीच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक आयात बेकायदेशीरपणे होत असल्याचा अंदाज आहे. १९८१ मध्ये देशाच्या एकूण निर्यातीपैकी सु. ४० टक्के पुनर्निर्यातच होती. हीत मुख्यतः यंत्रे, धातू उत्पादने, खाद्यपदार्थ, लाकूड उत्पादने, कापड व रसायने यांचा समावेश होता. केवळ सिमेंट, अधातू खनिजे, कापड व ॲल्युमिनियम उत्पादने ही लेबाननची स्वतःची निर्यात आहे. औद्योगिक सामग्री, मोटार वाहने, खाद्यपदार्थ व विद्युत्‌ सामग्री ही देशाची मुख्य आयात आहे. पुनर्निर्यात धरून देशाच्या एकूण निर्यातीपैकी सु. ९५% निर्यात मध्य-पूर्वेतील इतर देशांकडे होते. इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरिया हे लेबाननच्या मालाचे प्रमुख ग्राहक असून आयात मुख्यतः इटली, सौदी अरेबिया, फ्रान्स व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडून केली जाते. 

आंतरराष्ट्रीय व्यापारातील तूट वाढत जात असली, तरी सेवाव्यवसाय, विदेशी भांडवलाचे हस्तांतरण व परदेशांतील लेबानी कामगारांकडून पाठविले जाणारे पैसे यांमुळे ही तूट भरून काढली जात असल्याने लेबाननचा आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद अनुकूल राहिला आहे.

लेबानी पौंड हे देशाचे अधिकृत चलन आहे. १०० पिअस्टरचा एक लेबानी पौंड होतो. बँक ऑफ लेबानन नोटा किंवा नाणी काढते. १, २ १/२, ५, १०, २५, ५० पिअस्टर व १ लेबानी पौंडाची नाणी आणि १, ५, १०, २५, ५०, १०० व २५० लेबानी पौंडांच्या नोटा असतात. अधिकृत विनिमय दर सतत बदलत राहतो. लेबाननच्या आयातीवर मूल्यानुसार सीमाशुल्क आकारण्यासाठी मासिक विनिमय दर निश्चित केला जातो. इतर बाबींसाठी खुल्या बाजाराचा अवलंब केला जातो. मार्च १९९० रोजी १ अमेरिकी डॉलर = ५५५.२५ लेबानी पौंड आणि १ स्टर्लिंग पौंड = ९१०.५ लेबानी पौंड असा विनिमय दर होता. देशात दशमान पद्धती प्रचलित आहे. ग्रामीण भागात ओकिया, ओक, रॉटॉल, कंटार या परंपरागत वजनमापांचा वापर केला जातो.

बॅंक ऑफ लेबानन ही मध्यवर्ती बॅंक (स्था. १ एप्रिल १९६४) ओह. ३१ मार्च १९८३ अखेर बॅंकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी पुरविलेल्या एकूण २,७८८.९० कोटी लेबानी पौंड रकमेपैकी ५२% व्यापार क्षेत्राला, १७% औद्योगिक क्षेत्राला व १३% बांधकाम क्षेत्राला रक्कम पुरविली. विदेशी व्यापारासाठीचा वित्तपुरवठा आणि व्यापार बिलांची वटवणी यातून बॅंकांची खूप मोठी उलाढाल होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भांडवलाचे हस्तांतरण व विनिमय व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. बँकिंग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी व परदेशी ठेवी लेबाननमधील बॅंकांमध्ये वाढविण्यासाठी १९५६ च्या बॅंक गुप्तता कायद्याने खातेदाराच्या व्यवसायाचा कोणाकडेही, किंबहुना न्यायालयीन अधिकाऱ्यापुढेही, तपशील उघड करण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे बॅंक व्यवसायाची भरभराट झाली. १९८१ च्या अखेरीस देशात ६९ स्थानिक व १२ परदेशी बॅंका होत्या.

बेरूत शेअरबाजाराने १९५२ पासून अधिकृतपणे आपल्या व्वयहारांस सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळात तो बंद होता. परंतु १९७९ पासून तो पुन्हा सुरू करण्यात आला. १९८२ मध्ये अरब शेअर बाजार संघाचे बेरूत हे मुख्य केंद्र बनले. त्यामुळे मध्यपूर्वेतील एक महत्त्वाचे वित्तीय केंद्र म्हणून लेबाननचे महत्त्व कायम राहिले. देशातील विमा कंपन्यांचे नियमन राष्ट्रीय विमा परिषद करते. १९८० मध्ये ५० लेबानी व ४६ परदेशी विमा कंपन्या लेबाननमध्ये कार्यरत होत्या.

मर्यादित महसुलामुळे देशाचे अंदाजपत्रक तुटीचे राहिले आहे. तुटीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने चोरट्या व्यापाराला आळा घालून महसूल वाढविण्याचा प्रयत्न केला. १९८६ चे अंदाजपत्रक एकूण १,७९३.७ कोटी लेबानी पौंड खर्चाचे होते. करचुकवेगिरी ही देशातील प्रमुख समस्या आहे. लाभांशावर कर-आकारणी केली जात नाही, परंतु व्याजावर १२ टक्के कर असतो. खनिज तेल उत्पादने, तंबाखू उत्पादने व सिमेंट यांवर अबकारी कर आकारला जातो.

आयात-निर्यातीवर १९७७ पासून काही बंधने घातलेली आहेत. काही वस्तूंच्या आयातीसाठी परवाना घेणे आवश्यक केले आहे. बऱ्याचशा वस्तूंवर आयात शुल्क आकारले जाते. काही कृषी व औद्योगिक उत्पादनांवर मूल्यानुसार ३० ते ५०% कर आकारला जातो. मोटारगाड्या, त्यांचे सुटे भाग, टायर, मद्ये व इतर विलासी वस्तूंवर वेगवेगळे बरेच आयात शुल्क आकारण्यात येते. अरब देश व यूरोपीय समाईक बाजारांतर्गत देशांकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर अधिमान्य दराने शुल्क आकारले जाते. बेरूत हे करमुक्त क्षेत्र असून व्यापाराची उतारपेठ म्हणून या बंदराचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

लेबाननमध्ये गुंतवणूक करणारे कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन हे प्रमुख देश आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची खाजगी गुंतवणूक मुख्यतः तेलवाहतूक, साठवण सोयी व खत प्रकल्प यांमध्ये अधिक असून ती १९८० मध्ये ४०० लक्ष डॉलरची होती. परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या नवीन गुंतवणूकदारांना त्यांच्या उद्योगांच्या स्थापनेपासून सहा वर्षांपर्यंत आयकर सवलत देण्यात येते. त्याशिवाय इतरही सवलती दिल्या जातात.

दुसऱ्या महायुद्धोत्तरकाळापासून लेबाननने मुक्त अर्थव्यवस्थेचे व खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकारले. व्यापाराच्या दृष्टीने लेबाननला लाभलेले अनुकूल भौगोलिक स्थान आणि व्यापारी व बॅंकिंग क्षेत्रांना असलेले पारंपरिक महत्त्व यांमुळे १९७५ पर्यंत लेबाननची चांगलीच भरभराट झाली होती. चलनस्थिरतेला आवश्यक असा सुवर्णसाठा, सनातनी राजकोषीय नीती, परदेशी गुंतवणूकदारांसाठीची विविध प्रलोभने, बॅंकिंगबाबतची अत्यल्प नियंत्रणे या वित्तीय धोरणांमुळे लेबानन हे व्यापार, अर्थ व पर्यटन यांचे प्रमुख केंद्र बनले. १९७९ मध्ये विकास आणि पुनर्रचना मंडळाने २२ महापद्म लेबानी पौंड खर्चाची पुनर्रचना सादर केली होती. या योजनेच्या अंतर्गत बेरूत बंदराच्या पुनर्विकासास व तेथील विमानतळाच्या पुनर्रचनेस सुरुवात झाली होती. नोव्हेंबर १९७९ मध्ये सौदी अरेबिया व इतर सहा तेल उत्पादक अरब देश यांनी लेबाननच्या पुनर्रचनेसाठी पाच वर्षांकरिता २ महापद्म डॉलर देण्याचे आश्र्वासन दिले होते. परंतु ऑक्टोबर १९८२ पर्यंत केवळ ३,८१० लक्ष डॉलर एवढीच मदत मिळाली.


वाहतूक व संदेशवहन : लेबाननमध्ये ७,००० किमी. लांबीचे रस्ते होते (१९८७). १९८५ मध्ये बेरूत-ट्रिपोलीदरम्यानच्या नवीन महामार्ग बांधणीची योजना आखण्यात आली. बऱ्याच रस्त्यांची दुरुस्ती, पुरेशा निधीचा तुटवडा व सततची युद्धपरिस्थिती यांमुळे शक्य झाली नाही. देशात ४,७३,३७२ प्रवासी मोटारगाड्या ३,३४८ बसगाड्या ४६,२१२ ट्रक व १६,७९७ मोटार सायकली होत्या (१९८२). देशात ४१७ किमी. लांबीचे एकूण तीन लोहमार्ग आहेत. यांपैकी बेरूत व रियाक हे सिरियन सरहद्दीपर्यंत २२२ किमी. लांबीचा प्रमाणमापी लोहमार्गच कार्यान्वित आहे. 

बेरूत हे भूमध्य सागरकिनाऱ्यावरील प्रमुख बंदर आहे. १९७५-७६ च्या युद्धात आणि त्यानंतरही अधूनमधून हे बंदर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सायडन हे प्रमुख मुस्लिम बंदर बनले. ट्रिपोली व जूनीया ही इतर प्रमुख बंदरे आहेत. बेरूत हे अंतर्देशीय व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. गेल्या काही वर्षांत तसेच जून-ऑक्टोबर १९८२ मध्ये इझ्राएलकडून झालेल्या बाँबहल्ल्यांमुळे येथील विमानतळ बंद करावा लागला होता. १९८० मध्ये या विमानतळावरून १६,६०,००० प्रवासी वाहतूक झाली. मिड्ल ईस्ट एअरलाइन्स किंवा ‘एलर लिबान’ (एम्‌ईए) व ट्रान्स-मेडिटरेनियन एअरवेज (टीएम्‌ए) ह्या लेबाननच्या दोन विमान कंपन्या आहेत.

यादवी युद्धापूर्वी बेरूत हे आंतरराष्ट्रीय संदेशवहनाचे प्रमुख केंद्र होते. येथून भूउपग्रहाद्वारे संदेशवहन होत होते तसेच मार्सेवे व अलेक्झांड्रियाशी दोन महासागरी केबलच्या साहाय्याने ते जोडलेले होते. १९८२ मध्ये दुसऱ्या उपग्रह केंद्राची स्थापना करण्यात आली. देशात सु. ६,००० टेलेक्स मार्ग व ४,६५,००० दूरध्वनी संच होते (१९८३). बेरूत येथे स्वयंचलित दूरध्वनी पद्धत आहे. शासनाच्या अधिकारातील लेबानी प्रक्षेपण केंद्राद्वारे अरबी, फ्रेंच, इंग्लिश व इतर भाषांमधून रेडिओ कार्यक्रम प्रसारित केले जातात. दोन व्यापारी दूरचित्रवाणी सेवा संस्थांकडून अरबी, फ्रेंच व इंग्लिशमधून दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रसारित होतात. देशात सु. २१ लक्ष रेडिओ संच व ८ लाख दूरचित्रवाणी संच होते (१९८५). पूर्वीपासून लेबानन हे अरब जगतातील मुद्रणस्वातंत्र्य असलेले राष्ट्र आहे. यादवी युद्धकाळातही निर्बंधांशिवाय २५ वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होत होती. १९७७ मध्ये अभ्यवेक्षण अधिकार शासनाने घेतले, परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही. वृत्तपत्रे सरकारवर मोकळेपणाने टीका करतात. मात्र राजकीय पक्षांवरील टीकेपासून ती दूर राहतात. देशातून ४० दैनिके व शंभरांवर नियतकालिके प्रसिद्ध होतात (१९८०). ॲन-नहर आणि अल्‌-अन्वर ही सर्वांत महत्त्वाची अरबी दैनिके असून त्यांचा खप अनुक्रमे ७५,००० व ३५,२६१ होता (१९८१). ली ओरिएंट ली जूर आणि ली सॉयर ही फ्रेंच भाषेतील प्रसिद्ध वृत्तपत्रे असून त्यांचा खप अनुक्रमे १८,००० व १३,००० आहे. ले कॉमर्स टू लव्हॅंट हे साप्ताहिक महत्त्वाचे आहे.

बेरूत, ट्रिपोली, सायडन व झाल या चार प्रमुख शहरांत व्यापार व उद्योग मंडळे आणि बेरूत येथे रोटरी क्लब संघटना आहे. यांशिवाय देशात ऑटोमोबील अँड टूरिंग क्लब, फ्रेंच वाणिज्य मंडळ, लेबानी उद्योग संघ व इतर स्वयंसेवी समाजकल्याण संघटना आहेत.

येथील अरबी साहित्य समृद्ध आहे. लेबाननमधील खलील जिब्रान (१८८१-१९३१) यांना उत्कृष्ट चित्रकला आणि साहित्य यांमुळे आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. द प्रॉफिट ह्या दीर्घ काव्याबद्दल ते विशेष प्रसिद्ध आहेत. चार्ल्स हबिब मलिक (जन्म १९०६) ही लेबाननमधील एक प्रमुख मुत्सद्दी व्यक्ती होती. १९५८-५९ मध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे तेरावे अध्यक्ष होते.

लोक व समाजजीवन : अस्थिर व नाजूक राजकीय परिस्थिती, विविध वंशांच्या व धर्मांच्या गटांमधील तंटे यामुळे १९३२ पासून लेबाननमध्ये जनगणना झालेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार लेबाननची १९८३ च्या मध्यातील लोकसंख्या २८,११,००० होती. परंतु १९७५-७६ मधील यादवी युद्धात व त्यानंतरच्या काळात झालेली प्रचंड मानहानी आणि मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर यांमुळे लोकसंख्येच्या अचूक मोजणीची शक्यता नाही. संयुक्त राष्ट्रांनी १९९० च्या लोकसंख्येचा अंदाज ३३,०१,००० इतका केलेला होता. हा अंदाज दरहजारी स्थूल जननमान २८.९, मृत्युमान ७.३ आणि १९८५-९० मधील निव्वळ नैसर्गिक वाढ २१.६ गृहीत धरून केलेला आहे. लेबाननमधील लोकसंख्येचे वितरण खूपच विषम आहे. एकूण लोकसंख्येपैकी सु. ७५% नागरी व २५% लोकसंख्या ग्रामीण होती (१९८०).

वेगवेगळ्या कालखंडांत लोकांचे झालेले आप्रवासन आणि स्वाऱ्या यांमुळे लेबाननमध्ये वेगवेगळ्या वंशांच्या, धर्मांच्या व गटांच्या लोकांचे मिश्रण आढळते. त्यांत फिनिशियन, ग्रीक, आर्मेनियन व अरब हे महत्त्वाचे आहेत. बहुतांश लेबानी अरब आहेत. ते मुख्यतः मुस्लिम व ख्रिश्चन अशा दोन गटांत विभागलेले असून त्या प्रत्येकाचे वेगवेगळे धर्ममत व पंथ मानणारे आणखी काही उपगट पडतात. मुस्लिमांचे सुन्नी व शिया असे दोन पंथ आहेत. ड्रुझिझ हे इस्लाम धर्मापासून वेगळे असलेले महत्त्वपूर्ण अल्पसंख्य आहेत. ख्रिश्चनांचे मॅरोनाइट, ग्रीक ऑर्थडॉक्स, आर्मेनियन, ग्रीक, रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट असे मुख्य गट आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या वांशिक गटाच्या आपापल्या राजकीय संघटना, समलष्करी समूह व प्रादेशिक सुरक्षित जागा आहेत. त्यांशिवाय ज्यू, सिरियन कॅथलिक व इतर वंशांचे लोक देशात आढळतात. आर्मेनियनांपैकी बहुतांश आर्मेनियन ऑर्थडॉक्स पंथाचे व काही आर्मेनियन कॅथलिक पंथाचे आहेत. १९७५ नंतर बहुसंख्य ज्यू देश सोडून गेले आहेत. इ. स. सातव्या शतकापासूनच लेबानन हे ख्रिश्चन व मुस्लिम निर्वासितांचे आश्रयस्थान होते. देशात अधिकृतरीत्या ५५ टक्के ख्रिश्चन आणि ४५ टक्के इस्लाम व ड्रुझिझ धर्मांचे लोक होते (१९८२). प्रत्यक्षात ख्रिश्चनांपेक्षा मुस्लिम लोकांची संख्या अधिक असावी, असा अंदाज आहे. मुस्लिम-ख्रिश्चन यांच्यातील सत्ता-असमतोलामुळेच १९७५-७६ चे यादवी युद्ध झाले.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अनेक लेबानी लोकांनी ईजिप्तकडे किंवा अमेरिकेकडे स्थलांतर केले. १९२०-४० या काळात ग्रामीण भागाकडून किनाऱ्यावरील नागरी केंद्रांकडे, मुख्यतः बेरूतकडे मोठ्या प्रमाणावर अंतर्गत स्थलांतर घडून आले. इराणच्या आखाती देशांमधील आर्थिक संधीमुळे १९६५ पासून कुशल लेबानी फार मोठ्या प्रमाणावर त्या देशांकडे आकर्षिले गेले. १९८२ मध्ये सुमारे ३०,००,००० लेबानी परदेशांत काम करीत असल्याचा अंदाज आहे. १९७५ मध्ये लेबाननमध्ये सु. १५,००,००० परदेशी लोक रहात होते. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ ५० टक्क्यांपेक्षा अधिक होती. हिच्यात ३,५०,००० सिरियन रहिवासी ३,१५,००० तात्पुरती भेट देणारे सिरियन २,७५,००० निर्वासित छावण्यांत राहणारे पॅलेस्टिनी व छावण्यांबाहेर राहणारे ९५,००० लोक यांचा समावेश होता. राजकीय कारणास्तव लेबाननच्या नागरिकत्वासाठीचे सर्व अर्ज नाकारण्यात आले. लेबाननमधील या परदेशी रहिवाशांमध्ये बहुतांश मुस्लिम होते. युद्धोत्तर काळात नागरी केंद्रांकडे आलेले लोक पुन्हा आपल्या ग्रामीण ठिकाणांकडे गेले. त्यांशिवाय अमेरिकेची संयुक्त संस्थाने, यूरोप, लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया व मध्यपूर्वेतील तेल-उत्पादक राष्ट्रे यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केले.

यादवी युद्धकाळात सु. सहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोक निर्वासित बनले होते. त्यांपैकी पुष्कळ लोक फ्रान्स, सिरिया, जॉर्डन, ईजिप्त व आखाती देशांकडे पळून गेले. त्यापाठोपाठ १९८२ मधील इझ्राएलच्या आक्रमणाच्या वेळीही सु. ३०,००० निर्वासित परदेशी पळून गेले. ३० जून १९८३ रोजी देशात सु. २,४४,००० निर्वासित होते.


समाजकल्याण व आरोग्य : शासनाची सामाजिक सुरक्षा योजना पूर्णपणे अंमलात आलेली नाही. आजार व मातृत्व विमा, अपघात व विकलांगता विमा, कुटुंब भत्ता व सेवासमाप्ती नुकसानभरपाई रक्कम देण्याची योजना आहे. या योजनेसाठीच्या वर्गणीमधील ८६ टक्के हिस्सा मालकांचा, १० टक्के शासनाचा व ४ टक्के पगारी नोकरांचा असतो. शासकीय शर्तीची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एकूण वैद्यकीय खर्चाच्या ७० टक्के खर्च मिळतो. आजार लाभरक्कम २६ आठवड्यांपर्यंत मिळते. या सुविधा १९६५ पासून औद्योगिक कामगारांनाही लागू केल्या आहेत. देशातील जवळजवळ निम्म्या कामगारवर्गाला हे फायदे मिळू लागले आहेत. लेबाननमधील परदेशी कामगारांनाही या योजनेचा लाभ मिळतो. 

लेबाननमधील रुग्णालयांना पूरक म्हणून, मुख्यतः ग्रामीण भागात, फिरती वैद्यकीय पथके काम करतात. १९७९ मध्ये देशात ५,०३० डॉक्टर व ३,६८१ परिचारिका होत्या. १९८० मध्ये बालमृत्युमान दरहजारी ४५ होते. सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ६३ वर्षे व स्त्रियांबाबत ६७ वर्षे आहे. दुसऱ्या महायुद्धकाळापासूनच देशात घरबांधणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आला होता. १९७० पर्यंत ४,८४,००० घरे बांधण्यात आली होती.

शिक्षण : मध्यपूर्वेतील देशांमध्ये तुलनेने लेबाननचे साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. १९८० पर्यंत देशातील सु. ७८ टक्के प्रौढ पुरुषांना व ५८ टक्के प्रौढ महिलांना लिहिता-वाचता येत होते. प्राथमिक व माध्यमिक शाळा शासकीय तसेच खाजगीही आहेत. १९६० पासून प्राथमिक शिक्षण मोफत केलेले असले, तरी एकूण विद्यार्थ्यांपैकी ६६% विद्यार्थी खाजगी शाळांत शिक्षण घेत असल्याचे दिसते. लेबाननमधील पूर्व-प्राथमिक शाळांत १,१६,३४४ प्राथमिक शाळांत ३,२९,३४० सामान्य माध्यमिक विद्यालयांत २,३०,९३४ व्यावसायिक माध्यमिक शाळांत ३७,०३६ शिक्षक प्रशिक्षण व इतर विशेष शाळांत २,८६६ (१९८०) व उच्च शिक्षण संस्थांत ७०,५१० विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९८४). देशात एकूण पाच विद्यापीठे होती (१९८४).

भाषा व साहित्य : अरबी ही अधिकृत भाषा असून सु. ९० टक्के लोक ही भाषा बोलतात. बहुतांश लोक द्विभाषिक असून फ्रेंच ही त्यांची दुसरी प्रमुख भाषा आहे. त्याशिवाय इंग्लिश, आर्मेनियन व तुर्की भाषा बोलणारे लोकही बरेच आहेत. लेबानी अरबी भाषेवर अरबीपूर्व वेगवेगळ्या भाषांचा तसेच यूरोपीय भाषांचा प्रभाव आढळतो.

देशातील सर्वाधिक ग्रंथालये बेरूतमध्ये असून सायडन व हरिस्सा येथेही ग्रंथालये आहेत. लेबानन राष्ट्रीय ग्रंथालयात (स्था. १९२१) १,००,००० अरब विद्यापीठ ग्रंथालयात २,००,००० तर अमेरिकन विद्यापीठात ४,२५,००० ग्रंथ आहेत. सेंट जोसेफ विद्यापीठात अनेक विशेष ग्रंथालये आहेत. खोंचारा येथील सेंट जॉन मठाच्या ग्रंथालयात (स्था. १६९६) मध्यपूर्वेतील पहिले मुद्रणालय आहे. बेरूत येथील लेबानन राष्ट्रीय संग्रहालयात ऐतिहासिक दस्तऐवज व अनेक महत्त्वाचे पुरावशेष यांचा, तर अमेरिकन विद्यापीठ संग्रहालयात प्राचीन हस्तलिखितांचा मोठा संग्रह आहे.

महत्त्वाची स्थळे : बेरूत हे देशाच्या राजधानीचे तसेच अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. त्याशिवाय ट्रिपोली (लोकसंख्या १,७५,०००-१९८०), सायडन २४,७४०, टायर (सूर) १४,००० व झाल ४६,८०० ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. सायडन, बिब्लस (जुबेल) व बालाबाक येथील प्रेक्षणीय पुरावशेष व इतर ऐतिहासिक स्थळे, तसेच उत्साहवर्धक हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, आकर्षक सृष्टिसौंदर्य यांमुळे यादवी युद्धापूर्वी पर्यटक, विशेषतः इतर अरब देशांतील, मोठ्या प्रमाणात लेबाननमध्ये येत असत. १९७४ मध्ये सु. वीस लाखांवर पर्यटकांनी लेबाननला भेट दिली व एकूण उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न पर्यटन व्यवसायापासून देशाला मिळाले. १९७९ मध्ये एकूण १,१८,००० पर्यटक देशात येऊन गेले. युद्धाच्या वेळी झालेल्या बाँबहल्ल्यात बेरूतमधील प्रमुख हॉटेलांचे झालेले नुकसान व अस्थिर वातावरण यांमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद पडला होता. १९८५ च्या सुमारास बेरूतच्या उत्तरेकडील किनारी भागात सु. वीस पर्यटन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले. लेबाननच्या प्रसिद्ध ‘कॅसिनो दी लिबान’ ह्या जुगारगृहाशिवाय इतर अनेक बेकायदेशीर जुगारगृहे देशात आढळतात. बिगर-अरब पर्यटकांना लेबाननमध्ये येण्यासाठी प्रवेशपत्राची, तर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या पर्यटकांना निर्गमन प्रवेशपत्राची आवश्यकता असते. 

चौधरी, वसंत


लेबानन

राजधानी बेरूतमधील प्रमुख हुतात्मा चौकरोमनकालीन भव्य मंदिराचे भग्नावशेष, बालबेक, इ. स. पू. ६४.धर्मयोद्ध्यांनी बांधलेला मध्ययुगीन किल्ला, सैदाबंदर.पवनचक्क्यांच्या साहाय्याने पाणी साठवून बनविलेली जुन्या ट्रिपोली शहराजवळील मिठागरे