द्वितीय महायुद्धोत्तर नागासाकी

नागासाकी : जपानच्या क्यूशू बेटावरील नागासाकी जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या ४,५०,१९५ (१९७५). हे  युराकामी नदीच्या मुखाशी असून नागासाकी उपसागरावरील ‘रिया’ किनाऱ्याचे सुरक्षित, खोल व प्रमुख बंदर आहे. त्याची रचना मोठ्या प्रेक्षागृहासारखी असून समुद्र हटविल्याने उपलब्ध झालेली तेवढीच जमीन सपाट आहे. बाकीचे शहर टेकडीच्या उतारावर वसलेले आहे. सोळाव्या शतकापासून पोर्तुगीज व स्पॅनिश व्यापाऱ्यांची नागासाकीला जा-ये असे. पुढे केवळ डच व्यापाऱ्यांना जवळच्या डेशिमा बेटावर राहण्याची परवानगी मिळाली. १८५८मध्ये नागासाकीसह काही बंदरे पाश्चात्त्यांना खुली करण्यात आली. १९०३ च्या रूसो–जपानी युद्धापर्यंत रशियन आरमार या बंदरातच निवारा घेत असे. पाश्चात्त्यांचा प्रभाव, खिश्चनांची मोठी संख्या हे याचे वैशिष्ट्य आहे.

मित्सुबिशी उद्योगसमूहासारख्यांचे जहाजबांधणी आणि स्थापत्य अभियांत्रिकी इ. प्रचंड व तदनुषंगिक लहानमोठे व्यवसाय तसेच पोलाद लाटण कारखाना इत्यादींमुळे नागासाकीचे महत्त्व वाढले. ९ऑगस्ट १९४५रोजी अमेरिकेने दुसरा अणुबाँब या शहरावर टाकला, तेव्हा शहराचा मध्यभाग पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला ३६,०००माणसे मृत्युमुखी पडली व २५–३०हजार जबर जखमी झाली. तेव्हा नागासाकीकडे जगाचे लक्ष वेधले. युद्धसमाप्तीनंतर काही वर्षांतच जपानी लोकांनी शहराचे पुनर्वसन पूर्ण केले. सोफूकूजी चिनी मंदिर, औरा चर्च, ग्लोव्ह मॅन्शन, अणुबाँब पडला तेथील ‘शांतिउद्यान’ ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.

ओक, द. ह.