स्लोव्हाकिया : स्लोव्हाक प्रजासत्ताक. मध्य यूरोपातील एक खंडांतर्गत देश. क्षेत्रफळ ४९,०३५ चौ. किमी. लोकसंख्या ५४,१०,८३६ (२०१२). सामान्यपणे ऐतिहासिक स्लोव्हाकियाच्या प्रदेशाएवढेच सांप्रत स्लोव्हाकिया देशाचे क्षेत्र आहे. स्लोव्हाकियाच्या वायव्येस चेकोस्लोव्हाकिया, उत्तरेस पोलंड, पूर्वेस युक्रेन, दक्षिणेस हंगेरी व नैर्ऋ त्येस ऑस्ट्रिया हे देश आहेत. ब्रात्यिस्लाव्हा (लोकसंख्या ६,५९,५७८—२०१२) हे राजधानीचे तसेच देशातील सर्वांत मोठे शहर आहे.

भूवर्णन : स्लोव्हाकियाचा बराचसा भाग वेस्टर्न कार्पेथियन पर्वतीय प्रदेशाने व्यापलेला आहे. कार्पेथियनचे येथे आउटर, सेंट्रल व इनर असे पूर्व-पश्चिम तीन विभाग असून ते दर्‍या, खोरी व पर्वतांतर्गत द्रोणी प्रदेशांनी एकमेकांपासून अलग झालेले आहेत. दक्षिणेकडील हंगेरीच्या सरहद्दीपासून उत्तरेस दोन विस्तृत सखल प्रदेश आहेत. त्यांपैकी देशाच्या नैर्ऋत्य भागात लिटल ऑलफल्ड तर पूर्व भागात ईस्टर्न स्लोव्हाकियन लोलँड हा सखल प्रदेश आहे. हे दोनही प्रदेश इनर कार्पेथियन पर्वताचे अवनमन भाग आहेत. उत्तर भागात आउटर वेस्टर्न कार्पेथियन श्रेण्या असून त्यांचा विस्तार चेकोस्लोव्हाकियाच्या पूर्व भागात आणि पोलंडच्या दक्षिण भागात आढळतो. यांमध्ये देशाच्या पश्चिम भागातील लिटल कार्पेथियन व जाव्हॉर्निकी आणि उत्तर भागातील बेस्किदी या प्रमुख पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. देशाच्या मध्य भागात सेंट्रल वेस्टर्न कार्पेथियन पर्वतीय प्रदेश असून त्यामध्ये देशातील सर्वाधिक उंचीच्या श्रेण्या आहेत. त्यांपैकी देशाच्या उत्तर-मध्य भागातील हाय ( उंच ) तात्रा श्रेणीत गेर्लाकॉफ्का ( उंची २,६५५ मी. ) हे देशातील सर्वोच्च शिखर आहे. हाय तात्रा पर्वतीय प्रदेशातील सृष्टीसौंदर्य विशेष मनोहारी आहे. तेथे तांत्रास्काय राष्ट्रीय उद्यान असून, हा प्रदेश पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. हाय तात्राच्या दक्षिणेस लो ( ठेंगू ) तात्रा श्रेणी असून तिची लांबी १,९८१ मी. पर्यंत आढळते. दक्षिणेस असलेल्या इनर वेस्टर्न तात्रा पर्वतश्रेणीचा विस्तार दक्षिणेकडे हंगेरीपर्यंत झालेला असून त्यातील स्लोव्हाक ओअर ( स्लोव्हाकियन धातुक ) पर्वत हा आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे.

देशात विविध प्रकारच्या मृदा आढळतात. नैर्ऋत्य भागात काळी चर्नोसेम ही सर्वाधिक सुपीक मृदा आढळते. दक्षिणेकडील नद्यांच्या खोर्‍यांत  तपकिरी मृदा, मध्य व उत्तरेकडील मध्यम उंचीच्या प्रदेशात पॉडझॉल तर उंच पर्वतीय प्रदेशात खडकाळ पर्वतीय मृदा आढळते.

स्लोव्हाकियातील बहुतांश नद्या दक्षिणेत डॅन्यूब नदीखोर्‍याकडे वाहत जातात. मोराव्हा व डॅन्यूब या नद्यांनी देशाची नैर्ऋत्य सरहद्द निर्माण केली आहे. पर्वतीय प्रदेशांचे जलवाहन करीत दक्षिणेकडे वाहत जाणार्‍या नद्यांपैकी व्हा, ह्र्न, हेर्नाड व बोड्रोग या प्रमुख नद्या आहेत. पॉप्राट ही उत्तरवाहिनी नदी आहे. देशात अनेक पर्वतीय सरोवरे तसेच खनिजजल व उष्ण झरे आढळतात. 

स्लोव्हाकियाचे हवामान खंडीय प्रकारचे असून त्यात उंचीनुसार तफावत आढळते. उन्हाळे उबदार तर हिवाळे थंड असतात. जानेवारीमध्ये सरासरी किमान तापमान —१०° से. व जुलैमध्ये कमाल तापमान २०° से. असते. वृष्टीमान सामान्यपणे उन्हाळ्यात अधिक असून वृष्टी अनेकदा मेघगर्जनेसह होते. शरद ऋतूत हवा कोरडी व स्वच्छ असते. वसंत ऋतूत अनेकदा हवा दमट असते. पर्जन्य, हिम व इतर जलांशीय स्वरूपात वृष्टी होत असते. वार्षिक सरासरी वृष्टीमान डॅन्यूब खोर्‍यात ५७ सेंमी. तर पर्वतांच्या वातसन्मुख उतारावरील खोर्‍यांत ते ११२ सेंमी. असते. कमाल वृष्टी जुलैमध्ये तर किमान जानेवारीमध्ये होते. 

स्लोव्हाकिया हा विस्ताराने लहान देश असला तरी भूरचनेतील विविधतेमुळे वनस्पतींमध्येही भिन्नता आढळते. शेती व लाकूडतोड व्यवसायामुळे देशातील मूळ वनाच्छादनाचे क्षेत्र कमी झाले आहे. तरीही अद्याप एकूण भूक्षेत्राच्या ४०.१ टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. पर्वतीय प्रदेशात सर्वाधिक वनाच्छादन आहे. अधिक उंचीच्या भागात तैगा व टंड्रा प्रकारचे वनस्पतिजीवन आढळते. पर्वतीय प्रदेशात फर, स्प्रूस वृक्ष तर सखल भागात बीच, बर्च, लिंब व ओक इ. वनस्पतींचे प्रमाण पुष्कळ आहे. वृक्ष सीमारेषा सु. १,५२४ मी. उंचीवरून जाते. तात्रा पर्वतीय प्रदेशात वृक्ष सीमारेषेच्या खालील भागात खुजे पाइन वृक्ष तर सु. २,२८६ मी. उंचीच्या प्रदेशात अल्पाइन गवत व झुडपे आढळतात.

येथे वन्य प्राणिजीवन विपुल व विविधतापूर्ण आहे. हाय तात्रा नॅशनल पार्कमध्ये अस्वल, लांडगा, रानमांजर, मार्मोट, ऊदमांजर, मार्टेन, मिंक हे वन्यप्राणी आढळतात. शॅमॉय काळवीटासारखे काही प्राणी संरक्षित आहेत. वनांमध्ये तसेच सखल भागांत तितर, हंस, बदक यांसारखे पक्षी पहावयास मिळतात. रॅप्टर, करकोचा व इतर मोठे पक्षी संरक्षित आहेत. 

देशात सात राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यांपैकी तांत्रास्काय व प्येनीनी ही राष्ट्रीय उद्याने पोलंड सरहद्दीवर असून त्यांचे व्यवस्थापन दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने करतात. लो तात्रा राष्ट्रीय उद्यान देशाच्या अंतर्गत भागात आहे. या तीनही उद्यानांत विविध वन्य प्राणिजीवन, हिमानीय भूदृश्ये, अल्पाइन पादपजात व प्राणिजात आणि १६,००,००० ते १०,००० वर्षांपूर्वींचे प्लाइस्टोसीन (हिमानीयकालीन ) वनस्पती व प्राणी जातींचे अवशिष्ट अवशेष यांचे परिरक्षण केलेले आहे.

इतिहास व राजकीय स्थिती : स्लोव्हाकियातील मानवी वस्तीचा इतिहास इ. स. पू. २,७०,००० वर्षांपूर्वीपर्यंत मागे जातो. ब्राँझयुगात तांबे निर्मितीसाठी हा प्रदेश प्रसिद्ध होता. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांत इलिरियन, केल्टिक व जर्मानिक जमातींनी या प्रदेशावर राज्य केले. त्यानंतर या प्रदेशावर रोमन साम्राज्याची सत्ता आली. स्लाव्हिक लोकांच्या येथील आगमनाबद्दल विवाद आहे. साधारणपणे इ. स. पाचव्या व सहाव्या शतकांत सांप्रत स्लोव्हाकियात असलेल्या डॅन्यूब नदीजवळ स्लाव्हिक जमातींनी वसाहती केल्या असाव्यात. रोमनांनी सत्ता सोडल्यानंतर या प्रदेशावर आव्हार्झ, फ्रँक व मग्यार यांच्या सत्ता आल्या. इ. स. ६२३—५८ या कालावधीत येथे सामो साम्राज्याची सत्ता होती. इ. स. ८३३—९०७ या कालावधीत येथे असलेल्या मोरेव्हियन साम्राज्यात स्लोव्हाकियाबरोबरच बोहीमिया व मोरेव्हिया या प्रदेशांचाही समावेश होता. हे प्रदेश सांप्रत चेक प्रजासत्ताकात आहेत. दहाव्या शतकाच्या सुरुवातीस मोरेव्हियन सत्तेचा र्‍हास झाला.

अकराव्या शतकात हा प्रदेश हंगेरी राज्याचा एक भाग बनला. पुढे सु. एक हजार वर्षे स्लोव्हाकियावर हंगेरीची प्रामुख्याने त्यातील मग्यार लोकांची सत्ता होती. हंगेरियन सत्ताकाळात आपल्या संस्कृतीचा व भाषेचा त्याग करून स्लोव्हाकियनांनी हंगेरियन बनावे म्हणून त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला. तसेच मग्यारांनी स्लोव्हाकांच्या राष्ट्रवादी चळवळीची वाढ होऊ दिली नाही. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांतील हॅप्सबर्ग राजवंशाच्या कारकीर्दीत स्लोव्हाकिया हा प्रदेश हंगेरीच्या केंद्रस्थानी होता. सतराव्या शतकाच्या अखेरीस स्लाव्ह पुढार्‍यांनी स्लोव्हाकियात राष्ट्रीय अस्मिता जागृत केली. तोपर्यंत स्लोव्हाक लेखकांनी आपल्या लेखनासाठी चेक, जर्मन किंवा हंगेरियन भाषांचा वापर केला. रोमन कॅथलिक पाद्री ॲन्तॉन बेर्नोलॅक याने स्लोव्हाक भाषा लिपी रूपात आणण्याचा प्रयत्न केला. १८४० पर्यंत या भाषेचे यशस्वी रीत्या प्रमाणीकरण होऊ शकले नव्हते.


ऑस्ट्रिया व हंगेरीने १८६७ मध्ये ऑस्ट्रिया-हंगेरी या द्विदलीय राजसत्तेची स्थापना केली. पहिल्या  महायुद्धानंतरच्या  काळात  ऑस्ट्रिया–हंगेरी राजवट कोसळल्यानंतर १८ ऑक्टोबर १९१८ रोजी चेक व स्लोव्हाकांनी मिळून चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक या नव्या राष्ट्राची स्थापना केली. बोहीमिया व मोरेव्हियाच्या तुलनेत स्लोव्हाकियाची अर्थव्यवस्था कमी विकसित होती. तसेच चेक लोकांच्या तुलनेत स्लोव्हाकियनांना स्वयंशासनाचा अनुभव कमी होता. त्यामुळे चेकोस्लो-व्हाकियाच्या अर्थव्यवस्थेवर व प्रशासनावर चेक लोकांचे वर्चस्व होते. १९३० च्या दशकातील महामंदीमुळे स्लोव्हाकियाला आपला औद्योगिक विकास साधण्यात अपयश आले. अनेक स्लोव्हाक लोक चेक वर्चस्वाच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी चळवळीच्या वाढीसाठी पाठिंबा दिला.

कॉशित्से शहर व हंगेरियन लोकसंख्येसह चेकोस्लोव्हाकियाचा बराचसा भूप्रदेश आपल्याला द्यावा यासाठी हंगेरीने चेकोस्लोव्हाकियावर दबाव आणला (१९३८). मागणी केलेला हा प्रदेश स्लोव्हाकिया व हंगेरीच्या सरहद्दी दरम्यानचा होता. १४ मार्च १९३९ रोजी जर्मनीच्या पाठिंब्याने स्लोव्हाकियाने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली. रोमन कॅथलिक पाद्री जोझेफ टिसो यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी जर्मन फौजांनी चेकोस्लोव्हाकिया काबीज केला. त्यामुळे स्लोव्हाकिया जर्मन प्रभावाखाली आला. १९४४ मध्ये काही स्लोव्हाक प्रतिकारी गटांनी जर्मनीविरुद्ध लढा सुरू केला.

दुसरे महायुद्ध १९४५ मध्ये संपुष्टात आल्यानंतर स्लोव्हाकिया पुन्हा चेकोस्लोव्हाकियाचा एक भाग बनला. टिसो यांना राजद्रोहाबद्दल दोषी ठरवून फाशी देण्यात आले. मे १९४६ मध्ये कम्युनिस्ट पंतप्रधान क्लेमंट गोटव्हाल्ड यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कम्युनिस्ट पक्ष आणि इतर पक्षांचे सदस्य यांचे मिळून युती शासन अधिकारावर आले. मे १९४८ मध्ये झालेल्या निवडणुकीत संपूर्ण कम्युनिस्ट पक्षाची राजवट आली. कम्युनिस्ट शासनाने पुढील दोन दशकात आर्थिक व राजकीय स्वरूपात बदल घडवून आणले. देशातील सर्व कारखान्यांचा व इतर व्यवसायांचा ताबा शासनाने आपल्याकडे घेतला. शेतकर्‍यांनी सरकारी किंवा सामुदायिक शेतीत सामील व्हावे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. शासनाने कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधकांची मुस्कटदाबी केली. तसेच चर्चचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

१९६० च्या दशकाच्या अखेरीस कम्युनिस्ट पक्षातील अनेक स्लोव्हाक नेत्यांनी आणि विद्वानांनी कम्युनिस्ट शासनपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अलेक्झांडर डुब्चेक याच्या नेतृत्वा-खाली चेकोस्लोव्हाकियातील कम्युनिस्ट पक्षात उदारमतवादी व लोकशाही तत्त्वे आणण्याकरिता आणि रशियाचे वर्चस्व कमी करण्यासाठी एक भरीव कार्यक्रम आखला. त्याला समाजातूनही मोठा पाठिंबा मिळाला.परंतु चेकोस्लोव्हाकियातील या सुधारणांमुळे या देशातील कम्युनिस्ट राजवटीचा प्रभाव कमी होईल अशी धास्ती रशिया व इतर यूरोपियन कम्युनिस्ट देशांना वाटू लागली. त्यामुळे २१ ऑगस्ट १९६८ रोजी रशियाने चेकोस्लोव्हाकियात आपल्या फौजा घुसविल्या. १९६८ मध्ये संविधानात केलेल्या दुरुस्तीनंतर स्लोव्हाकियाला शासनामध्ये थोडे अधिक अधिकार देण्यात आले. एप्रिल १९६९ मध्ये रशियाच्या पाठिंब्याने कम्युनिस्ट पक्षाच्या नेतेपदी डुब्चेक ऐवजी गुस्टाव्ह हुसेक यांची निवड करण्यात आली. हुसेक शासनाने संपूर्ण राजकीय सत्ता ताब्यात घेऊन काही सुधारणा कमी केल्या आणि वृत्तपत्रांवर अभ्यवेक्षण लादले.

नोव्हेंबर १९८९ मध्ये शासनव्यवस्थेतील बदलासाठी तसेच राजकीय, आर्थिक आणि नागरी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी चेक व स्लाव्हिक लोक रस्त्यावर आले. १७ नोव्हेंबर १९८९ रोजी चेकोस्लोव्हाकियाच्या कम्युनिस्ट सरकारने राजीनामा दिला. ३ डिसेंबर रोजी बिगर कम्युनिस्ट शासन सत्तेवर आले. त्यानंतर गुस्टाव्ह हुसेक यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. २९ डिसेंबर रोजी फेडरल असेंब्लीच्या ३२३ सदस्यांनी एकमताने व्हॅकलाव्ह हावेल यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. अतिशय सुरळीतपणे आणि शांततापूर्ण मार्गाने चेकोस्लोव्हाकियातील कम्युनिस्ट राजवट जाऊन बिगर कम्युनिस्ट शासन सत्तेवर आले, यालाच ‘ वेल्वेट क्रांती ’ असे म्हणतात.

मे १९४६ नंतर पहिल्यांदाच १९९० मध्ये मोकळ्या वातावरणात निवडणुका होऊन बिगर कम्युनिस्टांनी विधानमंडळात स्पष्ट बहुमत मिळविले. नव्या शासनाने खुल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने कामकाजास सुरुवात केली. तसेच कम्युनिस्ट राजवटीमधील धोरणांना छेद दिला. परंतु चेक आणि स्लोव्हाक नेत्यांमध्ये आर्थिक सुधारणा व नवीन संविधान स्वीकारण्यावरून तणाव निर्माण झाला. खुल्या अर्थव्यवस्थेचा सत्वर स्वीकार कसा करावयाचा याबाबतीत चेक व स्लोव्हाक यांच्यात सहमती होऊ शकत नव्हती. खुल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीच्या धोरणामुळे चेकपेक्षा स्लोव्हाकियात बेरोजगारी अधिक वाढेल आणि लोकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतील अशी स्लोव्हाक लोकांची धारणा होती. परिणामतः स्लोव्हाकांचा राष्ट्रवादी पक्षांना व त्यांच्या राजकीय नेत्यांना असलेला पाठिंबा वाढला.

जून १९९२ मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत व्लादिमिर मेकेर यांच्या नेतृत्वाखाली स्लोव्हाकियाच्या स्वातंत्र्यासाठीची मोहीम हाती घेतलेल्या ‘ मूव्हमेंट फॉर डेमॉक्रॅटिक स्लोव्हाकिया ’ या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. तर चेक प्रजासत्ताकात व्हॅकलाव्ह क्लाऊस यांच्या नेतृत्वाखालील सिव्हिल डेमॉक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळाले. बहुसंख्य चेक व स्लोव्हाकांना आपण एकत्र रहावे असे वाटत होते. परंतु त्याचवेळी मेकेर व क्लाऊस यांनी मात्र चेकोस्लोव्हाकियाच्या फाळणीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. अंतिमतः १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हा-कियाची फाळणी होऊन स्लोव्हाकिया आणि चेक प्रजासत्ताक असे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. स्वातंत्र्यानंतर स्लोव्हाकियाने पश्चिम यूरोपशी आपले संबंध वाढविले. सन २००४ मध्ये यूरोपियन युनियन व नाटो या दोनही संघटनांचा स्लोव्हाकिया सदस्य बनला. २०१० मध्ये इव्हेटा रॅडिकोव्हा या पहिल्या महिला पंतप्रधानाची निवड झाली.

स्वतंत्र स्लोव्हाकियाचे पहिले संविधान १ जानेवारी १९९३ रोजी अंमलात आले. त्यानुसार या देशाने संसदीय लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केला. नॅशनल काउन्सिल ही एकसदनी संसद असून तीत प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने चार वर्षांसाठी निवडलेले १५० सदस्य असतात. राष्ट्राध्यक्ष देशाचे प्रमुख असतात. सप्टेंबर १९९८ मध्ये या संविधानात केलेल्या दुरुस्तीनुसार राष्ट्राध्यक्षांची निवड प्रत्यक्ष मतदान पद्धतीने पाच वर्षांसाठी करण्यात येते. एका व्यक्तीला राष्ट्राध्यक्षपदी सलग जास्तीत जास्त दोनदा राहता येते. देशात वेगवेगळे राजकीय पक्ष असून त्यांपैकी डायरेक्शन-सोशल डेमॉक्रसी पक्ष या प्रमुख राजकीय पक्षाला मार्च २०१२ मध्ये झालेल्या नॅशनल काउन्सिलच्या निवडणुकीत सर्वाधिक ४४.४% मते मिळाली.

राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांची नेमणूक करतात. पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्राध्यक्ष इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याया-धीशांची निवड नॅशनल काउन्सिलकडून तर सांविधानिक न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक नॅशनल काउन्सिलने केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्राध्यक्ष करतात. यूरोपियन संसदेत स्लोव्हाकियाचे १३ सदस्य असतात. देशाच्या सैन्यदलात ७,३२४ सैनिक तर हवाई दलात ४,२८० सैनिक होते (२००७).


आर्थिक स्थिती : पूर्वीपासून शेती हा या प्रदेशातील प्रमुख व्यवसाय होता परंतु कम्युनिस्ट राजवटीत देशात औद्योगिकीकरण वाढले. पूर्वीच्या चेकोस्लोव्हाकियात १९४७ मध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यानंतर अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण करण्यात आले. देशातील संपूर्ण जमिनीचा व व्यवसायांचा ताबा शासनाने आपल्याकडे घेतला. यंत्रे व पोलादनिर्मिती यांसारख्या अवजड उद्योगांच्या विकासावर विशेष भर दिला गेला. तत्कालीन चेकोस्लोव्हाकियातील शस्त्रनिर्मिती उद्योगाचे स्लोव्हाकिया हे प्रमुख केंद्र बनले. कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आल्यानंतर चेको-स्लोव्हाकियाच्या नवीन नेतृत्वाने मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यामुळे अनेक खाजगी उद्योग स्लोव्हाकियामध्ये स्थापन झाले. तसेच अनेक सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्यात आले. सांप्रत स्लोव्हाकियातील बहुतांश उद्योग खाजगी मालकीचे आहेत. देशातील आर्थिक बदलाचा सुरुवातीचा काळ खडतर होता. परंतु १९९० च्या दशकाच्या मध्यात स्लोव्हाकियाने आपली अर्थव्यवस्था बर्‍यापैकी सुस्थितीत आणली. त्यानंतर हळूहळू त्यात सुधारणा होत गेल्या. २००८ मध्ये देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी ३% उत्पादन कृषी क्षेत्रातून, ३८% औद्योगिक क्षेत्रातून व ५९% सेवा क्षेत्रातून मिळाले.

कृषी : आर्थिकदृष्ट्या एकूण कामकरी लोकांपैकी ४.४% लोक कृषी व्यवसायात गुंतले होते (२००६). सखल व सुपीक जमिनीतून बार्ली, मका, बटाटे, साखर बीट, गहू ही अन्नधान्य पिके घेतली जातात. पर्वतीय प्रदेशातील कमी सुपीक जमिनीतून राय, ओट, बटाटे व जवस ही पिके घेतली जातात. देशाच्या आग्नेय भागातील कार्पेथियन पर्वताच्या उतारावर, हाय व लो तात्राच्या दक्षिण उतारावर आणि दक्षिण स्लोव्हा-कियात द्राक्ष बागा आहेत. द्राक्षांचा उपयोग प्रामुख्याने वाइन निर्मिती-साठी केला जातो. व्हा नदीच्या खोर्‍यात तंबाखू व फळांचे उत्पादन घेतले जाते. तसेच पशुखाद्य पिकांचेही उत्पादन घेतले जाते. देशातील १.३४ द. ल. हे. क्षेत्र मशागतीयोग्य असून त्यांपैकी कायम पिकांखालील क्षेत्र २५,२६० हे. आहे. देशात २०१० मध्ये पुढीलप्रमाणे कृषी उत्पादने झाली ( उत्पादन हजार मे. टनांमध्ये ) : साखर बीट ९७८, गहू १,२२८, मका ९५२, बार्ली ३६१, बटाटे १२६, शिरसू बी ३२२, सूर्यफूल बिया १५०, द्राक्षे २१, सफरचंद ४५, टोमॅटो ३६.

स्लोव्हाकियात पशुपालन व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला जातो. मैदानी प्रदेशात शेतकरी गुरे व डुकरे पाळतात. तर पर्वतीय प्रदेशातील खोर्‍यांमध्ये मेंढीपालन केले जाते. देशात ६,८७,००० डुकरे, ४,७२,००० गुरे, ४,१२,००० शेळ्या-मेंढ्या व १२.५ द. ल. कोंबड्या असे पशुधन होते (२०१०). प्राणिज उत्पादने पुढीलप्रमाणे होती ( उत्पादन हजार टनांत ) : गोमांस १४, डुकराचे मांस ६९, कोंबडीचे मांस ७६, दूध ९२५, चीज ७२, अंडी ७५. देशात लाकूड उत्पादन ९५,९९,००० घ. मी. झाले (२०१०). मासेमारी गोड्या पाण्यात चालत असून एकूण मत्स्योत्पादन २,५८४ मे. टन झाले होते (२००९).

खनिजे व ऊर्जासंसाधने : स्लोव्हाकियामध्ये मर्यादित परंतु आर्थिक-दृष्ट्या महत्त्वाच्या खनिजांचे साठे आहेत. हँडलॉव्हा व मोद्री कामेनजवळ दगडी कोळशाचे साठे आहेत. दगडी कोळशाचे उत्पादन २५,७२,००० मे. टन (२००५) तर चुनखडीचे उत्पादन ५०,९९,००० मे. टन झाले होते (२००६). ग्बेली येथे १९८५ मध्ये नैसर्गिक वायूचे साठे सापडले. नैसर्गिक वायूचे साठे १४ अब्ज घ. मी. असून त्याचे ११० द. ल. घ. मी. एवढे उत्पादन झाले होते (२००९). खनिज तेलाचे साठे ९ द. ल. पिंपे एवढे असून उत्पादन २१,००० मे. टन झाले (२००९). मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे खनिज तेल व नैसर्गिक वायूसाठी स्लोव्हाकिया प्रामुख्याने रशियावर अवलंबून आहे. रशियातून नळांद्वारे खनिज तेल व नैसर्गिक वायूची आयात केली जाते. स्लोव्हाक ओअर पर्वतीय प्रदेशातून लोहखनिज, तांबे, मँगॅनीज, मॅग्नेसाइट, शिसे, जस्त या खनिजांचे उत्पादन घेतले जाते. कच्चे बॉक्साइट व निकेल यांची आयात करून त्यांचे अनुक्रमे झिअरनाड ह्रॉनॉम व सेरेत येथे परिष्करण केले जाते. पूर्व स्लोव्हाकियात सैंधवाचे साठे आहेत.

देशाची एकूण विद्युत्निर्मिती क्षमता ७.३ द. ल. किवॉ. आहे. विद्युत्निर्मिती २८.९ अब्ज किवॉ. तास झाली असून दरडोई विजेचा वापर ५,५१७ किवॉ. तास होता (२००८). डॅन्यूब, व्हा, ऑराव्हा, हेर्नाड, स्लाना या नद्यांवर धरणे बांधून जलविद्युत्निर्मिती प्रकल्प उभारले आहेत. देशात वापरात असलेल्या चार अणुभट्ट्या आहेत (२००९). एकूण विद्युत्निर्मितीपैकी अणुविद्युत्शक्तीचे प्रमाण ५५% होते (२००७). जगातील अणुशक्तीवर सर्वाधिक अवलंबून असणार्‍या देशांपैकी स्लोव्हाकिया एक आहे. एकूण ऊर्जा वापरापैकी ८.४% वीज पवनऊर्जा, सौरऊर्जा, सागरी लाटा, जलविद्युत्शक्ती, भूऔष्णिक व जैवऊर्जा यांसारख्या पुनर्नवीकरणीय स्रोतांपासून मिळविली जाते.

उद्योग : कारखानदारी व सेवा उद्योग हे स्लोव्हाकियाच्या अर्थ-व्यवस्थेतील महत्त्वाचे उद्योग आहेत. एकूण कामकरी लोकांपैकी सुमारे निम्मे लोक सेवाक्षेत्रात, तर सुमारे एकतृतीयांश कामगार कारखानदारी-मध्ये गुंतले आहेत. कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आल्यानंतर सेवाक्षेत्राचा विकास वेगाने झाला. यंत्रसामग्री, मोटारगाड्या, पोलाद, धातुजन्य वस्तुनिर्मिती, विद्युत् उपकरणे, रसायन उत्पादने, मृत्तिकाशिल्प, वस्त्रोद्योग, कागद, खाद्यपदार्थ, मद्यनिर्मिती, लाकूडकाम, खनिज तेल परिष्करण हे येथील प्रमुख उद्योग आहेत. १९९३ पासून शस्त्रसंभार निर्मितीउद्योगाचे पुनर्विलोकन करण्यात आले असून निर्यातीसाठी लष्करी साधनसामुग्रीचे उत्पादन घेतले जाते. मार्टिन हे ठिकाण शस्त्रास्त्र निर्मितीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. देशात पुढीलप्रमाणे औद्योगिक उत्पादने झाली ( उत्पादन द.ल. टन ): सिमेंट ६.४ (२००८), कच्चे पोलाद ३.५, लोहधातुक ४, उर्ध्वपातित इंधन तेल २.८, खनिज तेल १.६, शेष इंधन तेल ०.५, कोक १.६ (२००६). मोटारगाड्यांची निर्मिती ५,२४,८५९ इतकी करण्यात आली असून (२००८) इतर यूरोपीय देशांच्या तुलनेत येथील दरडोई मोटार गाड्यांचे उत्पादन सर्वाधिक आहे. ब्रात्यिस्लाव्हा, कॉशित्से आणि व्हा नदीतीरावरील झिलिना, ट्रेंचिन ही नगरे देशातील प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत.

कम्युनिस्ट राजवटीत प्रामुख्याने पूर्व यूरोपातील पर्यटक येत असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र पश्चिम यूरोपीय देश आणि उत्तर अमेरिकेतील पर्यटकांची संख्या फार झपाट्याने वाढली. पर्वतीय प्रदेशातील विलोभनीय सृष्टिसौंदर्य, गुहा, किल्ले, इतर ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके, कला महोत्सव, उष्ण व खनिजजल झरे ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. देशाला १३,२६,६३९ पर्यटकांनी भेट दिली असून त्यापासून २,२३३ द. ल. डॉलर उत्पन्न मिळाले (२०१०).

आर्थिक विकासाला गती देण्यासाठी स्लोव्हाकिया प्रामुख्याने विदेशी व्यापारावर अवलंबून आहे. काउन्सिल फॉर म्यूच्युअल इकॉनॉमिक ॲसिस्टन्स् ( कॉमेकॉन ) चे विसर्जन केल्यानंतर पूर्वीपासूनच्या पूर्व यूरोपीय देशांशी असलेल्या व्यापाराचे प्रमाण कमी होऊन देशाची पश्चिम यूरोपीय देशांशी व्यापारवृद्धी झाली. अधूनमधून काही अडथळे आले तरीही चेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकिया या उभय देशांतील व्यापाराचे प्रमाण अधिक राहिले आहे. स्लोव्हाकियाचा प्रामुख्याने चेक प्रजासत्ताक, रशिया, जर्मनी, इटली, पोलंड व ऑस्ट्रिया यांच्याशी व्यापार चालतो. देशाचे एकूण आयात मूल्य ६४,३८२ द. ल. व निर्यात मूल्य ६३,९९८ द. ल. अमेरिकी डॉलर होते (२०१०). यंत्रे, लोह व पोलाद, मोटारगाड्या, निर्मिती वस्तू , रसायने यांची निर्यात, तर खनिज तेल, नैसर्गिक वायू , यंत्रे, विद्युत्साहित्य यांची आयात केली जाते.

स्लोव्हाकियाने १ जानेवारी २००९ पासून यूरोऐवजी स्लोव्हाक कोरूना ( एस्केके ) हे अधिकृत चलन स्वीकारले. देशाचे २००८ चे अंदाजपत्रक ३४४.२४ अब्ज कोरूना महसूलाचे व ४०१.९४ अब्ज कोरूना खर्चाचे होते. स्लोव्हाक नॅशनल बँक ( स्था. १९९३) ही देशाची मध्यवर्ती व नोट प्रचालक बँक आहे. स्लोव्हाकियाने बँकिंग क्षेत्रात १९९१ पासून विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे अनेक खाजगी, व्यापारी व संयुक्त जोखीम बँका स्थापन झाल्या. अर्स्ट या ऑस्ट्रियन बँकेचे आणि ईंटेसा या इटालियन बँकेचे येथील आर्थिक व्यवहार फार मोठे आहेत. यांशिवाय येथे २४ व्यापारी बँका होत्या (२००६). ब्रात्यिस्लाव्हा येथे रोखेबाजार आहे. 


वाहतूक व संदेशवहन : स्लोव्हाकियातील वाहतूक यंत्रणेत तुलनेने बरीच आधुनिकता आहे. लोहमार्ग वाहतूक सर्वाधिक महत्त्वाची आहे. यूरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या आर्थिक मदतीने सर्व लोहमार्गांचे विद्युती-करण करण्यात आले आहे. लोहमार्गांची एकूण लांबी ३,६२२ किमी. होती (२०१०).या मार्गाने ४६.६ द. ल. प्रवासी व ४४.३ द. ल. टन माल-वाहतूक करण्यात आली (२०१०). ब्रात्यिस्लाव्हा, कॉशित्से व ट्रेंचिन या शहरांमध्ये ट्राममार्ग आहेत. रस्त्यांची एकूण लांबी ४३,७७० किमी. होती (२००६). देशात १६,६९,००० प्रवासी मोटारगाड्या, २,५३,००० प्रवासी व मालवाहतुकीची वाहने, ९,००० प्रवासी बसगाड्या आणि ६०,००० दुचाकी वाहने होती (२०१०). ब्रात्यिस्लाव्हा येथे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कॉशित्से येथूनही काही आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणे होतात. याशिवाय लुचेन्येत्स, झिलिना, इव्हॉलेन, पॉप्राट येथेही विमानतळ आहेत. डॅन्यूब विंग्ज (स्था. २००८), स्लोव्हाकियन एअरलाइन्स (स्था. २०११) या येथील हवाईवाहतूक कंपन्या आहेत. डॅन्यूब नदीचा जलवाहतुकीसाठी उपयोग केला जातो. कॉमार्नो व ब्रात्यिस्लाव्हा ही देशातील प्रमुख बंदरे आहेत.

शासन पुरस्कृत तसेच व्यापारी रेडिओ आणि दूरदर्शन केंद्रे येथे आहेत. देशात १०,९८,८०० दूरध्वनीधारक, ५९,२५,००० भ्रमणध्वनीधारक, ३१,४०,००० वापरात असलेले संगणक आणि महाजालकाचा वापर करणार्‍यांची संख्या ७३,१३,००० होती (२०१०).

लोक व समाजजीवन : देशाच्या एकूण लोकसंख्येत ८०.६५% स्लोव्हाक, ८.४९% हंगेरियन, १.९६% जिप्सी ( रोमा ), ०.७६% रूथीनियन-युक्रेनियन, ०.६२% चेक, ०.०९% जर्मन व ७.४२% इतर अशी वांशिक रचना होती (२०११). यांपैकी हंगेरियन लोक प्रामुख्याने दक्षिणेकडील सरहद्द प्रदेशात, रूथीनियन-युक्रेनियन पूर्व व ईशान्य भागात तर जिप्सी लोक देशाच्या पूर्व भागात अधिक संख्येने आढळतात. देशाच्या एकूण लोकसंख्येत ६८.९% रोमन कॅथलिक पंथीय, ६.९% इव्हँजेलिस्ट, ४.१% ग्रीक कॅथलिक व २% कॅल्व्हिन पंथीय होते (२००१).

उत्प्रवासन अधिक झाल्यामुळे पूर्वी स्लोव्हाकियातील लोकसंख्या- वाढीचा वेग कमी होता. १९१४ पूर्वी सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक लोकांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे स्थलांतर केले. कम्युनिस्ट राजवटीत उत्प्रवासनावर बंदी घालण्यात आली. औद्योगिकीकरणाच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर अंतर्गत स्थलांतर झाल्याने नागरीकरण वाढले. नागरी लोकसंख्येचे प्रमाण ५६.२% होते (२००५). दर हजारी जन्मप्रमाण ११.१, मृत्युमान ९.८, विवाहाचे प्रमाण ४.७ (२०१०), घटस्फोटाचे प्रमाण २.३ (२००७) व बालमृत्युमान ६.६ होते (२००६). वार्षिक लोकसंख्यावाढीचा दर ०.३% होता (१९९६—२००६). स्लोव्हाकियाच्या ५३,९७,०३६ या एकूण लोकसंख्येत २६,२७,७७२ पुरुष व २७,६९,२६४ स्त्रिया होत्या (२०११). सरासरी आयुर्मान ७५ वर्षे असून ते पुरुषांचे ७१ व स्त्रियांचे ७९ वर्षे होते (२००९).पुरुष व स्त्रिया या दोहोंच्या बाबतीत विवाहाचे सरासरी वय २५—२९ वर्षे आहे. प्रसूतिमान प्रती स्त्री १.२ अपत्ये असून जगातील सर्वांत कमी प्रसूतिमान असणार्‍या देशांपैकी स्लोव्हाकिया एक आहे.लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ११० व्यक्ती अशी होती (२०११). ओबडधोबड भूरचनेमुळे लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आहे. चेक प्रजासत्ताकाच्या सरहद्दीजवळ तसेच मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशात विखुरलेली वस्ती आढळते. पॉदुनिस्का या सखल प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आहे.

शिक्षण : स्लोव्हाकियाच्या संविधानाने सार्वजनिक प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत देण्याची हमी दिलेली आहे. त्याशिवाय खाजगी व चर्चने चालविलेली अनेक विद्यालये आहेत. ३—६ वर्षे वयोगटातील मुलांना बालोद्यान शाळा उपलब्ध आहेत. ६—१६ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. शिक्षणाचे माध्यम म्हणून प्रमुख विदेशी भाषांपैकी एखादी भाषा निवडता येते. सामान्य माध्यमिक विद्यालयांत विद्यापीठीय शिक्षणासाठीची तयारी करून घेतली जाते. व्यावसायिक माध्यमिक विद्यालयांत तांत्रिक, लिपिक व सेवा उद्योगांसंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते. देशातील २,८६९ पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थांत १३,८९६ शिक्षक व १,३९,२३९ विद्यार्थी,२१६ प्राथमिक विद्यालयांत ३०,१५५ शिक्षक व ४,३९,६७५ विद्यार्थी २५१ माध्यमिक ग्रामर स्कूलमध्ये ५,९६१ शिक्षक व ८९,३३६ विद्यार्थी ४९० विशेष माध्यमिक विद्यालयांत ११,८०८ शिक्षक व १,७९,७९० विद्यार्थी १८१ माध्यमिक व्यवसाय शिक्षण शाळांमध्ये २,५८९ शिक्षक व ५१,८८२ विद्यार्थी २१० माध्यमिक तांत्रिक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण संस्थांमध्ये ३,२२३ शिक्षक व ६०,६२१ विद्यार्थी ४१७ विशेष शाळांमध्ये ४,७८९ शिक्षक व ३६,००६ विद्यार्थी आणि ३३ विद्यापीठे वा विद्यापीठांसारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये १०,९७० शिक्षक व १,३९,७१६ विद्यार्थी होते (२०१०). कोमीनिअस युनिव्हर्सिटी, ब्रात्यिस्लाव्हा ( स्था. १९१९) हे सर्वांत जुने विद्यापीठ आहे. त्याशिवाय येथे स्लोव्हाक टेक्निकल युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स, दी स्लोव्हाक ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस व इतर अनेक कला अकादमी या प्रमुख उच्च शिक्षणसंस्था आहेत. देशाच्या अंदाजपत्रकानुसार ४.२% खर्च शिक्षणासाठी केला गेला होता (२०१०). सरासरी साक्षरता ९९.६५% असून ती पुरुषांबाबत ९९.७% व स्त्रियांबाबत ९९.६% होती (२००४).

आरोग्य : स्लोव्हाकियाच्या १९९२ मधील संविधानानुसार सार्वजनिक विमा कार्यक्रमांतर्गत मोफत आरोग्य सेवेची हमी दिलेली आहे. आरोग्य क्षेत्र मोठ्या प्रमाणावर शासननियंत्रित असून त्याशिवाय वैद्यकीय सुविधा देणार्‍या खाजगी संस्था व वैद्यकीय विमा कंपन्याही कार्यरत आहेत. देशात २९ रुग्णालये, ९,५८६ खाटा (२००८), ४,९८१ डॉक्टर, १,२६९ दंतवैद्यक, १५,८९७ परिचारिका व १,५६४ औषधनिर्माते होते (२००७). देशात ५,५१,२५८ लोक निवृत्तीवेतनधारक असून त्यांपैकी ३,४२,९९२ वृद्ध व्यक्ती होत्या (२००८). निवृत्तीचे सरासरी वय पुरुषांचे बाबतीत ६१ वर्षे ११ महिने तर स्त्रियांच्या बाबतीत ते ५७ वर्षे ७ महिने आहे.

भाषा व साहित्य : देशाची स्लोव्हाक ही अधिकृत भाषा आहे. त्याशिवाय चेक, जर्मन, हंगेरियन व पोलिश या भाषाही येथे बोलल्या जातात. इंडो-इराणियन भाषा कुलातील रोमा लोक रोमानी भाषा बोलतात. कम्युनिस्ट राजवट संपुष्टात आल्यानंतर स्लोव्हाक व हंगेरियन अल्पसंख्यांक यांच्यामध्ये भाषा व सांस्कृतिक प्रश्नांवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. लिखित स्लोव्हाक साहित्याचा इतिहास फार जुना नाही. अठराव्या शतकापासूनच स्लाव्हॉनिक लिपी विकसित होऊ लागली.


कला-क्रीडा : स्लोव्हाक लोकांच्या सांस्कृतिक जीवनात संगीताला विशेष महत्त्व आहे. स्लोव्हाक संगीताच्या विकासाचा इतिहास रोमन काळापर्यंत मागे जातो. रोमन कॅथलिक चर्चने आणि मग्यार उमरावांनी स्लोव्हाक संगीताला प्रोत्साहन दिले. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकात लोकगीतांचा विद्वत्तापूर्ण विकास करण्यात आला. आधुनिक स्लोव्हाक संगीत शास्त्रीय संगीत तसेच लोकगीतांमधून आलेले आढळते. बंदिशकार आन्द्रेज ओसेनाझ व मिकुलास मॉयझेस या संगीत क्षेत्रामधील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. स्लोव्हाक फिलार्मानिक हा देशातील प्रसिद्ध वाद्यवृंद आहे. संगीतिका गायक लुसिआ पॉप याने १९७० व १९८० च्या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले गायन सादर केले. स्लोव्हाक साहित्य क्षेत्रातील विकासाच्या समकालीन स्लोव्हाक नाट्यक्षेत्राचाही विकास झाला. १९१८ नंतर अनेक स्लोव्हाक रंगचित्रकारांनी प्राग येथे शिक्षण घेऊन या क्षेत्रात कार्य केले. स्लोव्हाकियातील चित्रपट व्यवसाय १९२० च्या दशकात उदयास आला. दुसर्‍या महायुद्धोत्तरकाळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या काही चित्रपटांची निर्मिती येथे झाली.

स्लोव्हाकियातील लोककलेला फार मोठी परंपरा आहे. टोपल्या, काचेवरील रंगचित्रकला, मातीची भांडी, लाकडावरील कोरीवकाम इत्यादींमधून या कलाकारांच्या कला दिसून येतात. रंगचित्रकलायुक्त लाकडी घरे व इतर वैशिष्ट्यपूर्ण वास्तू विविध प्रदेशांत आढळतात. गिर्यारोहण, खडकारोहण, भ्रमंती, स्कीइंग, गुहांचे समन्वेषण, अश्वारोहण, सायकल शर्यती, मत्स्यपारध, तराफा शर्यती इत्यादींमध्ये छंद म्हणून मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला जातो. फुटबॉल, बर्फावरील हॉकी हे खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. जूनमध्ये होणारा ब्रात्यिस्लाव्हा रॉक फेस्टिव्हल तर ऑक्टोबरमध्ये होणारा ब्रात्यिस्लाव्हा म्यूझिक फेस्टिव्हल व इंटरपोडियम हे प्रमुख उत्सव आहेत.

स्लोव्हाकियात १३ दैनिक वृत्तपत्रे प्रकाशित होत होती (२००६). त्यांपैकी स्लोव्हाक भाषेतून प्रकाशित होणार्‍या न्यू टाइमट्रूथ या वृत्तपत्रांचा खप सर्वाधिक आहे. हंगेरियन, चेक, युक्रेनियन, जर्मन व रोमानी या भाषांतील नियतकालिकांना शासन अर्थसाहाय्य करते. मार्टिन येथील स्लोव्हाक नॅशनल लायब्ररी आणि ब्रात्यिस्लाव्हा येथील स्लोव्हाक टेक्निकल लायब्ररी व युनिव्हर्सिटी लायब्ररी ही प्रमुख ग्रंथालये आहेत. स्लोव्हाक नॅशनल म्यूझीयम (स्था. १८९३) व स्लोव्हाक नॅशनल गॅलरी (१९४८) ही उल्लेखनीय वस्तुसंग्रहालये ब्रात्यिस्लाव्हा येथे आहेत. म्यूझीयम ऑफ ज्यूईश कल्चर हे वस्तुसंग्रहालय स्लोव्हाक नॅशनल म्यूझीयमचाच एक भाग आहे.

महत्त्वाची स्थळे : ब्रात्यिस्लाव्हा, कॉशित्से ( लोकसंख्या २,४०,०००—२००६), प्रेशॉफ (९३,०००), न्यित्रा (८४,८००), झिलिना (८५,४८७), बान्स्का बिस्ट्रित्सा (८३,०००), तर्नाव्हा (६८,४६६), मार्टिन (५९,०१४), ट्रेंचिन (५६,७६०) ही देशातील प्रमुख नगरे आहेत. कॉशित्से हे औद्योगिक व सांस्कृतिकदृष्ट्या तर प्रेशॉफ हे ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. युनेस्कोने घोषित केलेली सात जागतिक वारसास्थळे स्लोव्हाकियात आहेत.

पहा : चेकोस्लोव्हाकिया.

चौधरी, वसंत


स्लोव्हाकिया


स्लोव्हाक नॅशनल थिएटर, ब्रात्यिस्लाव्हा. ग्रासलकोविकोव्ह राजवाडा, ब्रात्यिस्लाव्हा.
पाइप : मेंढपाळांचे पारंपरिक वाद्य. पारंपरिक वेशभूषेत नृत्यमग्न स्लोव्हाक स्त्रिया
मध्ययुगीन किल्ला, बोजनिक. होलसिम सिमेंट कारखाना, रोहोझ्निक.
ब्रात्यिस्लाव्हा शहराचे चित्तवेधक दृश्य