चंपारण्य : बिहार राज्यातील जिल्हा. हा पाटण्याच्या वायव्येस असून मोतीहार हे या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. प्राचीन इतिहासात याचा उल्लेख आढळतो. त्या वेळी हे संस्कृत अध्यापनाचे माहेरघर होते. बाराव्या शतकात नेपाळच्या हिंदू राजघराण्याची येथे सत्ता होती. येथे मनोरंजक प्राचीन वास्तु तसेच अशोकस्तंभ व बौद्धकालीन अवशेष आहेत. १९१७ मध्ये निळीच्या कारखान्यात मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्धच्या सत्याग्रहासाठी म. गांधी येथे आले, तेव्हापासून यास महत्त्व आले. हा जिल्हा दुष्काळाच्या फार आधीन आहे. इ.स.१७७०, १८६६, १८७४, १८९५, १८९६ आणि १८९७ मधील दुष्काळ फारच जाणवले.

कांबळे, य. रा.