देवप्रयाग : एक दृश्य.

देवप्रयाग : उत्तर प्रदेश राज्यातील टेहरी–गढवाल जिल्ह्यातील एक तीर्थस्थान. लोकसंख्या १,५२७ (१९७१). हे हृषिकेशपासून ७०·४ किमी. अंतरावर अलकनंदा आणि भागीरथीच्या संगमावर वसलेले आहे. याची स. स. पासून उंची सु. ६९२ मी. आहे. रुद्रप्रयागपासून पश्चिमेस ३८ किमी. अंतरावरील देवप्रयागपर्यंत पक्का रस्ता जातो. केदारनाथाच्या वाटेवरील हे पहिले आणि पवित्र प्रयाग समजले जाते. देवप्रयागनंतर भागीरथीस गंगा म्हणतात. येथे रामचंद्राचे मोठे मंदिर व वसिष्ठकुंड ही पवित्र ठिकाणे आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी भाविक लोक दर्शनासाठी येथे येतात. येथे श्राद्धादी धार्मिक विधी केले जातात. संगमावर रघुनाथजी, आद्यविश्वेश्वर, गंगा–यमुना यांची मंदिरे आहेत. यांपैकी रघुनाथ मंदिर सर्वांत मोठे असून त्यांचा कळस सोनेरी आहे. येथील प्राचीन हिंदू मंदिरांमुळे या तीर्थास विशेष महत्त्व प्राप्त झाले. हे क्षेत्र नद्यांच्या संगमावर असल्याने यास ‘तीर्थराज प्रयाग’ असेही म्हणतात.

नदीवरील घाटांमुळे संगमाची शोभा अधिकच वाढलेली आहे. प्राचीन काळापासून येथील पुजारी तेलंगी ब्राह्मणच आहेत. या क्षेत्राचे माहात्म्य स्कंदपुराणात वर्णिलेले आहे. १८०३ मध्ये झालेल्या भूकंपाने येथील मंदिरांचे व इमारतींचे फार नुकसान झाले ग्वाल्हेरच्या दौलतराव शिंदे यांच्या मदतीने त्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला. येथे शाळा, दुकाने, डाकघर इ. सोयी असून गहू, जवस, सरस, मोहरी, बटाटे यांचा व्यापार चालतो.

सावंत, प्र. रा.