क्वालालुंपुर : मलेशिया, मलाया संघराज्य तसेच सेलँगर (मलाया संघराज्यातील घटक राज्य) यांची राजधानी. लोकसंख्या ४,५१,७२८ (१९७०). मलाया द्वीपकल्पाच्या वायव्य किनारपट्टीमधील क्लँग आणि गोंबक या नद्यांच्या संगमावर सु. १८५७ साली काही चिन्यांनी एक कथिलाची खाण खणून वस्ती केली. गढूळ पाण्याजवळील वस्ती म्हणून यालाच क्वालालुंपुर नाव पडले. जंगली आणि मलेरियायुक्त भाग असूनही आसपास मोठ्या प्रमाणात कथिलाच्या खाणी व रबराचे मळे निघाल्यामुळे क्वालालुंपुरची झपाट्याने वाढ झाली. १८८० मध्ये सेलँगरची व १८९५ मध्ये ब्रिटिशांकित मलायाची ही राजधानी झाली. नैर्ऋत्येस तीनशे-साडेतीनशे किमी. वरील सिंगापूर व वायव्येस तितक्याच अंतरावरील पिनँग बंदराशी हे रेल्वेने आणि रस्त्यांनी जोडले गेले.

क्वालालुंपुर बाजारपेठ

आग्‍नेयीस ४३ किमी. वरील स्वेटनम ह्या बंदरामुळे व पाच किमी. अंतरावरील उपनगरातील विमानतळामुळे हे सर्व जगाशाही जोडले गेले. कथिल व रबर यांशिवाय येथे अनेक छोटेमोठे उद्योगधंदे निघाल्याने आज क्वालालुंपुर ही पूर्व आशियातील महत्वाची बाजारपेठ बनली आहे. अत्याधुनिक वास्तुशिल्पांचे नमुने दर्शविणाऱ्या अनेक इमारती, शासकीय कार्यालये, विश्वविद्यालये, संग्रहालये, निरनिराळ्या शैक्षणिक व इतर संस्था येथे निर्माण झाल्या असल्या, तरी त्याच्याच जोडीला ६२ टक्के चिनी लोकवस्तीमुळे परंपरागत चिनी घरांचा (शॉप हाउसेस) पसारा क्वालालुंपुरमध्ये उठून दिसतो. १९५७ मध्ये येथील लोकसंख्येपैकी १८ टक्के हिंदी होते.

शाह, र. रू.