शिवालिक टेकड्या : हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील श्रेणी. हिमालयाच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या व एकमेकींना समांतर असणाऱ्या तीन प्रमुख पर्वतश्रेण्या आहेत. त्यांपैकी सर्वांत उत्तरेकडील श्रेणीला ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री, मधल्या श्रेणीला लेसर हिमालय किंवा हिमाचल व दक्षिणेकडील म्हणजेच हिमालयाच्या पायथ्याकडील श्रेणीला शिवालिक टेकड्या म्हणतात. त्यांना शिवालिक रांग, बाह्य (आउटर) हिमालय, उप-हिमालयीन श्रेणी असेही संबोधले जाते. हिमालयाची ही सर्वांत बाहेरची, कमी उंचीची व तरुण पर्वतश्रेणी आहे. इतर दोन श्रेणींप्रमाणे ही सलग रांग नाही.

वायव्येस सिंधू नदीच्या घळईपासून इशान्येस आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतच्या सु. २,४०० किमी. लांबीची प्रदेशात शिवालिक टेकड्यांचा विस्तार आढळतो. भूतानपासून पुर्वेकडील ब्रह्मपुत्रा नदीच्या वळणापर्यंतच्या सु. ६४० किमी. लांबीच्या श्रेण्या कधीकधी यात धरल्या जात नाहीत. वास्तविक मूळ शिवालिक रांगेचा विस्तार गंगा नदीकाठावरील हरद्वारपासून वायव्येस बिआस नदीपर्यंतच (लांबी ३२० किमी.) मानला जाई. शिवदेवतेवरून या श्रेणीला शिवालिक हे नाव देण्यात आले असावे. या श्रेणीची सरासरी रुंदी १० ते ५० किमी. च्या दरम्यान, तर उंची ६०० ते १,२०० मी. दरम्यान आढळते. पश्चिमेकडे रुंदी जास्त, तर पूर्वेकडे कमी आढळते. नेपाळमधील कोसी नदीपासून भूतानमधील मनास नदीपर्यंतच्या ३२० किमी. प्रदेशात ही श्रेणी खंडित झालेली आहे. या प्रदेशात मुसळधार मोसमी पावसामुळे प्रचंड क्षरण झालेले आहे.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशापासून या टेकड्यांची उंची एकदम वाढत गेलेली दिसते. त्यामुळे या टेकड्यांचे दक्षिण उतार तीव्र, तर उत्तर उतार मंद व वनाच्छादित आहेत. हिमालयाच्या निर्मितीनंतर या टेकड्या उंचावल्या गेल्यामुळे दक्षिणेकडे व पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्यानद्यांच्या प्रवाहमार्गांत अडथळे निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्या पात्रांत तात्पुरत्या स्वरुपाची सरोवरे निर्माण झाली. या सरोवरांत नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन झाले. पुढे या नद्यांनी शिवलिक टेकड्या भेदून आपले मार्गक्रमण केले. तेव्हा ती सरोवरे नष्ट झाली. परंतु त्यांनी केलेले संचयन तसेच राहिले. अशा प्रकारे वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यांमुळे लेसर हिमालय व शिवालिक टेकड्या यांच्या दरम्यान सपाट तळाची, डोंगररांगांना समांतर व रुंद खोरी निर्माण झाली आहेत. त्यांना ‘दून (डून)’ म्हणतात. उदा., डेहराडून या मैदानी प्रदेशात रेती व जलोढाचे जाड थर आढळतात दऱ्या विमुखनती प्रकारच्या, तर कटक संमुखनती प्रकारचे आहेत. या दून प्रदेशांत शेती व्यवसाय चालत असून तेथे लोकसंख्या दाट आहे. [⟶ दून]. नेपाळमधील शिवालिक टेकड्यांच्या प्रदेशाला ‘चुरिया डोंगर रांग’ म्हणतात.

शिवालिकमध्ये सर्वत्र खुरट्या वनस्पतींची विरळ जंगले होती परंतु ती तोडली गेल्यामुळे या प्रदेशाचे फार मोठ्या प्रमाणात क्षरण झालेले आढळते. सततच्या पुरांमुळे वाहत येणाऱ्या वाळूचे व गाळाचे संचयन वारंवार पात्र बदलणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांत होते. या संचयनास कॉस असे म्हणतात. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी हे संचयन कोरडे असते. शिवालिक टेकड्यांच्या पूर्व व मध्य भागांत दाट अरण्ये आढळतात.

पहा : शिवालिक नदी शिवालिक संघ.

 चौधरी, वसंत