विजयानगरम्: भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्यांचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६०,३५९ (१९९१). राज्याच्या ईशान्य भागात, बंगालचा उपसागर किनाऱ्यापासून सु. २५ किमी. अंतरावर हे शहर वसले आहे. विझगापटम् (विशाखापटनम्) येथील विजयराम राज या घराण्यातील पेद्दा विजयराम राज याने १७१२ मध्ये या नगरीची स्थापना करून तिला आपले नाव दिले. काहींच्या मते कर्नाटकातील विजयानगरच्या हिंदू साम्राज्यावरून याला हे नाव देण्यात आले. येथील राजे शिक्षण व कला यांचे आश्रयदाते व पुरस्कर्ते होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जलदगतीने वाढत गेलेले हे नगर बिमलिपटम् बंदर व जिल्ह्यातील डोंगराळ भूमी यांदरम्यानचे प्रमुख व्यापारी केंद्र बनले. १८६६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. हे नगर योजनाबद्ध वसविण्यात आलेले आहे. पूर्व घाटात मोक्याच्या जागी असलेल्या या शहराचे हवामान आरोग्यवर्धक असले, तरी उन्हाळ्यात मात्र उकाडा जाणवतो.

चर्मप्रक्रिया आणि तागावरील प्रक्रिया उद्योग येथे चालतात. शहरालगत देशातील सर्वांत मोठा लोह-मँगॅनीज प्रकल्प असून जवळच मँगॅनीजच्या खाणी आहेत. शहरात धान्य, भुईमुगाच्या शेंगा व साखर यांचा व्यापार चालतो. बंगालच्या उपसागर किनाऱ्यावरील कोनाडा गावाजवळ मीठ तयार करण्याचा व्यवसाय चालतो. शहराच्या उत्तरेस एक तलाव असून त्याच्या समोरच कँटोन्‌मेंट व रेल्वे स्थानक आहे. हे लोहमार्ग प्रस्थानक तसेच जहाज वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र असून येथून ताग व ताग उत्पादनांची निर्यात होते. शहरातील किल्ला (१७१४) व त्यातील राजवाडा, नगरभवन, महाविद्यालये इत्यादींच्या वास्तू सुंदर व प्रेक्षणीय आहेत. जवळच्या रामतीर्थम् गावाजवळ पुरतत्त्वीय बौद्धकालीन अवशेष आढळतात. शहरात महाविद्यालयापर्यंतच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत.

चौधरी, वसंत