लीब्रव्हिल : पश्चिम आफ्रिकेतील गाबाँ देशाच्या राजधानीचे ठिकाण, बंदर आणि लाकूड उद्योगाचे एक प्रसिद्ध शहर. लोकसंख्या ३,५०,००० (१९८३). विषुववृत्ताच्या उत्तरेस, अटलांटिक महासागरास मिळणाऱ्या गाबाँ नदीमुखाच्या उजव्या काठावर गिनीच्या आखाताजवळ छोट्या टेकड्यांवर ते वसले आहे. महासागरी विषुववृत्तीय स्थानामुळे येथील हवामान उष्ण व दमट आहे. सरासरी तापमान २६°से. असून वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५१सेंमी. असते. शहराचा प्राचीन इतिहासात ज्ञात नाही. खाडीच्या मुखापाशी पोंगो किंवा एम्पोंग्वे या आदिम लोकांनी सोळाव्या ते अठराव्या शतकात केव्हातरी वसाहत निर्माण केली. नंतर कॅमेरूनमधून तेथे फांग लोक आले. पुढे फ्रेंचांनी १८४३ मध्ये तेथे संरक्षणाच्या दृष्टीने द ओमाल हा किल्ला बांधला आणि नंतर एक वर्षाने तेथे कॅथलिक मिशनची स्थापना केली. गुलामविक्री पद्धतीचे उच्चाटन करण्यासाठी एलिझिया जहाजावरील मुक्त गुलामाची येथे १८४९ मध्ये वसाहत स्थापण्यात  आली. त्यावेळी पोंगो खेड्यांच्या या समूहाला गुलामांच्या मुक्ततेमुळेच लीब्रव्हिल (मुक्तनगर) हे नाव देण्यात आले. नंतर येथे आरमारी व व्यापारी ठाणे निर्माण झाले. त्यानंतर या गावाची हळूहळू वाढ झाली. तेथील उष्ण व रोगट हवामानामुळे या वसाहतीस ‘गोऱ्या लोकांचे थडगे’ असेही टोपणनाव मिळाले. ब्रिटिश, जर्मन, अमेरिकन इत्यादींनी १८६०-७४ दरम्यान येथे अनेक उद्योगधंदे सुरू केले. फ्रेंचांनी आपली फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेची राजधानी १८८८ ते १९०४ दरम्यान येथे ठेवली.

दुसऱ्या  महायुद्धानंतर या शहराला लाकडाच्या उत्पन्नामुळे व व्यापारामुळे हळूहळू महत्त्व प्राप्त झाले. गाबाँ स्वतंत्र झाल्यानंतर (१९६०) त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. गाबाँमधील लाकूड व्यवसायाचे हे प्रमुख केंद्र असून उष्णकटिबंधीय अरण्यातील लाकडी ओंडके, इमारतीच्या लाकडांचे ताफे येथे लहान जलप्रवाहांतून वाहून आणले जातात व त्यांची शहराच्या आग्नेयीस सु. १३ किमी. वर असलेल्या ओवेंदो बंदरातून निर्यात करतात. काकाओ, रबर, पाम उत्पादने, कापीव लाकूड (एबनी, वॉलनट, मॅहॉगनी) येथून निर्यात होते. जगातील सर्वोत्कृष्ट मॅहॉगनी लाकडाची ही मोठी बाजारपेठ आहे. शहरात लाकूडकटाईच्या गिरण्या, फर्निचर व प्लायवुड बनविण्याचे कारखाने, मद्यनिर्मिती व जहाजबांधणी उद्योग आहेत. यांशिवाय किनारपट्टीत मासेमारी व्यवसायही चालतो. शहराच्या उत्तरेला समुद्रात खनिज तेलाचा शोध लागला आहे. शहराच्या उत्तरेस सु. ११ किमी. वर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. रस्त्यांनी ते देशातील अन्य शहरांशी जोडले आहे.

 

शहरात बहुदेशीय लोक असून यूरोपीय रोमन-कॅथलिक पंथाचे आहेत. यांशिवाय फांग, शिरा, अदौमा इ. आफ्रिकी आदिम जमातींतील लोकही आढळतात. शहराला सांस्कृतिक दृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरात युनिव्हर्सिटी ओमार बाँगो (स्थां १९७०) हे विद्यापीठ असून येथील राष्ट्रीय ग्रंथालय (स्था. १९६०) संदर्भग्रंथांनी समृद्ध आहे. याशिवाय येथे उष्णकटिबंधीय पशुप्रधान शेती, भूविज्ञान आणि वनविद्या या विषयांत उच्चशिक्षण देणाऱ्या व संशोधन करणाऱ्या विशेष संस्था आहेत. शहरात आदिम जमातींच्या लाकडी घरांव्यतिरिक्त अनेक प्रशासकीय-शासकीय उत्तुंग इमारती आहेत. मध्ययुगीन रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट चर्च आणि मशिदी यांच्या लक्षवेधक वास्तू आहेत. शहरातून दोन वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. शहराजवळ किंग्वेली येथे जलविद्युत् प्रकल्प असून त्याद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. येथील पुळण आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. त्यामुळे पर्यटन उद्योगाची वाढ होत आहे.

मगर, जयकुमार