स्वाझीलँड : आफ्रिका खंडाच्या आग्नेय भागातील एक भूवेष्टित स्वतंत्र राजसत्ताक देश. क्षेत्रफळ १७,३६४ चौ. किमी. लोकसंख्या ११,०६,०००(२०१४). २५°४३¢ द. ते २७°२०¢ द. अक्षांश व ३०° ४८¢ पू. ते ३२°८¢ पू. रेखांश यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाची दक्षिणोत्तर लांबी १७६ किमी., पूर्व-पश्चिम रुंदी १३५ किमी. असून याला ५५४ किमी. लांबीची सरहद्द लाभली आहे. पूर्वेस मोझँबीक आणि दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांना द. आफ्रिका प्रजासत्ताकाने हा देश वेढलेला आहे. याच्या पश्चिम भागातील एम्बाबाने (लोकसंख्या ९४,८७४ २०१०) ही देशाची प्रशासकीय व लोबांबा ही वैधानिक शाही राजधानी आहे.

भूवर्णन : भौगोलिकदृष्ट्या स्वाझीलँड हा दक्षिण आफ्रिकी पठाराचा भाग असून त्याचे पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे हायव्हेल्ड, मिड्लव्हेल्ड, लोव्हेल्ड किंवा बुशव्हेल्ड आणि लेबोंबो भृगू प्रदेश असे चार प्राकृतिक विभाग केले जातात. उत्तर-दक्षिण पसरलेल्या या विभागांपैकी पहिल्या तीन विभागांची रुंदी सर्वसामान्यपणे एकसारखी आहे. देशाच्या पश्चिम सरहद्दीवरील हायव्हेल्ड ( उच्च तृणक्षेत्र ) हा प्रदेश दक्षिण आफ्रिकेतील ड्रेकन्सबर्ग पर्वतरांगेचाच विस्तारित भाग असून त्याची सस.पासूनची सरासरी उंची १,०७० मी. आहे. याच्या वायव्य सरहद्दीवरील मौंट एम् लेंबे हे देशातील सर्वोच्च (१,८६२ मी. ) शिखर आहे. या प्रदेशाने देशाचा सु. ३३% भाग व्यापला आहे. मिड्लव्हेल्ड ( मध्य तृणक्षेत्र ) प्रदेशाची उंची ६१०—७६० मी. असून याने देशाचे सु. २५%क्षेत्र व्यापले आहे. लोव्हेल्ड ( कमी उंचीचे तृणक्षेत्र ) प्रदेशाने देशाचे सु. ४०% क्षेत्र व्यापलेले असून याची सस.पासूनची उंची १५०—३०० मी. पर्यंत आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या मिड्लव्हेल्ड व लोव्हेल्ड प्रदेशांमध्ये एकवटलेली दिसून येते. पूर्वेकडील लेबोंबो भृगू प्रदेशाने एकूण सु. ९% क्षेत्र व्यापलेले असून हा प्रदेश सर्वसामान्यपणे ६००—८२० मी. उंचीचा आहे. देशाच्या पूर्व सरहद्दीवरील लेबोंबो या लाव्हाजन्य पर्वतरांगेचा समावेश या विभागातच होत असून त्याने हा देश मोझँबीक किनारी मैदानापासून वेगळा झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील विपुल जलसंपदा असलेल्या प्रदेशांपैकी स्वाझीलँड हा एक मानला जातो. येथील बहुतेक नद्या पश्चिमेकडील हायव्हेल्ड प्रदेशात उगम पावून पूर्वेस मोझँबीकमधून वाहत जाऊन पुढे हिंदी महा-सागरास मिळतात. कोमाटी, ऊंबेलूझी (एम्बुलूझी), उसूतू (लुसुत्फू), एन् नग्वावूमे (इंग्वाव्हूमा) या येथील चार प्रमुख नद्या आहेत. एम्खॉन्दव्हो ही नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने वाहणारी नदी उसूतूची उपनदी आहे. पहिल्या दोनही नद्यांनी देशाच्या उत्तर भागास, तर इतर नद्यांनी दक्षिण भागास पाणीपुरवठा केला आहे. स्वाझीलँडला एकूणच क्षेत्रफळाच्या मानाने विपुल जलसंपदा लाभली आहे. जलसिंचन व वीजनिर्मिती यांसाठी नद्यांचा चांगला उपयोग करून घेण्यात आला आहे. विशेषतः मिड्लव्हेल्ड प्रदेशाच्या शुष्क भागातील ऊस व लिंबू—वर्गीय फळबागांना यांतून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो परंतु कमी क्षेत्र व त्या मानाने जमिनीची मोठ्या प्रमाणात होणारी धूप तसेच गुरेचराई ह्यांमुळे जमिनीचा पोत खालावत चालला असून, पर्यावरणाच्या दृष्टीने देशापुढील ही मोठी समस्या आहे.

हवामान : स्वाझीलँडचे हवामान सर्वसामान्यपणे उपोष्ण कटिबंधीय स्वरूपाचे आढळते. स्थलपरत्वे यामध्ये थोडाफार फरक दिसून येतो. हायव्हेल्ड प्रदेशात ते आर्द्र-समशीतोष्ण स्वरूपाचे असून येथील वार्षिक सरासरी तापमान १६° से. व पर्जन्यमान १००—२३० सेंमी. असते. मिड्लव्हेल्ड व लोव्हेल्ड तसेच लेबोंबो पठारी प्रदेशात उपोष्ण व कोरडे हवामान आढळते. येथील वार्षिक सरासरी तापमान १९°—२२° से. व पर्जन्यमान ५०—९० सेंमी. आहे. मे ते सप्टेंबर हा काळ स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड व कोरड्या हवामानाचा असून या काळात तुरळक ठिकाणी हिमतुषार, तर डोंगरमाथ्यांवर काही वेळा बर्फ पडलेले आढळते. नोव्हेंबर ते मार्च हा आर्द्र हवामानाचा काळ असून त्या काळात गडगडाटी वादळांसह पाऊस पडतो.

देशाचे क्षेत्र कमी असूनही येथील वनस्पतिप्रकारांत विविधता दिसून येते. पश्चिमेकडील उंच प्रदेशात कठिण वृक्षांची जंगले, तर पूर्वेकडील सपाट मैदानी भागांत सॅव्हाना व उपोष्ण कटिबंधीय वृक्षप्रकार तसेच मिश्र व खुरट्या वनस्पती, दलदली व कुरणे, अनेक प्रकारची फुलझाडे व नेचे आढळतात. वायव्य भागात वर्षावने, तर इतर भागांत सर्वत्र झुडपांचे विविध प्रकार तसेच बिगोनिआ, ऑर्किड, कोरफडीसारखे वनस्पतिप्रकार दिसून येतात. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.०५% क्षेत्र जंगलांनी व्यापलेले होते (२००५).

या प्रदेशात वन्यप्राण्यांच्या रहिवासास योग्य वातावरण असल्याने वनस्पतिप्रकारांप्रमाणेच येथे प्राण्यांची विविधता दिसून येते परंतु बेसुमार शिकार, पारध खेळ यांमुळे वन्यप्राण्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. निळ्या रंगाचे रानटी बीस्ट, कूडू ( आफ्रिकन हरिण ), झेब्रा, वॉटरबक, पाणघोडा, गेंडा, हत्ती,सिंह , नदीप्रवाहांमधल्या विविध प्रकारच्या सुसरी इ. प्राणी येथील जंगलांत अद्यापही आढळतात. यांशिवाय पाण-वठ्याच्या जागी व जंगलाच्या अंतर्भागात विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात. त्यांमध्ये यूरोपियन स्टॉर्क, आयबिस, राखी रंगाचा बक यांचे प्रमाण जास्त आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती व वन्यप्राणी संरक्षणासाठी देशाने विविध उपाययोजना केल्या असून त्यांद्वारा प्राण्यांची संख्या व त्यांचे आरोग्य यांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात आले आहे. यासाठी येथील एम्लिलवाने वन्यप्राणी अभयारण्य प्रसिद्ध आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था : दक्षिण आफ्रिकेतील इतर प्रदेशां-प्रमाणेच या भागात पूर्वी शिकारी बुशमन लोकांचे वास्तव्य होते. येथील स्वाझी लोकांच्या काही आख्यायिकांनुसार त्यांचे पूर्वज ( बांतू ) सांप्रतच्या मोझँबीक देशातील मापूतोच्या परिसरात वास्तव्य करीत होते. सोळाव्या शतकात काही बांतूंनी नैर्ऋत्येकडे स्थलांतर केले. त्यांच्यापैकी स्वाझी गटाने सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात दुसरा एन्ग्वाने या गट-प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली लेबोंबो पर्वतरांग ओलांडून सांप्रतच्या स्वाझीलँडच्या आग्नेय भागात प्रवेश केला. तेथील मूळचे आफ्रिकी व एन्ग्वानेचे वसाहतकरी एकत्रितपणे या प्रदेशात वास्तव्य करीत होते. झुलू लोकांबरोबर मात्र स्वाझींचा कायम संघर्ष होत होता. त्यामुळे अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्वाझी उत्तरेकडे स्थायिक झाले व त्यांनी त्या प्रदेशाला ‘ स्वाझीलँड ’ हे नाव दिले. १८३० च्या सुमारास ब्रिटिश व्यापारी व दक्षिण आफ्रिकेतील डच वसाहतकरी ( बोअर लोक ) या प्रदेशात आले. स्वाझींनी झुलूंच्या विरोधात ब्रिटिशांची मदत घेतली. ब्रिटिशांनी या दोहोंमध्ये समझोता घडवून आणला. पुढे १८८०—८६ च्या सुमारास वसाहतकर्‍यांना येथे सोन्याचा शोध लागला. त्यामुळे अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या आशेने वेगवेगळ्या भागांतून अनेकांनी या प्रदेशाकडे धाव घेतली. या वसाहतकर्‍यांनी शेती, गुरेचराई, सोने व अन्य खनिजांचे उत्पादन यांसाठी स्वाझी नेत्यांकडून अधिकार प्राप्त करून घेतले. परिणामतः स्वाझींना या प्रदेशाचा ताबा गमवावा लागला. १८८१—८४ मध्ये ब्रिटिश व द. आफ्रिका प्रजासत्ताकातील बोअर लोकांचे ट्रान्सव्हाल प्रशासन यांच्यात करार होऊन स्वाझीलँडवर संयुक्त प्रशासन आले परंतु स्वाझींच्या राजाकडून मिळालेले फायदे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी स्वाझींना प्रशासनात सामावून घेतले. १८९४ मध्ये प्रशासनात बोअर लोकांचे वर्चस्व वाढले व ब्रिटिशांना त्यांच्याबरोबर समझोता करणे भाग पडले व या प्रदेशाचे अधिकार ट्रान्सव्हालच्या बोअर प्रशासनाकडे गेले. १८९९—१९०२ मधील बोअर युद्धात बोअर लोकांचा पराभव होऊन हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला.


ब्रिटिशांनी स्वाझींशी चांगले संबंध प्रस्थापित करून ६० वर्षांसाठी या प्रदेशाचे काही मूलभूत अधिकार स्वतःकडे ठेवून घेतले, ते १९६० च्या मध्यापर्यंत त्यांच्याकडे होते. स्वाझींचा प्रमुख व राजा दुसरा सोबूझा १९२१ पासून स्वाझींची सामाजिक व्यवस्था पाहत होता. याच वर्षी यूरोपियन ॲडव्हायझरी काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. १९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने स्थानिक प्रशासनासंबंधीची घोषणा केली व तीनुसार सर्वाधिकार मूळ रहिवाशांकडे देण्याचे ठरले. १९६३ मध्ये लंडनमध्ये त्यांना स्वातंत्र्य देण्याविषयीची चर्चा सुरू झाली. या अधिकारां-साठी स्वाझींचेही प्रयत्न सुरू होते. अखेर १९६७ मध्ये स्वाझींना त्यांच्या अंतर्गत प्रशासनाचा अधिकार मिळाला व ६ सप्टेंबर १९६८ रोजी पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. १९६८ मध्ये ग्रेट ब्रिटनने स्वाझीलँडचे संविधान तयार केले. त्यानुसार येथे राजेशाही प्रस्थापित झाली व दुसरा सोबूझा याला स्वतंत्र स्वाझीलँडचा राजा घोषित करण्यात आले परंतु या संविधानाने स्वाझींच्या रूढी, परंपरांची व अधिकारांची पायमल्ली होत असल्याचे मानून अनेक स्वाझींनी ब्रिटिशांच्या या कृतीला विरोध केला. परिणामी १९७३ मध्ये राजा सोबूझाने हे संविधान रद्द करून देशाचे विधानमंडळ निलंबित केले. त्याने सर्व सत्ता आपल्या हाती घेऊन मंत्रिमंडळ स्थापन करून त्याच्या सहकार्याने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. १९७९ मध्ये देशाचे नवीन संविधान तयार करण्यात आले. त्यानुसार अप्रत्यक्ष निवडणुकीने आणि राजाने नेमलेले काही प्रतिनिधी मिळून संसद स्थापण्यात आली व त्यांच्या सहकार्याने देशाचा कारभार चालू राहिला. १९८२ मध्ये राजा सोबूझाचे निधन झाले. १९८३ मध्ये त्याच्या ६७ मुलांपैकी १५ वर्षांचा राजपुत्र माखोसेटीव्ह याला गादीचा वारस म्हणून जाहीर करण्यात आले. २५ एप्रिल १९८६ रोजी सज्ञान झाल्यावर त्याला राजाधिकार प्राप्त झाले. त्याने तिसरा राजा एम्स्वाती या नावाने राज्यकारभार सुरू केला. १९९० मध्ये देशात पुन्हा अशांतता निर्माण झाली. त्यामुळे प्रशासनाला राजकीय धोरण व संविधान यांमध्ये बदल करणे भाग पडले. २६ जुलै २००५ रोजी राजा एम्स्वातीने सत्तेतील आपला अधिकार कायम ठेवून नवीन संविधान संमत केले.

 नवीन संविधानानुसार देशात वंशपरंपरागत राजेशाही असून द्विसदनी संसदही आहे. संसदेची हाउस ऑफ असेंब्ली (कनिष्ठ सभागृह) व हाउस ऑफ सिनेट (वरिष्ठ सभागृह) ही दोन गृहे असून संसद सदस्यांची नेमणूक निवडणुकीद्वारा व राजाच्या नियुक्तीद्वारा होते. राजा मंत्रिमंडळ व राष्ट्रीय विधानमंडळ यांच्या सहकार्याने राज्यकारभार पाहतो. राजाच्या आईला किंवा ज्येष्ठ पत्नीला ‘ राणीमाता ’ (क्वीन मदर) हा अधिकार असतो. ती व राजा हे स्वाझी नॅशनल काउन्सिलचे प्रमुख असतात. राणीमाता राष्ट्रीय परंपरा व सांस्कृतिक आचारपद्धतींची (कर्मकांडांची) प्रमुख असते. संसदेने मंजूर केलेल्या विधिविधानाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राजाची मान्यता अत्यावश्यक असते. पंतप्रधान मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असून त्याची नियुक्ती संसद सदस्यांमधून राजा करतो. १९७८ च्या संविधानानुसार देशात पक्षस्थापनेस कायद्याने बंदी केली होती परंतु २००६ च्या सुधारित संविधानामध्ये यासंबंधीची कोणतीही कायदेशीर भूमिका स्पष्ट केलेली नाही. कामकाजाच्या सोयीसाठी देशाची चार जिल्ह्यांत विभागणी केलेली असून तेथील कारभार केंद्राच्या सल्ल्याने स्थानिक प्रशासन पाहते.

 न्याय व संरक्षण : देशाची न्यायव्यवस्था द. आफ्रिकी रोमन-डच कायदा व स्वाझींचे पारंपरिक कायदे यांचे मिश्रण आहे. येथील न्यायदान- पद्धतीमध्ये अपील न्यायालये, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी मॅजिस्ट्रेट न्यायालये अशी व्यवस्था असून न्याया-धीशांच्या नेमणुका राजा करतो. रूढी-परंपरांविषयीच्या कायद्यांसाठी देशात स्वतंत्र न्यायालये आहेत.

 देशाचे सशस्त्र दल असून १९७३ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये भूदल व हवाईदलाचा समावेश असून विशेषतः अंतर्गत सुरक्षा व सरहद्दीच्या रक्षणासाठी त्यांचा उपयोग केला जातो. राजा त्यांचा प्रमुख असतो. १९८३ पासून प्रत्येक प्रौढ नागरिकाला कमीतकमी २ वर्षे संरक्षक दलाची सेवा सक्तीची करण्यात आली आहे.

 आर्थिक स्थिती : स्वाझीलँडची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेती, लहान उद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार यांवर अवलंबून आहे. देशातील एकूण कामगारांपैकी सु. ५०% कामगार शेतीव्यवसायात गुंतलेले आहेत. येथील एकूण शेतजमिनींपैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र एन्ग्वेन्यामाच्या ( राजाच्या ) मालकीचे असते व ते स्वाझी नेशन लँड ( एस्एन्एल् ) या नावाने ओळखले जाते. बहुतेक स्वाझी लोक या जमिनींमध्ये शेती व गुरेपालन यांद्वारे कुटुंबासाठी उदरनिर्वाहाची शेती करतात. शेतीतून प्रामुख्याने मयाचे पीक घेतले जाते. १९६० पासून स्वाझी शेतकर्‍यांनी कापूस व इतर धान्यांची नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. स्वाझी नेशन लँडव्यतिरिक्त देशातील ज्या जमिनी खाजगी मालकीच्या होत्या, त्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त जमिनी यूरोपियनांनी घेतलेल्या असून त्यांमध्ये ते लिंबूवर्गीय फळे, कापूस, अननस, भात, ऊस, तंबाखू यांसारखी नगदी पिके घेतात. २००७ मध्ये देशात कायमस्वरूपी लागवडीचे क्षेत्र १४,००० हे. होते. देशातील मूळचे स्वाझी लोक पशुपालन हे प्रतिष्ठेचे आणि श्रीमंतीचे द्योतक मानतात. काही धार्मिक विधी वगळता ते अन्न म्हणून गुरांची हत्या करीत नाहीत. यूरोपियन पशुपालक मात्र मांसोत्पादन व कातडी यांचा व्यवसाय करतात.

 स्वाझीलँडमध्ये १९४० पासून यूरोपियन कंपन्यांनी डोंगराळ भागांत कृत्रिम जंगलांच्या निर्मितीसाठी पाईन, युकॅलिप्टस ( निलगिरी ) वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सांप्रत देशातील बहुतेक डोंगररांगा जंगलव्याप्त असून येथील जंगले आफ्रिकेतील कृत्रिम जंगलांपैकी सर्वांत मोठी मानली जातात. लाकूड व अन्य जंगल उत्पादनांचे उद्योग यूरोपियनांच्या मालकीचे असून त्यांनी या भागांत लाकडाचा लगदा व कागदनिर्मिती उद्योग विकसित केले आहेत. २००५ मध्ये देशात ५,४१,००० हे. क्षेत्र जंगलांखाली होते व २००७ मध्ये १३४ लक्ष घ.मी. लाकूड उत्पादन घेण्यात आले होते. २००६ मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ८.१% शेती, ४६.४% उद्योग व ४५.५% सेवा व्यवसायांतून उत्पन्न मिळाले होते.

 स्वाझीलँडचा पर्वतीय प्रदेश खनिज संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असून येथील बहुतेक खाणी यूरोपियनांच्या मालकीच्या आहेत. देशाच्या आर्थिक उत्पन्नात खनिजांचा मोठा वाटा असतो. खनिजांमध्ये प्रामुख्याने लोह, ॲस्बेस्टस, कोळसा, बॅराइट, कथिल, केओलिन व काही प्रमाणात सोने यांचा समावेश असतो. येथील एन्ग्वेन्या पर्वतातील ‘ लायन कॅव्हर्न साइट ’ ही लोहधातूची खाण जगातील सर्वांत प्राचीन मानली जाते. उत्तर भागातील पिग्ज पीकजवळील ॲस्बेस्टसची खाण देशातील सर्वांत मोठी असून खनिज निर्यात उत्पादनांमध्ये तिचा मोठा वाटा असतो. १९६० पासून देशात अनेक लहान लहान निर्मितिउद्योगांचा विकास झाला आहे. बहुतेक उद्योग शेती व जंगल उत्पादनांवरील प्रक्रियांशी निगडित आहेत. १९८० नंतर द. आफ्रिकेतील अनेक कंपन्यांनी आपल्या व्यवसायांच्या शाखा येथे सुरू केल्या आहेत. देशात साखरनिर्मिती, फळांवरील प्रक्रिया, सौम्य पेये, पादत्राणे, कापड, कागद व कागद उत्पादने, मादक पेये, खाद्यपदार्थ इत्यादींचे निर्मितिउद्योग विकसित झाले आहेत. मान्झीनी, मात्सापा, न्हलांगानो ही शहरे उद्योगधंद्यांची केंद्रे आहेत. स्वाझीलँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत औद्योगिक विकासकामांचे नियोजन केले जाते. देशात कोळसा व जलविद्युत्निर्मिती केली जाते परंतु देशाच्या गरजेच्या मानाने वीज उत्पादन कमी असल्याने सु. ६६% वीज दक्षिण आफ्रिकेतून आयात केली जाते. देशाच्या निर्यातमालामध्ये प्रामुख्याने साखर, लाकूड व लाकूड उत्पादने, डबाबंद फळे यांचा, तर आयातीत यंत्रसामग्री, वाहतूक साधने, इंधन यांचा समावेश असतो. आयात-निर्यात व्यापार मुख्यत्वे द. आफ्रिका प्रजासत्ताक, मोझँबीक व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांशी केला जातो.


देशात १९६८ मध्ये टिबियो टका एन्ग्वेने या नावाने राजाच्या अधिकारातील निधी उभारण्यात आला. टिबियो म्हणजे राष्ट्रीय विकास निधी यावर संपूर्ण नियंत्रण राजाचे असते. हा निधी त्याच्या मालकीच्या क्षेत्रातील उद्योगधंद्यांच्या विकासासाठी राखून ठेवलेला असतो व तो उद्योगधंद्यांमधून कर स्वरूपात गोळा केलेला असतो. देशात मध्यवर्ती बँक, व्यापारी बँका, विकास बँका व वित्तीय संस्था यांद्वारा आर्थिक नियोजन केले जाते. सेंट्रल बँक ऑफ स्वाझीलँड ही येथील प्रमुख बँक असून तिची १९७४ मध्ये स्थापना करण्यात आली आहे. २०१० मध्ये देशात ४ व्यापारी बँका, ३ परकीय खाजगी बँका आणि एक गृहनिर्माण अर्थविषयक बँक होती. १९९९ मध्ये देशात शेअर बाजार कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. लिलँगेनी ( अनेकवचनी एम्लांगेनी ) हे देशाचे अधिकृत चलन असून त्याचे १०० सेंट असतात. डिसेंबर २०११ मध्ये १०० एम्लांगेनी = ७.९४ स्टर्लिंग पौंड = १२.२८ अमे. डॉलर = ९.४९ यूरो असा विनिमय दर होता.

 वाहतूक व संदेशवहन : देशातील बस हे वाहतुकीचे प्रमुख साधन असून परवानाधारक खाजगी प्रचालकांमार्फत बससेवा पुरविली जाते. देशात २००२ मध्ये ३,५९४ किमी. लांबीच्या रस्त्यांपैकी १,४६५ किमी.  लांबीचे पक्के व प्रमुख रस्ते होते. २००५ मध्ये देशात ३०१ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. देशातील प्रमुख लोहमार्ग उत्तर-दक्षिण दिशेने गेलेला असून तो ईशान्येस मोझँबीकमधील मापूतो शहराशी व दक्षिणेस द. आफ्रिका प्रजासत्ताकाशी जोडलेला आहे. मान्झीनी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. २००८ मध्ये देशात ४४,००० दूरध्वनी संच, तर १०० लोकांमागे ४६ भ्रमणध्वनी होते. याचवर्षी देशात आंतरजालाचा ( इंटरनेट ) वापर करणारे ८०,००० लोक होते. २००८ मध्ये देशात द टाइम्स ऑफ स्वाझीलँड व द स्वाझी ऑब्झर्व्हर या प्रमुख दोन इंग्रजी दैनिकांशिवाय अन्य वृत्तपत्रे निघत होती.

 लोक व समाजजीवन : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सु. ९७% लोक स्वाझी-झुलू वांशिक गटाचे असून ३% यूरोपीय व दक्षिण आफ्रिकी मिश्र वंशाचे आहेत. शेती व पशुपालन हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. २००७ मध्ये शेती व्यवसायात सु. ३,५४,००० लोक गुंतलेले होते. बरेच स्वाझी यूरोपियनांच्या शेतजमिनींमध्ये अथवा खाणींमध्ये तसेच कारखाने, कार्यालये अथवा दुकानांमध्ये मजूर म्हणून काम करतात. येथील बहुतेक स्वाझी समाज रूढी-परंपरावादी असून त्यांच्यात बहुभार्या पद्धती रूढ आहे. लग्नामध्ये वरपक्षाने वधूच्या कुटुंबाला वधूमूल्य ( लोबोला ) देण्याची प्रथा असून त्यामध्ये प्रामुख्याने गुरांचा समावेश असतो. वधूमूल्य दिल्यानंतरच वडिलांचे आडनाव मुलांना लावता येते अन्यथा मुलाला दोन्ही नावे लावण्याचा हक्क राहतो. राजालाही त्या प्रथांचे पालन करणे बंधनकारक असते. काही स्वाझींनी या जुन्या प्रथांना विरोध दर्शविला असला, तरी सु. ४५% पेक्षा जास्त लोकांचा पारंपरिक प्रथांवर विश्वास असून ते या प्रथांना संस्कृतीचा महत्त्वाचा घटक मानतात. स्वाझींच्या कुटुंबामध्ये मुख्य कर्ता पुरुष, त्याच्या भार्या, मुले, सुना,नातवंडे असा मोठा परिवार असतो. प्रत्येक मोठे कुटुंब खेड्यात राहते. मध्यभागी गुरांचे गोठे व त्यांभोवती गोलाकार विशिष्ट आकाराची घरे असे खेड्यांचे स्वरूप असते. प्रत्येक पत्नीसाठी स्वतंत्र घर, त्याभोवती थोडी शेतजमीन असते. या जमिनीत स्त्रिया उदरनिर्वाहाची पिके घेतात. स्वाझी पुरुष व मुले गुरांचे कळप सांभाळतात. अलीकडे मात्र श्रीमंत स्वाझींनी यूरोपीय अथवा उत्तर अमेरिकन पद्धतीची घरे बांधलेली दिसून येतात. खेड्यांतील स्वाझी लोक जनावरांच्या कातड्यांपासून बनविलेली पारंपरिक पद्धतीची वस्त्रे अथवा गडद रंगाची सुती वस्त्रे तसेच मण्यांची आभूषणे वापरतात. शहरी भागांतील लोक यूरोपीय ढंगाचे कपडे वापरतात. प्रत्येक स्वाझी व्यक्ती राजाने वयानुसार केलेल्या गटांशी संलग्न असते. स्वाझींच्या सांस्कृतिक समारंभांमध्ये वयोगटानुसार वेगवेगळी कामे सोपविली जातात. दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत ‘ उम्हलांगा ’ या राणीमातेच्या सन्मानार्थ केल्या जाणार्‍या उत्सवात पारंपरिक पोशाखात अविवाहित स्त्रियांनी राणीच्या दरबारात केलेले ‘ वेणू नृत्य ’ महत्त्वाचे असते. याशिवाय मे महिन्यात साजरा केला जाणारा ‘ बुश फायर ’ उत्सव संगीत व प्रयोगीय कलांना प्रोत्साहन देणारा असतो.

 स्वाझी समाजातील सु. ६०% लोक झायनिस्ट-ख्रिश्चन, १०% रोमन कॅथलिक, १०% मुस्लिम व इतर अन्यधर्मीय आहेत. देशात काही आशियायी लोकही असून ते लहान लहान उद्योगांत गुंतलेले आहेत. येथील बहुतेक शाळा चर्चमार्फत चालविल्या जातात. त्यांना शासन अनुदान देते परंतु अजूनही बहुतेक समाज निरक्षर असून देशाच्या प्रगतीतील हा मोठा अडसर आहे. प्रौढांमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त असून २००८ मध्ये ८७% प्रौढ साक्षर होते. २००७ मध्ये देशात २,३२,५७२ मुले प्राथमिक शिक्षण घेत होती, तर या वर्षी शिक्षकांची संख्या फक्त ७,१६९ होती. याचवर्षी माध्यमिक शाळांत ८३,०४९ मुले व ४,३५८ शिक्षक होते. बहुतेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत शेतीविषयक शिक्षणाला प्राधान्य असते. मुलांना पारंपरिक पद्धतीचे, तर प्रौढांना व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर असतो. युनिव्हर्सिटी ऑफ स्वाझीलँडद्वारा उच्च शिक्षण दिले जाते. १९७१ मध्ये स्वाझीलँड नॅशनल लायब्ररी सर्व्हिसची स्थापना करण्यात आली आहे. तिच्या अनेक शाखा असून त्यांमार्फत शाळांना ग्रंथसेवा उपलब्ध करून दिली जाते.

 देशातील सौम्य व आल्हाददायक हवामानाचा प्रदेश वगळता अन्य भागांत क्षयरोगाची समस्या भेडसावत आहे. विषमज्वर व परांत्रज्वर यांचा संसर्गही अद्याप दिसून येतो. मुलांचे अपपोषण हे येथील आजारांचे मुख्य कारण आहे. स्वाझीलँडमध्ये जगाच्या तुलनेत सर्वांत जास्त एच्आयव्ही- बाधित लोकसंख्या असून ही या देशाची मोठी समस्या आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. २००५ मध्ये देशात सु. ४०० आरोग्य केंद्रे होती व त्यांमध्ये ९ रुग्णालये होती. २००० मध्ये देशात १८४ डॉटर, ३,३४५ परिचारिका, २० दंतवैद्य व ४६ औषधनिर्माते होते. लोबांबा येथे १९७२ मध्ये स्वाझीलँड नॅशनल म्यूझीयमची स्थापना करण्यात आली असून ते देशाच्या सांस्कृतिक व परंपरांविषयीच्या माहितीचे केंद्र समजले जाते. सॉकर, बॉसिंग, व्हॉलीबॉल हे खेळ देशात लोकप्रिय आहेत.

 देशातील बहुसंख्य समाज बांतू भाषासमूहातील सिस्वाती ( स्वाती ) भाषा बोलणारा आहे. शासकीय व्यवहारांमध्ये स्वाती व इंग्रजी या दोनही भाषा अधिकृत करण्यात आल्या आहेत. यांशिवाय देशात काही आफ्रिकी बोली व पोर्तुगीज भाषाही थोड्या प्रमाणात बोलल्या जातात.

 पर्यटन : स्वाझीलँडमधील निसर्गसौंदर्य, राखीव जंगले, देशातील पारंपरिक पद्धतीचे सांस्कृतिक महोत्सव व राजदरबार तसेच एम्बाबाने येथील जुगारगृहे ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे असतात. या दृष्टीने मालोलोत्जा, हावाने, म्लाव्हुला व मॅन्वेंगा या ठिकाणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. २००९ मध्ये सु. ९,०९,००० पर्यंटकांनी या देशाला भेट दिली होती. त्यांमध्ये विशेषतः दक्षिण आफ्रिकेतील पर्यटकांचा समावेश होता. एम्बाबाने, मान्झीनी, लोबांबा ही देशातील प्रमुख शहरे आहेत.

चौंडे, मा. ल.


 स्वाझीलंड
स्वाझी युवकांचे शिकारनृत्य राजधानी एम्‌बाबाने : एक विहंगम दृश्य.
वेणू नृत्यसज्ज स्वाझी युवती पारंपरिक वेशभूषेत राजा एम्‌स्वाती (डावीकडून पहिला) आणि सहकारी