निझामसागर : आंध्र प्रदेश राज्याच्या निझामाबाद जिल्ह्यातील मानवनिर्मित जलाशय. हा निझामाबादच्या दक्षिणेस सु. ६० किमी. वर गोदावरी नदीच्या मांजरा उपनदीवर १९३१ साली निर्मिला असून याने १२९ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. याची पाणी साठविण्याची क्षमता ८,२२० लाख घ. मी., लांबी २४ किमी., रुंदी १६ किमी. व धरणाची उंची ३८ मी. आहे. जलाशयापासून काढलेला कालवा सु. ११२ किमी. लांब असून निझामाबाद जिल्ह्यातील बान्सवाडा, बोधन, निझामाबाद, आरमूर या तालुक्यातील सु. १,१०,००० हे. जमिनीस पाणीपुरवठा केला जातो. जलाशयाच्या खाली एक हंगामी स्वरूपाचे विद्युत्‌निर्मिती केंद्र १९५६ साली (पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी) सुरू झाले असून, तेथे ५,००० किवॉ. क्षमतेची तीन जनित्रे उभारली आहेत. जलाशयातून वाहणाऱ्या पाण्यावरच विद्युत्‌निर्मिती अवलंबून असते. हे केंद्र येर्रागड्डा येथील हुसेनसागर औष्णिक केंद्राशी जोडले असल्यामुळे हुसेनसागर येथील कोळशाची बचत झाली आहे. जलाशयातील उंचवट्यावर सुंदर बगीचा व दिलखुश बंगला असून तेथून जलाशयाचा व आजूबाजूचा विस्तृत मनोरम देखावा दिसतो. जलाशयाच्या किनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी विश्रामगृहे आहेत. सध्या हे सुंदर पर्यटन ठिकाण समजले जाते. हैदराबाद-मनमाड लोहमार्गावरील कामारेड्डी हे यास जवळचे (४१ किमी.) रेल्वेस्थानक असून त्याच्याशी हे सडकेने जोडले आहे.

सावंत, प्र. रा.