ओमान : अरबस्तानच्या आग्नेय टोकावरील देश. मस्कत व ओमान या नावाने १९७० पूर्वी  प्रसिद्ध. क्षेत्रफळ २,१२,४०० चौ. किमी. लोकसंख्या सु.  ७,५०,००० (१९७०). याच्या उत्तरेस ओमानचे आखात, पूर्वेस व दक्षिणेस अरबी समुद्र, नैर्ऋत्येस दक्षिण येमेन, पश्चिमेस सौदी अरेबिया व वायव्येस संयुक्त अरब अमीर राज्ये आहेत. हॉर्मझच्या सामुद्रधुनीत शिरलेला रूऊस अल्-जबल हा ओमानचा डोंगराळ द्वीपकल्पीय भाग, कल्‌बा आणि फुजाइरा या संयुक्त अरब अमीर राज्यांनी ओमानच्या मुख्य भूमीपासून अलग केलेला आहे. १७८४ साली कलातच्या खानाकडून ओमानला मिळालेला मकरान किनाऱ्यावरील ग्वादर  बंदराजवळील प्रदेश ओमानने १९५८ साली पाकिस्तानला ३० लाख पौंड घेऊन परत केला, तर ओमानकडून १८५३ मध्ये ब्रिटनला मिळालेली दक्षिण किनाऱ्याजवळील कुरिया-मुरिया बेटे ब्रिटनने १९६७ साली ओमानला परत केली. १,६०० किमी. किनारपट्टी लाभलेल्या ओमानची मस्कत ही राजधानी आहे.

भूवर्णन : चिंचोळी किनारपट्टी, त्यामागील पर्वतप्रदेश व त्याच्याही मागे उजाड पठारी प्रदेश असे ओमानचे सर्वसाधारण भौगोलिक स्वरूप आहे. ओमानच्या आखातावरील किनारपट्टी उत्तरेकडे सु. २५० किमी. लांब व २० – ६० किमी. रुंद असून अत्यंत सुपीक आहे. बाटिना या नावाने ही ओळखली जात असून येथील खजूर उत्तम स्वाद असलेला म्हणून जगप्रसिद्ध आहे.बाटिनाच्या दक्षिणेकडील किनारपट्टी अतिशय अरुंद असून मस्कत शहर याच भागात आहे. किनारपट्टीला लागून अल् हाजर ही सु. ४८० किमी. आग्‍नेय-वायव्य पर्वतरांग पसरली असून, वाडी समाईल या नदीखोऱ्याने तिचे पूर्व हाजर व पश्चिम हाजर असे दोन भाग झाले आहेत. जबल अल्- अख्दर (३,१०७ मी. ) हे यावरील सर्वोच्च शिखर होय. ओमानची अरबी समुद्रावरील धोफारची किनारपट्टी मात्र सरासरी ३२ किमी. रुंद व समृद्ध आहे. या किनारपट्टीच्या उत्तरेस जबल फलिक, कमर, कारा, समहान इ. ९०० — १,२०० मी. उंचीच्या पर्वतरांगा असून या पर्वतरांगांमध्ये  धोफार नावानेच प्रसिद्ध असलेला पठारी प्रदेश आहे. ओमानचा अंतर्गत पठारी प्रदेश अतिशय रुक्ष असून सौदी अरेबियाच्या रब-अल्-खली नावाच्या निर्मनुष्य वाळवंटभागाला तो मिळतो. किनारपट्ट्या आणि मरूद्याने सोडल्यास ओमानचा प्रदेश वाळवंटी, खडकाळ आणि उजाड आहे. नद्यांचे प्रवाहही कोरडे पडलेले असतात. त्यांना वाड्या म्हणतात. ओमानची दक्षिणेकडील मासिरा, कुरिया-मुरिया ही बेटेदेखील जवळजवळ ओसाड आहेत.

अतिशय उष्ण व किनारपट्टीवर दमट हवामान यांविषयी ओमान प्रसिद्ध आहे. येथील किनाऱ्याजवळील समुद्राचे पाणी बहुधा गरमच असते. किनारपट्टीवर नोव्हेंबर ते मार्च तपमान १६— २१ से. असते,  तर उन्हाळ्यात ते ३७ से. च्या वर व क्वचित ४६ से. पर्यंतही जाते. अंतर्गत भागात तपमान ५५ — ६० से. पर्यत जाते. पर्वतशिखरांवरील हवामान मात्र तुलनेने सौम्य आढळते. पूर्व किनाऱ्यावरील सरासरी वार्षिक पर्जन्य १० सेंमी. असला, तरी प्रामुख्याने किनाऱ्यांवर व पर्वतप्रदेशांवरच पाऊस पडतो. धोफार किनारपट्टीवर मात्र मोसमी वाऱ्यांपासून सु. ६० सेंमी.पर्यंत पाऊस पडतो. अतिशय उष्णता व कमी पाऊस यांमुळे मरूद्याने सोडल्यास, ओमानच्या अंतर्गत भागात वाळवंटी झुडुपे तीही फारच कमी प्रमाणात आढळतात. डोंगर भागावर थोडी जंगले असून त्यांमध्ये चित्ता, हरिण, सांबर, खोकड, लांडगा, ससा इ. प्राणी आढळतात. 

इतिहास-राज्यव्यवस्था: ओमानच्या किनाऱ्याहून बॅबिलोन – पूर्वकाळापासून वाहतूक होत असल्याचे पुरावे मिळतात. उत्तरेकडून आलेल्या सेमेटिकांनी ओमानमध्ये स्थायिक झालेल्या हॅमाइटांना हुसकावले होते. इ. स. पू. ५३६ मध्ये ओमानचा भाग पर्शियाच्या साम्राज्यामध्ये आल्याचा इतिहास मिळतो तथापि सातव्या शतकात ओमान इस्लामधर्मीय बनेपर्यंतचा इतिहास सुसंगत नाही. ओमानने इस्लाम धर्म स्वीकारला तरी मूळचा वंशभेद चालूच राहिला. उत्तरेकडील आलेले ते हिनवी व मूळचे घाफिरी समजले जाऊ लागले. इस्लाम धर्मातील फाटाफुटीनंतर आठव्या शतकात अब्दल्ला इब्न इबाह (६९९ – ? ) याने ओमानमध्ये इबादीय ( अबादीय) पंथाची स्थापना केली. या लोकांनी  ७५१ मध्ये जुलंद बिन मसूद याला ओमानचा पहिला इमाम म्हणून निवडले. याच्यानंतर लोक इमामाची निवड करीत परंतु ११५४ मध्ये बनू नभन याने आपल्या वंशाची स्थापना केली.१४२९ पासून नभनी राजांबरोबर लोकनियुक्त इमामांचाही कारभार सुरू झाला. नवव्या शतकापासून ओमानचे संबंध पूर्व आफ्रिकेतील प्रदेशांशी जमले होते मोझँबिकजवळील काही प्रदेशावर त्यांचा ताबाही होता. १५०८ साली पोर्तुगीजांनी ओमानचा किनाऱ्यावरील प्रदेश व पूर्व आफ्रिकेतील प्रदेश यांचा ताबा घेतला. जवळजवळ १५० वर्षे त्यांच्याकडेच हा भाग होता. १६१६ साली ओमानमधील नासिर बिन मुर्शिद या इमामाने आपली सत्ता प्रबळ करून यारुबी वंशाची स्थापना केली. याचा मुलगा बिन सैफ याने ओमान व पूर्व आफ्रिकेतून पोर्तुगीजांची हकालपट्टी केली  आणि ओमानचे साम्राज्य वाढविले. १७०८च्या सुमारास इमामाला पाठिंबा असलेले हिनवी व घाफिरी यांच्यात यादवीयुद्ध सुरू झाले. इमामाने इराणचा पाठिंबा मिळविला. १७३७ मध्ये इराणच्या नादिरशाहने ओमानवर आक्रमण केले. १७४१ मध्ये घाफिरींचा पाठिंबा असलेला इमाम अहमद बिन सैद याने इराण्यांना हाकलून सध्याच्या सय्यद (सैद) घराण्याची स्थापना केली. ब्रिटनने ओमानशी १७९८ मध्ये तह करून मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. १८२० नंतर ओमानचे साम्राज्य प्रबळ झाले. १८३२ मध्ये सुलतानाने आपली राजधानी झांझिबारला हलविली तथापि त्याच्या मृत्यूनंतर १८५६ साली  त्याच्या मुलांनी ओमान व झांझिबार वाटून घेऊन स्वतंत्र राज्ये बनविली. ओमानचा सुलतान दुर्बल झाल्यामुळे ब्रिटनने १७९१ साली ओमानला भारताबरोबर बांधून अंकित केले. १९१३ साली ओमानच्या अंतर्गत प्रदेशातील लोकांनी बंड करून नवीन इमाम निवडला परंतु या इमामाचा १९२० साली खून झाला. सुलतान सैय्यद तैमूर याने नवीन इमामाबरोबर तह केला. या इमामामागून येणाऱ्या इमामाने १९५४ साली वेगळे राज्य स्थापण्याचा प्रयत्‍न केला  परंतु सुलतानाने ब्रिटिशांच्या मदतीने त्याचा बीमोड केला. १८०० पासून सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमीर राज्ये यांच्या सरहद्दीवरील अल् बरायमी या मरूद्यानाच्या प्रदेशाबाबत वहाबी जमातीने गडबड चालू केली होती. ब्रिटिशांच्या मदतीने तीही शमविण्यात आली. १९६५ साली संयुक्त राष्ट्रांनी ठराव करून ओमानला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. ती ब्रिटनने मान्य केली. १९३२ साली गादीवर आलेला सुलतान सैद बिन तैमूर याच्या कारभाराला कंटाळून त्याचा मुलगा काबूस बिन सैद याने २४ जुलै १९७० रोजी रक्तशून्य क्रांती करून ओमानची गादी बळकावली. धोफार भागात १९७१– ७२ साली सुलतानाविरुद्ध उठावाचे प्रयत्न झाले परंतु ब्रिटिशांनी पूर्वेकडील आपले साम्राज्य संपुष्टात आणले असले, तरी यूरोपला तेल पुरविणाऱ्या इराणी आखातावरील राष्ट्रांत त्यांचे हितसंबंध पुष्कळच गुंतलेले आहेत.

सुलतान हा शासनप्रमुख असून त्याच्या हाताखाली गृह, कायदा, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, समाजकल्याण इत्यादींचे मंत्री असतात. शासनाच्या सोयीसाठी ओमानचे ‘विलायत’ (इलाखे) पाडले असून त्यांवर सुलतान वलींची नेमणूक करतो. न्यायदान काजींकडेच आहे. ओमान हा संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असून त्याचे ब्रिटन, भारत, अमेरिका, नेदर्लंड्स, जर्मनी इ. देशांशी अतिशय मित्रत्वाचे संबंध आहेत. सुलतानाजवळ छोटे सैन्यदल व वैमानिक दल आहे.

आर्थिक स्थिती : अतिशय उष्ण हवामान, अपुरा पाऊस यांमुळे ओमान पूर्वीपासूनच कृषी व औद्योगिक द्दष्ट्या मागासलेला आहे. त्यातच सनातनी इस्लामी शासनामुळे ओमानची प्रगती खुंटलेली होती. चाचेगिरी, मच्छीमारी, मोती व खजूर यांसाठीच ओमान प्रसिद्ध होता. बाटिनावर २५० किमी. पसरलेल्या खजुरीच्या बागांशिवाय अंतर्भागातील दऱ्याखोऱ्यांतही पाणीपुरवठ्यावर खजूर होतो. १९६४ साली नतीह, फाऊद, इबल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम सापडल्याने ओमानला महत्त्व आले. १९६९ साली ओमानमध्ये १.६ कोटी  टन पेट्रोलियमचे उत्पादन झाले. मात्र तेलापासून मिळणाऱ्‍या ५.५ कोटी पौंड उत्पन्नाचा तिसरा हिस्सा ओमानला संरक्षणावर खर्च करावा लागतो. खजुरीशिवाय ओमानच्या किनारपट्ट्यांवर, मरूद्यानांत आणि पर्वतउतारांवर गहू, बार्ली, ज्वारी, ऊस, रताळी, तंबाखू, केळी, आंबा, डाळिंब, संत्री, ऑलिव्ह, बदाम, आक्रोड, अंजीर, तुती, नारळ, अल्फाल्फा गवत इ. पिके काढली जातात. नझवा व सुहार येथे भारतीयांनी चालविलेली फळे व भाजीपाला यांची प्रायोगिक शेतीकेंद्रे आहेत. धोफार किनारपट्टीवर शेती व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय आहेत. जंगल उत्पादनांत ऊद, डिंक, हिंग, औषधी वनस्पती इ. पदार्थ असून मच्छीमारी  व मोती काढण्याचे उद्योग महत्त्वाचे समजले जातात. मस्कत ते धोफारपर्यंतची किनारपट्टी व तिच्यामागील पठारी प्रदेश उजाडच  आहे. पेट्रोलियमशिवाय येथून खजूर, मासळी, तंबाखू, ऊद, सुकी व ताजी फळे, मोती इत्यादींची निर्यात होते तर तांदूळ, आटा, साखर, सिमेंट, वाहने, यंत्रसामग्री, सिगारेट, कॉफी, कापूस, कापड, बांधकामसाहित्य इत्यादींची आयात करावी लागते. निर्यात प्रमुख्याने भारत, पाकिस्तान, इराक, इंग्‍लंड या देशांना होते. खजूर बहुतेक सर्व भारतातच जातो. ओमानच्या अंतर्गत भागात उंट हेच प्रुमुख वाहतुकीचे साधन आहे. तेथे उत्तम जातीच्या उंटांची पैदास केली जाते व त्यांस मागणीही चांगली असते. मस्कतहून किनारपट्टीवरील शहरे व पेट्रोलियम केंद्रे ह्यांना जोडणारे रस्ते झाले असून, त्यांची एकूण लांबी ४१६ किमी. आहे. मस्कत हे कारभाराचे केंद्र व उत्तम बंदर असून तेथे विमानतळ आहे. मात्र मस्कतच्या पार्श्वभूमीमध्ये डोंगराळ मुलूख असल्याने त्याच्या पश्चिमेकडील, डोंगरापलीकडचे मात्रा हे जुळे बंदर व्यापारी उलाढालींचे सर्वांत मोठे केंद समजले जाते. मस्कत व मात्रा यांच्या विकासाच्या योजना १९६७ नंतर अंमलात येत आहेत. आधुनिक रस्ते, मोटारी, वीज, पाणी, रुग्णालये इ. सोयी येथे होत आहेत. सुहार, सूर, खाबूरा ही ओमानच्या आखातावरील इतर प्रमुख बंदरे असून धोफार किनारपट्टीवर सालालाह हे प्रमुख शहर व मुरबात हे बंदर आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या मदतीने मस्कत येथे ‘रेडिओ ओमान’ ची स्थापना झाली असून दूरध्वनीने ओमान जगाशी जोडलेले आहे. काही ब्रिटिश बँकांच्या शाखा येथे असून ७ मे १९७० पासून रियाल सैदी हे ,स्टर्लिंग पौंडाच्या किंमतीबरोबरचे चलन ओमानमध्ये अधिकृत बनविले आहे. ते १,००० बैझांमध्ये विभागलेले आहे. मात्र भारतीय रुपया व मारिया थेरेसा डॉलर यांचा उपयोग ओमानमध्ये सर्रास होतो.


लोक व समाजजीवन : हिनवी आणि घाफिरी गटांत लोक विभागलेले असले, तरी ओमानचे बहुसंख्य लोक इबादीय पंथीय सुनी इस्लामी आहेत. किनारपट्टीवरील शहरांत भारतीय, बलुची व निग्रोवंशीय लोक आढळतात, तर अंतर्गत डोंगराळ भागात भारतातील तोडांप्रमाणे असलेल्या काही जमाती आढळतात. मस्कत आणि इतर काही मोठ्या शहरांत शाळा, तंत्रनिकेतन, रुग्णालये, पाणीपुरवठा अशा सोयी होत आहेत. इतरत्र मात्र रहावयास झोपडी किंवा तंबू, अपुरा अन्नपुरवठा, मुलांना कुराण व प्राथमिक स्वरूपाचे अंकगणित यांचेच फक्त शिक्षण, क्षयासारख्या रोगांचे प्राबल्य, पाण्याचे हाल इ.गोष्टी मोठ्या प्रमाणात आढळतात. सर्वसाधारण अरबांप्रमाणेच ओमानी माणसाची राहणी आढळते तथापि भयानक वाळवंटामुळे ओमान अरबस्तानपासून विभागला गेल्यामुळे ओमानी माणसांची संस्कृती इराणी अथवा भारतीयांसारखी आढळते. मद्यपाननिषेध, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपाननिषेध, पायघोळ झगा व डोक्यावर पागोटे, स्त्रियांचा गोषा इ. चाली अजून आहेत अगदी अलीकडेपर्यंत आखूड झगे घालणाऱ्या यूरोपीय स्त्रियांनाही दंड होत असे. आता मोटारी, मालट्रक, आधुनिक बांधकामे, वीज, रेडिओ इत्यादींमुळे चालीरीतींत झपाट्याने फरक पडत आहे.

एके काळी पूर्व आफ्रिकेपर्यंत साम्राज्य पसरलेल्या आणि अरबी समुद्रावर प्रभुत्व असलेल्या अरबस्तानच्या टोकावरील या छोट्याशा देशाला पेट्रोलियममुळे आज विशेष महत्त्व आले आहे. अनेक भारतीय ओमानमध्ये असल्याने व भारताशी ओमानचे चांगले संबंध असल्याने ओमानला आपल्या द्दष्टीने आगळेच महत्त्व आहे. 

संदर्भ : Phillips, Wendell, Oman : A History, London, 1967.

शाह, र. रू.

ओमान