शिमोगा : भारताच्या कर्नाटक राज्यातील याच नावाच्या तालुक्याचे व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,७८,८८२ (१९९१). मध्य कर्नाटकात तुंगभद्रा नदीच्या तुंग या शीर्षप्रवाहाच्या काठावर हे शहर वसले आहे. शिमोगाच्या दक्षिणेकडील मंडली या उपनगरास प्राचीन गंग वंशाच्या काळात मोठे महत्त्व होते. त्यानंतर शिमोगावर चालुक्य व होयसळ घराण्यांची सत्ता होती. नंतर ते विजयानगर साम्राज्यात आले. सोळाव्या शतकापासून ते केळदी किंवा बिदनूर येथील राजांच्या ताब्यात गेले. १७६३ मध्ये हैदर अलीने ते काबीज केले. परशुरामभाऊंच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने बंकी नबाब (मुहंमद रेझा) याच्या नेतृत्वाखालील टिपू सुलतानाच्या सैन्याशी शिमोगाजवळ लढाई करून त्यांना बिदनूरवरील ताबा सोडण्यास भाग पाडले. तसेच मराठ्यांनी शिमोगाला वेढा घालून ते लुटले व जाळले (१७९८). एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठ्यांशी झालेल्या युद्धानंतर (१८१८) यावर ब्रिटिश सत्ता आली. १८७० मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.

शिमोगामध्ये भातसडीच्या गिरण्या, तेलाच्या गिरण्या, कापूस प्रक्रिया, हातमागावरील कापड इ. उद्योगधंदे चालतात. सुपारी, भुईमूग, कॉफी, मिरी, तांदूळ, वनस्पती तेल, कापड यांचा व्यापार येथे चालतो. रस्ते व लोहमार्गावरील हे एक प्रमुख स्थानक आहे. शहरात कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र इत्यादींची महाविद्यालये असून ती म्हैसूर विद्यापीठाशी संलग्न आहेत. येथे एक पुरातत्त्व विद्याविषयक संग्रहालय आहे.

चौधरी, वसंत