प्लाटीया : ग्रीसमधील बिओशिया प्रांतातील प्राचीन नगर. हे थीब्झच्या दक्षिणेस १४ किमी. अंतरावर ॲटिकाच्या सरहद्दीजवळ असून कीथेरॉन पर्वताच्या उत्तर उतारावर समुद्रसपाटीपासून ३०० मी. उंचीवर आहे. अथेन्स-स्पार्टा यांच्या सत्तास्पर्धेत प्लाटीयाने अथेन्सची बाजू घेतली होती. इ.स.पू. ४९० मध्ये मॅराथॉन येथील प्रसिद्ध युद्धाच्या वेळी प्लाटीयाने अथेन्सच्या मदतीसाठी आपली एक हजार माणसे पाठविली होती. या ठिकाणी इ.स.पू.४७९ मध्ये पॉसेनिअसच्या नेतृत्वाखाली ग्रीकांनी पर्शियनांचा दारुण पराभव केला होता या विजयाच्या स्मरणार्थ येथे दर चार वर्षांनी उत्सव साजरा केला जातो. पेलोपनीशियन युद्धाच्या काळात (इ.स.पू. ४३१-४०४) थीब्झने प्लाटीयाला दोन वर्षे वेढा दिला होता. शेवटी थीब्झने प्लाटीया जिंकले, लुटले आणि ते दोन वेळा उद्ध्वस्त केले. जगज्जेत्या अलेक्झांडरने इ.स.पू . चौथ्या शतकात प्लाटीयाचे पुनरुज्जीवन केले होते.

कांबळे, य. रा.