माँटॅना : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी सर्वांत उत्तरेकडील राज्य. विस्तार १०४° ते ११६° प. रेखांश आणि ४४° ३० ते ४९° उ. अक्षांश यांदरम्यान. लांबी पूर्व–पश्चिम ८६१ किमी. व उत्तर–दक्षिण ४४३ किमी. एकूण क्षेत्रफळ ३,८१,०८६ चौ. किमी. पैकी ४,२९३ चौ.किमी पाण्याखाली आहे. लोकसंख्या ८,०१,००० (१९८२ अंदाज). माँटॅनाच्या उत्तरेला ब्रिटिश कोलंबिया, ॲल्बर्टा व सस्कॅचेवन हे कॅनडाचे प्रांत पूर्वेला नॉर्थ व साउथ डकोटा, दक्षिणेला वायोमिंग आणि नैर्ऋत्येस व पश्चिमेस आबडाहो ही राज्ये आहेत. राजधानी हेलेना (लोकसंख्या २३,९३८–१९८०).

भूवर्णन : माँटॅनो नावातील मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ ‘पर्वतीय वा डोंगराळ प्रदेश’ असा आहे. या भागात आलेल्या पहिल्या प्रवाशांना बर्फाच्छादित पर्वच्छादित पर्वतशिखरे सूर्यप्रकाशात चकाकताना दिसली, त्यांवरून या भागाला त्यांनी चमकणाऱ्या पर्वतांचा प्रदेश (लँड ऑफ शाइनिंग मौंटन्स) असे नाव दिले. या पर्वतीय प्रदेशात सोन्याचांदीचे मोठे साठे आढल्यावरून राज्याला ‘खजिन्याचे राज्य’ (ट्रेझर स्टेट) असेही नाव पडले.

भूस्वरूपदृष्ट्या रॉकी पर्वतीय भाग व सपाटभूमी भाग (ग्रेट प्लेन्स) असे राज्याचे दोन प्रमुख भाग पडतात. (१) रॉकी पर्वतीय भाग : राज्याचा ४०% भाग (मध्य व पश्चिम भाग) हा पर्वतीय व डोंगराळ आहे. रॉकी पर्वताचा प्रमुख कटक हा उत्तरेकडील ग्लेसियर राष्ट्रीय उद्यानापासून दक्षिणेकडे ‘यलोस्टोन’ राष्ट्रीय उद्यानापर्यंत पसरत गेला आहे. खंडीय विभाजक असणारी रॉकी पर्वतरांग सामान्यतः ग्लेसियर राष्ट्रीय उद्यानापासून आग्नेयीस व नंतर वायव्य माँटॅनामधून प्रथम पश्चिमेला व नंतर दक्षिणेला पसरत गेली असून ती आयडाहो राज्याला बिटररूट पर्वतश्रेणीशी सरहद्द बनली आहे. या रांगेपासूनच पुढे मिशन, स्वॉन यांसारख्या अत्यंत सुंदर लहानलहान पर्वतश्रेण्या विभागल्या असून त्यांच्यायोगे सुपीक नदीखोरी बनली आहेत. रॉकी पर्वतरांगेपासून बिगबेल्ट व लिटलबेल्ट या पर्वतरांगा पूर्वेकडे पसरल्या असून त्यांच्या दक्षिण व पश्चिम दिशांना ब्रिजर, गॅलाटिन, मॅडिसन, टोबॅकोरूट, रूबी इ. पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. या प्रदेशात सु. ५० पर्वतरांगा असून उंच शिखरे दक्षिण-मध्य माँटॅनामध्ये आढळतात. ग्रॅनाइट (३,९०१) मी. हे राज्यातील अत्युच्‍च शिखर होय. (२) सपाटभूमी भाग : माँटॅना राज्याचा सु. ६०% भाग या प्रांतातील मिसूरी पठारामध्ये मोडतो. हायवुड बेअर पॉ, बिग स्नोई, ज्यूडिथ, लिटल रॉकी यांसारख्या पर्वतरांगा या प्रांतात दिसून येतात.

मिसूरी व तिची उपनदी यलोस्टोन ह्या माँटॅनाच्या सर्वांत महत्त्वाच्या नद्या. या दोन्ही नद्या राज्याचा सु. ८४% प्रदेश निःसारित  करतात. पश्चिम माँटॅनामधून उगम पावलेल्या मिसूरीला थ्री फोर्क्स या शहरापाशी जेफर्सन, गॅलाटिन व मॅडिसन या नद्या मिळतात. हेलेनाजवळून मिसूरी उत्तरेला ‘गेट्‌स ऑफ द मौंटन्स’ या अतिभव्य व खोल घळीतून वाहत जाऊन पूर्वेस वळते. तिच्यावरील फोर्ट पेक हे जगातील सर्वांत मोठे मातीचे धरण होय. नॉर्थ डकोटा राज्याच्या सरहद्दीवर मिसूरी नदी माँटॅना राज्यातून बाहेर पडते. तेथे यलोस्टोन नदी तिला मिळते. राज्यातील मिसूरीच्या इतर महत्त्वाच्या उपनद्या म्हणजे मरिआस, मिल्क, सन व टेटन या होत. रॉकी पर्वताच्या पश्चिमेस क्लार्क फोर्क व कूटने या महत्त्वाच्या नद्या आहेत. बिटररूट, ब्लॅकफूट, फ्लॅटहेड व टॉम्सन या क्लार्क फोर्कच्या प्रमुख उपनद्या होत. या नद्या माँटॅनाचा सु. १४% प्रदेश निःसारित करतात. कूटने नदीवर लिबी धरण बांधण्यात आले आहे.

रॉकी पर्वतभागातच बहुतेक नैसर्गिक सरोवरे आढळत असून काही अत्यंत रमणीय सरोवरे ग्लेसियर राष्ट्रीय उद्यान भागात आहेत. राज्यातील सर्वांत मोठे नैसर्गिक सरोवर फ्लॅटहेड हे असून त्याचे क्षेत्रफळ सु. ५०० चौ.किमी आहे. १९५९ मध्ये भूकंपामुळे मॅडिसन नदीत एक सबंध डोंगरमाथाच कोसळल्यामुळे एक नवीनच सरोवर निर्माण होऊन त्याला ‘भूकंप सरोवर’ असे नाव पडले. काही बहुद्देशी धरण प्रकल्पांमुळे निर्माण झालेली सरोवरे अशी : फोर्ट पेक सरोवर (क्षेत्रफळ ९९२ चौ.किमी.) कॅन्यन, फेरी सरोवर, साउथ फोर्क नदीवरील हंग्री हॉर्स व टायबर धरणांचे जलाशय, यलोटेल धरण व बिगहॉर्न सरोवर, तसेच कूटने नदीवरील लिबी धरण, कूकानूसा सरोवर इत्यादी.

हवामान : अलास्काला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतर्गत राज्याचा दर्जा मिळेपर्यंत, माँटॅना राज्य हे देशाची ‘शीतपेटी’ म्हणून ओळखले जात असे. २० जानेवारी १९५४ रोजी रॉजर्स पास येथे -५७° से. एवढे तापमान नोंदण्यात आले होते. राज्याचा जुलै हा उबदार महिना (सरासरी तापमान सु. १८° से.) तर जानेवारी हा सर्वाधिक थंडीचा महिना (सरासरी तापमान सु. -९° से.) समजला जातो राज्याच्या पश्चिम भागात सरासरी पर्जन्य सु. ४६० मिमी., तर पूर्व भागात तो सु. ३३५ मिमी. असतो. रॉकी पर्वतरांगेमुळे कधीकधी पूर्व व उत्तर माँटॅनाचे भाग चिनूक वाऱ्यामुळे उबदार बनतात. जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यांत प्रसंगोपात्त उद्‌भवणाऱ्या गार वादळांमुळे कापणी न केलेल्या पिकांचे बरेच नुकसान होते.


राज्याच्या उत्तर भागातील मृदा हिमनद्यांनी वाहून आणलेली चिकण माती , वाळू, रेती इत्यादींच्या मिश्रणांतून बनलेली आहे. नदीकाठच्या प्रदेशातील तसेच पश्चिमेकडील खोऱ्यामधील मृदा गाळाने समृद्ध झाली आहे. रॉकी पर्वताच्या पूर्वेकडे विस्तृत गवताळ  प्रदेश तयार झाला आहे. ब्लू ग्रॅमा, नीडल अँड थ्रेड, ग्रीन नीडलग्रास, ब्लूबंच व्हीटग्रास, ब्लू ग्रास असे गवतांचे विविध प्रकार आढळतात. राज्याचा सु. २५% भाग हा वनव्याप्त असून तो पर्वतमय भागात आढळतो. बहुतेक वृक्ष मऊ लाकडांचे कोनिफर असून राज्यात कठीण लाकडाची वृक्षवने आढळत नाहीत. डग्लस फर, लार्च, पाँडेरोझा पाइन, व्हाइट पाइन, लॉजपोल पाइन इ. वृक्ष प्रकारांचे व्यापारी उत्पादन होते. सीडार, सेजब्रश, कॅक्टस यांच्या अनेक जाती आढळतात. स्प्रूस हाही महत्त्वाचा वृक्षप्रकार आहे.

पर्वतीय भागात सांबर, एल्क, खेचर, श्वेतपुच्छ हरिण, काळी अस्वले, मोठ्या शिंगांच्या हरिणांचे कळप प्रेअरीत स्वैरपणे  फिरताना आढळतात. सु. ३०० ते ४०० गव्यांचा कळप राष्ट्रीय गवा संरक्षित क्षेत्रात राखून ठेवण्यात आला आहे. मिंक, बीव्हर, चिचुंदरी यांची अल्प प्रमाणात फरसाठी शिकार केली जाते. हिंस्त्र पशूंमध्ये पर्वतीय सिंह, बॉबकॅट, कॉयॉट इत्यादींचा समावेश होता. ग्राउझ, बदके, कृकणपक्षी, तितर, हंस इ. शिकारी पक्षी आहेत. राज्यात पक्ष्यांच्या सु. ३०० जाती आढळतात. यलोस्टोन, हेब्‌गन, रेडरॉक या सरोवर प्रदेशांत हंसपक्षी वस्ती करतात. माशांच्या सु. ७० जाती असून रूपेरी सामन, व्हाइट फिश, ट्राउट इ. माशांचे प्रकार आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : अमेरिकन इंडियन हे येथील मूळ रहिवासी. मैदानी प्रदेशात आरपाहो, आसिनाबॉइन, आटसीना, ब्लँकफीट, शायएन, क्रो इ. आणि पर्वत भागांत बॅनॉक, कालस्पेल, कूटने, सेलिश, शोशोन या इंडियन टोळ्यांची वस्ती होती. शेजारील प्रदेशात राहणाऱ्या सु. मांदान व नेझ-पर्से या इंडियन टोळ्या माँटॅनीत शिकारीसाठी येत असत. साधारणतः १७४० च्या सुमारास फ्रेंच शिकारी या प्रदेशात प्रथम आले असावेत. मेरिवेदर ल्यूइस व विल्यम क्लार्क या दोन अमेरिन समन्वेषकांच्या पथकाने १८०५ व १८०६ मध्ये माँटॅनाच्या बऱ्याच भागांचे समन्वेषण केले. १८०७ नंतर या ठिकाणी फर व्यापाऱ्यांची विशेष वर्दळ सुरू झाली. १८४७ मध्ये अमेरिकन फर कंपनीने माँटॅनामधील मिसूरी नदी वरील फोर्ट बेंटन येथे आपली पहिली स्थायी वसाहत उभारली. निरनिराळ्या काळी माँटॅनाचे भाग लुइझिॲना, मिसूरी, नेब्रॅस्का, ऑरेगन, वॉशिग्टन, आयडाहो इ. राज्यांच्या प्रदेशात सामील करण्यात आले होते. ग्रॉसहॉपर क्रीक या नैर्ऋत्य माँटॅनाच्या प्रदेशात १८६२ च्या सुमारास सोन्याचे साठे आढळून आल्याने बॅनॉक, डायमंड सिटी, व्हर्जिनिया सिटी इ. वसाहती उभारण्यात आल्या २६ मे १८६४ रोजी आयडाहो प्रदेशाचा भाग असलेला माँटॅनो वेगळा करण्यात येऊन त्याचा एक प्रदेश बनविण्यात आला. १८५०–५५ च्या सुमारास माँटॅनामध्ये सुरू झालेला गुरे पाळण्याचा व्यवसाय १८८३ पर्यंत नॉर्दने पॅसिफिक लोहमार्ग चालू झाल्याने मोठ्या प्रमाणात भरभराटला. तथापि कडक थंडीमुळे  व बर्फवृष्टीमुळे पुढे हा व्यवसाय खालावला. माँटॅनाच्या भूमीवरच इंडियनांविरुद्ध दोन भयंकर युद्धे लढली गेली. २५ जून १८७६ रोजी सू व शायएन इंडियन टोळ्यांनी अमेरिकन जनरल जॉर्ज ए. कस्टर याची सातवी कॅव्हल्‍री रेजिमेंट लिटल बिघॉर्न नदीजवळच्या लढाईत नामशेष केली. अमेरिकन संघराज्यीय फौजांनी नेझ-पर्से इंडियनांना त्यांच्या ऑरेगनमधील जमिनीवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुसरी लढाई बिग होल येथे होऊन (१८७७) तीत इंडियनांचा पराभव झाला.

माँटॅनाच्या लोकांनी १८८४ मध्ये माँटॅनास राज्याचा दर्जा मिळावा अशी प्रथम मागणी केली. पुढे ८ नोव्हेंबर १८८९ रोजी अमेरिकेचे ४१ वे राज्य म्हणून माँटॅना घोषित करण्यात आले. याच काळात राज्यातील ब्यूटच्या परिसरातील सोने, चांदी व तांबे यांच्या खाणीमुळे राज्याचा विकास घडून आला. मार्कस डॅली व विल्यम ए. क्लार्क या दोघांनी ब्यूट येथील तांब्याच्या खनिज साठ्यांचा शोध घेऊन त्यांच्या विकास केला. दोघेही खाणव्यवसाय व राजकारण या दोहोंमध्ये प्रतिस्पर्धी बनले. डॅलीने ॲनाकाँडा आणि क्लार्कने हेलेना या शहराची उभारणी केली व प्रत्येकाने आपल्या शहरासाठी राजधानीच्या दर्जाची मागणी केली. मतदारांनी हेलेनाची निवड केली. प्रथम डॅलिने व नंतर इतरांनी आपली सर्व मालमत्ता एका कंपनीला विकली तीच ‘ॲनाकाँडा कंपनी’ होय. या कंपनीने वीज निर्मितिकेंद्रे स्थापिले, लोहमार्ग व अनेक धरणे बांधली. तिच्या नियंत्रणाखाली अनेक जंगलक्षेत्रे, बँका, वृत्तपत्रे होती. ॲनाकाँडा कंपनीला माँटॅना राज्याच्या इतिहासात अन्यन्यसाधारण महत्त्व आहे.

विसाव्या शतकारंभकाळात राज्यातील नद्यांवरील धरणे व वीज निर्मिती तसेच लोहमार्गाचा विस्तार यांमुळे साखर, पीठगिरण्या, मांसप्रक्रिया इ. उद्योग वाढीस लागले. १९१० मध्ये अमेरिकन शासनाने ‘ग्लेसियर राष्ट्रीय उद्यान’ उभारले. जीनेट रॅनकिन ही महिला मिझूला शहरातून अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहावर १९१६ मध्ये निवडून गेली. ती पहिली महिला सीनेटर होय.


महामंदीमुळे खनिजांच्या मागणीत प्रचंड प्रमाणात झालेल्या घटीमुळे माँटॅनालाही फार मोठा फटका बसला. त्यातच दुष्काळाची भर पडली. पुढे फोर्ट पेक धरण उभारण्यात येऊन (१९४०) शेतीला अत्यावश्यक पाणीपुरवठा उपलब्ध झाला. इतर योजनांमध्ये व प्रकल्पामध्ये कीटक नियंत्रण, जलसिंचन, ग्रामीण विद्युतीकरण, मृद्‌संधारण त्याचप्रमाणे उद्याने, करमणूक व मनोरंजन केंद्रे, रस्ते इ. अंतर्भूत होते. दुसऱ्या महायुद्धाकाळात राज्यातील मांस व धान्ये तसेच तांबे व इतर खनिजे यांना आलेल्या प्रचंड मागणीमुळे माँटॅनाची अर्थव्यवस्था सुधारली. युद्धानंतर मात्र शेतमालाला कमी किंमत येत गेल्याने कृषिउत्पन्नात घट आली. परिणामी नोकऱ्यांकरीता खेड्यांतून शहराकडे माणसांचा ओघ सुरू झाला. १९५०–५५ च्या दरम्यान  माँटॅना-नॉर्थ डकोटा यांच्या सरहद्दीवरील विलस्टन द्रोणीमध्ये महत्त्वाच्या खनिज तेलविहिरीचा शोध लागला. १९५५ मध्ये ॲनाकाँडा कंपनीने वायव्य माँटॅनामध्ये अँल्युमिनियमचा कारखाना उभारला. १९६६ मध्ये बिघॉर्न नदीवरील येलोटेल धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. १९७३ मध्ये कूटिने नदीवरील लिवी धरणप्रकल्पाचे काम सुरू झाले. १९७५ पासून या धरणाच्या पाण्यापासून विद्युत्‌निर्मिती सुरू झाली.

रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर १९५० व १९६० या दोन दशकांच्या काळात राज्यात निवडले गेले. मात्र १९६८ पासून डेमॉक्रॅटिक पक्षाच्या गव्हर्नरांची निवड झालेली आढळते. १८८९ पासून चालू असलेले संविधान सु. ३० वेळा संशोधित करण्यात आले. ६ जून १९७२ रोजी राज्याच्या मतदारांनी नव्यासंविधानाला अनुसंमती दिली, हे नवे संविधान १ जुलै १९७३ पासून अंमलात आले. चार वर्षांसाठी निवडलेल्या १०० प्रतिनिधींचे द्विसदनी विधानमंडळ असते. गव्हर्नर व लेफ्टनंट यांची चार वर्षांकरिता निवड होते. अधिवेशने हेलेना येथे विषमांकी वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या सोमवारपासून ९० दिवस भरतात. गव्हर्नर वा विधानमंडळ यांपैकी कोणाच्याही आदेशाने विशेष अधिवेशने भरविण्यात येतात. राज्य कारभारासाठी राज्याचे ५६ परगणे करण्यात आले आहेत.

राज्य सर्वोच्‍च न्यायालयाचे सहा सहयोगी व एक मुख्य न्यायाधीश आठ वर्षांसाठी मतदारांनी निवडून दिलेले असतात. राज्याच्या न्यायिक जिल्ह्यांकरिता १९ न्यायाधीश सहा वर्षांसाठी निवडले जातात. राष्ट्रसंसदेवर राज्यातर्फे २ सीनेटर व २ प्रतिनिधी पाठविले जातात. १ नोव्हेंबर १९८३ रोजी राज्य कारागृहात ७७७ कैदी व स्त्री सुधार केंद्रात १७ स्त्रिया होत्या. १९३० ते १९४२ यांदरम्यान एकूण सहाजणांना (४ श्वेत, २ निग्रो) फाशीची शिक्षा झाली. १९४३ पासून आजतागायत कोणालाही मृत्यूदंडाची शिक्षा झाली नाही.

आर्थिक स्थिती : कृषी हा राज्याचा आर्थिक कणा असून खाणकाम, वनोत्पादन, निर्मितीउद्योग व पर्यटन यांचाही राज्यविकासात बहुमोल वाटा आहे. गहू हे माँटॅनाचे प्रमुख  कृषिउत्पादन आहे. गुरे मेंढीपालन व लोकरउद्योग यांचाही विकास करण्यात येत आहे. सातू उत्पादन मोठे आहे. इतर कृषिउत्पादनांत गवत, साखरबीट, बटाटे, फ्लॅक्स, मोहरी, ओट यांचा समावेश होतो. पश्चिम माँटॅनात दुग्धशाला उद्योग महत्त्वाचा आहे. शेतांचा वाढता आकार, घटती शेतकरीसंख्या, शेतांवरील घरांमध्ये होत जाणाऱ्या सुधारणा, कृषिकर्मामधील वाढते यांत्रिकीकरण, ही कृषिउद्योगाची ठळक वैशिष्ट्ये. १९८२ मध्ये राज्यात सु. २४,००० शेते आणि पशुपालनक्षेत्रे असून त्यांचे क्षेत्र सु. २,४२,८१,१६० हे. होते. व शेताचा सरासरी आकार सु. १,०४७ हे. होता. १९८१ मध्ये शेतमालापासून ८,५४२ लक्ष डॉ., तर पशुधनापासून ६,२९० लक्ष.डॉ. उत्पन्न मिळाले. त्याच वर्षी सिंचित आणि कापणी केलेले क्षेत्र १७·३ लक्ष हे., तर असिंचित क्षेत्र ७९·८लक्ष हे. होते. १९८१ मधील महत्त्वाचे कृषिउत्पादन पुढीलप्रमाणे झाले : गहू. १,७२८ लक्ष बुशेल, सातू ५६७ लक्ष बुशेल, ओट ४८ लक्ष बुशेल, साखरबीट, गवत, बटाटे, घेवडा, फ्लॅक्स, चेरी, पशुधन : गुरे २९ लक्ष, गाई २९००० डुकरे २ लक्ष, मेंढ्या ६·१६ लक्ष. मेंढ्यांपासून ५५·६ पौंड लोकर मिळाली.

रॉकी पर्वताच्या पश्चिमेला मोठी अरण्ये असून बॉनर व लिबी येथे मोठ्या लाकूडगिरण्या आहेत. पूर्व उतारावर लॉजपोल पाइन वृक्षारण्ये असून त्यांचा उपयोग खांब, प्लायबोर्ड, पत्रीकरण केलेल्या तुळवा इत्यादीसाठी केला जातो. यांशिवाय लाकूड-लगदा, खाणींमध्ये आणि लोहमार्गासाठी वापरावयाचे स्लीपर यांसारख्या इतरही वस्तू लाकडांपासून बनवितात. नाताळच्या सुमारास नाताळ वृक्षांची करण्यात येणारी कापणी हे लाकूडतोड उद्योगाचे वैशिष्ट्ये आहे. १९७७ मध्ये राज्यातील एकूण वनव्याप्त क्षेत्र ९१,०५,४३५ हे., तर १९८१ मध्ये राष्ट्रीय उद्यानांत जंगलांखाली ६७, ९८,७२४ हे. क्षेत्र होते.


राज्यातील एकूण उत्पादित वस्तूंच्या मूल्याच्या ३१% वाटा (सु. १०० कोटी डॉ. मूल्यांचे उत्पादन) खाणउद्योगाचा आहे. खनिज तेलाचे वर्षाकाठी सु. ३,७१० लक्ष डॉ. किंमतीचे उत्पादन होत असते. रॉकी पर्वतीय भाग, पाउडर नदी खोरे तसेच विलस्टन नदी खोरे यांमधून सर्वाधिक खनिज तेल उत्पादन होते. यांशिवाय कार्बन, मसलशेल, पाँडरे, रोझवुड, टूल या परगण्यांतही खनिज तेल उत्पादन होते. उत्तर माँटॅनामधील तेलखाणीमधून नैसर्गीक वायूचेही उत्पादन केले जाते. कोळसा हे दुसऱ्या क्रमांकाचे खनिजउत्पादन होय. त्याचे वार्षिक उत्पादन सु. ३,१९० लक्ष डॉ. आहे. ब्यूट हिल प्रदेशातून राज्यातील बहुतेक सर्व खनिजांचे उत्पादन केले जाते. राज्याच्या एकूण खनिजोत्पादनातील ५०% वाटा एकट्या तांब्याच्या खनिजाचा आहे. याशिवाय सोने, चांदी, जस्त यांच्या खनिजांचेही उत्पादन होते. यांमुळे तांबे, सोने व चांदी यांच्या उत्पादनात माँटॅना हे एक अग्रणी राज्य बनले आहे. इतर खनिज उत्पादनांत अँटिमनी, व्हर्मिक्युलाइट, जिप्सम, चुनखडी, फॉस्फेटी खडक, माती व टाल्क यांचा समावेश होतो. १९८१ मध्ये राज्यात पुढीलप्रमाणे खनिज उत्पादन झाले : अशुद्ध खनिज तेल ३१० लक्ष पिंपे तांबे ६२ ४८५ टन वाळू व रेती ६१ लक्ष टन चांदी २९ लक्ष ट्रॉय औंस सोने ५४,२६७ ट्रॉय औंस जस्त २५ टन नैसर्गिक वायू १६,०१७ घ.मी. कोळसा ३३५ लक्ष टन.

राज्याच्या एकूण वार्षिक उत्पादनात निर्मितिउद्योगांचा सु. २६% वाटा आहे. लाकूडतोड, कापणी व लाकडापासून बनविलेल्या वस्तू (प्रतिवर्षी सु. ३,२८० लक्ष डॉ. मूल्य) हा महत्त्वाचा निर्मितीउद्योग होय. राज्यात सु. १०० लाकूड कापण्याच्या गिरण्या असून त्यांमधून प्रतिवर्षी सु. २९ लक्ष घ. मी. लाकूड उत्पादन होते. माँटॅना राज्यात प्रतिवषी सु. ३० लक्ष नाताळ रोझ (बाळकडू) वृक्षांचे उत्पादन होत असून युरीका या गावाला ‘जागतिक ख्रिसमस वृक्षांची राजधानी’ असे संबोधिले जाते.

अन्नप्रक्रिया उद्योगापासून प्रतिवर्षी सु. १,३४० लक्ष डॉ. मूल्याचे उत्पादन होते. बिलिंग्झ व मिझूला येथे राज्यातील सर्वांत मोठे मांसप्रक्रिया व डबाबंदीकरण कारखाने, तर बिलिंग्झ व सिडनी येथे साखर कारखाने आणि बिलिंग्झ व ग्रेट फॉल्स शहरांत मोठ्या पीठगिरण्या आहेत. खनिज परिष्करण व प्रक्रिया उद्योग हा आणखी एक महत्त्वाचा उद्योग समजला जातो. यांशिवाय मुद्रण व छपाई हेही उद्योग राज्यभर विखुरलेले आहेत. १९८१ मध्ये राज्यातील ६१२ निर्मितीउद्योगांमध्ये १७,२६४ कामगार होते. जलविद्युत्‌निर्मितीमध्ये माँटॅना देशात आघाडीवर आहे. फोर्ट पेक, कॅन्यन फेरी, हंग्री हॉर्स, लिबी या धरणांद्वारे तसेच मरीअझ नदीवरील धरणापासून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती केली जाते. १९८३ मध्ये राज्यात एकूण वीज उत्पादन १०·२७ लक्ष मेवॉ. ता. झाले त्यापैकी ९·०२ लक्ष मेवॉ. ता. जलविद्युत्‌ होती. १९८३ मध्ये राज्यातील एकूण श्रमबल ३,९३,२०० एवढे असून त्यांपैकी ३,६२,६०० लोक कामावर होते. शेतमजूर ४१,७०० होते. बिगरशेती उद्योगांत ३,२०,००० कामगार गुंतले होते.

राज्यात सु. १·३० लक्ष किमी. लांबीच्या मार्गापैकी ६०%  पक्के रस्ते आहेत. १९८३ च्या अखेरीस राज्यात ५,०६,००० प्रवासी गाड्या, ३,१९,५१५ ट्रक व ५०,६८८ मोटारसायकली होत्या. सुमारे ८,००० किमी. लांबीचे लोहमार्ग असून पाच लोहमार्गावरून मालवाहतूक चालते. १८८० नंतर राज्यात खंडगामी असे नॉर्दन पॅसिफिक व ग्रेट नॉर्दर्न (सांप्रत बर्लिंग्टन नॉर्दन) शिकागो-मिलवॉकी व सेंट पॉल असे तीन लोहमार्ग सुरू झाले. राज्यात सु. १२६ विमानतळ होते (१९८३) सांप्रत राज्यात ११ दैनिक व ६२ साप्ताहिके प्रसिद्ध होतात. बिलिंग्ज गॅझेट, ग्रेट फॉल्स ट्रिब्यून ही सर्वाधिक खपाची वृत्तपत्रे होत. सांप्रत राज्यात सु. ७५ नभोवणी केंद्रे व १२ दूरचित्रवाणी केंद्रे आहेत.

लोक व समाजजीवन : १९८० च्या जनगणनेप्रमाणे राज्यातील ५२·९ टक्के लोक शहरी भागात तर ४७·१ टक्के ग्रामीण भागात राहत असल्याने हे राज्य देशातील एक अतिशय विरळ (दर चौ. किमी. ला फक्त २) लोकवस्तीचे समजले जाते. ३,९२,६२५ पुरुष, तर ३,९४,०६५ स्त्रिया असे लोकसंख्येचे वितरण असून राज्यशासनाच्या आरक्षित भूमीमध्ये ३७,२७० अमेरिकन इंडियन (एकूण लोकसंख्येच्या ४·५%) राहतात. राज्यात सु. ९४% गोरे, ४·५ % इंडियन, १,७८६ निग्रो आणि उर्वरित आशियाई व इतर होते. प्रॉटेस्टंट पंथीयाचे आधिक्य असले तरी रोमन कॅथलिक १·३१ ल्यूथर सांप्रदायिक ६८,०००, मेथडिस्ट २५,००० या पंथांचेही लोक येथे आहेत. जननमान १८, मृत्युमान दरहजारी ८·५  बालमृत्युमान दरहजारी १०·७ होते. राज्यात १९८२ मध्ये प्राथमिक व माध्यामिक शाळांमधून १,५२,३३५ विद्यार्थी व ९,५१७ शिक्षक होते. बोझमन येथे माँटॅना राज्य विद्यापीठ, मिझूला येथे माँटॅना विद्यापीठ, ब्यूट येथे माँटॅना खनिजविज्ञान व तंत्रविद्या महाविद्यालय असून हॅव्हर, बिलिंग्झ आणि डिलन येथे प्रत्येकी एक महाविद्यालय आहे.

राज्यातील ६५ वर्षांवरील गरजू वृद्धांस अवलंबी मुलांच्या कुटूंबांस तसेच अंध व्यक्तींना शासकीय अर्थसाहाय्य मिळते. १९८३ मध्ये राज्यात ३,४२६ खाटांची ६१ रूग्णालये असून ९६२ खाटांची चार मानसोपचार केंद्रे होती.


माँटॅना विद्यापीठांच्या ग्रंथालयात वायव्य अमेरिकेच्या इतिहासाचा दुर्मिळ तसेच विधिविषयक ग्रंथांचा संग्रह, ईस्टर्न माँटॅना महाविद्यालयाच्या ग्रंथालयात युद्धविषयक ग्रंथसंग्रह, माँटॅना राज्य विद्यापीठ ग्रंथालयात कृषी व विज्ञानविषयक पुस्तकांचा संग्रह, हेलेनातील माँटॅना ऐतिहासिक संस्थेचे ग्रंथालय तसेच माँटॅना राज्य विधी ग्रंथालय या दोहोंमध्ये उत्कृष्ट संग्रह आहेत. बिलिंग्झ ग्रेट फॉल्स हेलेना. मिझला कालस्पेल या शहरांतील ग्रंथालये स्थानिक इतिहास संग्रहासाठी उत्कृष्ट समजली जातात. बिलिंग्झ ग्रंथालयात कला, इंडियन संस्कृती, खनिज तेल उद्योग यांवरील उत्कृष्ट ग्रंथसंग्रह आहेत.

माँटॅनावासियांचा जुनी पश्चिमी संस्कृती जतन करण्यावर भर असला तरी समकालीन कलांबाबतही उत्सुकता दिसून येते. उत्कृष्ट संग्रहालयापैकी बिलिंग्झमधील ‘गॅलरी-८५-आद्य पश्चिमी कलासंग्रह’, ब्राउनिंगमधील ‘प्लेन्स इंडियन म्यूझीयम’, ग्रेट फॉल्स येथील ‘सी. एम. रसेल गॅलरी’ हेलेनाची ‘माँटॅना ऐतिहासिक संस्था’, माँटॅना राज्याचा ऐतिहासिक विकास चित्रित करणारे बोझमनचे ‘रॉकी संग्रहालय’ इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. यांशिवाय राज्यात ठिकठिकाणी वाद्यवृंद आणि रंगमंदिरे असून रेड लॉज येथे प्रतिवर्षी ‘फेस्टिव्हल ऑफ नेशन्स’ हा उत्सव आयोजित करण्यात येतो.

पर्यटन : राज्यात १९५० पासून पर्यटन उद्योगाला विशेष महत्त्व मिळाले. पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी शासनाने अनेक उद्याने-उपवने, तर खाजगी उद्योगसंस्थानी वासंतिक विश्रांतिगृहे, स्की क्रीडाकेंद्रे उभारली. राज्यात सु. ११ राष्ट्रीय वने व ८९ राज्य उद्याने–उपवने आहेत. ऐतिहासिक गावांमध्ये व्हर्जिनिया सिटी ही सुवर्ण-नगरी, तसेच कस्टर युद्धभूमी व बिल होल येथील राष्ट्रीय स्मारके पर्यटकांना आकृष्ट करतात. फ्लॅटहेड सरोवरामध्ये  नौकाविहा, मासेमारी, पोहणे इ. सुविधा आहेत. ग्रेट फॉल्स (लोकसंख्या ५६,७२५–१९८०) शहराजवळील मिनिटाला १०·२० लक्ष लिटर पाणी व फेकणारा ‘जायंट स्प्रिंग’ हा गायझर मोठे आकर्षण आहे. ‘ग्लेसियर राष्ट्रीय उद्याना’मध्ये पन्नासांवर हिमनद्या असून या उद्यानातून भव्य पर्वतीय निसर्ग सौंदर्य पहावयास सापडते. राज्य विधानमंडळवास्तू (कॅपिटोल), सेंट हेलेना कॅथीड्रल, माँटॅना, ऐतिहासिक संस्था यांकरिता प्रसिद्ध असे हेलेना शहर बिलिंग्झ (६६,७९८) हे व्यापार व निर्मितीउद्योग यांचे केंद्र असून येथून जवळच ‘कस्टर’ व ‘यलोस्टोन’ ही राष्ट्रीय उद्याने आहेत. वारा व पाणी या दोन्ही नैसर्गिक घटकांमुळे विभिन्न आकृत्या दर्शविणारे ईकलॅक गावाजवळील ‘मेडिसिन रॉक्स’ हे वालुकाश्म अत्यंत प्रेक्षणीय आहेत. मिझूला (३३·३८८) जवळील सु. ५०० गावे असलेले सु. ७,६९० हे क्षेत्रांचे ‘राष्ट्रीय गवा अभयारण्य’ पर्यटकांना आकृष्ट करते. येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे अमेरिकेतील सर्वांत मोठे (८,९९,१५२) हे राष्ट्रीय उद्यान (स्था. १८७२) त्यामधील शंभरांवर गायझर व तीन हजारांवर उन्हाळी ‘ओल्ड फेथफुल’ हा गायझर, ‘मॅमथ हॉट स्प्रिंग’ ही उन्हाळी अश्मीभूत वने इ. नैसर्गिक नवलाईमुळे पर्यटकांचे मोठे आकर्षण बनले आहे.

गद्रे, वि. रा.