जॉर्डन नदी : इझ्राएल व जॉर्डन देशांतील नदी. लांबी ३६८ किमी. सिरिया व लेबाननमधील हर्मन पर्वतात ५५० मी. उंचीवर उगम पावून दक्षिणेकडे समुद्रसपाटीखाली ३९५ मी. वरील मृत समुद्रास मिळते. जॉर्डनचे खोरे हे आशिया मायनरमधून पूर्व आफ्रिकेत गेलेल्या सुप्रसिद्ध खचदरीचाच भाग आहे. सुरुवातीच्या हुला खोऱ्यातील दलदलीचा निचरा करून तो भाग शेतीखाली आणला आहे. यानंतर जॉर्डन समुद्रसपाटीखालील २०९ मी. वरील टायबीरियस सरोवरास (गॅलिलीच्या समुद्रास) वेगाने जाऊन मिळते, नंतर तिला यार्मूक व इतर उपनद्या मिळतात. नंतरचा गोर खोऱ्यातील झोर पूरमैदानाचा प्रदेश जॉर्डनला अनेक बंधारे घालून शेतीसमृद्ध केला आहे. येथून अनेक वळणे घेऊन व मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करून जॉर्डन मृत समुद्राला मिळते. जॉर्डनच्या खोऱ्यात गहू, तांदूळ, ऊस, कापूस, तंबाखू, द्राक्षे, ऑलिव्ह, लिंबूजातीची फळे, अंजीरे इ. उत्पन्न येते. १९६७ मध्ये बांधलेल्या गोर कालव्याच्या प्रदेशात मोसंबी, केळी, भाजीपाला, साखरबीट यांचे उत्पन्न होते. जॉर्डनच्या खोऱ्यात पाणीपुरवठ्याच्या भागात पूर्वीपासून, अरब व ज्यू लोक राहत होते. जॉर्डन नौकासुलभ नाही. दमास्कस, नॅब्‍लस, अफूला व जेरूसलेम यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पूल झाले आहेत. अल् मन्सीया येथे एक तेलनळ जॉर्डन ओलांडून जातो. यार्मूकवरील धरणाची पातळी व भूमध्य समुद्राचे पाणी मृत समुद्रात सोडून त्याची पातळी राखून वीजउत्पादनही करण्याची विचाराधीन योजना यांमुळे जॉर्डनचे महत्त्व वाढणार आहे परंतु अरब- इझ्राएल तणावामुळे तूर्त प्रगती मंदावली आहे.

यार्दी. ह. व्यं. कुमठेकर, ज. ब.