ग्वाद्याना : स्पेन-पोर्तुगालची एक मोठी नदी. लांबी ८१६ किमी. जलवाहन क्षेत्र सु. ६१,००० चाै. किमी. स्पेनच्या क्वेंग्का डोंगरातून आलेल्या थांग्कारा, हीग्वेला, हाव्हालोन व आल्तो ग्वाद्याना या शीर्षप्रवाहांनी बनलेल्या स्यूदाद रीआलच्या पाणथळीतून ही उगम पावते. परंतु ला मांचा मैदानाच्या दक्षिणेकडून आलेले आथ्‌वेर, कारकॉलीस इ. शीर्षप्रवाह कार्स्ट प्रदेशातून मधूनमधून भूपृष्ठाखालून वाहतात. टोलीडो आणि स्येरा मोरेनाचे डोंगर व ला मांचा मैदान या कमी पावसाच्या प्रदेशांमुळे स्येरा मोरेनातील थूहार उपनदी मिळूनही ग्वाद्यानाला पाणी बेताचेच असते. टोलीडोच्या डोंगरातील निदाऱ्यांत ग्वाद्यानावर चार मोठी धरणे बांधून मेरीदा-बादाहोथ वैराण प्रदेश आता सुपीक बनविला आहे. बादाहोथनंतर ग्वाद्याना पश्चिमेऐवजी दक्षिणेकडे वाहू लागते. बादाहोथ ते माँसराश व पुन्हा पूमराओपासून अटलांटिकच्या कादिझ आखातावरील मुखापर्यंत ती स्पेन-पोर्तुगालची सीमा आहे. मुखाजवळचे स्पेनचे आयामोंटे आणि पोर्तुगालचे व्हिला रीआल दे सांतो आंतोन्यो या बंदरांपासून पूमराओपर्यंत ग्वाद्याना नौकासुलभ आहे. तिच्या खोऱ्यात भूमध्यसागरीप्रदेशीय उत्पन्ने होतात.

यार्दी, ह. व्यं.