अलास्का :उत्तर अमेरिका खंडाच्या वायव्य कोपऱ्‍यातील, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ४९ व्या क्रमांकाने सामील झालेले व क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्यांतील सर्वांत मोठे राज्य. उ. अक्षांश ५१ ते ७१२५’ आणि प. रेखांश १३० ते १७२२५’. क्षेत्रफळ १५,१८,७७६ चौ.किमी. लोकसंख्या ३,०२,१७३ (१९७१).

 

स्थूलमानाने याचे तीन विभाग पडतात : (१) पश्चिम रेखांश १४१ च्या पश्चिमेकडील उत्तर अमेरिका खंडाचा सर्व भूविभाग, (२) त्याच्या आसमंतातील आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडील बेरिंग समुद्रातील व मुख्य भूमीच्या कडेची सर्व बेटे, आणि (३) उ.अक्षांश ५४४०’ पासून उत्तरेकडे प. रेखांश १४१ पर्यंत पोहोचणारा किनारपट्टीचा व बेटांचा मिळून झालेला ‘पॅनहँडल’ प्रांत. अलास्काच्या सीमांवर दक्षिणेस पॅसिफिक महासागर, पश्चिमेस बेरिंग समुद्र व आर्क्टिक महासागर, उत्तरेस आर्क्टिक महासागर आणि पूर्वेस कॅनडा देश आहे. अस्ताव्यस्त विस्तारामुळे याची सर्वाधिक पूर्व-पश्चिम रुंदी अमेरिकेच्या मुख्य भूमीएवढी आणि दक्षिणोत्तर लांबी २,२४० किमी. आहे. किनाऱ्‍याची लांबी ५४,२४६ किमी. किंवा राष्ट्राच्या मुख्य खंडभूमीच्या किनाऱ्‍यापेक्षाही जास्त आहे. तीन बाजूंनी सागराने वेढलेल्या अलास्का हद्दीत असंख्य बेटे असून त्यांपैकी दक्षिणेचे कोडिॲक आणि पश्चिमेचे सेंट लॉरेन्स व प्रिबिलॉफ द्वीपसमूह विशेष मोठे आहेत. वेगवेगळ्या हिमाच्छादित पर्वतराजींमुळे राज्याचे सहा नैसर्गिक विभाग पडतात. (१) आग्नेयीचा चिंचोळा किनारी प्रदेश, ॲलेक्झँडर द्वीपसमूह व अंतर्जलमार्ग मिळून ‘पॅनहँडल’ आणि त्याच्या पूर्वेकडील कॅनडा सीमेवरची ‘कोस्टल रेंज ’ नावाची तटराजी. (२) मुख्य भूमीचा आग्नेयीकडील भाग : या विभागाच्या पश्चिमेस कुक खाडी आहे उत्तर अमेरिकेचे सर्वोच्च शिखर मौंट मॅकिन्ले (६,१९८ मी.) असलेली अलास्का पर्वतराजी आणि पूर्वेचा सेंट एलिआस व पश्चिमेचा केनाई हे पर्वत यातच मोडतात. (३) अलास्का द्वीपकल्प कोडिॲक द्वीपसमूह व ज्वालामुखींनी बनलेली अल्यूशन द्वीपमालिका. (४) पश्चिम अलास्का : ब्रिस्टल उपसागर, कस्कोक्विम व यूकॉन नदीमुखांजवळचे त्रिभुज प्रदेश, नॉर्टन उपसागर आणि असंख्य टेकड्या, लहान तळी व प्रवाह असलेला स्यूअर्ड द्वीपकल्पाचा दलदली प्रदेश. (५) उत्तर अलास्का : या उत्तर ध्रुववृत्ताच्या आतील भूभागात उत्तरेचा आर्क्टिक उतार व ९६० किमी. लांबीची ब्रुक्स पर्वतराजी येते उत्तरेचा उतार ‘नॉर्थ स्लोप’ ही वर्षातील बहुतेक काळ गोठलेली दलदल असून उन्हाळ्यात दीडदोन महिने तिचा पृष्ठभाग २० ते ३० सेंमी. वितळतो तेव्हा त्यावर खुरट्या वनस्पती व शेवाळी उगवतात, असंख्य कीटक निर्माण होतात आणि पक्ष्यांचे थवे जमतात. (६) अंतर्देशीय अथवा मध्य अलास्का : ब्रुक्स पर्वताच्या दक्षिणेस अलास्का पर्वतापर्यंत अनेक दऱ्याखोऱ्‍यांनी युक्त असे हे एक विस्तार्ण पठार असून त्यातून यूकॉन व कस्कोक्विम या नद्या पूर्वेकडून पश्चिमेला वाहत जाऊन बेरिंग समुद्राला मिळतात. दीर्घकाल कडक थंडी व अल्पकाल कडक उन्हाळा अशा आत्यंतिक हवामानाच्या या प्रदेशात टॅनना नदीखोऱ्‍यासारख्या काही दुर्मिळ सुपीक भागांतच थोडी शेती शक्य असते.

 

राज्यात अनेक प्रकारच्या मृदा व बहुतेक खनिजे उपलब्ध असून त्यांपैकी पेट्रोलियम, कोळसा व सोने ही सध्या खाणींतून काढण्यात येतात. वाहतुकीच्या सोयी नसल्यामुळे इतर खनिजे काढणे अजून परवडत नाही. अलास्कातील अगणित सरोवरांपैकी १२८ किमी. लांब व ३२ किमी. रुंद इलिअम्ना हे सर्वांत मोठे आहे. बर्फ, धुके आणि लांब अंतरे या कारणांनी मच्छीमारी व खनिजांची वाहतूक एवढ्याच कामी राज्याला वेढणारा समुद्र उपयोगी पडतो. हवामान दक्षिणेकडून उत्तरेकडे अधिकाधिक प्रतिकूल होत जाते. पॅनहँडल प्रदेशात ७५ ते ३०० सेंमी. पाऊस, ६५ ते ६५० सेंमी. बर्फ व शिवाय धुके पडत असूनही पश्चिमेकडून पॅसिफिकमधील प्रवाहाची ऊब व उत्तरेकडील थंड वाऱ्यांपासून पर्वतांचे संरक्षण मिळत असल्याने हवामान सुसह्य राहते. उच्च तपमान सहसा आढळत नाही ते क्वचितच ३२ से. पर्यंत चढते. दक्षिण अलास्कातही त्या मानाने हवामान सौम्यच आहे. इतर विभागांत हवामानातले फरक समुद्रसान्निध्यामुळे अंतर्भागाइतके आत्यंतिक नसले, तरी शीतकटिबंधातला व लगतचा प्रदेश कडक थंडीचाच आहे. राज्याच्या दक्षिण भागात आठ महिने थंडीचे व चार महिने सापेक्षतः उबेचे, तर उत्तर भागात दहा महिने कडक थंडीचे व दोन महिने सौम्य थंडीचे असतात. अंतर्भागात पाऊस अगदी कमी, किमान तपमान –६२ से. व कमाल तपमान ३७·८ से. असते. पण त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांच्या उन्हाळ्यातदेखील जमिनीतून बटाटे, भाजीपाला इ. पिके काढता येतात. या वेळी सर्व चराचर सृष्टीत येणाऱ्‍या नवचैतन्याच्या आनंदासाठी इतर राज्यांतूनही पुष्कळ लोक अलास्कात येतात. स्प्रूस, हेमलॉक, सीडार, फर, बर्च इ. वनस्पती येथे आढळतात. नैर्ऋत्य भागात गवत व उत्तरेस टंड्रा वनस्पती आहेत. प्राण्यांपैकी ८२० किलोपर्यंत वजनाचे जंगी कोडिॲक अस्वल, तपकिरी व काळे अस्वल, ध्रुवप्रदेशीय शुभ्र अस्वल, मूज, कॅरिबू, रेनडिअर, सिल्का हरीण, रानमेंढा, रानबकरा, मिंक, कोल्हा असे भूचर व्हेल, वॉलरस, सील, पाणसिंह असे जलचर ठराविक ऋतूत हजारोंच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्‍या पक्ष्यांचे अनेक प्रकार गोड्या व खाऱ्‍या पाण्यातले सॅमन, मॅकेरेल, कॉड, हॅलिबट, ग्रेलिंग, चार असे मासे शिवाय खेकडे, चिंगाट्या, कालव, झिंगे इ. अन्नोपयोगी जलजीव अलास्कात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. येथील ६ लक्ष (लोकसंख्येच्या दुप्पट) कॅरिबू, १ लक्ष ६० हजार मूस, ४०,००० डाल मेंढ्या व ३६,००० रेनडिअर हे मौल्यवान पशुधन आहे.

 

इतिहास व राज्यव्यवस्था : या भूमीचा अधिकृत शोध १७४१ मध्ये व्हीटस बेरिंग या रशियन नौदलातील डॅनिश दर्यावर्द्याने लावला. त्याच्या आधी येथे एस्किमो व ॲल्यूट लोकांची बरीच वस्ती होती. त्यांनी या प्रदेशाला ‘ॲलाक्‌शाक्’ ‌म्हणजे ‘महान भूमी’ या अर्थाचे नाव दिले होते. आग्नेय भागात काही इंडियन लोकांच्या जमाती राहत असत. स्पॅनिश, फ्रेंच व इंग्रज इकडे पाहणी करून गेले होते. १७८४ मध्ये कोडिॲक बेटावर पहिली रशियन वसाहत झाली. आसपास सापडणाऱ्या ऑटर व सील या जलचरांच्या मऊ फरच्या कातड्यांना बाजारात फार किंमत येत असल्यामुळे त्या व्यापाराला खूप तेजी होती. अखेर सीलसारखे प्राणी जवळजवळ नामशेषच झाले तेव्हा रशियाला या भागात गोडी उरली नाही. १८६७ च्या तहाने हा ‘ रशियन अमेरिका’प्रदेश अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी ७२,००,००० डॉलर्सना विकत घेतला. १८८० मध्ये जूनो-परिसरात सोने सापडल्यावर लोक इकडे लोटू लागले. सुव्यवस्थेकरिता १८८४ साली अलास्कासाठी गव्हर्नर नेमण्यात आला. १८९६ मध्ये क्लॉन्डाइक दरीत पुन्हा सोन्याचा शोध लागला आणि नशीब काढण्यासाठी इकडे साहसी लोकांची रीघ लागली. १९१२ साली या प्रदेशाला केंद्रशासित दर्जा व विधानमंडळ मिळाले. १९३९ च्या जागतिक महायुद्धामुळे अलास्काला असाधारण लष्करी महत्त्व आले सितका, डच-हार्बर, कोडिॲक, अँकरेज व फेअरबँक्स येथे ठाणी स्थापन झाली. अमेरिका—अलास्का राष्ट्रीय हमरस्ता कॅनडातून नेण्यात आला व त्यावर पहारे बसविण्यात आले. १९४२ मध्ये जपानने घेतलेली काही अल्यूशन बेटे पुढच्याच वर्षी जिंकून परत मिळविण्यात आली. युद्धानंतरच्या संरक्षणयोजनांमुळे अलास्काकडे रहदारी वाढून राज्याला आर्थिक तेजी आली. मोठमोठी बांधकामे व उद्योगधंदे सुरू होऊन वस्ती वाढली व आधुनिक सुखसोयी आल्या. घटक राज्य म्हणून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत प्रवेश मिळविण्याचा अलास्काचा प्रयत्‍न ४२ वर्षांनंतर १९५९ मध्ये फलद्रप झाला. या राज्यातून १ प्रतिनिधी व दोन सिनेटर काँग्रेसवर निवडून जातात. येथील अंतर्गत शासनव्यवस्था क्रमाक्रमाने विकसित होत असून देशातील इतर राज्यांसारखीच बनत आहे.

 

आर्थिक व सामाजिक स्थिती : राज्यातील शेतीयोग्य अशा ४,०५,००० हे. जमिनीपैकी अवघी ६,०७५ हे. मॅटॅनूस्का व टॅनना नदीखोऱ्‍यांतून लागवडीखाली आहे. भाजीपाला, बटाटे, धान्य, दूध-दुभत्याचे पदार्थ, कोंबड्या असे कृषिप्रधान उत्पादन थोडेसेच होते. मुख्य उद्योगधंदे मासे डबाबंद करण्याचे, लाकूड कापण्याचे आणि लगद्याचे कारखाने हे आहेत. खाणींमधून मुख्यतः पेट्रोलियम, कोळसा, बांधकामासाठी वाळू व सोने, पारा, प्लॅटिनम गटातील धातू इ. खनिजे काढण्यात येतात. अगदी अलीकडे ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’मधून अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज बर्फफोड्या आगबोटी व क्वचित पाणबुड्या यांच्या साहाय्याने अलास्काच्या उत्तर उतारभागातील अमाप पेट्रोलियम उपलब्ध होऊ लागले आहे. तथापि डोंगर-नद्या ओलांडून व कायम गोठलेल्या जमिनीखालून तेलाचे नळ नेले आणि कदाचित भूकंप वगैरेमुळे ते फुटले तर पशुपक्षी व मासे यांची होणारी अपरिमित हानी तसेच तेलवाहू जहाज कदाचित फुटले तर समुद्र व तेथील प्राणी यांचे होणारे नुकसान हे धोके कितपत पत्करावे, हा प्रश्न राज्यापुढे उभा आहे. जीवनोपयोगी अशा बहुतेक सर्वच वस्तू आयात कराव्या लागत असल्याने जीवनमान खर्चाचे व त्यामुळे वेतनमानही भारी आहे. मासे, लाकूड, खनिजे व मऊ फरची कातडी या वस्तूंची निर्यात होते. खनिजे, लाकूड व द्रवरूप जळणवायू यांचा ९५% भाग जपानला जातो. जपान येथे मोठे भांडवल गुंतवीत आहे. अलास्का प्रदेश विस्तीर्ण, त्रुटित आणि रहदारीला अवघड असल्यामुळे आकाशमार्गच दळणवळणाला सर्वांत सोयीचा आणि विमान हेच प्रमुख वाहन ठरले आहे. राज्यात ८०० वर विमानतळ असून ध्रुव प्रदेशावरून होणाऱ्या आकाशप्रवासात अलास्का हा महत्त्वाचा मधला टप्पा आहे. अँकरेजमधील लेकहूड या सरोवराहून दररोज ४०० विमानांची उड्डाणे व अवतरणे होतात. राज्यात परवाना असलेले ८,००० विमानचालक व ४,५०० खाजगी विमाने आहेत. शहरे, खेडी व वस्त्या जोडणारे हमरस्ते ८,६८० किमी. व दुय्यम रस्ते ३,५२३ किमी. लांबीचे आहेत. त्या मानाने एकूण लोहमार्ग फक्त ७५२ किमी. एवढेच आहेत. तारकचेऱ्‍या व दूरध्वनियंत्रे वस्तीच्या सर्व ठिकाणांपर्यंत पोहोचली असून १८ नभोवाणी व ७ दूरचित्रवाणी केंद्रांखेरीज वृत्तवितरणार्थ ६ दैनिके, ६ साप्ताहिके व ३ मासिकेही प्रसिद्ध होतात. राज्याचे बहुसंख्य नागरिक ख्रिस्ती धर्माच्या मेथडिस्ट, प्रॉटेस्टंट, एपिस्कोपल, प्रेसबिटेरियन, कॅथलिक, रशियन, ऑर्थोडॉक्स अशा विविध पंथांचे असले, तरी येथील आदिवासी एस्किमोनी मात्र आपल्या जीवनपद्धतीप्रमाणे धार्मिक रूढीही पूर्वीसारख्या चालू ठेवल्या आहेत. त्यांच्यापैकी फक्त ॲल्यूट जमातीवर तेवढी आधुनिकतेची छाप आढळते. गोऱ्या रहिवाशांची राहणी देशातल्या इतर राज्यांतील लोकांसारखीच असते. रात्र दीर्घ असल्यामुळे समाजजीवनात रात्रीचे कार्यक्रम, समारंभ व उत्सव अधिक प्रमाणात असतात. उन्हाळ्याच्या अल्प काळात लोक मोकळ्या हवेसाठी शक्य तितके समुद्रकिनाऱ्‍याला किंवा पर्वतांवर जातात व जलक्रीडा, मासे धरणे, गिर्यारोहण किंवा शिकार अशा करमणुकींचा उपभोग घेतात. हिवाळ्यात बर्फावरचे खेळ चालतात. एतद्देशीय इंडियनांनी लाकडाचे मोठमोठे सोट कोरून उभे केलेले देवकस्तंभ (टोटेम पोल्स) हे अलास्काचे कलावैशिष्ट्य म्हणता येईल. अनेकांनी कडे करून ताणून धरलेल्या कातड्यावरून किंवा ब्‍लँकेटवरून एखाद्याला उंच उंच फेकून पुनः झेलणे हा खेळ एस्किमो लोकांत अजून रूढ आहे. राज्याची भाषा इंग्रजी असून शिक्षण ७ ते १६ वर्षांपर्यंत सक्तीचे व मोफत असते. गोऱ्यांच्या मुलांसाठी राज्याची आणि अन्य वर्णीयांच्या मुलांसाठी केंद्राची अशी दुहेरी शिक्षणव्यवस्था येथे आहे. उच्च शिक्षणासाठी २ विद्यापीठे व ६ महाविद्यालये असून एक मध्यवर्ती ग्रंथालय आणि वेगवेगळ्या शहरांतून ३ वस्तुसंग्रहालये आहेत.⇨जूनो  या राजधानीखेरीज प्रमुख शहरे अँकरेज, फेअरबँक्स व कोडिॲक ही होत. धूर, मोटारीचे उत्सर्गवायू वगैरेंमुळे हवा दूषित होणे, काही ठिकाणी भूमिजलपातळी भूपृष्ठावरच असल्यामुळे सांडपाण्याचा निकाल न होणे, थंड हवेमुळे घाण कुजून नाहीशी न होता साचून राहणे यांसारखे प्रश्न उपस्थित होत आहेत. या राज्यातील पर्वत, हिमनद्या, ज्वालामुखी, ध्रुव प्रदेश, राष्ट्रीय उद्याने अशी भव्य निसर्गदृश्ये पाहण्यासाठी हौशी प्रवाशांची वाढती वर्दळ असते.

खाणी, शिकार, लाकूडतोड वगैरेंसाठी आलेल्या इतर लोकांनी एस्किमो, ॲल्यूट वगैरे आदिवासींची ही ‘महान भूमी’ व्यापली परंतु ते लोक मागासलेलेच राहिले. आता ते केंद्र सरकारकडे भूमी, नुकसानभरपाई आणि खाणींचे स्वामित्वशुक्ल यांची मागणी करीत आहेत. त्यांचे काही प्रतिनिधी राज्य विधिमंडळावरही आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा आर्थिक लाभ उठविण्याच्या भरात या प्रदेशाचे सौंदर्य व आकर्षण यांचा नाश होऊ देता कामा नये, हा विचार प्रबळ होत आहे.

 

ओक, शा. नि.