पूला : पॉला. यूगोस्लाव्हियाच्या क्रोएशिया विभागातील प्रमुख नैसर्गिक बंदर. लोकसंख्या ४७,४१४ (१९७१). हे एड्रिॲटिक समुद्रावरील इस्त्रीया द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर वसले आहे. ख्रिस्तपूर्व १७८ मध्ये येथे रोमनांचा लष्करी व नाविक तळ होता. इ. स. पू. ३९ मध्ये इलिरियन-डाल्मेशियन युद्धात ते उदध्वस्त झाले तथापि चार वर्षांनीच त्याची पुनर्रचना करण्यात आली. १९४७ मधील पॅरिसच्या तहानुसार पूला यूगोस्लाव्हियाच्या ताब्यात आले. येथे जहाजबांधणी व दुरूस्ती, यंत्रसामग्री, सिमेंट, काच, वस्त्रनिर्मिती इ. उद्योग चालतात. येथील रोमन रंगमंदिर, विजय-कमान (इ. स. पू. पहिले शतक), तसेच पुरातत्त्वीय संग्रहालय इ. उल्लेखनीय आहेत.

चौधरी, वसंत