पॅराग्वाय : (रिपब्लिका दे पॅराग्वाय). दक्षिण अमेरिकेतील एक भूवेष्टित सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र. अक्षवृत्तीय विस्तार १९ १७’ द. ते २७ ३०’ द. व रेखावृत्तीय विस्तार ५४ ३०’ प. ते ६२ ३०’ प. असून क्षेत्रफळ ४,०६,७५२ चौ. किमी. व लोकसंख्या २८,०५,००० (१९७७ संयुक्त राष्ट्रांचा अंदाज) आहे. देशातून वाहणाऱ्या पॅराग्वाय या मोठ्या नदीवरून देशास हे नाव मिळाले आहे. आसूनस्यॉन (लोकसंख्या ४·३४९ लक्ष-१९७५ अंदाज) हे राजधानीचे व देशातील सर्वांत मोठे शहर आहे. पॅराग्वायच्या पश्चिमेस अर्जेंटिना व बोलिव्हिया, उत्तरेस ब्राझील व बोलिव्हिया, पूर्वेस ब्राझील व अर्जेंटिना आणि दक्षिणेस अर्जेंटिना हे देश आहेत. या देशाच्या पूर्व सीमेवरून पाराना, पश्चिम सीमेवरून तिची प्रमुख पनदी पील्कोमायो व दक्षिण सीमेवरून पॅराग्वाय या नद्या वाहतात.

भूवर्णन: दक्षिण अमेरिकेच्या जवळजवळ मध्यभागी असणारा हा देश ब्राझीलच्या पाराना पठाराचाच दक्षिण भाग आहे. हे पठार ट्रायासिक कालखंडातील रेतीखडक व बेसाल्ट खडकांपासून बनले आहे. पठाराच्या ईशान्य भागात सर्वोच्च उंची ६०० मी. च्या दरम्यान असून त्यावर पारानाच्या उपनद्यांच्या खोल दऱ्या निर्माण झाल्या आहेत. पॅराग्वाय नदी या देशाच्या जवळजवळ मध्यावरून वाहते. पश्चिमेकडील भाग बराच सपाट असून त्यास ‘ग्रान चाको’ म्हणतात त्याचे क्षेत्रफळ २,४६,९२५ चौ. किमी. आहे. हा भाग अर्वाचीन तृतीयक व चतुर्थक काळांतील गाळाच्या खडकांनी बनला आहे. पॅराग्वायचा पूर्वेकडील भाग १,५९,८२७ चौ.किमी. क्षेत्रफळाचा असून नदीलगतचा सखल खोऱ्यांचा प्रदेश व पूर्वेकडील डोंगराळ भाग, असे त्याचे विभाग आहेत. पॅराग्वाय नदीच्या पूर्वेस ईशान्य–नैऋत्य दिशेने ३०० ते ७०० मी. उंचीच्या डोंगररांगा नदीस समांतर जातात या डोंगरांचा पूर्वेचा उतार सीमेवरील पाराना नदीपर्यंत तीव्र आहे. या डोंगररांगा म्हणजे पॅराग्वाय व पाराना या नद्यांमधील जलविभाजक प्रदेश होय. या प्रदेशातून पश्चिमेस पॅराग्वाय नदीकडे वाहणाऱ्या नद्या संथ आहेत, तर पूर्वेस पारानाकडे जाणाऱ्या नद्यांवर अनेक धबधबे आहेत. अशा प्रकारे या देशाचे भूरचनेप्रमाणे तीन विभाग होतात.

(१) पूर्वेकडील पाराना व पॅराग्वाय नद्यांमधील जलविभाजक उच्च प्रदेश : हा ब्राझील पठाराचाच भाग असून त्याची उंची ३०० ते ६०० मी. आहे. कॉर्डिलेरा डे आमाम्बाय ही डोंगररांग सीमेनजीक असून ती दक्षिणेस एंकार्नासीओनपर्यंत पसरते. या रांगेच्या पूर्वेस पॅराग्वायच्या सीमेवरून पाराना नदी वाहते.

(२) पॅराग्वाय नदीच्या पूर्वेचा सखल प्रदेश: हे पॅराग्वायचे विस्तीर्ण खोरे असून लोकवस्ती या भागातच एकवटली आहे व या भागातच ईप्वा हे २४० चौ. किमी. क्षेत्रफळाचे व ईपाकाराई ही दोन सरोवरे आहेत. सरोवरांकाठी बरीच दलदलही आहे. पॅराग्वाय नदीच्या पूर्वेकडील या दोन्ही विभागांस ‘रीजन ऑरिएंटल’ म्हणतात.

(३) पॅराग्वाय नदीच्या पश्चिमेचा विस्तीर्ण सपाट प्रदेश (ग्रान चाको): हा अर्जेंटिना, पॅराग्वाय आणि बोलिव्हिया ह्या तिन्ही देशांत पसरतो. हा प्रदेश अर्वाचीन काळातील गाळ संचयनाने निर्माण झाला असून त्याचा १/३ भाग पॅराग्वाय देशात समाविष्ट होतो.

नद्या : पॅराग्वाय ही अर्थातच प्रमुख नदी आहे. पॅराग्वाय याचा ग्वारानी भाषेतील अर्थच मुळी ‘मोठी नदी’ असा आहे. पॅराग्वायला खरे पाहता नद्यांचा देश असेच म्हणावयास हवे. कारण देशाची ८०% सीमा नद्यांनी निश्चित झालेली आहे. पाराना, पॅराग्वाय, आपा, आल्टो पाराना व पील्कोमायो या नद्यांचे काही प्रवाहभाग सीमेवरून वाहतात. पॅराग्वाय १,५०० किमी. उत्तरेस बाझीलच्या पठारावरून वाहत येऊन पॅराग्वायमध्ये प्रवेशते व नागमोडी वळणांनी सरळ दक्षिणेस वाहते. मार्गात हेव्ही–ग्वासू, आपा व आकीडाबान या उपनद्या पूर्वेकडून मिळतात, तर आसूनस्यॉनजवळ पील्कोमायो नदी पश्चिमेकडून मिळते. पुढे पॅराग्वाय नदीस दक्षिण सीमेवर पाराना नदी मिळते व त्यांपासून पुढे अर्जेंटिनामध्ये ला प्लाता नदी बनते. ग्रान चाको भागात मोठ्या नद्या नाहीत व ज्या आहेत त्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. ईप्वा व ईपाकाराई ही दोन सरोवरे मध्य सखल प्रदेशात निर्माण झाली आहेत. पॅराग्वाय हा देश पूर्णपणे भूमिवेष्टित असल्याने ला प्लातामधूनच पुढे अर्जेंटिनामार्गे पॅराग्वायला समुद्र संपर्क ठेवता येतो.

मृदा : पॅराग्वायमधील मृदा जास्त पाऊस व उष्ण हवामान यांमुळे रारायनिक विदारणाने बनलेल्या असून पूर्वेस डोंगराळ भागात तांबूस मुरमाड माती व बेसाल्टपासून विदारणाने बनलेली माती आहे. नद्यांच्या मैदानात गाळाचे व चुनखडीचे प्रमाण जास्त असलेली माती आहे. पॅराग्वाय नदीकाठी बराच भाग दलदलीचा असून त्या भागात जलसंपृक्त खाजणी मृदा व लोम मृदा आहेत. तर पारानाच्या काठी पूर्व भागात लाल मृदा व दक्षिणेस काळी चिकण माती आहे. पश्चिमेच्या ग्रान चाको भागातील मृदा अर्वाचीन गाळापासून बनल्या आहेत व पश्चिमेस हवामान कोरडे असल्याने भूपृष्ठालगत चुनखडक वर आलेले आहेत. त्यांमुळे मातीला पांढरट छटा प्राप्त झाली हे. तसेच वाऱ्याबरोबर वाहून आलेल्या वाळूच्या मिश्रणाने बनलेल्या मृदा या भागात आहेत. शेतीला ही जमीन फारशी योग्य नाही, पण विरळ कुरणे या भागात आढळतात.

खनिज संपत्ती: देशात एकूण खनिज संपत्ती मर्यादितच आहे. लोह व मँगॅनीजचे साठे आहेत, पण ते व्यापारी प्रमाणावर नसल्याने खाणकाम परवडणारे नाही. चुनखडक, मीठ, केओलीन व अपेटाइटचे खूप मोठे साठे आहेत. ग्रान चाको भागात खनिज तेल सापडण्याची शक्यता असून अनेक परदेशी कंपन्या खनिज तेलाचा शोध घेत आहेत. एंबोस्काडा व कापूकू येथे अनुक्रमे मँगॅनीज व तांबे सापडते. पूर्वी येथे विविध प्रकारची खनिज संपत्ती सापडेल असा अंदाज होता, पण तो खोटा ठरला आहे.

हवामान: उत्तर भागात आर्द्र उष्ण हवामान आणि दक्षिण भागात उबदार थंड हवामान आहे. हिवाळ्यात सरासरी तपमान उत्तरेस २०० से. व दक्षिणेस १०० से. पर्यंत असते, तर उन्हाळ्यात  ऑक्टोबर ते मार्च या काळात तपमान ३२ते ३५० से. पर्यंत वाढते. ब्राझीलच्या सीमाप्रदेशात व पूर्वेच्या डोंगराळ भागात पाऊस २०० सेंमी.पर्यंत पडतो व तो पश्चिमेस कमी होतो. पॅराग्वायच्या खोऱ्यांत १२० सेंमी. व ग्रान चाकोच्या खोऱ्यात मारीस्काल एस्टीगारीब्या भागात ५० ते ७५ सेंमी. पाऊस पडतो. पाऊस वर्षभर पण मुख्यत: मार्च ते मे यांदरम्यान पडतो.

वनस्पती व प्राणी: देशाचा सु. ५४% भाग जंगलाखाली असून पूर्व भागात कठीण लाकडांचे व सीडार झाडांचे घनदाट जंगल आहे. त्यातील लाकूडतोड अद्याप फारशी झालेली नाही. ताड, तुंग व अन्य झाडे थोड्या प्रमाणात तेलासाठी तोडली जातात. ह्या जंगलाच्या पश्चिम भागात पानझडी व अतिपूर्वेस चाकोमध्ये खुरटी झुडपे व उंच गवत आढळते. चाको भागातील सहज मिळू शकणारी क्वेब्रॅको ही चामडे कमावण्यास उपयुक्त असणारी झाडे संपून गेली आहेत पण दुर्गम प्रदेशात अजूनही ती शिल्लक आहेत व त्या भागात लाकूडतोड प्रयत्‍न सुरू आहेत. उरूंडी, लापाचो व परातोडो ही झाडे पॅराग्वायमध्येच सापडतात. परातोडोपासून क्विनीन बनवितात. पूर्वेस ब्राझीलमधील प्राण्यांसारखेच प्राणी असून वानर, टॅपिर,जॅगुआर (जॅग्वार) आणि रानडुक्कर सर्वत्र आहेत. आर्मडिलो (घोरपडीसीरखा प्राणी), कॉइपू हा पाण्यात राहणारा उंदीर, कॅपिबारा हा कुरतडणारा प्राणी व आयबिस, हेरन, टूकान, मस्कव्ही बदक, कबुतरे, होले, पोपट, गरुड, ससाणा इ. पक्षी व टॅरँट्युला हे राक्षसी विषारी कोळी सापडतात. पक्ष्यांच्या सु. ४०० जाती येथे आढळतात.


इतिहास: यूरोपीय लोकांनी या प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी ‘ग्वारानी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व शिकार करून उपजीविका करणाऱ्या रेड इंडियन लोकांच्या टोळ्या या भागात होत्या. यूरोपीयांनी अमेरिकेतील बहुतेक सर्वच भागांत रेड इंडियनांशी संघर्ष करून त्यांचा जवळजवळ वंशच्छेदच केल्याचा इतिहास आहे. पण पॅराग्वाय हा देश मात्र त्याला अपवाद आहे. येथे यूरोपीय व ग्वारानी इंडियन यांचे संबंध बरेच मैत्रीचे आहेत. ग्वारानी व यूरोपीय यांच्या वांशिक मिश्रणामुळे या देशात आज केवळ दोन-तीन टक्केच यूरोपीय वंशाचे लोक आहेत. यूरोपीयांस लोभ सुटावा अशी खनिज संपत्ती किंवा जमीन या भागात नसल्यानेच हा भाग सुरुवातीच्या संघर्षांपासून मुक्त राहिला.

सीबॅस्‍चन कॅबट याने १५२९-३० साली ला प्लाता, पाराना व पॅराग्वाय नद्यांच्या खोऱ्यांची पाहणी केली. त्यापूर्वी तो १५२४ मध्ये पोर्तुगीजांसाठी ब्राझीलकडून बोलिव्हियाकडे जाताना पॅराग्वायच्या भागातूनच गेला होता. पण या प्रदेशाच्या पाहणीचे श्रेय कॅबटकडेच जाते. पुढे १५ ऑगस्ट १५३७ रोजी ह्वान डे सलाथार याने आसूनस्यॉन येथे पील्कोमायो व पॅराग्वाय नद्यांच्या संगमाजवळ एक गढी स्थापन केली. हीच या भागातील पहिली यूरोपीय वस्ती होय. नंतरच्या काळात येथूनच यूरोपीय लोक द. अमेरिकेच्या अन्य भागांत पसरले. ब्वेनस एअरीझ वसविणारे लोकही आसूनस्यॉनमधूनच आले होते. म्हणून आसूनस्यॉन हे द. अमेरिकेतील आद्य शहर मानले जाते. त्या काळात पॅराग्वाय प्रांत विशाल होता. ला प्लाता, पाराना व पॅराग्वाय मिळून हा प्रांत बनत असे. १६१७ पर्यंत ब्वेनस एअरीझ पॅराग्वायचाच भाग होता व पेरूच्या प्रतिनिधीची या प्रांतावर सत्ता होती. १६१७ मध्ये ब्वेनस एअरीझ व पॅराग्वाय प्रांत वेगळे करण्यात आले. १७७६ साली ब्वेनस एअरीझ येथे स्वतंत्र राजप्रतिनिधी नेमण्यात आला आणि पॅराग्वाय व ब्वेनस एअरीझ हे प्रांत त्याच्याकडे सोपविण्यात आले.

स्पेनच्या परवानगीने जेझुइट धर्मप्रसारकांनी १६०९ मध्ये पॅराग्वायच्या पूर्व भागात धर्मप्रसारास सुरुवात केली. त्याबरोबरच त्यांनी ग्वारानींना शेती, कुटिरोद्योग, आरोग्य यांचे तसेच आत्मसंरक्षणासाठी व लुटारूंस पळवून लावण्याठी बंदुका वापरण्याचेही शिक्षण दिलेच त्यांची नवीन गावे स्थापन केली. १७२१ मध्ये ग्वारानींनी स्पेनविरुद्ध बंडाळी करून स्वतंत्र वसाहत जाहीर केली. ती १७३४ पर्यंत टिकून होती. त्यामुळेच हे स्वतंत्र संस्थान बनेल, या भीतीने स्पेनने १७६७ साली धर्मप्रसारकांस येथून हाकलून दिले.

लॅटिन अमेरिकेतील स्वातंत्र्य चळवळीत ब्वेनस एअरीझमधील क्रांतिकारकांनी १८११ च्या प्रारंभी पॅराग्वाय पादाक्रांत करण्याचा प्रयत्‍न केला, पण आसूनस्यॉनच्या जनतेने तेव्हा राज्यपालास मदत करून तो हाणून पाडला. त्याच वर्षीच्या मेमध्ये त्यांनी राज्यपालास राजीनामा देण्यास भाग पाडून स्पॅनिश सत्ता झुगारून दिली. युद्धविहीन स्वातंत्र्यप्राप्ती हे पॅराग्वायचे तिसरे वैशिष्ट्य होय. यावेळी पॅराग्वाय हा ब्वेनस एअरीझमधील क्रांतिराज्याचाच भाग होता. १८१३ मध्ये तो त्यापासून अलग झाला.

पॅराग्वाय हा १८१३-१४ या काळात दोन राज्याधिकाऱ्यांच्या हाती राहिला. त्या वर्षी त्यांतील एकास–होसे गास्पार रॉद्रीगेथ फ्रांस्या–तात्पुरता हुकूमशहा नेमण्यात आले. १८१६ मध्ये तो आजीव हुकूमशहा झाला. त्याने १८४० पर्यंत अधिकार गाजविला व पॅराग्वायमध्ये शांतता स्थापून त्याचे स्वातंत्र्य अबाधित केले. तथापि फ्रांस्याने २६ वर्षे देशाचे दरवाजे बंद करून टाकले, परदेशी व्यापार संपुष्टात आणला, शिक्षणाने असंतोष वाढतो अशा समजुतीने ते बंद केले आणि ग्वारानी जमातीच्या लढाऊपणाचा उपयोग करून प्रबळ सैन्य निर्माण केले. मात्र त्या जमातीच्या ऐहिक स्वास्थ्याकडे त्याने चांगले लक्ष दिले आणि स्थानिक गोऱ्यांच्या कारवायापासून त्यांचे संरक्षण केले. शेती, हस्तव्यावसाय इत्यादींस उत्तेजन दिले. कॅथलिक धर्मपंथाचा ताबा घेऊन पोपचे स्वामित्व कमी केले, आम जनतेस सुख दिले, स्वातंत्र्य मात्र खच्ची केले.

त्याच्या मृत्यूनंतर त्याचाच भाचा कार्लोस आंतोन्यो लोपेथ हुकूमशहा झाला. याने १८४४–६२ मधील आपल्या कारकीर्दीत व्यापार, गोरे आप्रवासी, राजनैतिक व आर्थिक दळणवळण यांस देश खुला करून फ्रांस्याने घातलेले निर्बंध रद्द केले. रस्ते, टपाल-तारव्यवस्था, लोहमार्ग इत्यादींत सुधारणा करून आपला देश इतरांबरोबरीने आणण्याची खटपट केली व पॅराग्वायला संपन्न आणि एकसंध राष्ट्राचे स्वरूप दिले. पॅराग्वायी लोक या धोरणी व देशभक्त मुत्सद्याचे नाव आजही कृतज्ञतेने घेतात.

लोपेथ १८६२ मध्ये मरण पावला आणि त्याचा मुलगा फ्रां थीस्को सोलानो लोपेथ हा अधिकारावर आला. त्याचे शिक्षण यूरोपमध्ये झाले होते आणि तेथेच त्याने थोडे लष्करी ज्ञानही पैदा केले होते. यूरग्वायमधील यादवीत ब्राझीलने हस्तक्षेप करण्यास त्याने कडवा विरोध केला : कारण त्या देशांच्या आक्रमक धोरणाची त्याला चांगली कल्पना होती. परंतु याचा परिणाम मात्र पॅराग्वायच्या इतिहासातील अत्यंत करुण-भीषण घटनेत–त्रिसंमेळ युद्धात झाला. यात पॅराग्वायला अर्जेंटिना, ब्राझील व यूरग्वाय यांच्या बलाढ्य युतीशी लढावे लागले. १८६५–७० या पाच वर्षांत या छोट्या राष्ट्राने प्रचंड लढा दिला व जवळजवळ यश मिळविले. या युद्धात पॅराग्वायच्या प्रजेची ‘न भूतो न भविष्यति’ अशी कत्तल झाली आणि लोकसंख्या ६,००,००० वरून २,३२,००० वर आली. यात धट्टेकट्टे पुरुष फक्त २८,०००च राहिले. देशही उद्‍ध्वस्त झाला पशुधन नष्ट पावले स्वत: लोपेथ कामास आला व युद्ध संपले. परिणामत: ब्राझीलला १,२९,५०० चौ.किमी. क्षेत्र द्यावे लागले. अर्जेंटिनाशी ग्रान चाकोबद्दल वाद होता, तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे राष्ट्राध्यक्ष हेजच्या लवादाने १८७८ मध्ये मिटला. यात मात्र पॅराग्वायच्या बाजूने निकाल लागला.

नवी घटना २५ नोव्हेंबर १८७० रोजी झाली व १८८७ मध्ये पॅराग्वाय कोलोरादो (लाल) व लिबरल (उदार) हे दोन पारंपरिक राजकीय पक्ष जन्मास आले व जनरल बेर्नार्दीनो काबायेरोच्या आधिपत्यापत्याखाली ‘लाल’ पक्ष अधिकारावर आला. हा लाल पक्ष जमीनदार, उद्योगपती इत्यादिकांचा हितरक्षक आहे व लाल शब्दाशी इतरत्र जी तत्त्वे निगडित आहेत त्यांच्या विरुद्ध याचे धोरण आहे. १९०४ साली ‘उदार’ पक्षाच्या उठावाने लाल पक्ष अधिकारच्युत झाला तो १९४० पर्यंत.

सप्टेंबर १९३२ मध्ये ग्रान चाकोच्या सीमानिश्चितीबद्दलच्या जुन्या वादाने पेट घेऊन पॅराग्वाय-बोलिव्हिया युद्ध सुरू झाले. यात पॅराग्वाय सैन्याचा विजय होत राहिला. १४ जून १९३५ रोजी युद्धतहकुबी होऊन अखेर तो सीमावाद ऑक्टोबर १९३८ मध्ये नव्या सीमानिश्चितीने संपला.

कर्नल राफाएल फ्रँकोच्या नेतृत्वाखाली १७ फेब्रुवारी १९३६ रोजी लाल पक्ष थोडा काळ अधिकारारूढ झाला होता. पण ऑगस्ट १९३७ मध्ये उदार पक्षाने सत्ता काबीज केली. त्यामुळे उद्‍भवलेली राजकीय अस्थिरता १९४७ मधील सहा महिन्यांच्या यादवीनंतर संपली. हा उठाव लाल पक्षाचा राष्ट्रपती मोरीनिगोविरुद्ध होता, परंतु यादवी युद्धात तो विजयी झाला. तथापि १ जून १९४८ रोजी पक्षांतर्गत यादवीमुळे मोरीनिगोने राजीनामा दिला व एकामागून एक राष्ट्रपती अधिकारावर येऊ लागले मध्यंतरी (१९४९–५४) चाव्हेस हा हुकूमशहा होऊन गेला. त्यास मे १९५४ मध्ये सेनापती आल्फ्रेदो स्ट्रॉएस्‍नेरने पदच्युत करून सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व ११ जुलै १९५४ रोजी ते अध्यक्ष झाले. १९३६ पासून पॅराग्वायमध्ये ११ वर राष्ट्रपती झाले. यावरून तेथील राजकीय अस्थिरतेची कल्पना येते. ही अस्थिरता १९५४ पासून हुकूमशहांच्या दडपणांनी काबूत आलेली आहे असे दिसते.


राजकीय स्थिती: २५ ऑगस्ट १९६७ रोजी देशाने १९४० चे जुने संविधान रद्द करून नवे संविधान अंमलात आणले. त्यामध्ये सर्व कायदेशीर मान्यताप्राप्त पक्षांना सहभाग देण्यात आला आहे. संसदेची दोन सभागृहे आहेत. सीनेटचे सभासद ३० व चेंबर ऑफ डेप्युटीजचे सभासद ६० असून प्रत्येक सभागृहातील २/३ जागा बहुमतवाल्या पक्षास दिल्या जातात व उरलेल्य १/३ जागा अल्पमतवाल्या पक्षांमध्ये त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात वाटून देतात. १८ वर्षावरील स्त्री-पुरुषांस मतदानाचा अधिकार असून मतदान करणे सक्तीचे आहे. राष्ट्रपतीचे अधिकार खूपच व्यापक असून तो सर्वत्रिक मतदानाने पाच वर्षांसाठी निवडला जातो. त्याला दुसऱ्यांदा निवडणुकीस उभे राहता येते. राष्ट्रपतीच (अध्यक्ष) मंत्रिमंडळाची नेमणूक करतो व जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू नसते, तेव्हा अध्यक्ष हुकूमनामे काढून कारभार चालवितो. नवीन संविधानाप्रमाणे पहिली निवडणूक ११ फेब्रुवारी १९६८ रोजी घेण्यात आली व ११ जुलै १९५४ रोजी अध्यक्ष बनलेले आणि १९५८ व १९६३ रोजी अध्यक्ष म्हणून निवडून आलेले कोलोरादो पार्टीचे आल्फ्रेदो स्ट्रॉएस्‍नेर हेच १९७३ मध्ये अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. एका व्यक्तीस दोनपेक्षा अधिक वेळा अध्यक्ष होता येते, या नवीन संविधानातील दुरुस्तीमुळे १९७८ मध्ये तेच पुन्हा अध्यक्ष झाले. राष्ट्रपतीने संसद बरखास्त केल्यास त्याला दोन महिन्यात नवीन निवडणुका घ्याव्याच लागतात. देशात एकपक्षपद्धतीच आहे. १९६७ ची संविधान-दुरुस्ती करण्यासाठी ६ फेब्रुवारी १९७७ रोजी संविधान सभेच्या ६० सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. पॅराग्वाय नदीच्या पूर्वेचा (ऑरिएंटल) व पश्चिमेचा (ऑक्सिडेंटल) असे दोन प्रांत राज्यकारभारासाठी केले असून पूर्व भागाचे १५ व पश्चिम भागाचे ४ विभाग (डिपार्टमेंट्स) असून प्रत्येकावर ‘देलेगादो’ हा केंद्रशासनाचा अधिकारी असतो.

पॅराग्वायचा ध्वज लाल, पांढऱ्या व निळ्या आडव्या पट्ट्यांचा असून त्याच्या दोन्ही बाजूंस भिन्न चिन्हे आहेत. अशा प्रकारे भिन्न बाजूंस वेगळी चिन्हे असणारे हे जगातील एकमेव राष्ट्रीय निशाण आहे.

न्याय: सर्वोच्च न्यायालयावर पाच न्यायाधीश राष्ट्राध्यक्षाकडून नेमण्यात येतात. त्यांच्या नियंत्रणाखाली मुलकी, व्यापारी व फौजदारी न्यायालये आहेत व त्यांचे सहा विभाग आहेत. साध्या खटल्यांचा निर्णय जे.पी.च्या न्यायालयात होतो. राज्याची कायद्याची बाजू महान्यायवादी मांडतो. त्याचे प्रतिनिधी प्रत्येक न्याय विभागात व सर्व न्यायालयांत असतात. कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक सर्वोच्च न्यायालय करते.

देशात एकपक्षीय राजकीय स्थिती आहे. ‘पार्टिदो कोलोरादो’ किंवा ‘नॅशनल रिपब्‍लिकन पार्टी’ हगा सत्ताधारी पक्ष मुख्यत: श्रीमंत जमीनदारांचा आहे. अध्यक्ष स्ट्रॉएस्‍नेर याच पक्षाचे आहेत. ‘लिबरल’ (पार्टिदो लिबरल युनिफिकादो) हा खऱ्या अर्थाने सुधारणाविरोधी परंतु प्रमुख विरोधी पक्ष आहे. फेब्रुवारी १९३६ च्या क्रांतीमध्ये निर्माण झालेला ‘फेब्रेरिस्टा’हा आणखी एक छोटा पक्ष आहे. त्याला १९६४ मध्ये मान्यता मिळाली. कम्युनिस्ट पक्ष अवैध ठरविण्यात आला आहे. राजकीय छळामुळे ५ ते ७.५ लाख लोक १९४७ साली पॅराग्वायमधून शेजारच्या अर्जेंटिनात परागंदा झाले असावेत, असा अंदाज आहे. दुसऱ्या महायुद्धात पॅराग्वायचा कल जर्मनीच्या बाजूस होता व युद्धानंतर अनेक जर्मनांनी पॅराग्वायमध्ये आश्रय घेतल्याचा अंदाज आहे.

संरक्षण: राष्ट्राध्यक्ष हा सैन्याचा क्रियाशील प्रमुख असतो. १९७५ साली संरक्षणदलात अधिकारी व सैनिक मिळून १५,००० बळ होते त्यापैकी ११,००० भूदलात, १,९०० नौदलात व २,००० हवाईदलात होते. शिवाय ६,५०० हत्यारी पोलीस आहेत. १८ ते २० वयाच्या दरम्यान संरक्षणदलात सेवा सक्तीची आहे. पण अनेकजणांस सवलत दिली जाते. हवाईदल जुने असून सांप्रत त्याचा उपयोग मुख्यत: वाहतूक व प्रशिक्षण यांपुरताच करण्यात येतो. आसूनस्यॉन येथे हवाईदलाचे प्रमुख कार्यालय आहे.

आर्थिक स्थिती: सुपीक जमीन, विस्तीर्ण अरण्ये, प्रचंड चराऊ मैदाने आणि समघात हवा असूनही पॅराग्वायची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही. अपुरी लोकसंख्या व दळणवळणाची साधने, जुनाट शेतसारा पद्धती आणि निरक्षर व बुरसटलेली समाजरचना हे याचे कारण आहे. आयात-निर्यातीस एकच दरवाजा (पाराना-पॅराग्वाय नदीमार्ग) खुला आहे. संभाव्य खनिजे निराशाजनक आहेत. यामुळे अमेरिका खंडामध्ये, एक हैती सोडल्यास पॅराग्वायइतका गरीब देश दुसरा नाही.

दरडोई उत्पन्न १९७२ साली केवळ २९८ डॉलर इतके अल्प होते. देशात आर्थिक विषमता कमालीची असून, शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. शेतीदृष्ट्या महत्त्वाच्या पूर्व प्रांतात १·५ लाख शेते आहेत, पण त्यांपैकी ७०% शेते १० हेक्टरांपेक्षा लहान आहेत. उलट ५३४ शेते ५,००० हेक्टरांपेक्षा मोठी आहेत आणि त्यांत ७०% शेती सामावली आहे. ग्रान चाको भागात १४ जणांच्या मालकीच्या जमिनीचे क्षेत्रफळ ७५·७ लाख हेक्टर होते.

कृषी : देशातील सु.१० लाख हे. जमीन शेतीखाली असून ४०% भागात चराऊ कुरणे आहेत. प्रमुख पिकांचे उत्पादन १९७४-७५ मध्ये पुढीलप्रमाणे झाले (आकडे लक्ष मे. टनांत): कसावा (मॅनिऑक) १४·२७ ऊस १२·०० मका ३·३७ सोयाबीन २·१६ रताळी १·७८ कापूस १·०० घेवडा ०·६० भात ०·५० अल्फाल्फा ०·२८ तंबाखू ०·२५ गहू ०·२०. मका हे प्रमुख धान्य असून त्याखालोखाल गहू व तांदूळ ही महत्त्वाची धान्ये, तर कसावा, ऊस, कापूस आणि तंबाखू ही प्रमुख नगदी पिके आहेत. काही तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. ‘येर्बा माते’  ह्या पॅराग्वायमध्ये होणाऱ्या कडक चहाचे उत्पादन आज कमीकमी होत आहे. लिंबूवर्गीय फळे, केळी, द्राक्षे इ. काही फळांचे थोडे उत्पादन होते. पूर्वेस काही भागात व विशेषत: पॅराग्वायच्या मध्य खोऱ्यांत, ८० किमी. रुंदीच्या प्रदेशातच शेती एकवटलेली आहे. अलीकडे जपानी स्थलांतरीत लोक तुतीच्या झाडांची लागवड करून रेशीम उत्पादन करण्याचा प्रयत्‍न करीत आहेत. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी ५१% उत्पन्न शेती, पशुपालन, जंगल व्यवसाय, मासेमारी व शिकार, खाणकाम व उद्योग यांपासून मिळते. पश्चिमेचा ग्रान चाको भाग मुख्यत: पशुपालनासाठी वापरला जातो. एकूण ३५% भागात पशुपालन होते. निर्यातीमध्ये मांसापासून सर्वांत जास्त परकीय चलन उपलब्ध होते. १९७५ मध्ये देशात पुढीलप्रमाणे पशुधन होते (आकडे लक्षांत): गुरे ४९·३६, डुकरे ८·००. घोडे ३·१५, मेंढ्या ३·५५, बकरे १·००, गाढवे ०·२७ व खेचरे ०·१२. त्याच वर्षी खालीलप्रमाणे पशुधन उत्पादने होती (आकडे लक्ष मे. टनांत): गोमांस १·०२, डुकराचे मांस ०·५१, घोड्याचे मांस ०·०४, कोंबड्यांचे मांस ०·११, दूध १·१०, अंडी ०·१७ व गुरांची चामडी ०·१६. दुग्ध व्यवसायाचा विकास होण्यास खूप वाव आहे. देशाच्या पूर्व भागात कठिणकाष्ठ व सीडार वृक्ष यांची न तोडलेली अशी प्रचंड वने आहेत. ताड, तुंग या प्रकारच्या वृक्षांपासून तेल काढतात. संयुक्त राष्ट्रांच्या एका प्रकल्पाधारे पाइन व फर वृक्षसंवर्धन हाती घेण्यात आले आहे.


शक्तीसाधने: देशात दगडी कोळसा व पेट्रोलियम अद्याप सापडलेले नाही. तथापि अनेक नद्या व योग्य भूरचना असल्याने सुप्त जलविद्युत‌्शक्ती विपुल आहे. पॅराग्वाय हा विद्युत्‌शक्ती निर्यातक देश असून देशातील सर्व संकल्पित प्रकल्प पूर्ण झाले, तर तो जगामधील अग्रेसर विद्युत्शक्ती निर्यातक देशांपैकी एक बनू शकेल. आकाराई येथे जलविद्युत् केंद्र स्थापन करण्यात आले असून त्याची उत्पादनक्षमता ९० मेवॉ. आहे. त्यापासून सु. ८० गावांस वीज पुरविली जाते व उरलेली वीज ब्राझील व अर्जेंटिनास निर्यात होते. ही क्षमता दुप्पट म्हणजे १८० मेवॉ. करण्याची योजना आहे. पॅराग्वायने पाराना नदीवर ईताइपू येथे संयुक्त प्रकल्प बांधण्याचा करार ब्राझीलबरोबर केला असून १९७५ मध्ये ह्या प्रकल्प बांधकामास प्रारंभ झाला. नियोजित वीजउत्पादन क्षमता १२,६०० मेवॉ. आहे. १९८८ मध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हावयाचा असून त्याचा एकूण खर्च ५१२ कोटी डॉलर आहे. अर्जेंटिनाशी केलेल्या दुसऱ्या एका कराराने यासीरेता जलविद्युत् प्रकल्पाचा आरंभ १९७६ मध्ये व्हावयाचा होता. त्याची क्षमता ४,००० मेवॉ. आहे. अर्जेंटिनाबरोबर आणखी एक दीर्घ करार करण्यात आला असून त्यानुसार पाराना नदीवरच ५,००० मेवॉ. क्षमतेचा कॉर्पूस प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे. हे वीज उत्पादन देशाच्या गरजेपेक्षा खूपच जास्त आहे पण शेजारच्या ब्राझील व अर्जेंटिना या देशांकडून मोठ्या प्रमाणावर वीजमागणी आहे.

उद्योग: पॅराग्वायमध्ये उद्योगांचा विकास अत्यंत मर्यादित आहे. मांस डबाबंदीकरण उद्योग प्रमुख असून त्याचे तीन कारखाने आहेत. शिवाय वनस्पती तेल व कापड गिरण्या आसूनस्यॉन व पीलार येथे आहेत. लाकूड उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्याची शासनाची योजना आहे. ओंडके निर्यांतीस बंदी घातल्याने लाकूड कापण्याच्या व लाकडी सामान बनविणाऱ्या गिरण्या स्थापन होत आहेत. प्रतिवर्षी १,७८४ घी.मी. कठीण काष्ठवृक्षाच्या कापीव लाकूड उत्पादनाचा एक मोठा औद्योगिक प्रकल्प १९७६ साली सुरू झाला. सोयाबीनच्या उत्पादनावर भर देणारे दोन कृषिक-औद्योगिक प्रकल्प उभारण्याची शासनाची योजना आहे. ब्राझीलशी सहकार्य करून अनेक औद्योगिक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. १९७० साली बाये-मी येथे सिमेंट कारखाना स्थापन झाला असून दैनिक उत्पादन ७,००० गोणी आहे. तसेच बीया एलीसा येथे तेलशुद्धीकरण कारखाना असून रोजचे उत्पादन ३,५०० पिंपे आहे. यांशिवाय काड्यापेट्या, औषधे, साबण व सौंदर्यप्रसाधने, सिगारेट, पादत्राणे व पीठ-गिरण्या असे लघु-उद्योगही आहेत. कडू नारिंगापासून मिळणारे व अत्तरासाठी उपयुक्त असणारे ‘पेटिटग्रेन’ तेल पॅराग्वायमध्ये तयार होते. या तेलाचा जगातील २/३ पुरवठा या देशातूनच होतो.

वार्षिक ५०,००० टन क्षमता असणारा साखर शुद्धीकरण कारखाना, सिमेंट कारखाना, हॉटेले यांसारखे अनेक संयुक्त औद्योगिक प्रकल्प ब्राझीलच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे १९७७ पासून वर्षास १ लक्ष टन पोलाद निर्माण करण्याचा ‘एस्‍पार’ नावाचा ५ कोटी डॉलर खर्चाचा एक संयुक्त प्रकल्प अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सहकार्याने हाती घेण्यात आला आहे. पॅराग्वायचा १९७०–७४ यांदरम्यानचा आर्थिक विकासदर सरासरी प्रतिवर्षी ६.२% असा होता. १९७४ व १९७५ या दोन वर्षांमध्ये हा विकासदर ८% असा होता. १९७१–७५ च्या विकास योजनेत निर्यात सुविधांमध्ये सुधारणा, शेतीचा विकास आणि लाकूडतोड उद्योगाचे आधुनिकीकरण यांवर विशेष भर देण्यात आला. पॅराग्वाय ‘लॅफ्टा’ (लॅटिन अमेरिकन फ्री ट्रेड असोसिएशन), ‘सेला’ (लॅटीन अमेरिकन इकॉनॉमिक सिस्टिम), ‘आयएडीबी’ (इंटर अमेरिकन डेव्हलपमेट बँक) आणि  ‘ओएएस्’ (ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेटस्) या संघटनांचा सदस्य आहे.

देशातील एकूण लोकसंख्येचा सु. तिसरा हिस्सा आर्थिक दृष्ट्या क्रियाशील असून त्यांपैकी ५२% लोक शेती आणि खाणकाम, १८% निर्मितिउद्योग व बांधकाम, १७% सेवा, ७ %  वाणिज्य व व्यापार आणि ६०%  वाहतूक-संदेशवहन व इतर यांमध्ये गुतलेले आहेत. ‘कॉन्फेडरेशन ऑफ पॅराग्वायन वर्कर्स’ आणि  ‘मूव्हमन्ट सिंडिकॅलिस्टा पॅराग्वाय’ या दोन कामगार संघटना असून त्यांचे ३०,००० सभासद होते. देशात संप करणे बेकायदेशीर आहे.

व्यापार व अर्थकारण: पॅराग्वायच्या निर्यात व्यापारात प्रामुख्याने मांसजन्य पदार्थ, इमारती लाकूड, तंबाखू, सुती धागा, तुंगतेल, खोबरेल, गुरांची चामडी, बाष्पनशील तेले, क्वेब्रॅको अर्क (टॅनिन), तेलबिया, कॉफी, येर्बा माते, फळफळावळ अशा कृषी जंगले आणि पशुपालन या क्षेत्रांमधील पदार्थांचा व वस्तूंचा समावेश होते. अन्नपदार्थ, वस्त्रे व कापड, पेये व तंबाखू पदार्थ, इतर धातू, यंत्रसामग्री व मोटारी, वाहतूक सामग्री व कृषिअवजारे, इंधने व वंगणतेले, लोह व पोलादाच्या वस्तू, रसायने व औषधे आणि कागद यांचा आयातीमध्ये अंतर्भाव होतो. १९७६ मधील आयात व्यापार २,७५८·९ कोटी ग्वारानी व आयातक देशांचा हिस्सा पुढीलप्रमाणे होता: अर्जेंटिना २१%, ब्राझील १७%, अल्जीरिया १३% अमेरिकेची संयुक्त संस्थाने १०%, प. जर्मनी ८%, ग्रेट ब्रिटन ८% व जपान ५%. निर्यात व्यापार २,२४२·३ कोटी ग्वारानी असून पुढील देशांना निर्यात करण्यात आली : नेदरलँड्स १५%, अमेरिकेची संयुक्त संस्थाने १२%, प. जर्मनी ११%, अर्जेंटिना १०%, स्वित्झर्लंड १०%, ग्रेट ब्रिटन ६%, फ्रान्स ६%, ब्राझील ६%, यूरग्वाय ५ %.

ग्वारानी हे पॅराग्वायचे चलन असून १०० सेंतिमोंचा १ ग्वारानी बनतो. १, ५, १०, ५०, १००, ५००, १,०००, ५,००० व १०,००० ग्वारानींच्या कागदी नोटा प्रचारात असून सार्वजनिक समारंभप्रसंगीच नाणी काढण्यात येतात. विनिमय दर १ स्टर्लिंग पौंड = २०८·७८ ग्वारानी व १ अमेरिकी डॉलर = १२६ ग्वारानी असा होता (डिसेंबर १९७६). पॅराग्वायचे बहुतेक महसुली उत्पन्न आयात शुल्क, प्राप्ती, वारसा व स्थावरसंपदा यांवरील करांपासून गोळा केले जाते. वाणिज्य, उद्योग, अर्थकारण, गुरचराई आणि स्थावरसंपदा यांपासून मिळणारे उत्पन्न करपात्र असून कृषिउद्योग, व्यवसाय आणि शारीरिक श्रम यांपासून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. अप्रत्यक्ष करांचे प्रमाण अत्यल्प आहे. अनुकूल व्यापारसंतुलनाचे संधारण आणि कृषी व औद्योगिक उत्पादनांमध्ये सुधारणा ही पॅराग्वायच्या अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे आहेत. अर्जेंटिना व ब्राझील या देशांवरील अवलंबन शक्य तो कमी करण्यामध्ये पॅराग्वाय प्रयत्नशील आहे.

वित्तव्यवहार आणि विदेशविनिमय यांची सर्वे कार्ये पाहणारी ‘सेंट्रल बँक’ आणि कृषी व उद्योग या क्षेत्रांमधील लहानमोठ्या उपक्रमांना अल्पकालिक व दीर्घकालिक कर्जे देणारी तसेच सर्व बँकिंग व्यवहार करणारी  ‘राष्ट्रीय विकास बँक’, कामगारांना कर्ज साहाय्य करणारी तसेच बचतीला उत्तेजन देणारी बँक, सहकारी संस्थांना बचत व पतसुविधा उपलब्ध करणारी बँक या शासकीय स्तरांवरील बँका असून लॅटिन–अमेरिकन, यूरोपीय व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या बँकशाखाही कार्य करीत आहेत. गेल्या काही वर्षांत कृषिक व औद्योगिक क्षेत्रांत परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढत असून त्याला उत्तेजन दिले जात आहे. मांस डबाबंदीकरण, लाकूडतोड, खाद्यतेल प्रक्रिया हे उद्योग आणि बँकिंग यांमध्ये ही गुंतवणूक प्रकर्षाने झालेली दिसते.


वाहतूक व संदेशवहन: पॅराग्वायचे द. अमेरिकेतील भूवेष्टित स्थान लक्षात घेता जलद व स्वस्त वाहतूकसाधनांच्या विकासावरच पॅराग्वायची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. याच दृष्टीने सरकार शेजारील देशांशी चांगले हमरस्ते व सुलभ जलवाहतूक यांद्वारा संपर्क ठेवण्यात क्रियाशील आहे. प्रेसिडेंट कार्लोस आंतोन्यो लोपेथ हा ४४५ किमी. लांबीचा व १·४५ मी. रुंदीचा लोहमार्ग आसूनस्यॉन ते एकार्नासीओनपर्यंत जातो. आसूनस्यॉन ते ब्वेनस एअरीझपर्यंत थेट रेल्वेसेवा आठवड्यातून दोनदा उपलब्ध आहे. या लोहमार्गाचे आधुनिकीकरण व विद्युतीकरण करण्याची ६८० लक्ष अमेरिकी डॉलर खर्चाची योजना शासनाच्या विचाराधीन आहे. ५७ किमी. लांबीचा दुसरा लोहमार्ग मुख्यत: लाकूड उद्योगासाठी वापरण्यात येत असला, तरी त्यावरून प्रवासी वाहतूकही केली जाते. १९७६ मध्ये देशातील ११,००० किमी. रस्त्यांपैकी ९०० किमी. फरसबंदीचे, ६०७ किमी. खडीचे आणि ९,५०० किमी. धुळीचे रस्ते होते. सुस्थितीतील रस्त्यांचा अभाव हा देशाच्या आर्थिक प्रगतीपुढील मोठा अडसर असून १९६० पासून चांगल्या प्रकारच्या हमरस्त्यांच्या बांधणीवर शासनाने मोठा भर दिला आहे. पॅन-अमेरिकन महामार्ग हा पॅराग्वायमधून ७०० किमी. पेक्षा जास्त अंतर जात असून ट्रान्स-चाको महामार्ग आसूनस्यॉनपासून बोलिव्हियापर्यंत जातो. १९७५ साली देशात मोटारगाड्या ८,१५० बसगाड्या १,५४८ ट्रक ३,००६ व्हॅन ७,३३३ आणि जीपगाड्या १,१६५ होत्या. जलवाहतुकीच्या संदर्भात पाराना नदी ही ब्राझील व अर्जेंटिना या देशांशी व्यापार करण्याचे प्रमुख जलवाहतूक माध्यम समजली जाते. या नदीतून कोयेंतेस ते प्वेर्तो आगीरेपर्यंत मोठ्या बोटींची वाहतूक चालते. पॅराग्वाय नदी आसूनस्यॉन बंदराचा व्यापारमार्गच मानतात. पॅराग्वाय, अर्जेंटिना, हॉलंड व ग्रेट ब्रिटन या देशांच्या जलवाहतूक कंपन्या आंतरराष्ट्रीय व्यापारवाहतूक करतात. १९४५ मध्ये राष्ट्रीय व्यापारी नौदल स्थापण्यात आले. मालवाहू जहाजे, तेलटाकी जहाजे प्रशीतक जहाजे तसेच प्रवासी जहाजे यांचा त्यात भरणा आहे. सरकारच्या मालकीच्या विमानकंपनीद्वारा हवाई वाहतूक सेवा पुरविली जाते. दोन खाजगी विमानकंपन्याही वाहतूक करतात. आसूनस्यॉन येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून दहा परदेशी विमानकंपन्या त्याचा वापर करतात. देशातील महत्त्वाची शहरे नागरी व लष्करी हवाई वाहतुकीने जोडलेली आहेत. याशिवाय देशात आसूनस्यॉन, पीलार, कन्सेप्शन, एंकार्नासीओन, कोरोनेल ओव्ह्येदो व मारीस्काल एस्टीगारीब्या येथे अंतर्गत विमानवाहतूक तळ आहे.

देशात १३७ टपाल व तार कार्यालये असून रेल्वेची ३४ टपाल-तार कार्यालये आहेत. तारायंत्राची एकूण लांबी ३,३५० किमी. आहे. आसूनस्यॉनहून ब्वेनस एअरीझला व तेथून जगातील देशांशी थेट दूरसंदेशवहन उपलब्ध आहे. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बोलिव्हिया, चिली, ब्राझील यांच्याशी थेट संदेशवहन चालते. दूरध्वनी सेवेचे १९४५ साली राष्ट्रीयीकरण करण्यात आले. दूरध्वनी तारांची एकूण लांबी ८,३६० किमी. होती व १९७६ साली ३७,६५६ दूरध्वनी होते. त्यांपैकी ३१,८०५ दूरध्वनी एकट्या आसूनस्यॉनमध्येच होते व तेथे स्वयंचलित दूरध्वनी विनिमय सेवा होती. देशात एकूण २८ आकाशवाणी केंद्रे होती. त्यांपैकी सरकारी मालकीचे एक व अन्य खाजगी मालकीची सात अशी आठ केंद्रे प्रमुख वीस शहरांत होती. आसूनस्यॉनमध्ये व्यापारी दूरदर्शन केंद्रही होते. देशात १,८०,००० रेडिओ संच आणि ५४,५०० दूरचित्रवाणी संच होते (१९७६).

लोक व समाजजीवन: स्पॅनिश आक्रमणापूर्वी या प्रदेशात ग्वारानी इंडियन राहत होते. पण इंका किंवा माया इंडियन लोकांप्रमाणे त्यांची संस्कृती प्रगत नव्हती. ते मुख्यत: शिकार व मासेमारी करूनच उपजीविका करीत. स्पॅनिश लोक या देशात इतर देशांपेक्षा इंडियन लोकांशी पूर्णपणे मिसळून गेले, त्यामुळेच आज देशाची ९५% लोकसंख्या मेस्तिझो किंवा स्पॅनिश-ग्वारानी संकरातून निर्माण झाली आहे. ग्रान चाकोच्या भागात सु. ४०,००० ग्वारानी अद्यापही रानटी अवस्थेत टोळ्यांचे जीवन जगत आहेत. त्यांच्या मॅटाको, लेंगुआ, सॅनापाना, चॅमाकॉको, मॉरो या प्रमुख टोळ्या आहेत. इतर वंशगटांत मेननाइट गट महत्त्वाचा आहे. १९६९ मध्ये त्यांची संख्या १३,००० होती. हे कर्मठ ख्रिश्चन मेननाइट पंथीय १९२७, १९३० व १९४७ साली जर्मनी व कॅनडा या देशांतून तेथील धार्मिक छळास कंटाळून पॅराग्वायमध्ये आले. २,००० कॅनडियन व ११,००० जर्मन असून ते चाको व ओरिएंटल प्रांतांत विखुरलेले आहेत. १९३५ साली जपानी स्थलांतरित पॅराग्वायमध्ये आले व ऑरिएंटल भागात त्यांनी वसाहती केल्या. १९६९ मध्ये त्यांची संख्या ७,००० होती. १९५९ साली पॅराग्वायने जपानशी केलेल्या एका करारानुसार १९५९–८९ या काळात ८५,००० जपानी लोकांस पॅराग्वायमध्ये स्थलांतरास परवानगी देण्यात येईल. असाच करार १९६६ साली द. कोरियाशी करण्यात आला आहे.

देशाची एकूण लोकसंख्या १९७२ साली २३,५४,०७१ होती व लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ५·७८ इतकी अल्प होती तर चाको भागात ती दर चौ. किमी.स केवळ ०·५ इतकीच होती. १८६५ साली झालेल्या ट्रिपल-अलायन्स युद्धाच्या वेळी पॅराग्वायची लोकसंख्या १२ लाख होती पण १८७३ मध्ये केवळ २,३१,००० इतकीच होती. मोठ्या प्रमाणावर मनुष्य संहार व स्थलांतर यांमुळे ही परिस्थिती ओढवली व त्या युद्धाचे परिणाम म्हणून आजही देशात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे व सु. ५०% जन्म विवाहपूर्व संबंधांतून आढळतात. विरळ लोकसंख्येमुळे देशाचा विकास अडून राहिला आहे, म्हणून देशाचे धोरण स्थलांतरांस प्रोत्साहन देणारे आहे.

देशात सर्व धर्मांस स्वातंत्र्य आहे पण देशाचा अधिकृत धर्म म्हणून रोमन कॅथलिक ख्रिश्चन पंथास मान्यता असून आसूनस्यॉन येथे आर्चबिशप आणि बीयारीका व कन्सेप्शन येथे बिशप आहेत. देशाचे तीन धर्मप्रांत, चार उपधर्मप्रांत व दोन धर्मग्रामे आहेत. राष्ट्राध्यक्ष धर्मगुरूंची नेमणूक करतात. तिला नंतर धर्मप्रमुख संमती देतात. १९६९ पासून चर्च व राज्यसत्ता यांचे संबंध दुरावले कारण  राजबंद्यांच्या विनाचौकशी तुरूंगवासास चर्चने विरोध केला. १९७४ मध्ये राजकीय कटाच्या आरोपाखाली १,००० लोकांस कैद पण नंतर मुक्त करण्यात आले. १९७६ मध्ये अनेक जेझुइट धर्मप्रसारकांस, ते मार्क्सवादी असल्यामुळे हद्दपार करण्यात आले.

सामाजिक कल्याण संस्था देशातील सर्व वेतनदारांना आपली सेवा उपलब्ध करते. अपघात, प्रसूतिसेवा, दुर्बलता प्रतिपूर्ती आणि अपघाती मृत्यूची जबाबदारी उचलणारा आयुर्विमा यांबाबत आर्थिक लाभ मिळू शकतात. रेल्वे व बँका यांमधील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनिधी व सेवानिवृत्ती वेतने हे फायदे मिळतात. भूधारणसुधारणा यांचे नियोजन व कार्यवाही करणाऱ्या शासकीय यंत्रणा देशात असून लहान शेतकऱ्यांना तांत्रिक, आर्थिक व सामाजिक साहाय्य करणाऱ्या शासकीय संघटनाही आहेत.

आंत्रविकार व फुफ्फुसांचे रोग हीच मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. हिवाळ्यात अपुरी निवासव्यवस्था असल्याने इन्फ्‍लुएंझा, न्यूमोनिया व क्षय ह्या रोगांचा प्रांदुर्भाव होतो. मलेरिया व महारोग यांचेही बरेच प्रमाण असून बालमृत्यूमान फार मोठे आहे. आरोग्यसेवा मर्यादितच आहेत. १९६७  मध्ये देशात १६७ इस्पितळे, ४,२५४ खाटा व १,३४४ वैद्य होते.


शिक्षण : प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असून ते ७ ते १४ वर्षांच्या वयोगटातील मुलामुलींना उपलब्ध आहे. शालेय सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. एकूण लोकसंख्येपैकी २२% अशिक्षित असून शालेय वयाच्या मुलांपैकी केवळ ७५ टक्केच शाळेत जातात. बहुतेक सर्व मुले घरीच ग्वारानी भाषा बोलतात. शाळांमधून पुढे त्यांना स्पॅनिश भाषा शिकविली जाते कारण तीच भाषा शिक्षणाचे माध्यम आहे. माध्यमिक शिक्षण शासनचालित ‘कॉलेजिओज’ (उच्च माध्यमिक शाळा) मधून मिळते. प्राथमिक शिक्षकांना ६ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. व्यापार, वाणिज्य, व्यवसाय यांबाबतचे खास प्रशिक्षणही उपलब्ध आहे. यांशिवाय देशात तांत्रिक व धंदेवाईक शाळाही असून सचिवीय शिक्षण दोन भाषांतून उपलब्ध करून दिले जाणारे महिलांचे विद्यालयही आहे. आसूनस्यॉन येथेच ‘नॅशनल युनव्हर्सिटी’ व ‘कॅथलिक युनव्हर्सिटी’ अशी दोन विद्यापीठे असून पहिले विद्यापीठ मोठे आहे. तेथे शिक्षण मोफत असून सर्व खर्च शासन भागविते. जनसंपर्क विषयावर एम्.ए. ही पदवी देणारी ‘द इंटरनॅशनल हायर इन्सिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स’ ही संस्था येथेच आहे. याशिवाय देशात कृषी, पशुविकारवैद्यक यांच्या शाळा तसेच सूक्ष्मजंतुशास्त्र आणि क्ष-किरणचिकित्सा यांच्या संस्था आहेत. १९७५ साली देशात प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा २,७९६, विद्यार्थी ४,५२,२४९ व शिक्षक १५,३९८ माध्यमिक शाळा ७३१, विद्यार्थी ७५,४२४ व शिक्षक १०,४०६ उच्च माध्यमिक शाळा २१, विद्यार्थी १७,१३५ व शिक्षक १,७४१ धंदेवाईक शाळांमधून विद्यार्थी १,३६१ व शिक्षक ६७ होते.

भाषा व साहित्य: स्पॅनिश ही देशाची अधिकृत आणि राज्यकारभाराची भाषा असून ग्वारानी ही दुसरी अधिकृत भाषा आहे. पण ती शाळांमधून शिकविली जात नाही. ती खऱ्या अर्थाने मातृभाषा आहे व मुले ती घरातच शिकतात. ग्वारानी भाषेत ह्यूल्यो कोरेआ याने नाट्यरचना केली असून ती प्रसिद्ध आहे. देशात तीन दैनिक वृत्तपत्रे असून ती आसूनस्यॉनमध्येच प्रसिद्ध होतात. सर्व वृत्तपत्रे स्पॅनिश भाषेत आहेत. एबीसीचा (स्थापना १९६७) खप ४०,००० तर ला ट्रिब्यूनचा (स्थापना १९२५) ३०,००० आहे. एल् रॅडिकल, एल् लिबरलएल् एनानो ही अन्य उदारमतवादी वृत्तपत्रे असून पात्रिया हे कोलोरादो पक्षाचे वृत्तपत्र आहे. आसूनस्यॉन येथे राष्ट्रीय ग्रंथालय, राष्ट्रीय पुराभिलेख ग्रंथालय व राष्ट्रीय निसर्गेतिहास संग्रहालय ही संग्रहालये आहेत.

पॅराग्वायच्या कलाविश्वात ग्वारानी आणि स्पॅनिश कलांचा संगम आढळतो. हार्प व गिटार यांचा संगम असणारे वाद्य लोकप्रिय आहे. होसे आसूनस्यॉन हा संगीतकार त्याच्या ‘ग्वारानिया’ या अभिनव संगीतप्रकारासाठी प्रसिद्ध आहे. पॅराग्वायमध्ये अत्यंत नाजुक अशी लेस विणली जाते, तिला ‘नँदुती’ म्हणतात. ग्वारानी भाषेत नँदुती म्हणजे कोळ्याचे जाळे. यूरोपात सोळाव्या शतकात प्रगत झालेला व तेथून या भागात आलेला लेस विणण्याचा प्रकार आणि ग्वारानी परंपरेचे अभिकल्प व नमुने यांच्या संगमातून नँदुती हा लेसप्रकार निर्माण झाला, असे समजतात. आसूनस्यॉनमध्ये संगीतशाळा व कॉन्झर्वेटरी ऑफ म्यूझिक ह्या संस्था, तसेच नॅशनल अकादमी ऑफ फाइन आर्ट्स व आसूनस्यॉन सिम्फनी ऑर्केस्ट्रा हा वाद्यवृंद ह्या कलासंस्था आहेत. आसूनस्यॉनमध्ये ६५ चित्रपटगृहे आहेत आणि इतर गावांत बरीच आहेत. वास्तुशिल्प,मूर्तिशिल्प इ. मध्ये या देशात काही खास उल्लेखनीय नाही.

महत्त्वाची स्थळे : आसूनस्यॉन हे प्रमुख शहर व देशाची राजधानी असून १५ ऑगस्ट १५३७ रोजी त्याची स्थापना झाली. लोकसंख्या ४,३४,९०० (१९७५). हे प्रमुख जलमार्ग, रेल्वेमार्ग, रस्ते व विमान वाहतुकीचे केंद्र तसेच शैक्षणिक, लष्करी, व्यापारी आणि औद्योगिक केंद्र आहे. एन्कार्नासीओन [लोकसंख्या २४,२११ (१९७२)] हे पॅराग्वायमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर पाराना नदीच्या उजव्या तीरावर वसले असून, एक प्रमुख नदीबंदर व औद्योगिक शहर आहे. बीयारीका [लो. १८,३०० (१९७० अंदाज)] हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून तेथील कॅथीड्रल उल्लेखनीय आहे. कन्सेप्शन[ लो. १९,३९२ (१९७२)] हे पॅराग्वाय नदीवरील प्रमुख बंदर व धार्मिक स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. यांशिवाय पेद्रो ह‌्वान काबायेरो, कोरोनेल ओव्हयेदो, लूके, सान लोरेन्सो इ. शहरे महत्त्वाची हेत. १९७५ साली ८१,११३ परदेशी प्रवाशांनी पॅराग्वायला भेट दिली. (चित्रपत्रे ५, १७).

डिसूझा, आ. रे. गद्रे, वि. रा.


पॅराग्वाय


यातुविधीच्या लाकडी बाहुल्या   माका इंडियन शिंगवादक   विणकर माका स्त्री  राष्ट्राध्यक्ष भवन, आसूनस्यॉनलाकूड वाहतूक : पॅराग्वायची प्रमुख निर्यात   ' काउ-बॉय ' व त्याचा उमदा साथी   स्पॅनिश वास्तुकलेचा निदर्शक ' हॉल ऑफ काँग्रेस '        हातमागावर विणलेला कलात्मक रग

पिकांची झोडणी   आरेग्वा शहराजवळील उपग्ह संदेशवहन केंद्र