अमृतसर: पंजाब राज्याच्या जिल्ह्यातील प्रमुख ठिकाण व शीखांचे परमपवित्र स्थान. लोकसंख्या कँटोनमेंट व उपनगरासह ४,५८,०२९ (१९७१). १५७४ मध्ये शीखांचा धर्मगुरू रामदास येथे असलेल्या अमृतसरोवराकाठी राहावयास आला. शीखांचे तीर्थक्षेत्र बनविण्याच्या उद्देशाने १५७७ मध्ये त्याने अकबराकडून येथील जागा मिळविली व सरोवराच्या मध्यभागी असलेल्या बेटावर सध्याच्या सुवर्णमंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. त्याच्या नंतरचे धर्मगुरू अर्जुनदेव यांनी ते पूर्ण केले. पुढे हे ठिकाण शीखांचे सत्ताकेंद्र बनले. मोगलांनी शहराचा नाश करण्याचे प्रयत्‍न केले १७६१ मध्ये दुर्रानीने शहराचा संपूर्ण विध्वंस केला होता. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत शहराचे वैभव खूप वाढले याच काळात मंदिराचा कळस सुवर्णमय करण्यात आला व मंदिरास ‘सुवर्णमंदिर’ नाव पडले. ब्रिटिश-कालखंडात अमृतसर व्यापारी, सांस्कृतिक आणि ब्रिटिशविरोधी चळवळींचे केंद्र होते. सुप्रसिद्ध ‘जालियनवालाबाग-घटना’ येथेच घडली. पाकिस्तान- च्या निर्मितीनंतर सीमेवरील शहर म्हणून अमृतसरला खूपच महत्त्व आले. लाहोरपासून फक्त ५३ किमी. अंतरावर असल्यामुळे भारत–पाक-युद्धात (१९६५) हे महत्त्वाचे केंद्र होते व त्यावेळी शहराची खूप हानीही झाली.

उत्तर रेल्वेवर दिल्लीपासून वायव्येस ४४० किमी.वर हे स्थानक असून सडकेने व विमानाने ते अन्य प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. शहरात सुती, रेशमी व गरम कापडाच्या गिरण्या असून वनस्पती-तूप, औषधे, पितळी भांडी, विजेची उपकरणे, रसायने व दुधापासून पदार्थ तयार करण्याचे कारखाने आहेत. सुंदर गालिचे व ‘पश्मिना’ शाली यांसाठी अमृतसर प्रसिद्ध आहे. बाजारपेठेत काश्मिरी भरतकामाचे व कागदी लगदाकामाचे उत्तमोत्तम नमुने पाहावयास मिळतात. हे पंजाबातील सर्वांत मोठे सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध आहे. १९७१ मध्ये लोकसंख्येपैकी ५७ टक्के साक्षर व ३१ टक्के कामकारी होते. अमृतसरचे विशेष आकर्षण म्हणजे सुवर्णमंदिर. याला ‘दरबार-मंदिर’ किंवा ‘हरिमंदिर’ म्हणतात. येथून जवळच शीखांच्या चार तख्तांपैकी एक अकाल तख्त आहे. जालियनवालाबागेतील स्वातंत्र्य-ज्योत, बाबा अटलरायचा मनोरा, दुर्गामंदिर, रामबाग, कैसरबाग, गोविंदगढ इ. स्थळे प्रेक्षणीय आहेत. 

पहा : सुवर्णमंदिर जालियनवालाबाग शीखांचे धर्मपंथ.

दातार, नीला