हाथरस :हाथ्रस. उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर व याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आणि राज्यातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र. लोकसंख्या १,६१,२८९ (२०११). आग्रा-अलीगढ व मथुरा–बरेली हे महामार्ग एकमेकांस जेथे छेदतात, तेथे हे शहर वसलेले असून ते अलीगढच्या दक्षिणेस सु. ५० किमी. व मथुरेच्या ईशान्येस सु. ४५ किमी.वर आहे. जिल्ह्यातील शेतमालाचे हे प्रमुख व्यापारकेंद्र असून शहर व शहर परिसरात कापूस व तेलबियांवरील प्रक्रियांचे छोटेछोटे उद्योग विकसित झाले आहेत.

 

हे शहर केव्हा व कोणी वसविले याविषयीचा लिखित पुरावा उपलब्ध नाही. काही पुरावशेषांवरून (रंगीत भांडी) मौर्य काळात (इ. स. पू. दुसरे शतक) येथे वस्ती असल्याचे दिसून येते. शुंग, कुशाण, नाग, गुप्त, मुसलमान, राजपूत, मराठा इत्यादींच्या सत्ता या प्रदेशावर होऊन गेल्याचे ऐतिहासिक पुराव्यांवरून दिसून येते. शैवांच्या जुन्या मंदिरांपैकी (नाग- वंशाच्या समकालीन) येथील वीरेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.१७१६ च्या सुमारास जाट राजा नंदराम याचा मुलगा भोजसिंग याने हे शहर राजपुतांकडून जिंकून घेतले. त्यानंतर वंशपरंपरेने अनुक्रमे सदनसिंग, भूरीसिंग, त्याचा मुलगा राजा दयाराम यांची या शहरावर सत्ता होती. ऐतिहासिक अवशेषांपैकी राजा दयारामाचा किल्ला उल्लेखनीय आहे. नाग-वंशीयांच्या काळात या ब्रजभूमीत श्रीकृष्णाचा भाऊ व शेषनागाचाअवतार मानलेल्या बलरामाचे महत्त्व खूपच वाढले होते. या काळातयेथे बलरामाची अनेक मंदिरे बांधली गेली. भूरीसिंगाच्या कारकीर्दीत बांधण्यात आलेले बलरामाचे मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. हे मंदिर’ दाऊ बाबा’ या नावाने ओळखले जाते. १७८४ मध्ये या शहरावर महादजी शिंदे यांची सत्ता होती. पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीस इंद्रजीतसिंग थाईनुआ या जाट प्रमुखाकडे याची सत्ता गेली. शहराच्यापूर्व भागात त्याच्या किल्ल्याचे अवशेष अद्याप दिसून येतात. १८०३ मध्ये हे शहर ब्रिटिशांनी घेतले परंतु जाट प्रमुखाचा कडवा विरोध झाल्याने त्याच्या किल्ल्याचा ताबा मात्र १८१७ मध्ये वेढा देऊन ब्रिटिशांनाघ्यावा लागला होता. १८६५ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या काळात व्यापार दृष्ट्या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. १९ ऑक्टोबर १८७५ रोजी मथुरा कँटोन्मेंट ते हाथरसरोड अशी पहिली रेल्वे वाहतूक सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्यालढ्यात येथील राजा महेंद्रप्रताप, मुन्शी गजाधर सिंग इत्यादींनी मोठी कामगिरी बजावली होती.

 

हे शहर कापड, हिंग, देशी तूप, साखर, होळीचे रंग, गुलाल, सतरंज्या, रसायने, कृत्रिम मोती, खाद्य तेले यांच्या उत्पादनांसाठी व अन्न-धान्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. यांशिवाय येथील राजस्थानी तांबड्या पाषाणातील हवेल्या, दाऊजी उत्सव व त्या प्रसंगीचे नौटंकीचे कार्यक्रम, निसर्गसुंदर बोहरीवाला बाग, जुना किल्ला ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत. येथील लक्ष्मी-नारायण, बोहरीवाली देवी, गोपेश्वर महादेव, चौबेवाले महादेव, श्रीनाथजी, चामुंडा माँ इत्यादींची मंदिरे प्रसिद्ध आहेत.

चौंडे, मा. ल.