व्हिश्चला : (पोलिश – व्हीस्ला). पोलंडमधील सर्वांत मोठी नदी. लांबी १,०४७ किमी., जलवाहनक्षेत्र १,९४,४२४ चौ. किमी., पैकी ८०% क्षेत्र पोलंडमधील. दक्षिण पोलंडमधील कार्पेथियन पर्वतश्रेणीच्या पश्चिम बेस्क्रिड्झ पर्वतरांगेच्या उत्तर उतारावर उगम पावणारी ही नदी अनुक्रमे पूर्वेस, उत्तरेस, पश्चिमेस व पुन्हा उत्तरेस वाहत गेल्यानंतर एका विस्तृत अशा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करून डॅन्झिग शहराच्या पूर्वेस बाल्टिक समुद्राला जाऊन मिळते.

व्हिश्चला नदीप्रवाहाचे मुख्य तीन टप्पे पडतात : पहिल्या टप्प्यात उगमानंतर ती पूर्वेस व ईशान्येस वाहते. क्रेको शहराजवळून गेल्यानंतर सानडॉमिएशजवळ तिला सान ही उपनदी उजवीकडून येऊन मिळते. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात ती उत्तरेकडे वाहत जाते. वॉर्सा शहरजवळून पुढे वाहत गेल्यानंतर तिला नारेफ नदी मिळते. वॉर्साच्या पुढे ती वायव्य दिशेला वळते. टॉरून्यपासून पुढे बिडगॉशपर्यंत गेल्यानंतर ती काहीशी ईशान्येकडे जाऊन शेवटी बाल्टीक समुद्राला मिळते. मुखाजवळ व्हिश्च्ला खारकच्छाला मिळणारा नोगाट हा पूर्वेकडील फाटा व डॅन्झिग आखाताला मिळणारा लेनिवका (मार्त्वा व्हिश्चला) हा पश्चिमेकडील फाटा असे तिचे दोन फाटे आहेत. व्हिश्चला खारकच्छ व डॅन्झिग आखात एका लांबट वाळूच्या दांड्याने एकमेकांपासून अलग केले आहेत. लेनिवका फाटा दलदलयुक्त प्रदेशातून उत्तरेकडे जातो परंतु सध्या लेनिवका फाट्याशी समांतर वाहत जाणाऱ्या स्वीबीनो या मुख्य फाट्याने ती प्रत्यक्षपणे बाल्टीक समुद्राला जाऊन मिळते. तेथेच नॉव्हिपोर्ट हे डॅन्झिगचे सागरी बंदर आहे.

बग व्ह्येप्श, सान, व्हिस्लोका व डूनयेत्स या व्हिश्चला नदीच्या उजवीकडून, तर निडा, पीलीत्सा, बर्ड, वेर्झ्योका या डावीकडून मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या आहेत. 

डॅन्झिग, टोरून्य, वॉर्सा, क्रेको ही व्हिश्चला नदीवरील प्रमुख शहरे आहेत. व्हिश्चला खोऱ्यातील विभिन्न हवामानामुळे प्रवाहाच्या पातळीत कमी जास्तपणा आढळतो. व्हिश्चला व सान नद्यांतून जलवाहतूक चालते. क्रेकोपर्यंत लहान बोटीही जाऊ शकतात. त्यातून कोळसा, लाकूड व औद्योगिक उत्पादनांची वाहतूक केली जाते. नदीच्या फक्त खालच्या टप्प्यातच मोठी जहाजे वाहतूक करू शकतात. पूर्वेकडील बग या उपनदीने तसेच नीपर-बग कालव्याने व्हिश्चला नदी रशियातील अंतर्गत जलमार्गांशी, विशेषत: प्रीपेट व नीपर नद्यांशी जोडलेली आहे. बग व नारेफ नद्याही जलवाहतुकीस योग्य आहेत. बर्डा नदी, बिडगॉश कालवा व नॉटेच नदी यांनी पश्चिमेकडील ओडर व व्हिश्चला या नद्या एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. नेमान नदीशी ती कालव्याने जोडलेली आहे. विकसित अशा ओडर नदी-कालवा-संहतीपेक्षा व्हिश्चला नदीला पोलंडच्या आर्थिक विकासात तसे कमीच महत्त्व आहे. हिवाळ्यात ५० ते ६० दिवस व्हिश्चला नदीचा प्रवाह गोठलेला असतो.  

चौधरी, वसंत