पालनपूर : गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या ४२,११४ (१९७१). अहमदाबादच्या उत्तरेस १२३ किमी. मुंबई-बडोदे लोहमार्गाच्या पालनपूर –दीसा शाखेवरील एक प्रस्थानक असून मूळ गाव खोलात वसले आहे. त्याच्या सभोवती टेकड्या असल्यामुळे हवा उष्ण व कोरडी असूनही तापाचा प्रादुर्भाव आणि फुप्फुसाचे विकार आढळतात. पालनपूर पोलिटिकल एजन्सीचे हे मुख्य ठिकाण व पालनपूर संस्थानची राजधानी होते. दिवाण बहादूर खानजीने गावाभोवती १७५०  बांधलेला विटांचा तट ५ ते ६ मी. उंच, २ मी. रुंद व ५ किमी. लांबीचा आहे. पालनपूरचा उल्लेख प्राचीनकाळी चाब डा घराण्याच्या संदर्भात मिळतो. वनराजा (७४६ – ८०) हा चावडा घराण्याचा संस्थापक येथेच वाढला. तेराव्या शतकात चंद्रावतीच्या पोवार घराण्याचा प्रल्हादन देवाच्या वेळी हे राजधानीचे शहर होते. पुढे ते अफगाणिस्तानातील लोहाजी जमातीच्या घराण्याकडे गेले (चौदावे शतक). संस्थानिक नबाब ताले महंमद खान १९१८ साली गादीवर आले. त्यांना १९३६ साली ले. कर्नल हा हुद्दा मिळाला. येथील घरे इतस्ततः विखुरलेली असून रस्ते अरुंद आणि अस्वच्छ आहेत. विहिरीपासून पाण्याचा अपुरा पुरवठा होतो.

पालनपूर शहराचे प्रवेशद्वार  

येथे एक रुग्णालय, शाळा, दवाखाने, डाक व तार कार्यालय असून हे गुजरात राज्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे. अन्नधान्य, कापड, लोणी, तेलबिया व ऊस यांचे व्यापारी केंद्र आहे. तसेच येथे हातमागावर कापड विणले जाते आणि तेलबियांपासून तेल काढण्यात येते. यांशिवाय कलाकुसरीचे काम, धातुकाम इ. इतर उद्योगही येथे चालतात. 

पवार, चं. ता.

Close Menu
Skip to content