गॅझेटीअर: पृथ्वीवरील देश, प्रदेश, स्थळे, नद्या, पर्वत इत्यादींची वर्णानुक्रमाने मुख्यतः भौगोलिक व त्या अनुषंगाने ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक वगैरे अनेकविध माहिती देणारा कोश. गॅझेट्टा  हे व्हेनिसमधील एका नाण्याचे व १५६६ मध्ये त्या किंमतीस विकले जाणाऱ्या शासकीय वृत्तपत्राचे नाव होते. वृत्तपत्र या अर्थी गॅझेट हा शब्द अद्यापही वापरला जातो. गॅझेट लिहिणारा तो गॅझेटीअर असा प्रथम अर्थ होता. भौगोलिक माहितीचा कोश या अर्थी गॅझेटीअर हा शब्द सुरुवातीस दिलेल्या अर्थाने एकोणिसाव्या शतकात इंग्रजीतरूढ झाला. पाश्चात्त्य देशांत इ. स. पू. सहाव्या शतकात सायलॅक्स व त्यानंतर २०० वर्षांनी मीगॅस्थीनीझ यांनी भारताचा वृत्तांत लिहिला होता. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मौर्यकालीन भारताची भौगोलिक व आकडेवार माहिती आहे. फाहियान, ह्युएनत्संग, इब्न बतूता यांनीही आपापले वृत्तांत लिहून ठेवले आहेत. अल्-बीरूनीच्या इंडिकात सूक्ष्म निरीक्षण व शास्त्रीय विश्लेषण दिसते. सहाव्या शतकाच्या प्रारंभी बायझंटियममधील स्टेफीनने तयार केलेले गॅझेटीअर व १०८५-८६ मध्ये विल्यम द काँकररने करविलेल्या इंग्‍लंडच्या पाहणीवरून तयार झालेले डोम्स डे बुक (Domes Day Book) ही हल्लीच्या गॅझेटीअरची पूर्वस्वरूपे म्हणता येतील.

आधुनिक कल्पनेप्रमाणे प्रथम तयार झालेले गॅझेटीअर म्हणजे जिनीव्हात १५६५ मध्ये चार्ल्‌स स्टीफनने प्रसिद्ध केलेला  ऐतिहासिक भौगोलिक कोश Dictionarium historico-geographicum हा होय. यानंतर फेर्रारीचा लेक्सिकन जिऑग्राफिकम (Lexicon geographicum, १६२७), बॉड्रॉदचा Geographia ordine literarium disposita (१६८२), ला मार्टिनिरीचा डिक्शनेअर जिऑग्राफिक, हिस्टॉरिक एट क्रिटीक (Dictionnaire geographique, historique et critique, १७२६) इ. अनेक गॅझेटीअररूपी पुस्तके झाली. या सर्वांत तत्कालीन विशिष्ट शास्त्रीय कल्पना, लोकभ्रम व इतर सामान्य चुका असत. १८१७ मध्ये जर्मन भूगोलज्ञ योहान्न जी. एच्. हॅसेल याने रचिलेला Geographisch-statistisches Handworterbuch हा अलिप्त शास्त्रीय दृष्टिकोन आणि श्रमपूर्वक केलेले संशोधन यांनी युक्त कोश इतरांना प्रमाणभूत ठरला. त्याआधी १८०८ मध्ये क्रूट वेलचे युनिव्हर्सल गॅझेटीअर आणि नंतर एडिंबरो गॅझेटीअर (१८१७–२२), जॉन्स्टनची डिक्शनरी ऑफ जिऑग्राफी (१८५०), ब्‍लॅलीचेइंपीरिअल गॅझेटीअर (१८५०), माक्‌कलखची जिऑग्राफिकल डिक्शनरी (१८५१), लिपिनकॉटचे प्रोनाउन्सिंग गॅझेटीअर ऑफ दि वर्ल्ड (१८५५), रिटरचे Geographischstatistisches Lexicon (१८७४), व्हिव्हियन द सेंट मार्टिनचे Nouveau Dictionnaire de Geographie Universelle १८७९–१९००, लाँगमनचे गॅझेटीअर ऑफ दि वर्ल्ड (१८९५), जी. गॅरोल्लोचे Dizionario Geografico Universale (१८९८), केंडेचे Geographisches Worterbuch (१९२१), एवाल्ड एच्. ए. बॅन्सेचे Lexickon der Geographie (१९२३), रेनल्ड्झचे काँप्रिहेन्सिव्ह ॲटलास व गॅझेटीअर ऑफ दि वर्ल्ड (१९२५), वेब्‌स्टरची जिऑग्राफिकल डिक्शनरी (१९४९), कोलंबिया लिपिनकॉट गॅझेटीअर ऑफ दि वर्ल्ड (१९५२) ही गॅझेटीअरे प्रसिद्ध झाली. हल्ली बहुतेक नकाशासंग्रहांच्या शेवटी गॅझेटीअर असते. त्यात त्या संग्रहातील नकाशांत दाखविलेल्या भौगोलिक गोष्टींची वर्णानुक्रमाने यादी व ती कोणत्या नकाशात कोठे सापडतील ते दिलेले असते. काही संग्रहांत स्थळांचे अक्षांश, रेखांश, लोकसंख्या इ. माहितीही त्याबरोबर असते.

भारतीय गॅझेटीअरे : यूरोपात गॅझेटीअर साहित्याची वाढ प्रबोधन काळात व औद्योगिक क्रांतीनंतर झाली. यूरोपीय जगभर पसरले व सर्व गोष्टींचे कुतूहलाने सूक्ष्म निरीक्षण व टिपण करू लागले. ब्रिटिशांना अपरिचित लोकांच्या मोठ्या प्रदेशाचा कारभार करण्यासाठी राजकीय, सामाजिक, सैनिकी, वसुली यांच्या दृष्टीने आकडेवार पाहणी करावी लागली. त्यात निरीक्षणतज्ञ परदेशी प्रवाशांच्या वृत्तांताची भर पडली. कर्नल मॅकेंझीची पाहणी, लोगनचे मलबारवर्णन, बुकननचे मद्रास ते म्हैसूर, कानडा व मलबार यांचे प्रवासवृत्त इत्यादींप्रमाणे १८१५ चे वॉल्टर हॅमिल्टनचे ईस्ट इंडिया गॅझेटीअर, १८५४ ची एडवर्ड थॉर्नटनची ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखालील प्रदेशांची गॅझेटीअरे इ. प्रसिद्ध झाली. १८५७ पूर्वीच डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल अकौंट्सचे– जिल्ह्याच्या आकडेवार वृत्तांतांचे– काम हाती घेतले गेले होते. १८६६ मध्ये रिचर्ड टेंपलने मान्य अर्थाने मध्य प्रांतातील जिल्ह्यांची अधिकृत गॅझेटीअरे तयार करून प्रसिद्ध करण्यात पुढाकार घेतला. मुंबई इलाख्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे गॅझेटीअर सरकारी आदेशानुसार जेम्स एम्. कँबेल याने तयार केले होते. त्यात त्या त्या जिल्ह्याचे भौगोलिक वर्णन, उत्पन्ने, लोकसंख्या, शेतकी, भांडवल, व्यापार, इतिहास, जमिनीचा महसूल, न्याय, सार्वजनिक पैशाची व्यवस्था इ. अनेक बाबींचा तपशील दिलेला आढळतो. याच पद्धतीवर इतर इलाख्यांत आणि काही संस्थानांतही गॅझेटीअरे तयार झाली. प्रांतिक सरकारांच्या या प्रयत्‍नांत एकसूत्रता नव्हती. तेव्हा हिंदुस्थान सरकारने मध्यवर्ती सत्तेखाली इंपीरिअल गॅझेटीअर तयार करण्याची विल्यम विल्सन हंटर याची सूचना १८७१ मध्ये स्वीकारली. प्रांतिक गॅझेटीअरांच्या संपादकांच्या स्वतःच्या काही कल्पना असत व कित्येकदा राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा स्थानिक प्रश्नांना अधिक महत्त्व दिलेले असे. हंटर हा स्वतः विद्वान व उत्तम प्रशासक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली १८८१ मध्ये इंपीरिअल गॅझेटीअरचे ९ खंड प्रसिद्ध झाले. १८८२ मध्ये इंडियन एंपायर, इट्स हिस्टरी, पीपल्स अँड प्रॉडक्ट्स हे पुस्तक निघाले. १८८१ ची जनगणना व देशाच्या जीवनात वेगाने होणारा बदल यांस अनुसरून १८८५ मध्ये इंपीरिअल गॅझेटीअरच्या दुसऱ्या आवृत्तीचे १४ खंड निघाले. ते देश व लोक यांचा संपूर्ण विश्वासार्ह वृत्तांत मानले जाऊ लागले. या शतकाच्या सुरुवातीस ते कालबाह्य ठरल्याने लॉर्ड कर्झनच्या प्रेरणेने १९०७–०९ मध्ये २६ खंडांची सुधारलेली आवृत्ती निघाली. पहिल्या चार खंडांत हंटरच्या इंडियन एंपायरची सुधारलेली आवृत्ती, पुढील २० खंडांत वर्णानुक्रमाने माहिती आणि शेवटच्या दोन खंडांत सूची व नकाशे अशी रचना होती. प्रांत व जिल्हा हे घटक धरून त्यांचीही अशी गॅझेटीअरे निघाली. काही संस्थानांनीही आपापली अशी माहितीची पुस्तके काढली. त्यानंतर गेल्या ५० वर्षांत अशी सर्वंकष पाहणी झाली नाही. फक्त आकडेवारी प्रसिद्ध होत राहिली.

नंतरच्या काळात देशात व बाहेर क्रांतिकारक बदल झाले. आशियाई राष्ट्रे स्वतंत्र झाली. आफ्रिकेला जागतिक प्रश्नांत महत्त्वाचे स्थान मिळत आहे. वसाहतवाद नामशेष झाला आहे. विज्ञान व तंत्र यांमुळे जुन्या आर्थिक व सामाजिक संस्थांत बदल होत आहे. भारताचे स्वातंत्र्य, महायुद्धानंतर झालेली औद्योगिक प्रगती, शिक्षणाचा प्रसार, लोकांच्या नैतिक व मानसिक प्रवृत्तींत बदल, यांमुळे सामाजिक आणि राजकीय जीवन बदलले आहे. प्राकृतिक रचना, हवामान इत्यादींचेही नवीन उपलब्ध ज्ञानानुसार पुनर्लेखन अवश्य झाले आहे. एप्रिल १९५१ मध्ये केंद्रीय गॅझेटीअर पुनर्रचनेची योजना मौलाना आझाद यांनी संसदेत मांडली. केंद्र शासनाने भारतीय स्वरूपाचे खंड आणि राज्य शासनांनी जिल्हावार नवीन गॅझेटीअरे तयार करावी असे ठरले. गॅझेटीअर पुनर्रचनेस मुंबई राज्याने १९४९ मध्ये सुरुवात करून आघाडी मारली. १९५४ मध्ये पुणे खंड प्रसिद्ध झाला. इतर राज्यांनीही मग सुरुवात केली. वर्णानुक्रमाने खंड न करता जिल्हा गॅझेटीअरांची अखिल भारतीय सूची करावी असे ठरले. जिल्हा गॅझेटीअरे झाल्यावर राज्य गॅझेटीअरे करावयाची आहेत. या सर्वांचे स्वरूप एका विशिष्ट योजनेप्रमाणे व विशिष्ट दर्जाचे राहील. जानेवारी १९५८ मध्ये सेंट्रल गॅझेटीअर युनिट व फेब्रुवारीत त्यासाठी सेंट्रल ॲडव्हायझरी बोर्ड स्थापन झाले. ऑगस्ट १९५९ मध्ये प्रा. हुमायून कबीर यांची त्यांच्या अध्यक्षपदी योजना झाली. एकूण ३०० जिल्हा गॅझेटीअरे व्हावयाची आहेत १९६४ मध्ये ७२ तयार होती. इंपीरिअल गॅझेटीअर ऑफ इंडिया  याचे नवे स्वरूप गॅझेटीअर ऑफ इंडिया: इंडियन युनियन  असे असून त्याचे संकल्पित चार खंड आहेत: (१) देश व लोक, (२) इतिहास व संस्कृती, (३) आर्थिक संरचना व घडामोडी, (४) प्रशासन व सार्वजनिक कल्याण. हे खंड इंग्रजीत लिहिले जात असून त्यांपैकी पहिला खंड १५ ऑगस्ट १९६५ रोजी प्रसिद्ध झाला आहे. प्रत्येक खंडातील प्रत्येक प्रकरण त्या त्या विषयातील अधिकारी तज्ञाने लिहिलेले असेल.

नवीन गॅझेटीअर शासकांना आणि जनतेलाही शिक्षण देईल. त्यात वस्तुस्थिती तर असेलच पण स्वतंत्र भारताच्या विचारधारा, ध्येये व महत्त्वाकांक्षा हीसुद्धा प्रतिबिंबित झालेली असतील.

वाघ, दि. मु. कुमठेकर, ज. ब.