मरी, सर, जॉन : ( ३ मार्च १८४१ – १६ मार्च १९१४ ). ब्रिटिश संशोधक आणि महासागरविज्ञानाचा एक जनक. कॅनडाच्या आँटॅरिओ राज्यातील कोबर्ग येथे जन्म. एडिंबरो विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. बहुतेक जीवन त्याने ग्रेट ब्रिटनमध्येच व्यतीत केले.

मरीने १८६८ साली आर्क्टिक प्रदेशातील यान मायेन व स्पिट्‍सबर्गेन ( स्वालबार द्वीपसमूह ) बेटांच्या काही भागांचे संशोधन केले. सागरतळाचे चित्रण, संशोधन व प्रवाळभित्ती या विषयांतील त्याचे व्यक्तिगत कार्य महत्त्वाचे आहे. आपल्या या मोहिमेत त्याने सागरी जीवसृष्टीचे महासागरविज्ञानाच्या दृष्टीने विविध प्रकारांनी संशोधन केले. जगभराच्या सागरी संशोधनाच्या हेतूने प्रथमच निघालेली मोहीम म्हणजे ‘चॅलेजर मोहीम’ ( १८७२ – ७६ ). १८७२ साली कॅप्टन सर चार्ल्स विव्हिल टॉम्‍सन याच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या मोहिमेत जॉन मरी एक संशोधन म्हणून गेला. सागरी पृष्ठभागापासून ते तळापर्यतच्या सर्व भागांचे सागरी जीवविज्ञान, भूविज्ञान, रसायनशास्त्र, भौतिक महासागरविज्ञान या विविध दृष्टींनी प्रथमच संशोधन करण्यात आले. टॉम्‍सन आणि मरी ह्यांनी गोळा केलेले महत्त्वाचे नमुने एडिंबरो येथे अभ्यासण्यात आले. ते जगभराच्या सागरी वैज्ञानिकांच्या संशोधनास चालना देणारे ठरले. सर विव्हिल टॉम्‍सनच्या मृत्यूनंतर मरीने ह्या मोहिमेवरील रिपोर्ट ऑन द सायंटिफिक रिझल्ट्‍स ऑफ द व्हॉयिज ऑफ एच्‍. एम्‍. एस्‍. चलेंजर या संशोधनपर ग्रंथाचे पन्नास अपूर्ण खंड पूर्ण केले (१८८० – ९५ ).

मरीला १८९८ साली ‘सर’ हा बहुमान मिळाला. स्कॉटलंडच्या किनार्‍याची जीवशास्त्रीय दृष्ट्या पाहणी करून ग्रँटन व मिलपोर्ट येथील संशोधन संस्थांना त्याने काही नमुने सादर केले ( १९०६ ). १९१० साली योहान यॉर्ट याच्यासमवेत उत्तर अटलांटिकच्या सागरी मोहिमेत त्याने भाग घेतला. त्याचा ऑन द स्ट्रक्‍चर अँड ओरिजिन ऑफ कोरल रीफ्‍स अँड आयलंड्‍स हा संशोधनपर लेख ( १८८० ) व उत्तर अटलांटिकच्या सफरीवरील द डेप्थ्‌स ऑफ द ओशन ( १९९२ ) ( सहलेखक – यॉर्ट ) हे ग्रंथ महासागरविज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जातात. कर्क्लिस्टनजवळ ( स्कॉटलंड ) त्याचे अपघाती निधन झाले.

पंडित,भाग्यश्री