अँडीज पर्वत : दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळची, त्याला समांतर असलेली, उंचीला फक्त हिमालयाच्याच खालोखाल आणि जगातील सर्वांत लांब—केप हॉर्न ते पनामापर्यंत सु. ७,२४० किमी. किंवा टिएरा डेल फ्यूगो ते कॅरिबियनपर्यंत सु. ६,४४० किमी.– पर्वतश्रेणी. केचुआ इंडियनांच्या ‘पूर्व’ या अर्थाच्या ‘अँटी’ किंवा ‘तांबे’ या अर्थाच्या ‘अँटा’ या शब्दावरून कदाचित ‘अँडीज’ हे नाव पडले असावे. याच्या पूर्वेस ओरिनोकोचे लानोज, ॲमेझॉनचे खोरे, पूर्व बोलिव्हिया व पाराना यांची मैदाने आणि पॅटागोनियाचे पठार आहे. पश्चिमेस अँडीज व पॅसिफिक महासागर यांच्या दरम्यान अगदी चिंचोळी किनारपट्टी असून, काही ठिकाणी अँडीजचे फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत, तर काही ठिकाणी किनारी पर्वतरांगा आहेत. चिलीमधील किनारी रांगा सलग असल्यामुळे त्या व अँडीज यांच्या दरम्यान सांरचनिक दरी आहे. सबंध दक्षिण अमेरिका खंडावर या पर्वतश्रेणीचा फार मोठा प्रभाव आहे. त्यातील फक्त ब्राझील, पॅराग्वाय व यूरग्वाय या तीन राज्यांतच अँडीजच्या रांगा नाहीत. व्हेनेझुएलाची काराकास (९०२ मी.), कोलंबियाची बोगोटा (२,६४० मी.), एक्वादोरची कीटो (२,८१७ मी.) व बोलिव्हियाची ला पास (३,६३० मी.) या चार राजधान्या अँडीजमध्ये उंचावर आहेत. इंकांची जुनी राजधानी कूस्को ही ४,४०० मी. उंचीवर होती. अँडीज पर्वत पूर्वपश्चिम ओलांडण्यास सर्वांत कमी उंचीची जागा सु. ३,०५० मी. उंचीवर आहे. ॲकन्काग्वा (७,०३५ मी.), पिस्सिस (६,८६२ मी.), वास्कारान (६,७६८ मी.), मेर्सेदार्यो (६,७७० मी.), सोराटा किंवा इयांपू (६,५५० मी.), साहामा (६,५२० मी.), ईयीमानी (६,४४७ मी.), चिंबोराझो (६,२७२ मी.), कोटोपाक्सी (५,८९६ मी.) ही अँडीजमधील काही उंच शिखरे आहेत. अँडीज हा दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यापासून १६० किमी. अंतरावर ४,५०० मी. उंच एकदम भिंतीसारखा अभा राहिलेला पर्वत आहे एवढेच नव्हे, तर समुद्राची खोलीही या किनाऱ्यापासून तेवढ्याच अंतरावर ६,००० मी. आहे. यावरून येथे मोठ्या प्रमाणात गटविभंग झाला असावा.

भूविज्ञान : अँडीजचे भूविज्ञान फार जटिल आहे. ही एकच एक पर्वतश्रेणी नसून अनेक सांरचनिक घटक येथे एकत्र आले आहेत. सामान्यत: वलीकरण व विभंग यांमुळे येथील रचना झालेली दिसते. तथापि जागृत ज्वालामुखींचा प्रभाव दक्षिण व मध्य पेरू, दक्षिण चिली, बोलिव्हिया व चिली यांची सीमा आणि एक्वादोर व दक्षिण कोलंबिया या चार भागांत स्पष्टपणे दिसून येतो. मृत ज्वालामुखी तर सर्वत्र आहेत. येथील गाळाचे व ज्वालामुखीजन्य खडक आर्कियन कालखंडातील प्राचीन, जटिल पायावर उभे आहेत. पुराजीव महाकल्पातील खडकांत कँब्रियन क्वार्टझाइट, सिल्यूरियन शिस्ट, डेव्होनियन पिंडाश्म व वालुकाश्म आहेत. मध्यजीव महाकल्पातील खडक पुष्कळ ठिकाणी उघडे पडलेले आहेत. जीवाश्मयुक्त ज्युरॅसिक व क्रेटेशियन चुनखडक येथे आहेत. प्राचीन भूवैज्ञानिक काळात अँडीज प्रदेश ही एक खचलेली द्रोणी होती. तिच्यात सिल्यूरियन शेल व कार्बोनिफेरस चुनखडक यांचे जाड थर साचले. मध्यजीव महाकल्पातील काळात चुनखडक व वालुकाश्म यांचे थर साचले. क्रिटेशसच्या शेवटीशेवटी सबंध दक्षिण अमेरिका खंडात उत्थान, वलीकरण, प्रणोदविभंग या क्रिया मोठ्या प्रमाणावर झाल्या. नवजीवन-कालखंडात क्षरणाने स्थलीप्राय भूमी निदान मध्य अँडीजमध्ये तयार झाली. उत्तर नवजीवन-कालात पुन्हा उत्थापन होऊन ९०० ते २,१०० मी. पर्यंत उंची प्राप्त झाली. प्लायोसीन व पूर्व प्लेइस्टोसीन काळात पुन:क्षरण व उत्थापन झाले. सध्या ३,६५० मी. उंचीवर व बोलिव्हियाच्या १,८०० ते ४,५०० मी. उंचीच्या भागात हे जुने पृष्ठभाग दिसून येतात. तेथे लाव्हा प्रवाह व लाव्हाचे बनलेले पर्वत यांचे त्यांवर आच्छादन आहे. वारंवार होणारे भूकंप  पर्वतनिर्माणक्रियेचे गमक मानले तर सध्या अँडीजची उंची वाढत आहे. प्लेइस्टोसीन काळात दक्षिण अँडीज भागात व मध्य आणि उत्तर अँडीजच्या उंच भागात हिमानीक्रिया विस्तृत प्रमाणात व परिणामकारक रीत्या झालेली होती.

भूवर्णन : अँडीजची बरीच शिखरे हिमाच्छादित आहेत. विषुववृत्ताजवळही उंचीमुळे हिमाच्छादन आढळते. सर्वांत मोठ्या हिमनद्या दक्षिण चिलीत आढळतात. काही पॅसिफिकपर्यंत जातात. दक्षिण अँडीजमधील पुष्कळ हिमनद्यांनी खडकाळ किनाऱ्यावर खोल दऱ्या कोरलेल्या आहेत. या दऱ्या पाण्याखालीही खोल गेलेल्या आढळतात. त्यामुळे येथे नॉर्वेसारखा दंतुर किनारा आढळतो.

अँडीजचे दक्षिण, मध्य व उत्तर असे तीन मुख्य भाग पडतात. दक्षिण अँडीजच्या अरुंद रांगेची उंची ३,००० मी. पर्यंत आढळते. हिची सुरुवात अंटार्क्टिकातील पामर भूशिरापासून होते, असे म्हणता येईल. त्यात उत्तर बाजूस शिखरे उंच होत गेलेली आहेत. ॲकन्काग्वा हे अँडीजचे सर्वोच्च शिखर अर्जेंटिनात असले, तरी चिलीच्या सँटिआगोपासून फक्त १०५ किमी. दूर आहे. मध्य अँडीजमध्ये आग्नेय-वायव्य दिशेने जाणाऱ्या दोन रांगा असून त्यांमध्ये पेरू-बोलिव्हियाचे सु. ३,६०० मी. उंचीचे पठार आहे. पुढे एक्वादोरमध्ये दोन्ही रांगा एक होतात. उत्तर अँडीजमध्ये मध्य अँडीजपेक्षा कमी उंचीच्या तीन रांगा आहेत. त्यांपैकी एक किनाऱ्या‍किनाऱ्याने कोलंबियातून पनामाकडे जाते. तिचा संबंध मध्य अमेरिकेतील पर्वत व मेक्सिकोतील सिएरा माद्रेशी लागतो. मधली रांग कोका व मॅग्डालीना या नद्यांच्या दरम्यान आहे. तिच्यात तोलीमा हा ५,२१५ मी. उंचीचा प्रसिद्ध ज्वालामुखी आहे.पूर्वेकडील रांगेच्या दोन शाखा होतात. एक व्हेनेझुएला—कोलंबिया सीमेवरून जाते व दुसरी माराकायव्हो सरोवराच्या दक्षिणेस सीमा ओलांडून कॅरिबियनकडे जाते. तिचा संबंध अँटिलीस द्वीपसमूहातील पर्वतांशी दिसतो. उत्तर अँडीजमधील पुष्कळ शिखरे ४,५७५ मीटरपेक्षा उंच आहेत. त्यांपैकी क्रिस्तोबल कोलोन हे ५,७७५ मी. उंचीचे सर्वांत उंच आहे. एक्वादोरमधील कोटोपाक्सी, तूंगूराग्वा व सांगाय हे ज्वालामुखी जागृत आहेत. धरणीकंप नेहमीच होतात. त्यामुळे पुष्कळ शहरांचे नुकसान झाले आहे व्हॅलपारेझो, लीमा, कायाओ व कीटो ही त्यांपैकी काही होत. १९५९ मध्ये चिलीत मोठा भूकंप झाला होता आणि त्याहूनही विध्वंसक भूकंप पेरूमध्ये १९७० साली झाला.

अँडीजमुळे पॅसिफिक दक्षिण अमेरिका व अटलांटिक दक्षिण अमेरिका असे दोन प्रादेशिक भाग पडतात एवढेच नव्हे, तर त्याच्यामुळे त्याच्या दोहो बाजूंच्या प्रदेशांच्या हवामानातही फरक पडतो. दक्षिण चिलीत पश्चिम बाजूला जास्त पाऊस, तर पूर्वेकडे पँटागोनियाचा निमओसाड प्रदेश आहे. उत्तर चिली व पेरू येथे पश्चिम किनाऱ्यावर पर्जन्यहीन ओसाड प्रदेश आहे व पूर्वेकडे जंगलमय प्रदेश आहे. विषुववृत्तीय प्रदेश व दक्षिण चिली सोडले, तर अँडीजच्या पश्चिमेकडील भाग पूर्वेकडील भागापेक्षा कमी पावसाचा आहे. ॲमेझॉनचे मुख्य उगमप्रवाह व तिच्यासारख्याच मोठ्या उपनद्या अँडीजच्या पूर्व उतारावर उगम पावतात. ओरिनोको व पाराना यांनाही अँडीजमधून आलेल्या उपनद्यांचे पाणी मिळते. पॅसिफिकला मिळणारी एकही नाव घेण्याजोगी मोठी नदी नाही.

बोलिव्हिया व पेरू यांच्या रुंद, पठारी भागावरील पाणी पॅसिफिककडे किंवा अटलांटिककडे न जाता तितिकाका या सरोवरात जाते. हे सरोवर जगातील सर्वांत जास्त उंचीवर (३,८१० मी.) असलेले गोड्या पाण्याचे विस्तीर्ण सरोवर आहे. त्याचे पाणी देसाग्वादेरो नदीमार्गे पोओपो सरोवरात जाते. पोओपोतून पाणी बाहेर पडण्याच्या मार्गाच्या पातळीखाली त्याच्या पाण्याची पातळी आहे. त्यामुळे पाणी विशेष वाढते तेव्हाच ते बाहेर पडते व जवळच्या दलदलीत जाते. अँडीजच्या पूर्व व पश्चिम उतारांवर अर्जेंटिना व चिलीमध्ये हिमानीक्रियेने तयार झालेली पुष्कळ सरोवरे आहेत.


खनिजे : अँडीजमध्ये डायोराइट, अँडेसाइट व पॉर्फिरीझ हे खनिजयुक्त खडक आढळतात. अर्वाचीन ज्वालामुखीच्या भागात गंधक व बोरॅक्स मिळते. अँडीजमधील खाणींमुळे इंका लोकांनी ब्राँझ व तांबे यांची हत्यारे व सोन्याचांदीचे दागिने व धार्मिक विधींसाठी भांडी वगैरे बनविली. हल्ली सोने व चांदी यांपेक्षा तांबे व कथील यांचे उत्पादन अधिक आहे. पेरूमधील सेंट्रल टेल रोडच्या भोवतीचा प्रदेश, बोलिव्हियाचा पूर्वेकडील पर्वतविभाग व उत्तर चिलीतील नायट्रेट पट्ट्याच्या पूर्वेचा पश्चिम पर्वतविभाग हे प्रदेश खाणींसाठी प्रसिद्ध आहेत. वाहतूक, यंत्रसामग्री, कामगार, अन्न व जळणपुरवठा या अडचणींमुळे मोठमोठ्या कंपन्याच खाणी चालवू शकतात. कोळसा फारच थोडा मिळतो आणि काही खाणी तरुरेषेच्याही वर असल्यामुळे लाकूड वापरता येत नाही. कामगार दुसरीकडून आणावे लागतात आणि काही खाणींना सर्व प्रकारचा पुरवठा फक्त विमानांनीच करता येतो. बोलिव्हियाच्या निर्यातीचा ८०% भाग कथील आहे. तेथे चांदी, तांबे, टंग्स्टन, अँटिमनी, शिसे, जस्त, बिस्मथ, प्लॅटिनम, पारा ही खनिजेही सापडतात. चिलीतील चूकिकामाताच्या, तांब्याच्या खाणी प्रसिद्ध आहेत. चिलीचे तांबे-उत्पादन दक्षिण अमेरिकेत सर्वांत जास्त आहे.

अँडीजचा दक्षिणोत्तर विस्तार फार मोठा आणि त्याची उंचीही पुष्कळ यामुळे तेथे हवामानाचे सर्व प्रकार आढळतात. अर्थातच विषुववृत्तीय वर्षावनांपासून मरुभूमीतील काटेरी झुडुपांपर्यंत आणि पायथ्याच्या जंगलांपासून उंचीवरील आल्प्स प्रकारच्या गवतापर्यंत वनस्पतींचे अनेक प्रकार येथे आढळतात. तीच गोष्ट प्राण्यांबद्दलही सांगता येईल. ह्युमुल हरिण, अल्पाका, लामा, चिंचिला, काँडॉर पक्षी इ. खास दक्षिण अमेरिकेतील प्राणी अँडीजच्या निरनिराळ्या भागांत आढळतात.

दळणवळण : अँडीजमध्ये लोहमार्ग तयार करणे फार कठीण आहे. डोंगर फार उंच व खड्या चढाचे आहेत. मध्य अँडीजमध्ये ३,००० मी. उंच गेल्यावर मगच तो ओलांडण्यास खिंड सापडते. अँडीजच्या पश्चिम उतारावरून पेरू व बोलिव्हियातील खनिजांच्या प्रदेशापर्यंत जाणारे चार लोहमार्ग आहेत. त्यांपैकी ला आँरॉयाने लीमा हा ४,८०० मी. उंचीवर आहे. प्रमाणमापाचा हा जगातील सर्वांत अधिक उंचीवरील लोहमार्ग आहे. पेरूमधील पश्चिम किनाऱ्यावरील कायाओपासून १६० किमी. आत असलेल्या सेरो द पास्कोपर्यंत पक्का रस्ता आहे. तेथून ॲमेझॉनच्या एका शाखेपर्यंत खोल दरीतून बारमाही रस्ता जातो. अँडीजवरून पलीकडे पेरूच्या सखल प्रदेशात चार रस्ते जातात. अँडीजमध्ये वायुमार्ग अधिक उपयोगी पडतात. चिलीच्या सँटिआगोपासून अर्जेंटिनाच्या ब्वेनस एअरीझपर्यंत नियमित विमानवाहतूक आहे. उस्पालाता या ३,८०० मी. उंचीवरील खिंडीखालून ३,१९० मी. उंचीवरील ३,०२१ किमी. बोगद्यातून लोहमार्ग जातो. या खिंडीच्या मार्गाने विमानेही जातात. या दोन देशांतील सीमानिश्चितीच्या स्मरणार्थ सीमेवर उभारलेला ‘ख्राइस्ट ऑफ द अँडीज’ हा प्रचंड पुतळा येथे दिसतो. या खिंडीतील निरीक्षणकेंद्राकडून विमानांना हवामानाची माहिती पुरविली जाते. येथून जवळच एका बाजूला ॲकन्काग्वा व दुसऱ्या बाजूस तूपूंगगातो ही शिखरे आहेत.

अ‍ँडीजमध्ये प्राचीन काळापासून लोकवस्ती आहे. इंका व चिब्चा या सुसंस्कृत लोकांच्याही पूर्वीपासून अँडीजच्या उंच भागातील पठारे व खोलगट भाग येथे इंडियन लोकांनी वस्ती केलेली होती. ते तेथे निर्वाहशेती करून राहत असत व अजूनही राहतात. त्यांची जीवनपद्धती अगदी साधीसुधी व निसर्गावलंबी आहे. अँडीजमधील खनिजसंपत्तीचा त्यांनी काही उपयोग केला परंतु आधुनिक काळात येथील खनिजे हेच अँडीजचे मोठे आकर्षण व प्राप्तिसाधन आहे. अलीकडे पर्यटनद‌ृष्ट्याही येथील कित्येक भागांस महत्त्व येत आहे.

संदर्भ : 1. Huxley, A., Ed. Standard Encyclopaedia of World Mountains, London, 1964.

           2. James, P. E. Latin America, New York, 1954.

कुमठेकर, ज. व.