वेंझबरी : इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड परगण्यातील एक नगरपालिकीय बरो. लोकसंख्या ३५,००० (१९७१). हे इंग्लंडच्या पश्चिममध्य भागात, बर्मिंगहॅमच्या वायव्येस १२ किमी. अंतरावर वसलेले आहे. प्राचीन काळी हे एक महत्त्वाचे व्यापारी ठाणे होते. इ.स. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात सॅक्सन व ब्रिटन लोक यांच्यात येथे लढाई झाली. दहाव्या शतकाच्या पूर्वार्धात आल्फ्रेड द ग्रेट याची कन्या एथलफ्लेड हिने या ठिकाणी एक किल्ला बांधला. येथील पॅरिश चर्च सर्वांत जुन्या चर्चपैकी एक आहे. पोलाद व पोलादी वस्तू यांच्या उत्पादनांचे हे एक प्रमुख केंद्र आहे. त्याशिवाय विद्युत्‌ सामग्री, मोटारींचे सुटे भाग, धातूच्या खिडक्या व घरगुती उपयोगाच्या वस्तूंची उत्पादने येथे केली जातात.                                    

चौधरी, वसंत