लूनी नदी : राजस्थान राज्याच्या पश्र्चिम भागातील मैदानी प्रदेशातून वाहून समुद्रापर्यंत पोहोचणारी राज्यातील एकमेव नदी. जलवाहन क्षेत्र ३७,२५० चौ. किमी. लांबी सु. ५३० किमी. अजमीर शहराच्या नैर्ॠत्येला ५ किमी. वरील अनासागर जलाशयातून उगम पावणारी ही नदी सुरुवातीच्या भागात सागरमती म्हणून ओळखली जाते. पुष्कर सरोवरात उमग पावणारी सरसुती (सरस्वती) नदी गोविंदगडच्या पुढे तिला मिळते व तेथपासून ती लूनी या नावाने ओळखली जाते. पश्र्चिम व नैर्ॠत्य दिशांदरम्यान सु. ३२० किमी. अंतर कापत अरवली पर्वताला समांतर वाहणारी ही नदी अखेरीस कच्छच्या रणातील दलदलयुक्त प्रदेशात अदृश्य होते. सुक्री, बांदी, जवाई, खारी, सुरेली, इ. अरवली पर्वताच्या पश्र्चिम उतारावर अजमीर व अबू यांदरम्यान उगम पावणाऱ्या उपनद्या तिला डावीकडून येऊन मिळतात. मात्र त्यांतील सुक्री ही एकच नदी मोठी असून इतर उपनद्या म्हणजे छोटे प्रवाह आहेत. लूनी नदीला पावसाळ्यातच पाणी असते. उन्हाळ्यात तिचे पात्र कोरडे ठणठणीत असते. या काळात जमिनीची सुपीकता व ओलावा यांचा उपयोग करून नदीच्या पात्रात कलिंगडे व शिंगाडे यांसारखी पिके घेण्यात येतात. नदीच्या दोन्ही बाजूंस २ ते ५ मी. उंचीचे तट असून पावसाळ्यात काही वेळा पूर आल्याने नदीचे पाणी तटांवरून ओसांडून वाहू लागते. या पाण्याबरोबर वाहत आलेला गाळ आजूबाजूच्या परिसरात पसरतो आणि त्यावर गहू व सातू यांसारख्या अन्नधान्याचे पीक येते. म्हणूनच वाळवंटाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांना ती वरदान ठरली आहे. या भागातील अन्नोत्पादनाचा निम्मा भाग म्हणजे ‘लूनीची देणगी’ आहे, असे म्हटले जाते. मात्र ही नदी फार लहरी असून ती काही वेळा हानिकारक ठरण्याचीही शक्यता असते.

 

बालोत्रा शहरापर्यंतच्या वरच्या निम्म्या भागात नदीचे पाणी गोड असते. त्याखालच्या भागात मात्र ते खारट होऊ लागते व त्याची क्षारता अधिकाधिक वाढत जाते. यामुळेच तिला ‘लूनी’ हे नाव पडले असावे. संस्कृत वाङ्मयात तिचा ‘लोणावरी’ किंवा ‘लवणवारी’ (लवण = मीठ, वारी = पाणी) म्हणजेच ‘खारट पाणी’ असा उल्लेख आढळतो. कच्छच्या रणाला मिळताना तर पाणी इतके खारट बनते की, तिच्या मुखाकडील तीन मुख्य शाखांचा ‘संपृक्त लवणजलाचे साठे’ असाच उल्लेख करण्यात येतो. मुखाशी तिने छोटासा त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला असल्याने तिला पूर्वी भरपूर पाणी असावे, असे मानण्यात येते. या नदीवर बिलारा शहराजवळ बंधारा बांधून जलाशय निर्माण करण्यात आला असून जोधपूरच्या राजपुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याचे ‘जसक्त सागर’ असे नामकरण करण्यात आले आहे. या बंधाऱ्यामुळे ५,००० हेक्टर जमिनीला पाणीपुरवठा झाला आहे.

लूनीच्या खोऱ्याचा बराचसा भाग सखल, मैदानी आहे. खालच्या भागाची उंची तर २० मी. पेक्षा क्वचितच जास्त भरते. तरीदेखील अरवली पर्वत व नदी यांमधील पूर्व भागच शेतीयोग्य आहे. येथील जमीन नदी व तिच्या उपनद्या यांनी आणलेल्या गाळाने सुपीक बनली असून भूजलपातळी जमिनीपासून फारशी खोल नाही. नदीच्या उजव्या किनाऱ्याकडून पश्र्चिमेकडे मात्र वाळवंटी परिस्थिती तीव्र होत जाऊन भूजलपातळी खूप खोल जाते. कच्छच्या रणाला येणाऱ्या पुरालादेखील लूनी नदी अंशतः कारणीभूत आहे. बिलारा, लूनी, सामदरी, बालोत्रा, गुऱ्हा इ. या नदीवरील प्रमुख शहरे आहेत.

फडके, वि. शं.