नरसिंहस्वामी मंदिर, नेल्लोर.

नेल्लोर : आंध्र प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,३३,५९० (१९७१). हे मद्रास-कलकत्ता या लोहमार्गावर व राष्ट्रीय महामार्गावर, मद्रासच्या उत्तरेस १५३ किमी.वर असून पेन्नार नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. चोल, पांड्य, काकतीय व मुस्लीम राजांचे आधिपत्य या शहरावर होते.पांड्य काळात ‘नेलूरू’ (भाताच्या पिकाचे आगर) हे नाव त्यास पडले. दक्षिण भारतात अठराव्या शतकात इंग्रज व फ्रेंच यांच्यात सत्तास्पर्धा चालू होती, त्यावेळेपासून शहराचे महत्त्व वाढले. १८६६ पासून येथे नगरपालिका असून हे अभ्रक उत्पादन व त्यावरील प्रक्रियेचे मुख्य ठिकाण आहे. येथे मातीची भांडी बनविणे, कापड रंगविणे, हस्तव्यवसाय, तंबाखूवरील प्रक्रिया, मोटारदुरुस्ती आणि भातसडीच्या व तेलगिरण्या इ. उद्योगधंदे चालतात. येथे अमेरिकन बॅप्टिस्ट आणि रोमन कॅथलिक मिशन तसेच युनायटेड फ्री चर्च मिशन हायस्कूल, वेंकटगिरी राजाचे हायस्कूल ही जुनी माध्यमिक विद्यालये व आंध्र विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालयेही आहेत. शहराच्या दक्षिणेकडील नरसिहकोंडा टेकडीवर अनेक देवळे आहेत.

सावंत, प्र. रा.