खुलना : बांगला देशाच्या राजशाही विभागातील जिल्ह्याचे शहर. लोकसंख्या १,२७,९७० (१९६१). हे कलकत्त्याच्या १२३ किमी. ईशान्यपूर्वेस आणि डाक्क्याच्या १२८ किमी. नैर्ऋत्येस, भैरव नदीकाठी, सुंदरबनाच्या टोकावर आहे. खुलना प्रमुख रेल्वेकेंद्र असून जेसोर-दारसाना फाट्याने अन्य शहरांशी जोडले आहे. नारायणगंज, बारीसाल, मदारीपूर आणि छलनाद्वारे चितगाँगशी जलमार्गे खुलनाचा मोठा व्यापार चालतो. ईस्ट इंडिया कंपनीच्या अमदानीत येथे मिठाच्या व्यापाराचे मुख्य ठाणे होते. हल्लीही शहराच्या परिसरातील तांदूळ, मीठ, सुपारी, ताग, नारळ वगैरे माल येथूनच अन्यत्र रवाना होतो. येथे तेलबिया गाळण्याच्या गिरण्या, कापड गिरण्या व लहानमोठ्या नावा बांधण्याचे कारखानेही आहेत. येथील चार महाविद्यालये राजशाही विद्यापीठाला जोडलेली आहेत.

ओक, द. ह.