आझरबैजान : सोव्हिएट संघराज्यापैकी एक राज्य. क्षेत्रफळ ८६,६०० चौ. किमी. लोकसंख्या ५३,२६,००० (१९७२). यूरोपीय रशियातील ट्रान्सकॉकेशियाच्या अगदी दक्षिणेकडे हे राज्य मोडते. आझरबौजानच्या उत्तरेला रशियाच्या डागेस्तान हा प्रांत, वायव्येस जॉर्जिया राज्य,पश्चिमेस व नैर्ऋत्येस आर्मेनिया, दक्षिणेस इराणचा आझरबैजान व पूर्वेस कॅस्पियन समुद्र आहे. आझरबैजानमध्ये नाखिचेव्हान लोकराज्य व नगॉर्न-करबाख लोकतंत्र प्रदेशाचा समावेश होतो. 

प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने आझरबैजानचे चार विभाग पाडता  येतील. उत्तरेकडील कॉकेशस पर्वतराजीचा अगदी पूर्वेकडील भाग असून त्यामध्ये ४,२०० मीटरहून उंच असलेलले बझार–ड्युझी शिखर आहे. या भागाचा आग्नेय उतारतीव्र असून त्यामुळे कॅस्पियन समुद्राजवळ अप्शेरॉन द्विपकल्प तयारहोते. दुसरा विभाग म्हणजे मध्यभागाचा कूरा–आरास नद्यांचा सखल प्रदेश. हा कॉकेशसच्या मोठ्या व छोट्या रांगांच्या दरम्यानच्या, काळ्या समुद्रापासून आलेल्या खोलगट प्रदेशाचा पूर्वभाग आहे. तो पुढे कॅस्पियनवरील कूरा त्रिभुजप्रदेशापर्यंत सपाट व रूंद होत जातो. नैर्ऋत्येकडे कॉकेशस पर्वताच्या कमी उंचीच्या रांगा व पठारे यांचा समावेश असलेला तिसरा विभाग आहे. काही थोड्या ठिकाणी त्यांची उंची ३,००० मी.हून अधिक आहे. आग्नेयीकडे उंच पर्वतरांगा व कॅस्पियन समुद्र यांच्यामधील लेंकोरानचे चिंचोळे मैदान हा चौथा विभाग आहे. या भागात कूरा व आरास या दोन मुख्य नद्या आहेत. उंचीतील फरकामुळे येथील हवामान,वनस्पती व जमीन यांत फरक आढळतो. हा प्रदेश ३९उ. ते. ४२ उ. या अक्षांशांत असल्यामुळे येथील हवामान समशीतोष्ण कटिबंधातील कोरड्या प्रकारचे आहे. पावसाचे प्रमाण कूराच्या मुखाजवळ २५ सेंमी. पेक्षा कमी, कूरा खोऱ्यात २५ ते ३७ सेमी. व कॉकेशसच्या उंच भागात १०० सेंमी. पर्यंत असते. लेंकोरानच्या मैदानात मात्र ते १०० ते १२५ सेंमी. असते. कूरा मैदानात जानेवारीतील सरासरी तपमान हे कधीही गोठणबिंदूच्या खाली जात नाही. मात्र डोंगराळ प्रदेशात ते से. च्या खाली जाते. जुलै महिन्यातील सरासरी तपमान सखल प्रदेशात २५० ते ३० से. असते, तर डोंगराळ प्रदेशात ते २०० ते २५ से. इतके असते. वनस्पतिप्रकार जमिनीच्या उंचीनुसार बदलतात. निमओसाड व गवताळ प्रदेश सखल मैदानात व डोंगरांच्या पायथ्याशी आढळतात  त्यानंतर रुंदपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश व अगदी वर अधूनमधून झाडे असलेली चराऊ कुरणे आहेत. लेंकोरानचे मैदान मात्र विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. अरण्यविभाग व कॉकेशस पर्वत यांतून अनेक वन्य प्राणीउदा., कॉकेशियन हरिण, रानडुक्कर, अस्वल, लांडगा, खोकड, कोल्हा, चित्ता, लिंक्स आढळतात. अरण्याच्या वरच्या प्रदेशात रानबोकड व गरुड आहेत. सखल प्रदेशात साळिंदर, काळवीट, तरस, वाघ व बिळे करून राहणारे प्राणी आहेत. लेंकोरानमध्ये पाणपक्षी पुष्कळ आहेत.

काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांतील दळणवळणाच्या मार्गावर आणि इराण व तुर्कस्तान यांच्यामध्ये असल्याकारणाने, हा भाग सदैव संघर्षग्रस्त होता. अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत या भागावर अनुक्रमे तुर्की व मंगोलियन राज्यकर्त्यांचे वर्चस्व होते. सोळाव्या शतकात इराण व ऑटोमन साम्राज्य यांच्यात आझरबैजानवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झगडा सुरू झाला व त्यात इराण सदैव विजयी ठरला. अठराव्या शतकापासून आझरबैजानचा ताबा मिळविण्यासाठी रशियाचे प्रयत्‍न सुरू झाले. आरास नदीच्या उत्तरेकडील आझरबैजानचा सर्व प्रदेश स्वत:च्या आधिपत्याखाली आणण्यात रशियाला १८२८ मध्ये यश आले. पहिल्या महायुद्धानंतर आझरबैजानमध्ये प्रतिक्रांतिकारक सरकारची स्थापना झाली (१९१८२०). २८ एप्रिल १९२० मध्ये या राज्याचा सोव्हिएट संघराज्यात समावेश झाला. १९३६ मध्ये त्याला संघराज्याचा दर्जा प्राप्त झाला. १९७१ सालच्या निवडणुकीप्रमाणे येथील सोव्हिएटमध्ये १०,००० लोकसंख्येच्या विभागाचा एक याप्रमाणे एकूण  ३८५ प्रतिनिधी निवडून आले. त्यांत महिला प्रतिनिधींची संख्या १४२ आहे.

शेती हा मुख्य व्यवसाय असून कामकऱ्यांपैकी ४० टक्के लोक शेतावर काम करतात. हा प्रदेश कापसाच्या लागवडीकरिता प्रसिद्ध आहे. मुख्य पिके कापूस, गहू, मका, बार्ली, तांदूळ, द्राक्षे, फळे, भाज्या, तंबाखू, रेशीम ही होत. मेक्सिकोमधील ‘ग्रेयूल’ जातीची झाडे येथील हवामानात आता टिकू शकत असल्याने, त्यांची लागवड करण्यात आली आहे. डोंगराळ भागात उपयोगात येणारी व दर हेक्टरी जास्त उत्पन्न देणारी नवीन हिवाळी गव्हाची जात तयार करण्यात आली आहे. लागवडीखालील क्षेत्राच्या ७० टक्के जमिनीस जलसिंचन केले जाते. जलसिंचनाखाली असलेल्या जमिनीत ‘ईजिप्शियन व सी-आयलंड’ जातीच्या कापसाची लागवड केली जाते. डोंगराळ भागातील दऱ्यांतून फळबागा, द्राक्षाचे मळे व रेशीम–निर्मितीची केंद्रे आढळून येतात. कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्याच्या दक्षिणेस हवा जास्त दमट असल्यामुळे चहाचे मळे असून लिंबाच्या जातीची फळे व समशीतोष्ण कटिबंधातील पिके होतात. रशियन संघराज्यातील अक्रोडाची सर्वांत मोठी लागवड या प्रदेशात आहे. शेतीखालोखाल पशुपालनाचा धंदा महत्त्वाचा आहे. गालिचे तयार करण्याचा परंपरागत व्यवसाय येथे अद्याप चालू आहे. हे संघराज्य नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत समृद्ध आहे. खनिज तेल, लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे, शिसे, जस्त, मौल्यवान धातू, चुनखडी व गंधक येथे मिळतात. सर्वांत प्रमुख उद्योगधंदा म्हणजे खनिज तेलाचा होय. खनिज तेल बाकूच्या उत्तरेस व दक्षिणेस आणि कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सापडते. बाकूच्या पश्चिमेस काही खाणी असून, काही खाणी कॅस्पियन समुद्रातच खणलेल्या आहेत. याव्यतिरिक्त तांबे, रसायने, सिमेंट, बांधकामास आवश्यक असणारे साहित्य, अन्न, इमारती लाकूड, कापड-गिरण्या व मत्स्योद्योग हे धंदे आहेत. ⇨ बाकू हे राजधानीचे शहर आहे. बाकूशिवाय किरोव्हाबाद, स्टेपनकेर्ट, नाखिचेव्हान, लेंकोरान ही औद्योगिक केंद्रे आहेत. मीनगिचउर जलविद्युत्–केंद्राने बाकू औद्योगिक विभागास वीजपुरवठा होतो. सुमगाईट येथे कृत्रिम रबर तयार करण्याचा कारखाना आहे.

 

आझरबैजानमध्ये कमी रुंदीचे रेल्वेमार्ग सोडून १,७३० किमी.चे रेल्वेचे जाळे आहे. ४२ किमी.लांबीची रशियातील पहिली विद्युत् रेल्वे १९२४ मध्ये या राज्यात सुरू झाली.१९७१ मध्ये २१,१०० किमी. लांबीच्या सडका व ५०० किमी. लांबीचे राज्यांतर्गत जलमार्ग होते. 

आझरबैजानमधील लोक जातीने व भाषेने तुर्की लोकांना जवळचे आहेत. १९७२ मध्ये एकूण लोकसंख्येचा ७४ टक्के लोक आझरबैजानी तुर्की, १०% रशियन, ९% आर्मेनियम व २·७% जॉर्जियन होते. धर्माने ते शिया मुसलमान आहेत. दुसऱ्या शतकात येथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्‍न झाला. पहिल्या महायुद्धापूर्वी एकंदर लोकसंख्येच्या ९/१०लोक निरक्षर होते १९४६ पर्यंत मात्र निरक्षरतासंपूर्णतया नष्ट करण्यात आली. १९७१–७२ मध्ये ४,७७५ प्राथमिक व माध्यमिक शाळा, ७८ तंत्रमहाविद्यालये व १३ उच्चशिक्षण–संस्था होत्या. बाकू विद्यापीठात १,००,१०० विद्यार्थी होते. आझरबैजान शास्त्र अकादमीद्वारा ३१ प्रयोगशाळा उघडण्यात आल्या आहेत. १९२९ पर्यंत शिक्षण आझरबैजानी भाषेत दिले जात होते. १९२९ मध्ये अरबी लिपी काढून लॅटिन लिपी वापरात आणली व १९३८ पासून मात्र रशियन लिपी व भाषा वापरण्याबाबत सक्ती करण्यात आली. १९७० मध्ये ११८ नियतकालिके होती, त्यांतील ९३ आझरबैजानी भाषेत होती.

आझरबैजानचे पूर्वीचे साहित्य हा तुर्की लोकांच्या साहित्याचाच भाग आहे. पुष्कळसे साहित्य अरबी व फार्सी भाषेत लिहिलेले आहे. दहाव्या शतकातील किताबीदे देकोकुर्द हे तुर्की भाषेतील महाकाव्य प्रसिद्ध असून निझामी, नेसीमी, फिझली, विदाली व वजीफ हे अझरी साहित्यातील जुन्या काळातील थोर साहित्यक आधुनिक काळातील बाखिखान, मिर्झा शफी वाझिक, मिर्झा फतली आखुर्डोय इ. लेखक व हुसेन जावित, अहमद जेवत हे कवी प्रसिद्ध आहेत. आझरबैजानमधील कलेचा उत्तर इराणमधील कलेशी फार जवळचा संबंध आहे. दगडांचे कोरीवकाम, धातूचे दागिने बनविणे, चिनी मातीची भांडी तयार करणे, गालिचे विणणे इ. कलाकुसरीच्या कामांकरिता राज्य प्रसिद्ध आहे. मध्ययुगातील किल्ले, दर्गे, सुंदर कबरी व राजवाडे येथील वास्तुशिल्पाची साक्ष देतात. सप्तस्वरांवर बांधलेले येथील संगीत व विविध नृत्यप्रकार आझरबैजानी लोकांचे जीवनच बनलेले आहे.

वर्तक, स. ह.