फिरोजपूर : भारताच्या पंजाब राज्यातील फिरोझपूर जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५१,०९० (१९७१). हे सतलज नदीकाठी, भारत-पाकिस्तान सरहद्दीपासून सु. ५ किमी. आणि दिल्लीच्या वायव्येस सु. ३६८ किमी. अंतरावर आहे. फाळणीपूर्वीच्या दिल्ली-लाहोर या उत्तर लोहमार्गावरील हे महत्त्वाचे प्रस्थानक असून सध्या याच मार्गावरील भारतातील हे अंतिम स्थानक आहे. दिल्ली, अमृतसर, जलंदर, लुधियाना इ. प्रमुख शहरांशी हे सडकांनी व लोहमार्गांनी जोडलेले आहे. इंग्रजी अंमलात लष्करी छावणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरास आजही पाकिस्तान-भारत सरहद्दीवरील मोक्याचे ठिकाण म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे.

रुंद व प्रशस्त रस्ते तसेच तटबंदीयुक्त असे हे शहर दिल्लीचा तिसरा बादशहा फिरोझशाह तुघलक (१३०९ ? – ८८) याने १३८४ मध्ये वसविले. १८९७ मध्ये वायव्य सरहद्द प्रांतातील सारागढी किल्ल्याभोवतीचा पठाणांचा वेढा फोडून काढताना धारातीर्थी पडलेल्या ३६ शिखांच्या स्मरणार्थ बांधलेले येथील स्मारक प्रसिद्ध आहे. शहरात तीन महाविद्यालये असून जुन्या छावणी भागात बहुतेक सर्व शासकीय कार्यालये आहेत.

कापूस व अन्नधान्य यांची मोठी बाजारपेठ म्हणून फिरोझपूर प्रसिद्ध आहे. सरकी काढणे व कापूस दाबणे, अन्नप्रक्रिया, मेवामिठाई, चॉकलेट, गोळ्या इ. विविध उद्योग शहरात चालतात.

कापडी, सुलभा