हल : किंग्स्टन अपॉन हल. इंग्लंडमधील यॉर्कशर परगण्यातील ऐतिहासिक नगरपालिकीय शहर व बंदर. लोकसंख्या २,५६,४०६ (२०११ अंदाज). हे लंडनच्या उत्तरेस २४९ किमी.वर उत्तर समुद्रापासून ३५ किमी. आत असून, हंबर व हल या नद्यांच्या संगमाजवळ हंबर नदीच्या उत्तर किनाऱ्यावर हल नदीमुखाशी वसलेले आहे. हे शहर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे बंदर असून ते लोहमार्गाने अंतर्गत भागाशी जोडल्यापासून याची विशेष भरभराट झाली आहे. हे एक औद्योगिक, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र आहे.

 

मध्ययुगीन काळात हे बंदर लोकरीसाठी प्रसिद्ध होते. १२९३ मध्ये मॅक्स ॲबीकडून इंग्लंडचा राजा पहिला एडवर्ड याच्या अखत्यारीत हे आले. एडवर्ड राजाने याचे किंग्स्टन अपॉन हल असे नामकरण करून याच्या बंदर विकासासाठी नियोजन केले. येथे १७७८ मध्ये प्रथम गोदी बांधण्यात आली. यास १८९७ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या बाँबवर्षावात शहराची व बंदराची हानी झाली. याचा हंबरसिद या परगण्यात समावेश करण्यात आला (१९७४).

 

हल येथे ११ किमी. लांबीची आधुनिक गोदी बांधण्यात आलेली आहे. मासेमारीसाठी हे बंदर महत्त्वाचे असून एक औद्योगिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे कागद, कापड, जहाजबांधणी, रसायने, विमाने, ट्रॅक्टर, अन्नपदार्थ, पेयनिर्मिती इ. उद्योग चालतात. उत्तर समुद्रातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू काढणे व त्यांवर प्रक्रिया करणे या उद्योगांचा शहराच्या अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम झालेला आहे. शहराच्या पश्चिम सरहद्दीजवळ, हंबर नदीवर देशातील सर्वांत लांब (१,४१० मी.) निलंबी पूल बांधून तो १९८१ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यामुळे हंबर नदीच्या दक्षिणेकडील भागाचा विकास झाला. येथे तेलबिया, लाकूड, अन्नपदार्थ, लोकर, खनिज तेल यांची आयात होते तर कोळसा, कोक, यंत्रसामग्री, लोखंड व पोलादाच्या वस्तू , ट्रॅक्टर यांची येथून निर्यात होते.

 

हल येथे ग्रामर स्कूल (१४८६), एंडस्लिग महाविद्यालय, हल विद्यापीठ (१९२७) या शिक्षणसंस्था आहेत. येथील ट्रिनिटी हाउस, होली ट्रिनिटी पॅरिस चर्च, विल्बकोर्स संग्रहालय, फेरेन्स कलावीथी इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.