मेक्सिको सिटी : मेक्सिको देशाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या १,२९,३२,११६ (१९८०). देशाच्या मध्यभागी सस. पासून २,२४० मी. उंचीवर पर्वतीय परिसरात ते वसले आहे. येथील हवामान थंड, कोरडे व आरोग्यदायक आहे.

मेक्सिको सिटी असा एक विशाल संघजिल्हा आहे. १९७२ पासून त्याचे १६ प्रशासकीय विभाग केलेले असून त्याला खास शासकीय दर्जा आहे. सार्वजनिक सेवा तरतुदीसाठी १६ समित्या नेमण्यात आल्या आहेत. राज्यपाल हा या संघजिल्ह्याचा प्रमुख असतो. अनेक उपनगरे आणि नागरी, ग्रामीण विभाग या जिल्ह्यात आहेत. लोकसंख्येची घनताही येथे अधिक आहे. हे देशाचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे.

कुट्टिमचित्रणाने सजविलेली मेक्सिको विद्यापीठाची ग्रंथालयवास्तू, मेक्सिको सिटी.ॲझटेक इंडियन लोकांची ही एके काळची राजधानी व सांस्कृतिक केंद्र होते. १३२५ च्या सुमारास तेस्को सरोवराच्या परिसरातील बेटावर ॲझटेकांनी आपली राजधानी उभारण्यात सुरुवात केली. १५१९ च्या सुमारास येथे स्पॅनिशांचे आगमन झाले. लहानशा बोटी किंवा साकव यांद्वारे त्यावेळी नगरात प्रवेश करता येई. पुढे एक जलसेतू आणि नंतर १६ किमी. लांबीचा बंधारा बांधून पूर आणि सरोवराचे पाणी यांपासून शहराला संरक्षण देण्यात आले. १५१९ मध्ये येथे आलेल्या एर्नांदो कोर्तेझ (१४८५–१५४७) या स्पॅनिश मेक्सिको विजेत्याचे ॲझटेकांनी त्यांच्या श्रद्धेनुसार परमेश्वर समजून स्वागत केले. पुढे ॲझटेक व स्पॅनिश यांच्यात संघर्ष सुरू झाला. १५२१ मध्ये स्पॅनिश वसाहतीची ही राजधानी बनली व तिचा विकास होऊ लागला. शहराच्या उत्तर-पूर्व भागात, इंडियन लोक वसती करून राहिले व नवे शहर पश्चिम-दक्षिणेकडील वाढू लागले. मेक्सिकोच्या स्वातंत्र्यापर्यंत (१८२१) ते स्पॅनिशांच्याच ताब्यात होते. मेक्सिकन युद्धकाळात ते अमेरिकेच्या (१८४७) आणि पुढे अल्पकाळ (१८६३–७७) फ्रेंचांच्याही ताब्यात होते. १८८० नंतर मात्र शहराचा वेगाने विस्तार झाला. १९३१ मध्ये आसपासच्या लहानमोठ्या गावांचा व वस्त्यांचा त्यात समावेश करण्यात आला. एक संघजिल्हा म्हणून आता हे शहर विस्तारले आहे.

साधारणपणे वर्तुळाकार रचनेच्या या शहरात मध्यभागी इतिहासकालीन वास्तू आणि त्याच्या परिसरात असलेले औद्योगिक आणि निवासी विभाग आढळतात. तथापि शहराची वाढ नियोजनबद्ध अशी झाली नाही. १९७५ नंतरच शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आली.

देशातील शिक्षणाचे हे केंद्र असून येथील राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठ (स्था. १५५१) व राष्ट्रीय तंत्र निकेतन (१९४४) उल्लखनीय आहेत.

लोखंडी जाळीवजा ‘C’ आकाराचे रस्ते, चौकोनी आणि भव्य चौक या ॲझेटक नगरविशेषांच्या खुणा शहरात अद्यापही टिकून आहेत. झोकॅलो हा शहराच्या हृदयस्थानी असलेला मोठा इतिहासप्रसिद्ध चौक आहे. त्याच्या अवतीभवती जुन्या व नव्या वास्तू आढळतात. शहरात श्रीमंत तशाच गलिच्छ वस्त्याही आहेत.

शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. ॲझटेक पिरॅमिडचा चौथरा, त्याच्या उत्तरेला सोळाव्या शतकात उभारलेले कॅथीड्रल आणि पूर्वेला आधुनिक निवासी वास्तू असे तीन संस्कृतीचे निदर्शक स्थळ म्हणजे प्लाझा ऑफ थ्री कल्चर्स हे होय. पूर्वेकडील विद्यमान राष्ट्रीय राजवाडा म्हणजे ॲझटेक सम्राटाचे एकेकाळचे निवासस्थान होते. ते पाडून स्पँनिशांनी तेथे विद्यमान वास्तू उभारली. सध्या या राजवाड्यात राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय, राष्ट्रीय अभिलेखागार, वस्तुसंग्रहालय व कलात्मक भित्तिचित्रे आढळतात. झोकॅलो चौकात नागरी सभागृह आहे. त्याच्या दक्षिणेला संग्रहालयाची इमारत असून त्यात नगरविकासाचे टप्पे दर्शविणारे साहित्य पहावयास मिळते.

येथील अठराव्या शतकातील सांतो दोमिंगोचे चर्च उल्लेखनीय आहे. तेथून जवळच शिक्षण मंत्रालयाचे कार्यालय असून, त्यात देशाच्या सामाजिक परिवर्तनाचे दर्शन घडविणारी भित्तिचित्रे आहेत.

झोकॅलो चौकाच्या पश्चिमेकडे वसाहतकालीन अनेक वास्तू आढळतात. त्यांपैकी सॅन फ्रॅन्सिस्को चर्चचे अवशेष उल्लेखनीय आहेत. येथेच ४४ मजल्यांची लॅटिनो-अमेरिकाना विमाकंपनीची उत्तुंग इमारत आहे. नजीकचा विद्यमान आर्ट डेको पार्क म्हणजे ॲझटेक काळातील बाजाराची जागा होय. या पार्कच्या पलीकडेच पर्यटकांसाठी बाजार, हॉटेले इ. सुविधा असलेला पिंक झोन आहे.

येथील चपुल्तपेक पार्क प्रसिद्ध असून, तेथे त्याच नावाचा इतिहासकालीन किल्ला आढळतो. या किल्ल्यात आता ऐतिहासिक संग्रहालय आहे. पार्कमध्ये जगप्रसिद्ध मानवशास्त्रीय संग्रहालय आहे. याशिवाय शहराच्या परिसरात वसाहतकालीन तसेच ॲझटेक इंडियनांच्या अनेक वास्तू आढळतात. झोकॅलो चौकापासून १३ किमी. नैर्ऋत्येला नवा विद्यापीठ परिसर आहे. त्यातील १२ मजली ग्रंथालय वास्तू उल्लेखनीय आहे. तसेच १ लाख प्रेक्षकांची सोय असलेले ऑलिंपिक क्रीडागार जवळच आहे. येथेच १९६८ मध्ये ऑलिंपिक क्रीडा-सामने भरविण्यात आले होते. शहराच्या आग्नेय बाजूस तरंगत्या बागांचे उपनगर आहे. ॲझटेक-पूर्व काळात येथील सरोवराच्या काठी फुलबागा उठविण्यात आल्या. आता सरोवर नसले, तरी हा विभाग कायम आहे. ॲझटेक संस्कृती, वसाहतकालीन घडामोडी व आधुनिकता या त्रिविध गोष्टींचे एक कुतूहलजनक संमिश्र रंगरूप या शहराला लाभले आहे.

शहरातील दोन राष्ट्रीय सिंफनी संस्था, बॅले कंपनी, राष्ट्रीय रंगमंदिर प्रसिद्ध असून संगीत, नृत्य, नाट्य व इतर ललित कला यांच्या अनेक संस्था शहरात आढळतात. फुटबॉल (सॉकर), बेसबॉल, घोड्यांच्या व मोटारींच्या शर्यती, मुष्टियुद्ध व बैलांच्या झुंजी हे येथील लोकप्रिय खेळ आहेत. येथील फुटबॉल (सॉकरचे) क्रीडांगण जगात सर्वांत मोठे आहे. सिटी ऑफ स्पोर्ट्‌स विभाग क्रीडाक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून मुष्टियुद्ध, बैलांच्या झुंजी इ. खेळ तेथे होतात.

मेक्सिको देश हा भूकंपट्ट्यात असल्याने या शहराला वारंवार नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते. १९५७ साली झालेल्या भूकंपामुळे शहराचे जबर नुकसान झाले.

या शहरात कापड, तयार कपडे, पोलाद, ॲल्युमिनियम, सिमेंट, अन्नपदार्थ व शीतपेये, सिगारेट, कातडी व रबरी वस्तू, फर्निचर, यांत्रिक तसेच वीज उपकरणे इ. उत्पादक उद्योगधंदे विकसित झाले आहेत. येथील प्रकाशन व्यवसाय सबंध लॅटिन अमेरिकेत अग्रेसर आहे. येथील एकूण कर्मचारीवर्गात स्त्रियांचे प्रमाण ३०% आहे. हे देशाचे आणि मध्य अमेरिकेचे आर्थिक व्यवहारांचे केंद्र आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँकांच्या शाखा येथे आहेत. पर्यटन हा येथील विशेष विकसित असा व्यवसाय आहे. दर्जेदार हॉटेले येथे आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदांचे केंद्र म्हणूनही त्याची ख्याती आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून लोहमार्ग, सडका, हवाईमार्ग यांच्या सुविधा येथे आहेत. दूर अंतरावरची बससेवाही उपलब्ध आहे. शहराच्या ईशान्येस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथील जमिनीखालील बोगद्यातून रबरी टायरची लोहमार्ग सेवा प्रसिद्ध आहे (मेट्रो–१९७०).

जाधव, रा. ग.