झादार : एड्रिॲटिक समुद्रावरील यूगोस्लाव्हियाचे बंदर आणि सागरी विश्रामस्थान. लोकवस्ती ४३,००० (१९७०). येथे सुप्रसिद्ध माराशिनो मद्य, मासे-प्रक्रिया व डबाबंदी, दोर, कापड, सिगारेट, प्लॅस्टिक, कातडी वस्तू, घरगुती उपकरणे इत्यादींचे व्यवसाय आहेत. येथून इटलीशी व यूगोस्लाव्हियाच्या इतर भागांशी लोहमार्ग, सडका, विमाने, नौका इत्यादींनी चांगले दळणवळण चालते. अनेक सत्तांतरे पाहिलेल्या या ऐतिहासिक शहरी रोमन विजय-कमान, जुनी चर्च व इमारती प्रेक्षणीय आहेत.

लिमये, दि. ह.