मोरोक्को : आफ्रिका खंडाच्या वायव्य कोपऱ्यातील एक देश. क्षेत्रफळ ७,१०,८५० चौ.किमी. पैकी मोरोक्कोने आपला हक्क सांगितलेल्या पश्चिम सहारा (स्पॅनिश सहारा) प्रदेशाचे क्षेत्रफळ २,५२,१२० चौ. किमी. खुद्द मोरोक्कोची लोकसंख्या २·१२ कोटी (१९८४ अंदाज). पश्चिम सहारासह देशाची ईशान्स-नैर्ऋत्य लांबी १·८०९ किमी. व आग्नेय–वायव्य रुंदी ५२५ किमी. अक्षवृत्तीय विस्तार २७° ४० ते ३५ ५६ उ. (प. सहारासह २३° ते ३५° ५६ उ.) व रेखावृत्तीय विस्तार ०° ५८ ते १३° प. (प. सहारासह ० ५८ ते १६° २१ प.) यांदरम्यान. देशाचे अतिउत्तरेकडील टोक हे यूरोप खंडातील स्पेनच्या भूमीपासून केवळ १४ किमी. अंतरावर असून, हे दोन भूभाग भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अलग केले आहेत. खुद्द मोरोक्कोच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, पूर्वेस व आग्नेयीस अल्जीरिया, दक्षिणेस प. सहारा व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. खुद्द मोरोक्कोच्या चोहोबाजूंच्या सरहद्दींची मिळून एकूण लांबी ३,९१५ किमी. आहे. राबात (लोकसंख्या ९,००,०००–१९८२ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे अधिकृत ठिकाण असून तँजिअर (१,८५,८५०–१९७१) हे उन्हाळ्यातील राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : मोरोक्कोची बरीच भूमी पर्वतीय आहे. प्राकृतिकदृष्ट्या देशाचे तीन विभाग पडतात : (१) ॲटलास पर्वत प्रदेश, (२) अटलांटिक किनाऱ्यावरील मैदानी प्रदेश व (३) पर्वतीय प्रदेशाचा आग्नेयीकडील सहारा वाळवंटी प्रदेश. ॲटलास पर्वताच्या चार श्रेण्या असून त्यांपैकी उत्तरेस भूमध्य समुद्रकिनाऱ्याला समांतर अशी रिफ पर्वतश्रेणी (उंची २,४०० मी.) आहे. रिफ श्रेणीच्या दक्षिणेसदेशाच्या मध्यभागातून ईशान्य–नैर्ऋत्य दिशेत जाणाऱ्या मध्य ॲटलास (उंची ३,२९० मी.), हाय (ग्रेट) ॲटलास व अँटी ॲटलास (उंची २,४०० मी.) ह्या तीन पर्वतश्रेण्या आहेत. हाय ॲटलासमधील जेबेल टुब्कल (उंची ४,१६५ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर आहे. रिफच्या दक्षिणेस ताझा ही प्रसिद्ध खिंड असून, अटलांटिक किनाऱ्यावरील मैदानी प्रदेश व अल्जीरिया यांना जोडणारा हा मुख्य दुवा आहे. तँजिअर-फेज-कॅसाब्लांका यांदरम्यानच्या त्रिकोणाकृती भागातील सुपीक गार्ब व सेइस मैदान, माराकेश व कॅसाब्लांका यांदरम्यानचे दाउकाला मैदान, शविआ (चाओवीआ) उच्चभूमी व जलसिंचित तादला व हाउझ मैदाने आणि आगादिर-अँटी ॲटलास यांदरम्यानचे सूर मैदान असे अटलांटिक किनाऱ्यावरील मैदानी प्रदेशाचे विभाग पडतात. हे देशातील मुख्य कृषी व पशुपालक प्रदेश असून, देशातील बहुतांश लोकसंख्या व अर्थव्यवस्था या विभागावर अवलंबून आहे. ॲटलास पर्वतश्रेण्यांच्या पूर्वेस व दक्षिणेस सहारा प्रदेश असून, तो सहारा वाळवंटात विलीन झालेला आहे. हामाडा, रेग, खडकाळ पठारे, ठिकठिकाणी सुपीक मरूद्याने असलेला व दगडगोटेयुक्त असा हा वाळवंटी प्रदेश आहे. प. सहाराप्रदेश खडकाळ, वालुकामय व विरळ लोकवस्तीचा आहे. हा प्रदेश शेतीच्या दृष्टीने निरुपयोगी असला, तरी फॉस्फेटच्या साठ्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

मोरोक्कोच्या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक आहे. फॉस्फेट हे देशातील सर्वांत महत्त्वाचे खनिजद्रव्य असून, फॉस्फेटच्या उत्पादनात व निर्यातीत मोरोक्को जगात प्रसिद्ध आहे. मँगॅनीज, कोबाल्ट, निकेल, जस्त, शिसे व लोह ह्या मुख्य खनिजाशिवाय तांबे, कथिल, चांदी, मीठ, अँटीमनी, बराइट, कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचेही साठे आहेत.

उत्तर आफ्रिकेतील इतर देशांपेक्षा मोरोक्कोमध्ये अधिक नद्या आढळतात. अटलांटिक महासागरकिनाऱ्याला समांतर पसरलेल्या ॲटलास पर्वतश्रेण्या म्हणजे देशातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक असून, येथे उगम पावणाऱ्या नद्या सामान्यपणे वायव्येस अटलांटिक महासागराकडे किंवा आग्नेयीस सहारा वाळवंटाकडे वाहत जातात. ॲटलास पर्वताची उंची व विशिष्ट स्थिती यांमुळे अटलांटिकवरून येणारे आर्द्र वारे किनाऱ्यावर मैदानी प्रदेशात व पर्वतश्रेण्यांच्या पश्चिम उतारांवर हिवाळ्यात पाऊस देतात, तर पूर्वेकडील उतार पर्जन्यछायेचे व कोरडे राहतात, त्यामुळे अटलांटिककडे वाहणाऱ्या नद्यांना जास्त, तर सहाराकडे वाहणाऱ्या नद्यांना कमी पाणी असते. या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या कोरड्या ऋतूत जलसिंचनाच्या दृष्टीने विशेष उपयुक्त ठरतात. ५६० किमी. लांबीची मूलूया ही नदी मात्र ॲटलास पर्वताच्या हाय ॲटलास व मध्य ॲटलास श्रेण्यांदरम्यान उगम पावून ईशान्येस वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळते. ऊम अर रबीआ, सेबू, बू रेग्रेग, टेनसीफ्ट, द्रा व सूस या अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या, तर झीझ व गेरीस ह्या आग्नेयीस सहारा प्रदेशाकडे वाहणाऱ्या मुख्य नद्या आहेत.

हवामान : अटलांटिक महासागर व भूमघ्य यांचे लाभलेले सान्निध्य, किनाऱ्याजवळून वाहणारा थंड समुद्र प्रवाह आणि देशातील पर्वतीय प्रदेश यांमुळे येथील उष्ण कटिबंधीय प्रकारच्या हवामानाची तीव्रता कमी झालेली आहे. पर्वतश्रेण्यांच्या वायव्येकडील प्रदेशात थंड व आर्द्र हिवाळे आणि उबदार आणि कोरडे उन्हाळे, तर आग्नेयीकडील सहारा प्रदेशात हवामान कोरडे असून उन्हाळे उष्ण, हिवाळे उबदार व रात्री थंड असतात. किनारी प्रदेशात तपमानकक्षा कमी, तर अंतर्गत भागात ती जास्त असते. अटलांटिकावरून वाहत येणारे आर्द्र वारे ॲटलास पर्वताला अडतात, त्यामुळे पर्वताच्या वातसन्मुख पश्चिम उतारांवरील हवामान थंड आणि आर्द्र राहते, तर पूर्वेकडील बाजूचे हवामान सहारा प्रकारचे उष्ण व कोरडे बनले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर व एप्रिल-मे या काळात पर्जन्यवृष्टी होते. वायव्य भागात कमाल वार्षिक पर्जन्यमान ७५ ते १०० सेमी. असते. जास्त उंचीच्या पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टी होते.


वनस्पती व प्राणी : अटलांटिक किनारी प्रदेशात कॉर्क ओक वृक्षांची विस्तीर्ण अरण्ये आहेत. ॲटलास पर्वतउतारांवर विस्तृत सदाहरित अरण्ये असून, त्यांत प्रामुख्याने ओक, सीडार, पाइन, यूकॅलिप्टस, फर, जुनिपर, सायप्रस वृक्ष आढळतात. स्टेपी प्रकारच्या प्रदेशात झुडुपे, बोर व रुमा मस्तकी कोरड्या प्रदेशातील नद्यांकाठी पॉप्लर, विलो, टॅमॅरिस्क आणि खजूर इ. वनस्पती आढळतात. वाळवंटी प्रदेशात मरूद्याने वगळता बाकीचा भाग ओसाड आहे. ऑलिव्ह वनस्पती सर्वत्र आढळत असल्या, तरी तेल देणाऱ्या वनस्पती केवळ सूस नदीखोऱ्यातच आहेत. देशात फळबागांखाली विस्तृत क्षेत्र आहे. मोरोक्कोत बिबळ्या, कोल्हा, खोकड, कुरंग, रानमेंढी हे प्राणी आढळतात. पूर्वी सिंह आढळत, पण आज ते नामशेष झाले आहेत. सभोवतालच्या जलाशयांत सार्डीन, अँकोव्ही, तलवार मासा आणि ट्यूना इ. जलचर सापडतात.

चौधरी, वसंत

इतिहास व राज्यव्यवस्था : मोरोक्को हा आफ्रिका आणि यूरोप तसेच अरब लोक आणि कृष्णवर्णीय आफ्रिकी यांच्यातील सांस्कृतिक आदान–प्रदानाचा देश म्हणता येईल. बर्बर जमातीचे लोक हे येथील मूळचे रहिवासी. विद्यमान मोरोक्कोचा उत्तर भाग हा प्राचीन कार्थेज नगर–संस्कृतीचा (इ. स. पू. ११००–इ. स. ६९८) भाग होता. इ. स. पू. १४६ मध्ये तो मॉरिटेनिया असा रोमन प्रांत बनला. इ. स. ४२९ मध्ये रोमन सत्तेच्या ऱ्हासकाळात यूरोपातून व्हँडॉल लोकानी या प्रदेशावर स्वारी केली. सहाव्या शतकात ते बायझंटिन साम्राज्याच्या ताब्यात होते. सातव्या शतकात अरबांनी मोरोक्को जिंकले. आक्रमणांच्या वरील सर्व कालखंडांत बर्बर लोकांचा विरोध कमीअधिक प्रमाणात टिकून राहिला. आठव्या व नवव्या शतकांत छोटीमोठी मरुस्थलीय राज्ये येथे स्थापन झाली. अकराव्या शतकात मोरोक्कोच्या मैदानी प्रदेशातील व मॉरिटेनियामधील बर्बर लोकांनी ॲल्मॉरव्हिड्‌झ राजघराणे स्थापन केले आणि देशात सर्वत्र आपली सत्ता प्रथापित केली. माराकेश ही त्याची राजधानी होती. बर्बर-अरब ऐक्यातून मूर म्हणून ओळखले जाणारे मोठे बलवान साम्राज्य या प्रदेशात उदयास आले. या साम्राज्याचा विस्तार फ्रान्सपर्यंत पसरला होता. याच काळात सहारातील सोने आणि गुलामांचा व्यापार सुरू झाला. बाराव्या शतकात ॲल्मॉरव्हिड्‌झ सत्ता नष्ट झाली व अल्‌मोहाड या नव्या राजघराण्याची स्थापना झाली. फेज, ट्‌लेमसेन, माराकेश आणि राबात ही या नव्या मूर साम्राज्याची मोठी नगरे त्यावेळी भरभराटीस आली. तथापि तेराव्या शतकापासून मूर सत्ताअंतर्गत संघर्षामुळे खिळखिळी झाली. ऑटोमन तुर्क, स्पेन व पोर्तुगाल यांनी मूर साम्राज्याचा शेवट घडवून आणला. १४९२ पर्यंत मोरोक्कोमधील अनेक अनेक नगरे त्यांनी ताब्यात घेतली. उत्तर मोरोक्कोत स्पेनने स्यूता आणि मेलील्या ही ठाणी कायम राखली. मोरोक्कोत पंधराव्या ते एकोणिसाव्या शतकांपर्यत राज्य करणाऱ्या सादी घराण्याने सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात तुर्कांना हुसकावून लावले, तरी उ. आफ्रिकेचा मोठा भाग तुर्कांच्याच ताब्यात राहिला. सादी राज्यकर्त्यानी पोर्तुगीजांचाही अनेकदा पराभव केला. तसेच सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प. सूदानमधील सोंघाई राज्यकर्त्यांना अनेकदा पराभूत केले.

मोरोक्कोच्या इतिहासात १३००–१८००हा कालखंड चाचेगिरीचा कालखंड म्हणून ओळखण्यात येतो. मूर सत्ताधाऱ्यांना सागरी चाचेगिरीतून खूपच मोठे उत्पन्न मिळत असे. १८०१ मध्येअमेरिकेने ट्रिपोलीशी युद्ध करून चाचेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रिपोली हे छोटे राज्य होते व तेथून अमेरिकी व यूरोपीय बोटींवर चाचे हल्ले करीत. १८०२ मध्ये मोरोक्कोचा सुलतान मौले सौलीमान याने अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले पण ही वार्ता अमेरिकेला कळण्यापूर्वीच त्याने माघार घेतली. १८१४ साली ख्रिस्ती लोकांना पकडून गुलाम करण्याची पद्धत मोरोक्कोत बंद करण्यात आली. १८१७ साली मोरोक्कोत चाचेगिरीवर कायद्याने बंदी घालण्यात आली.

फ्रेच आणि स्पॅनिश वसाहतींचा कालखंड मोरोक्कोच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. फ्रान्सने अल्जीरिया आधीच ताब्यात घेतला होता. मोरोक्कोतील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेऊन फ्रान्सने हा देश घेण्याचा प्रयत्न केला पण जर्मनीने यास विरोध केला. १९०६ मध्ये यूरोपीय साम्राज्यवादी सत्तांची बैठक होऊन मोरोक्कोचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा व सर्व यूरोपीय सत्तांना समान व्यापारी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला. फ्रान्सने १९०७ साली व स्पेनने १९११ साली मोरोक्कोत लष्करी आक्रमण केले. याही वेळेस जर्मनीने विरोध केला. मात्र ग्रेट ब्रिटनने फ्रान्सला पाठिंबा दिला. १९१२ मध्ये फ्रान्स व मोरोक्कोचा सुलतान यांच्यात फेज येथे तह झाला आणि त्यानुसार मोरोक्कोतील शासन, अर्थव्यवस्था यांवर फ्रान्सचे नियंत्रण आले. तसेच देशात सैन्य ठेवण्याचा अधिकारही फ्रान्सला मिळाला. तथापि उत्तर मोरोक्कोतील इफ्नी बंदर व त्याचा परिसर, भूमध्य समुद्रालगतची लांबचलांब किनारपट्टी आणि द्रा नदी व दक्षिण सीमा यांमधील प्रदेश, एवढ्या भागावरील स्पेनचा अधिकार मान्य केला. स्पॅनिश भागाचा कारभार, स्पॅनिश उच्चायुक्त (राजधानी टेटवान) आणि फ्रेंच भागाचा कारभार रेसिडेंट जनरल (राजधानी राबात) पहात असे. १९२० च्या दशकात मोरोक्कोतील स्थानिक जमातींनी या दोन्ही यूरोपीय सत्तांविरुद्ध सशस्त्र उठाव केले. १९३४ पर्यत येथील फ्रेंच सत्ता स्थिर झाली. फ्रेंचानी शेती, उधोगधंदे, खाणी इत्यादींचा देशात विकास केला तसेच जलविद्युत् प्रकल्प, शाळा, रुग्णालये इ. सोयीही केल्या.

दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर फ्रेंच मोरोक्कोत जर्मनीचे पक्षपाती शासन आले. मात्र मोरोक्कोचा सुलतान आणि राष्ट्रवादी नेते यांनी दोस्त राष्ट्रांनाच त्यावेळी पाठिंबा दिला. १९४२ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने फ्रेंच मोरोक्कोचा ताब्यात घेऊन तेथे मोठा लष्करी तळ केला. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात देशाच्या स्वातंत्र्याचे प्रयत्न करण्यात आले. १९५३ साली मोरोक्कोचा सुलतान सिद्दी मुहंमद बिन यूसुफ याला फ्रेंचांनी हद्दपार होण्यास भाग पाडले. परिणामतः देशात सर्वत्र दहशतवाद व हत्याकांड सुरू झाले. १९५५ साली फ्रान्सने माघार घेऊन सुलतान यूसुफ यास मोरोक्कोत परतण्यास संमती दिली. त्याप्रमाणे तो देशात आला. देशात लोकशाही शासन स्थापन करण्याचे वचन त्याने दिले. २ मार्च १९५६ रोजी फ्रान्सने फ्रेंच मोरोक्कोला स्वतंत्र केले. स्यूता आणि मेलील्या या स्पॅनिश वसाहतींखेरीज बाकी सर्व देश त्यावेळी मुक्त झाला. मोरोक्कोचा सुलतान १९५७ साली देशाचा राजा बनला. स्पेनने १९५८ साली दक्षिणेकडील भाग व १९६९ साली इफ्नी हे बंदर मोरोक्कोच्या ताब्यात दिले.

राजा पाचवा मुहंमद म्हणजेच पूर्वाश्रमीचा सुलतान सिद्दी मुहंमद याने १९६० साली देशाचे शासन आपल्या ताब्यात घेतले. त्याच्या मृत्यूनंतर (१९६१) त्याचा मुलगा मौले हसन हा दुसरा हसन म्हणून गादीवर आला. १९६२ साली देशात पहिल्यांदाच संविधान करण्यात आले आणि संविधानात्मक राजेशाही व इस्लाम हा देशाचा अधिकृत धर्म म्हणून जाहीर करण्यात आला. दुसऱ्या हसनने १९६३ साली अहंमद बहमनी याला पंतप्रधान केले. मोरोक्कोच्या इतिहासातील महंमद बहमनी याला पंतप्रधान केले. मोरोक्कोच्या इतिहासातील तो पहिला पंतप्रधान होय. १९६५ साली राजा हसनने देशात आणीबाणी जाहीर केली. मंत्रिमंडळ आणि विधानसभा बरखास्त करून सर्व सत्ता हातात घेतली. १९७० साली देशांत नवे संविधान लोकमत घेऊन स्वीकारण्यात आले .त्याचप्रमाणे विधिमंडळाचीही निवडणूक घेण्यात आली. तथापि दुसऱ्या हसनला पदच्युत करण्याचे प्रयत्न डाव्या विचारसरणीच्या लोकांनी सुरू केले होते. त्यांचा नेता बेन बर्क याचा १९६५ साली पॅरिसमध्ये खून झाला. १९७१–७२ मध्येच दरबारी कपट कारस्थानांचे आणि सैनिकी उठावांचे प्रयत्न झाले. राजा हसनने १९७२ मध्ये हेही विधिमंडळ बरखास्त केले. १९७७ साली निवडणुका घेण्यात आल्या. 


या देशाच्या दृष्टीने प. सहारा या प्रदेशाचा प्रश्न अजूनही नीटपणे सुटलेला नाही. १९७६ साली स्पेनने स्पॅनिश सहारा म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश मोरोक्को व मॉरिटेनिया यांना परत केला. पश्चिम सहाराच्या उत्तर भागावर मोरोक्कोने, तर द. भागावर मॉरिटेनियाने दावा केला होता. तथापि अल्जीरिया आणि प.सहारातील रहिवाशांची पॉलिसारिओ आघाडी (फ्रंट) यांनी वरील दोन्ही दावे अमान्य केले. पॉलिसारिओ आघाडीचे गनिम आणि मोरोक्को व मॉरिटेनिया यांचे सैन्य यांच्यात वारंवार चकमकी सुरू झाल्या. पॉलिसारिओ आघाडीला प्रथम अल्जीरियाने व नंतर लिबिया व क्यूबा यांनी लष्करी मदत दिली. शेवटी १९७९ मध्ये मॉरिटेनियाने आपला दावा मागे घेऊन स्वतःपुरता हा संघर्ष मिटवला. तथापि मोरोक्कोने मात्र प. सहाराच्या सर्वच प्रदेशांवर हक्क सांगितला असून याबाबतीत त्याचा पॉलिसारिओ आघाडीशी सशस्त्र संघर्ष अजूनही चालू आहे. परिणामतः द. मोरोक्को हा लष्करी विभाग म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे.

मोरोक्कोत १९७२ साली जनमताचा कौल घेऊन नवे संविधान स्वीकारण्यात आले व १९८० मधील जनमतपृच्छेनुसार त्यात काही दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यानुसार देशात संविधानात्मक राजेशाही आहे व ती सामान्यपणे वंशपरंपरागतच आहे. राजा हाच नागरी व धार्मिक बाबतींत सर्वोच्च अधिकारी असतो. राबात येथे तसेच अधूनमधून फेज, माराकेश आणि स्कीरात या इतर जुन्या राजधान्यांच्या ठिकाणी राजाचा निवास असतो. देशात एकसदनी विधिमंडळ असून त्यात ३०६ सदस्य असतात. त्यांपैकी २०४ प्रतिनिधी सर्वसाधारण निवडणुकांतून निवडले जातात आणि १०२ सदस्य हे नगरपरिषदा, इतर प्रांतिक विधानसभा, व्यापार, उद्योग, शेती, कामगार संघटना इ. संघटनांच्या अधिकृत निर्वाचनक्षेत्रांतून निवडले जातात. पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची नेमणूक राजाच करतो. विधिमंडळ बरखास्त करण्याचा, तसेच कायद्यास संमती देण्याचा अधिकार राजाला आहे. १४ सप्टेंबर १९८४ रोजी देशात निवडणुका झाल्या. देशातील विद्यमान राजा दुसरा हसन हा ३ मार्च १९६१ रोजी गादीवर आला. मुहंमद करीम लामरानी हे देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत.

प्रशासनाच्या दृष्टीने देशात ३२ प्रांत आहेत. मोरोक्को हा अलिप्त राष्ट्रपरिषदेचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रे, इस्लामिक परिषद, अरब लीग याही संघटनांचा तो सदस्य आहे.

देशात मुसलमानी विधी आणि फ्रेंच विधिसंहिता व विधिप्रक्रिया यांच्या आधारे एक सुसंगत अशी न्यायपद्धती तयार करण्यात येत आहे. विद्यमान न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय, अपील न्यायालये, प्रादेशिक न्यायाधिकरणे व दंडाधिकारी न्यायालये अशी रचना आढळते.

देशात १८ महिन्यांची सैनिकी सेवा सक्तीची आहे. देशाच्या भूसेनेत ४ यंत्रसज्ज पायदळे, १ सुरक्षा, १ हवाई छत्री व १ विमान प्रतिरोधी असे विभाग आहेत. त्यांशिवाय १० यंत्रसज्ज पायदळ रेजिमेंट, ९ तोफखाना विभाग, ७ चिलखती रणगाडा विभाग, १ शाहीसुरक्षादल, ५ उंटदळे, २ वाळवंटी घोडदळे, १ डोंगरी बटालियन, ३ कमांडो बटालियन, ४ अभियंत्रिकी व ४ चिलखती गाड्यांचे स्कॉड्रन आहेत. युद्धसाहित्यात रणगाडे आणि चिलखती गाड्यांचा अंतर्भाव होतो. भूसेनेचे एकूण बळ १,२५,००० असून देशात ३०,००० सैनिकीसम भूदल आहे (१९८५). नौसेनेत १,८०० अधिकारी व इतर सैनिक असून ५०० बोटी आहेत. त्यांत लढाऊ बोटी, गनबोटी, विमानवाहू जहाजे इत्यादींचा समावेश होतो. मोरोक्कोची वायुसेना १९५६ मध्ये उभारण्यात आली. तीत लढाऊ मिराज विमाने त्याचप्रमाणे इतर प्रकारची लढाऊ व टेहेळणी विमाने अंतर्भूत होतात. वायुसेनेचे बळ १०,००० होते (१९८४).

आर्थिक स्थिती : देशातील सु. ७०% लोक शेतीवरच उपजीविका करतात. देशातील २०% जमीन शेतीखाली आहे व सु. २५% ते ३०% जमीन चराऊ कुरणे , अरण्ये व एस्पार्टो गवत यांनी व्यापलेली आहे. गहू, सातू, साखरबीट, लिंबूवर्गीय फळे, मका, कडधान्ये, द्राक्षे, ऑलिव्ह, टोमॅटो, बटाटे, हरभरा व मेथी ही प्रमुख कृषिउत्पादने होत. कृषिउत्पादनाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (लक्ष टनांत) : गहू १८·१ सातू १८·९ (१९७९) साखरबीट २१·९ (१९८१) लिंबवर्गीय फळे १०·४ ऊस ३·७५ (१९८०). उसाखालील क्षेत्र १९९० पर्यंत १० लक्ष हे. पर्यंत वाढविण्याची योजना आहे. लिंबूवर्गीय फळे निर्यात करणारा एक मोठा देश म्हणून मोरोक्कोची ख्याती आहे. याशिवाय देशात कॅनरी गवताचे बी, जिरे, धने, जवस, बदाम इ. उत्पादने होतात. पशुपालन हाही देशातील महत्त्वाचा उद्योग आहे. उंट, घोडे, डुकरे, मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या, इतर गुरे इत्यादींचा अंतर्भाव यांत होतो. साधारणपणे १६० लक्ष बकऱ्या २९ लक्ष गुरे घोडे, खेचरे व उंट मिळून २० लक्ष जनावरे अशी १९८० सालची आकडेवारी मिळते. जंगलातून ८०% जळाऊ लाकूड मिळते. कातडी कमावण्यासाठी तिझ्रा लागडाचे विशेष उत्पादन देशात केले जाते. मत्स्योत्पादन हाही महत्त्वाचा उद्योग आहे. आगादिर, साफी, एस्वीर, कॅसाब्लांका इ मासेमारीची प्रसिद्ध केंद्रे होत. देशात ५,००० मच्छिमार बोटी असून मत्सप्रक्रियेची १०० संयंत्रे देशात आहेत. सुमारे ५०,००० कामगार या व्यवसायात गुंतले आहेत. १९८२ साली एकूण मत्स्योत्पादन ४.१३ लक्ष टन होते.

खाणकाम हा देशातील महत्त्वाचा उद्योग आहे. फॉस्फेटचे सर्वांत जास्त उत्पादन येथे होते. सीदी, बेन गेरीर इ. ठिकाणी फॉस्फेटच्या खाणी आहेत. दगडी कोळसा, खनिज तेल, शेल, लोहधातू, शिसे, मँगॅनीज, अँटिमनी, कोबाल्ट, तांबे, जस्त, चांदी, युरेनियम इ. खनिजउत्पादने देशात मिळतात. देशातील इतर उद्योगधंद्यात अन्नप्रक्रिया, साखर, मद्य, पोलाद उद्योग, सिमेंट, कापड, सिगारेट, टायर, गालिचे, पादत्राणे आणि स्वयंचलित वाहने हे प्रमुख आहेत.

देशाच्या विकासयोजनांत रसायने, मत्स्योत्पादन, वनसंवर्धन, नारिंगे व साखर उत्पादन, धरणे व बंधारे, पर्यटन व हस्तव्यवसाय इ. उद्योगधंद्यांना प्रधान्य देण्यात आलेले आहे.

मोरोक्कोत आर्थिक नियोजनाचा अवलंब करण्यात आला आहे. पहिली पंचवार्षिक योजना १९७३–७७, दुसरी त्रैवार्षिक योजना १९७८–८० व तिसरी पंचवार्षिक योजना १९८१–८५ अंमलात आणण्यात आल्या. देशाचे राष्ट्रीय चलन दिरेम हे असून त्याचा विदेश विनिमय दर १ स्ट्रलिंग पौंड = १०·५० दिरेम (१९८५) असा होता. देशाची मध्यवर्ती बँक राबात येथे आहे. त्याशिवाय मोठ्या शहरांतून बँकांची सोय आहे. वजन-मापांसाठी देशात मेट्रिक पद्धत स्वीकारलेली आहे. निर्यातीच्या बाबतीत फ्रान्स, प. जर्मनी, स्पेन, इटली, ग्रेट ब्रिटन यांच्याशी व आयातीत फ्रान्स, स्पेन, सौदी अरेबिया, ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांच्याशी देशाचा व्यापार चालतो. आयात मालात नित्याच्या उपभोग्य वस्तू व औद्योगिक उत्पादने आणि निर्यातीत फॉस्फेट, भाजीपाला व कापड यांचा अंतर्भाव होतो. तँजिअर हे मुक्त बंदर म्हणून १९६२ पासून घोषित करण्यात आले.


देशात एकूण ५७,५९२ किमी. लांबीच्या सडका असून (१९८३) त्यांपैकी २७,६७१ किमी. लांबीच्या पक्क्या सडका आहेत. देशात २,०७,३७० मालवाहू ट्रक ४,४५,००० खाजगी गाड्या आणि १८,४२४ मोटारसायकली होत्या (१९८१). देशातील लोहमार्ग १७७९ किमी.लांबीचा असून त्यापैकी ७०९ किमी. लोहमार्ग विद्युतीकरण झालेले आहे. कॅसाब्लांकापासून पूर्वेकडे हे लोहमार्ग पसरलेले आहेत. लोहमार्ग विकासाच्या योजना आहेत. देशात १९ विमानतळ आहेत. त्यांपैकी कॅसाब्लांकाचा विमानतळ महत्त्वाचा आहे. सागरी मार्ग देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून देशातील व्यापारी बोटींची संख्या १४५ होती (१९८०).

यूरोप खंडाशी संपर्क साधण्यासाठी केबल मार्ग उपलब्ध आहे.कॅसाब्लांका, तँजिअर ही याची मोठी केंद्रे आहेत. देशात २·४१ लक्ष दूरध्वनी संच होते (१९८२). राबात व तँजिअर येथे नभोवाणी व दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. अरबी, बर्बर, फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रजी या भाषांतून नभोवाणी व दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. देशात १९७१ साली २३५ चित्रपटगृहे होती.

लोक व समाजीवन : मोरोक्कोमधील मूळ रहिवासी म्हणजे बर्बर लोक होत. उत्तरेकडील ॲटलास पर्वतभागातील बर्बर लोक विशेष कडवे असून, अरबांच्या राजकीय-सांस्कृतिक वर्चस्वकाळातही त्यानी आपली सांस्कृतिक पृथगात्मता टिकवून ठेवली. विद्यमान मोरोक्को समाज हा बर्बर, अरब, फ्रेंच आणि स्पॅनिश या सर्वांच्या वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संमिश्रणातून तयार झालेला आहे. उत्तरेकडील पर्वतीय भागातील बर्बर लोक मुख्यतः मेंढपाळी करतात आणि दक्षिणेकडील उंटांचे काफिले बाळगतात. इस्लाम हा देशाचा अधिकृत धर्म आहे. बहुसंख्य लोक सुन्नी पंथाचे असून, ज्यू व रोमन कॅथलिक पंथाचे लोकही येथे आहेत. अरबी ही देशाची अधिकृत भाषा असून बर्बर जमातीत बर्बर बोलीभाषा अजूनही वापरतात. तसेच फ्रेंच व स्पॅनिश भाषांचाही वापर यूरोपीय लोकांत रूढ आहे. फ्रेच व स्पॅनिश लोक शहरांत व परिसरात राहतात. देशातील साक्षरतेचे प्रमाण कमी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २० टक्केच आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत फ्रेच, स्पॅनिश, ज्यू, मुस्लिम इत्यादींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा देशात होत्या. १९६९ पासून देशातील शिक्षणव्यवस्थेची हळूहळू पुनर्रचना करण्यात येत आहे. ७ ते १३ वर्षे वयोगटातील मुलामुलींना सक्तीचे शिक्षण आहे. १९८२–८३ च्या आकडेवारीनुसार प्रथामिक शाळेत २३,७५,५६८ विद्यार्थी आणि ६५,५२१ शिक्षक होते. माध्यमिक शाळांतून ९,०२,२३४ विद्यार्थी आणि ४२,७२८ शिक्षक होते. तंत्रशिक्षणांच्या शाळांतून १०,०२० विद्यार्थी व शिक्षक-प्रशिक्षण संस्थांतून १६,१४८ विद्यार्थी होते. १९८१ पासून प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षणाचे माध्यम अरबी भाषा असून, काही वैज्ञानिक अभ्यासक्रम मात्र फ्रेंच भाषेतून शिकविले जातात. देशात सहा विद्यापीठे असून ती राबात, कॅसाब्लांका, फेज (२), माराकेश व औज्दा या ठिकाणी आहेत. या सर्व विद्यापीठांतील एकूण विद्यार्थिसंख्या ८२,९४४ आणि अध्यापक संख्या ४,००७ होती (१९८२–८३).

देशात वैद्यकीय सेवाही उपलब्ध असून १९७९ साली रुग्णालयतील उपलब्ध खाटांची संख्या २४,४५३ होती.

मोरोक्कन समाजात अनेक धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. रिफ व ॲटलास पर्वतीय भागांतील बर्बर लोकांची अश्वारोहण कला जगप्रसिद्ध आहे. या परंपरागत बर्बर कलेचीप्रात्यक्षिके प्रासंगिक समारंभातून पहावयास मिळतात. माराकेशमध्ये मे महिन्यात संगीत-नृत्यांचा वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. अटलांटिक किनाऱ्यालगतच्या प्रदेशात अनेक प्रकारच्या जलक्रीडा व खेळ प्रचलित आहेत. ॲटलास पर्वतभागात गिर्यारोहण, तसेच हिवाळ्यात स्कीइंग इ. खेळ खेळले जातात. अश्वारोहण हा देशातील अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. वाळवंटाच्या अंतर्भागातील सहली व सफरी हाही मनोरंजनाचा प्रकार रूढ आहे. मोठ्या शहरांतून चित्रपट, निशागृहे यांसारख्या आधुनिक मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

कला–क्रीडा : भौमितिक आकृतबंध, वेलबुटी यांसारखी इस्लामी कलापरंपरेची सर्वसाधारण वैशिष्ट्ये देशातील वास्तुकला, विशेषतः मशिदी, राजवाडे इत्यादींच्या रचनेत आढळतात. बर्बरांच्या कलापरंपरेची धाराही महत्त्वाची आहे. कलाकुसरयुक्त रजई व गालिचे, उत्तम प्रतीचे रग, विणलेली व भरतकाम केलेली वस्त्रे, चित्रजवनिका इ. पारंपरिक हस्तव्यवसाय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. फेज शहराच्या परिसरातील रेशमी वस्त्रे, धातुपात्रे, तर मेकनेस शहरातील कातडी वस्तू प्रसिद्ध आहेत. कलात्मक तबके, चांदीचे व पितळेचे खंजीर व इतर पितळी वस्तू देशात सर्वत्र तयार होतात. बर्बर लोकांचे पारंपरिक दागिने, गालिचे व मृत्पात्री मोठी कलात्मक असतात. मोरोक्कोच्या संगीत क्षेत्रात बासरी, तंबोरा, ढोलक यांसारख्या वाद्यांच्या साथीतील बर्बर संगीताची परंपरा आढळते, तर दुसऱ्या बाजूला दरबारी अरबी संगीताची परंपराही दिसून येते.

प्रेक्षणीय स्थळे : तँजिअर हे आफ्रिका आणि यूरोपमधील प्रसिद्ध प्रवेशद्वार आणि बंदर आहे. इतिहासकालीन भव्य मशिदी, तसेच देशातील कला आणि पुरातत्त्वीय वस्तूंचे संग्रहालय, जुना राजवाडा व जुगारगृहे यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तँजिअरच्या पूर्व परिसरात उत्कृष्ट पुळणी आहेत. दक्षिणेकडे टेटवान या जुन्या नगरात लोककला वा हस्तकला यांचे शिक्षण देणारी संस्था आहे. लिक्सस येथे प्राचीन फिनिशियन व रोमन अवशेष आढळतात. स्यूता हे एक मुक्त असे बंदर आहे. येथून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीचे सुंदर दर्शन घडते. राबात या राजधानीच्या शहरात राजवाडा, शासकीय इमारती आणि आधुनिक मशिदी आढळतात. येथे पुरावस्तुसंग्रहालय, तसेच मोरोक्कन कलासंग्रहालय असून, जवळच इतिहासकालीन शाही कबरस्तान आहे. साले हे राबातचे जुळे शहर. कॅसाब्लाका हे देशाचे महत्त्वाचे बंदर व व्यापारी आणि औद्योगिक केंद्र आहे. त्याचे रंगरूप मात्र प्राधान्याने यूरोपीय आहे. शहरात नियोजनाचा पूर्ण अभाव आहे. येथील पुळणी आकर्षक असून पर्यटकांचे हे मोठेच आकर्षण आहे. राबात आणि कॅसाब्लांका यांचा दरम्यान अटलांटिक किनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळे व पुळणी आढळतात. त्यांपैकी मुहंमदीया ही सर्वांत मोठी व प्रसिद्ध पुळण आहे. याच भागातील साफी येथे जुना पोर्तुगीज किल्ला आहे. दक्षिणेकडे आगादिर आणि एस्वीर ही सागरकाठची लोकप्रिय स्थळे. माराकेश हे मरूस्थलीय शहर म्हणजे देशातील गुलाबी नगरी होय. इतिहासकालीन अनेक वास्तूंचे अवशेष येथे आढळतात. येथील जुन्या कुतुबिया मशिदीचे मिनार ७० मी. उंच आहेत. येथील पारंपरिक कसरतपटू, जादूगार, गारुडी, कथाकथनकार इ. लोक हे पर्यटकांचे मोठेच आकर्षण आहे. फेज हे इतिहासप्रसिद्ध शहर मृत्पात्री, विणकाम व रंगकाम या परंपरागत हस्तकलांसाठी अजूनही प्रसिद्ध आहे. येथेही जुन्या वास्तूंचे अवशेष आढळतात. देशातील सर्वांत मोठी मशीद येथे आहे. ८१ हे. जमीन व्यापणारा येथील सुलतानाचा राजवाडा प्रसिद्ध आहे. मेकनेस ही जुनी बर्बरनगरी. येथे भव्य जुना राजवाडा आहे. त्यातील धान्याची कोठारे, राजदूतांची दालने, तबेले अवशिष्ट आहेत. येथून ६७ किमी. वर रोमन विजयी कमानी, सभास्थाने आणि तेलगिरण्या यांचे अवशेष आढळतात. 

  

संदर्भ : 1. Barbour, Nevill, Morocco, New York, 1965.

            2. Kinross, Lord and Hales-Gary, D., Morocco, London, 1971.

            3. Waterbury, John, Commander of the faithful: The Moroccan Political Elite, New York, 1970.

            4. Zartman, I. William, Ed., Man, State and Society in the contemparary Maghreb, Praeger, 1973.

जाधव, रा. ग.


मोरोक्को

राष्ट्रीय लोकोत्सवातील बर्बरांचे नृत्य, मोरोक्को.नक्षीदार टोपल्या : मोरोक्कोतील पारंपरिक कुटिरोद्योग.मूर लोकांच्या वास्तुशैलीचा निदर्शक मनोरा, तँजिअर, मोरोक्को.आधुनिक उत्तुंग १७ मजली इमारत, कॅसाब्लांका, मोरोक्को.'समीर' तोलशुद्धीकरण कारखाना, मोहॅमद्या, मोरोक्को.