ग्रीस : (हेलास किंवा एलास). यूरोपच्या बाल्कन द्वीपकल्पातील दक्षिणेचा प्राचीन देश क्षेत्रफळ १,३१,९८६ चौ.किमी. लोकसंख्या ८७,६८,६४१ (१९७१). विस्तार ३४°४८’०२’’उ. ते ४१°४४’५९’’उ. आणि १९°२२’४१’’पू. ते २९°३८’२७’’पू. यादरम्यान. याच्या दक्षिणेस भूमध्य, पूर्वेस इजीअन व पश्चिमेस आयोनियन समुद्र असून वायव्येस अल्बेनिया, उत्तरेस यूगोस्लाव्हिया व बल्गेरिया आणि ईशान्येस व पूर्वेस तुर्कस्तान आहे. याचा सु. २५,२o५ चौ.किमी. भाग बेटांनी व्यापलेला असून त्यांत सिक्लाडीझ, डोडेकानीझ, स्पॉरडीझ व आयोनियन हे द्वीपसमूह व क्रीट (८,३३१ चौ.किमी.), यूबीआ, लेझ्बॉस, रोड्झ, कीऑस, सेफालोनिया, कॉर्फ्यू व सेमॉस ही मोठी बेटे समाविष्ट आहेत. अथेन्स ही राजधानी असून ग्रेटर अथेन्सची लोकसंख्या २५,४o,२४१ (१९७१) आहे.

भूवर्णन : डोंगराळ प्रदेश, दंतुर किनारा व त्याभोवती असंख्य बेटे हे ग्रीसचे वैशिष्ट्य आहे. पिंडस, ऑलिंपस इ. पर्वतरांगा आणि त्यांची ऑलिंपस २,९७२ मी. व इतर २,४६o मी. पर्यंत उंचीची शिखरे विख्यात असून सर्वत्र पसरलेल्या पर्वतराजींमधून बिओशियातील सपाट्या किंवा आर्केदीआतील खोरी यांसारखे बंदिस्त खोलगट भाग आहेत. सलग मैदानी मुलूख फक्त थेसाली, मॅसिडोनिया आणि थ्रेस या प्रांतांत आढळतो. पश्चिम ग्रीसमध्ये पिंडस पर्वत किनाऱ्याला समांतर असल्याने तो किनारा काहीसा एकसंध व सलग आहे. उलट पूर्वभागात डोंगरांच्या रांगा किनाऱ्याशी काटकोन करीत असल्याने हा किनारा इतका ठिकठिकाणी तुटलेला व बेटांनी वेढलेला आहे, की असा किनारा यूरोपमध्ये अन्यत्र कोठेही नाही. सर्व महत्त्वाची बंदरे याच किनाऱ्याला आहेत आणि या बाजूच्या इजीअन समुद्रात यूरोप-आशिया दरम्यान सु. २,ooo बेटे विखुरलेली आहेत. थेसाली आणि मॅसिडोनियाचे काही भाग वगळल्यास ग्रीसचा कोणताही प्रदेश समुद्रापासून ११२ किमी.हून दूर नाही. देशाचे नैसर्गिक विभाग थ्रेस, मॅसिडोनिया, ईपायरस, थेसाली, मध्य ग्रीस, पेलोपनीसस आणि बेटे हे आहेत. ईशान्येकडील थ्रेस आणि उत्तरेचा मॅसिडोनिया हे जवळजवळ सर्वस्वी डोंगराळ प्रदेश त्यातून अल्बेनिया, यूगोस्लाव्हिया व बल्गेरियात जाणाऱ्या डोंगराच्या रांगांत वार्दर, स्त्रूमा, नेस्तॉस व मरित्स या चार मोठ्या नद्यांची खोरी आहेत. या नद्यांच्या मुखांशी विस्तृत सपाट प्रदेश आहेत. मुख्य बंदरे तुर्कस्तानच्या सीमेपाशी ॲलेक्झँड्रूपलिस, इजीअनच्या उत्तर किनाऱ्याच्या मध्यावर कव्हाल आणि वार्दर नदीमुखाशी बाल्कन पार्श्वप्रदेशातील मालवाहतुकीचे महाद्वार सलॉनिक (थेसालोनायकी) ही होत. ईपायरस विभाग पिंडस पर्वताच्या पश्चिमेला आहे. ईपायरसच्या आयोनियन किनाऱ्यावर अनेक लहानलहान सपाट भूभाग आणि अंतर्भागात योआनीना भोवतालच्यासारखे काही पर्वतवेष्टित सुपीक खोलगट भूभाग आहेत. तथापि बहुतेक प्रदेश खडकाळ, रस्ते फार थोडे व देशाच्या इतर भागाला जोडणारे लोहमार्गही नाहीत. थेसाली हा पर्वतवेष्टित प्रदेश देशाच्या पूर्वमध्य विभागात इजीअन समुद्राकाठी येतो. पिंडस पर्वताने ईपायरसपासून आणि ऑलिंपस पर्वताने थ्रेसपासून थेसाली विभक्त केला आहे. मॅसिडोनियाप्रमाणेच सुपीक व विस्तृत अशा थेसालीच्या मैदानी प्रदेशात देशातल्या अन्य कोणत्याही भागापेक्षा अधिक प्रमाणात शेती चालते. पिनीअस नदीवरचे लारीस हे प्रदेशातले प्रमुख शहर आणि व्हॉलॉस हे मुख्य बंदर आहे. थेसाली आणि ईपायरसच्या दक्षिणेस आणि कॉरिंथ आखाताच्या उत्तरेस मध्य ग्रीस हा विभाग आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स व तिचे बंदर पायरिअस या विभागात आहे. थीब्झ, लेव्हादीअ आणि लेमीअ यांची सपाट भूमी चिंचोळ्या पर्वतराजींनी विलग झालेली असून छोट्या घाटरस्त्यांनी जोडलेली आहे. देशातील या प्रदेशाची हवा सर्वांत कोरडी आहे. दक्षिणेचा पेलोपनीसस प्रदेश पूर्वी ५-६ किमी. रुंदीच्या कॉरिंथ संयोगभूमीने मुख्य भूमीला जोडलेला होता, तो १८९३ साली कॉरींथचा कालवा पुरा झाल्यावर वेगळा होऊन मोठे बेट बनला. आर्थिक दृष्ट्या यातील सर्वांत निर्मितिक्षम भाग ईशान्येस आहे. प्रदेशाचा पूर्वभाग खडबडीत दगडगोट्यांचा आणि तुरळक उथळ मातीचा असून दक्षिणेतील मेसीन भूशिरभाग मात्र सौम्य हवामानाचा आहे. याचे पट्रॅस हे बंदर वायव्येस आहे. ग्रीस बेटांपैकी सर्वांत दाट वस्ती आयोनियन बेटांवर आहे. त्यांचे हवामान सौम्य व सागरी आहे. बेटांच्या मध्यवर्ती स्थानामुळे लोकांना दर्यावर्दी व व्यापारी जीवनाची प्रेरणा मिळते. क्रीट हे सर्वांत मोठे ८,३३१ चौ. किमी. २५६ किमी. लांब व ९ ते ५६ किमी. रुंद असून त्याची लोकसंख्या ४,५६,६४२ (१९७१) आहे. कँडिया व कानीया ही क्रीटची दोन प्रमुख शहरे असून भूमी डोंगराळ व खडकाळ, ओबडधोबड पर्वतांचे उंच कडे सरळ समुद्रात तुटलेले, तर कुठे दोन उंच डोंगररांगांमध्ये लहान सपाट गाळजमिनी, शिखरे बहुधा हिमाच्छादित असे क्रीटचे एकंदर दृश्य भव्य व कठोर निसर्गाचे आहे. बहुतेक इजीअन बेटे अन्नाबाबत स्वावलंबी नाहीत. पुष्कळसे रहिवासी समुद्रावर मच्छीमारी करून किंवा खलाशी म्हणून उपजीविका करतात इतर निर्वाहासाठी मुख्य भूमीकडे किंवा परदेशी स्थलांतर करतात. देशातील केवळ चतुर्थांश भूमी शेतीच्या उपयोगी, षष्ठांश वनभूमी आणि बाकीची खडकाळ आहे. खोलगट प्रदेशात व नदीमुखांपाशी गाळमाती, उंचीवर चुनखडीमिश्रित, काही भागात ज्वालामुखीजन्य शिलारसावशेषांची व काही बेटांवर जीर्ण सिकता शिलांची माती आहे.

प्राचीन काळात लॉरियम भागातील चांदी, शिसे व जस्त यांच्या धातुकांनी अथेन्सला वैभव मिळवून दिले होते. तुर्की अंमलात खनिजांची उपेक्षा झाली. एकोणिसाव्या शतकात ग्रीसने स्वातंत्र्य मिळविल्यानंतर सहज सापडणाऱ्या खनिजांचे थोडेबहुत उत्पादन झाले, तथापि खनिज संपत्तीची पद्धतशीर पाहणी झाली नव्हती. १९५१ साली ग्रीसच्या प्रदेशाची भूवैज्ञानिक दृष्ट्या शास्त्रीय पाहणी करण्यास सुरुवात झाली. ज्ञात खनिजांचे साठे : सिक्लायडीझ, मध्य ग्रीस व क्रीटमध्ये लोहधातुक यूबीआ व मध्य उत्तर ग्रीसमध्ये क्रोमाइट मध्य ग्रीस, यूबीआ व आमॉर्गस (सिक्लाडीझ)मध्ये बॉक्साइट नॅक्सॉस (सिक्लाडीझ)मध्ये लोह पायराइट व एमेरी मीलॉसमध्ये बॅराइट मध्य ग्रीस व थर्मासमध्ये शिसे आणि जस्त यूबीआ व लेझ्बॉसमध्ये मॅग्नेसाइट मीलॉस व नीसिरॉसमध्ये गंधक उत्तर ग्रीस व कीऑसमध्ये अँटिमनी व मँगॅनीज आणि यूबीआ, पेलोपनीसस व टॉलेमेइसमध्ये लिग्नाइट कोळसा. अमेरिकन तंत्रज्ञांच्या साहाय्याने मेसीना, झँटी, कार्दीत्सा चिक्कला आणि थ्रेस या विभागांत खाणी चालू करण्यासारखी तेलक्षेत्रे आढळली आहेत. कमीजास्त प्रमाणात ॲस्बेस्टॉस, संगमरवर, चुनखडी, तांबे व सोने ही खनिजेही ग्रीसमध्ये आहेत.

नद्या, सरोवरे, समुद्र वगैरे : मर्यादित क्षेत्रफळ व अनियमित पर्जन्य या कारणांनी ग्रीसमधील लहानलहान नद्यांच्या पाण्याची शाश्वती नसते. त्यातल्यात्यात जास्त पाणी वर्षभर असणाऱ्या नद्या वार्दर व स्त्रूमा असून त्यांच्या पाणलोटांची विस्तीर्ण क्षेत्रे मध्य बाल्कन प्रदेशात आणि मुखाकडचे भाग तेवढे ग्रीसमध्ये आहेत. इजीअन समुद्राला ग्रीसमधून मिळणाऱ्या इतर नद्या नेस्तॉस, आलीआक्‌मॉन, पिनीअस व स्पेर्खीऑस, पेलोपनीससमधील सर्वात मोटी नदी युरोतस, कॉर्फ्यू बेटावर मेगॉसी आणि आयोनियन समुद्राला मिळणाऱ्या ॲकिलोअस, आराख्थॉस आणि थीअमिस. चुनखडी प्रदेशातून वाहणारे प्रवाह प्रसंगी विवरांतून लुप्त होतात आणि पाऊस जास्त झाल्यास काही दिवस तळ्यांच्या रूपाने टिकतात. पर्वतप्रदेशात कित्येक लहान सरोवरे आहेत. उत्तरेखेरीज तिन्ही दिशांना समुद्राने वेढलेल्या या देशाला क्षेत्रफळाच्या मानाने सर्वांत जास्त किनारा लाभला आहे आणि स्त्रूमा, सलॉनिक, कॉरिंथ, मेसीनीया, कीपारिसीया, पागासे, वानित्सा अशा अनेक आखातांनी त्याला विविधता आणली आहे.


हवामान : देशाच्या बहुतेक भागात उन्हाळा कडक आणि हवा कोरडी असून समुद्रसपाटीला सरासरी तपमान २७° से. असते. समुद्रकिनाऱ्याला दुपारच्या वाऱ्यामुळे हवा काहीशी सुसह्य होते. उत्तरेकडील पर्वतप्रदेशात हवा कमी उष्ण असून उन्हाळ्यात व नंतर पाऊस पडतो. अन्यत्र उत्तरेकडून उबदार कोरडे वारे वाहतात. सप्टेंबरच्या द्वितीयार्धात पावसाळ्याला सुरुवात होते. सामान्यतः भूमध्यसागरी हवामान असते. हिवाळ्यात पूर्वेकडे जाणारी चक्री वादळे असतात. पर्वतप्रदेशात थंडी कडक, प्रसंगी सलॉनिक येथे तपमान १०° से. पर्यंत पश्चिम किनाऱ्याचे दक्षिणेकडील हवामान कमी थंडीचे, कारण उत्तरेकडच्या थंड, ‘बोरा’वाऱ्यांना दक्षिणेचे उबदार ‘शिलॉक’ वारे तेथे भिडतात. उत्तर दक्षिण भागांच्या थंडीच्या तपमानात मोठा फरक आढळतो. पाऊस पूर्व किनाऱ्याला कमी व पश्चिम किनाऱ्याला अधिक पडतो. थेसालीच्या मैदानात ३८ सेंमी. व अथेन्सला ३९ सेंमी. पाऊस पडतो, तर कॉर्फ्यू येथे १२८ सेंमी. पाऊस पडतो. तपमान दक्षिणेत किमान १·७° से., कमाल ४१·१° से. उत्तरेत किमान ८·९° से., कमाल ३५° से. सरासरी वार्षिकपर्जन्य दक्षिणेत ३७·५o ते ८०सेंमी., उत्तरेत ५० ते १२०सेंमी. असतो.

 

वनस्पती व प्राणी : दक्षिण व मध्य देशात भूमध्यसागरी वनस्पती, पर्वतभागात व उत्तरेत मध्य यूरोपीय खुरटी झुडपे, पानगळ व सदाहरित वृक्ष आहेत. ओक, चेस्टनट, फर, पाइन हे मुख्यतः दिसतात. वसंत ऋतूत खडकाळ भागात विविधरंगी फुलझाडांना बहर येतो. डोंगराळ प्रदेशात मध्य यूरोपीय लांडगे, रानडुक्कर, लिंक्स, रानमांजर, मोर्टेन-पिंगट अस्वल, हरिण, पश्चिम व दक्षिण प्रदेशांत खोकड, रानबकरा, साळू हे प्राणी आढळतात. पेलिकन बगळे, करकोचे, ठिपक्यांचा कोकीळ हे पक्षी असून उत्तर यूरोपमधले अनेक जातींचे पक्षी हिवाळ्यात ग्रीसमध्ये येतात. समुद्रात मासे, कवची जलचर, कासव, स्पंज इ. सापडतात.

इतिहास : प्राचीन काळी म्हणजे इ.स.पू. ३ooo ते इ.स.पू. १४६ पर्यंत ग्रीसमध्ये एक समृद्ध संस्कृती नांदत होती. रोमनांच्या आक्रमणाने ती संपुष्टात आली. ही संस्कृती कला, वाङ्‌मय, तत्त्वज्ञान वगैरे बाबतींत अत्यंत समृद्ध होती [→ ग्रीक संस्कृति].

रोमन अंमल : (इ.स.पू. १४६–इ.स. ३३o). रोमन साम्राज्यात ग्रीस समाविष्ट झाल्यावर त्याची पुनर्घटना करण्याचे काम रोमन सम्राटांनी हाती घेतले. प्रथम त्यांनी कॉरिंथ शहर उद्‌ध्वस्त करून तेथील रहिवाशांना गुलाम म्हणून विकले. मॅसिडोनियाच्या गव्हर्नरला केवळ देखरेखीचे अधिकार देण्यात आले. सीझरनंतर अँटोनीच्या कारकीर्दीत त्याने युद्धखर्च भागविण्यासाठी ग्रीसवर जबरदस्त कर लादले. संपूर्ण ग्रीस रोमन साम्राज्याचा एक भाग करण्यात आला व त्याला ‘अकेइआ’ हे नाव देण्यात आले. त्याची व्यवस्था सीनेटऐवजी बादशाहाकडे सुपूर्द करण्यात आली. नंतरच्या काही रोमन सम्राटांनी ग्रीसचे वैभव वाढविण्याचे यत्न केले आणि अथेन्स येथे एक काँग्रेस (अकादमी) स्थापन केली. रोमन सत्तेच्या अवनतीच्या काळात गॉथ वगैरे रानटी टोळ्यांनी ग्रीसवर हल्ले केले. त्यांचे पारिपत्य कधी रोमन फौजांनी, तर कधी स्थानिक लोकांनी केले.

बायझंटिन अंमल : (३३o–१४५२). पहिल्या कॉन्स्टंटीनच्या अमदानीत ग्रीसचे हेलास, पेलोपनीसस, निकॉपलिस व इतर बेटे असे तुकडे पाडण्यात आले आणि कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) येथे नवी राजधानी स्थापण्यात आली. पण हे सर्व ३७५ च्या भूकंपाने आणि ३९५-९६ च्या व्हीसीगॉथ टोळ्यांच्या आक्रमणाने उद्ध्वस्त झाले. काही राजांनी पेगन धर्मावरील ग्रीकांची निष्ठा कमी व्हावी म्हणून यत्न केले. कॉन्स्टंटीन व इतर बहुतेक राजांनी रोमन सुधारणा रुजविण्याचे धोरण आखले. व्हीसीगॉथ, ऑस्ट्रोगॉथ, हूण तसेच स्लाव्ह, बल्गर, व्हँडॉल वगैरे रानटी टोळ्यांनी पाचव्या ते सातव्या शतकांत ग्रीसमध्ये प्रवेश केला. त्यांपैकी काहींनी तेथेच ठाण मांडले. त्यांचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न बायझंटिन राजांनी केले, पण काही टोळ्या दहाव्या शतकाअखेर ग्रीसमध्ये राहिल्या. सहाव्या शतकात जस्टिनियन हा एक थोर राजा होऊन गेला. त्याने ग्रीसचा पूर्वीचा रोमन साम्राज्यात गेलेला प्रदेश परत मिळविण्याचा प्रयत्न केला. बायझंटिन कलेचे पुनरुज्जीवन याच वेळी झाले [→ बायझंटिन संस्कृति]. या काळात पूर्वापार चालत आलेल्या नगरराज्यांत फारसा फरक पडला नाही. मात्र सर्व सत्ता केंद्रशासित होती, फक्त पूर्वीच्या अथेनियन राज्यपद्धतीऐवजी नोकरशाही पद्धत अस्तित्वात आली. बाराव्या शतकात ग्रीसवर सेल्जुक तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. पुढे चौथ्या धर्मयुद्धाच्या (क्रूसेड्स) काळात पाश्चिमात्यांनी कॉन्स्टँटिनोपल उद्ध्वस्त करण्यात पुढाकार घेतला (१२o४–६१). त्यांचा अंमल ग्रीसवर प्रस्थापित होऊन ग्रीसची एकता नष्ट झाली.

ग्रीक अंमल : (१४५३–१८५१). १४५३ मध्ये तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल घेतले व बायझंटिन साम्राज्यावर आपला अंमल प्रस्थापित केला. या काळात ग्रीकांना फक्त त्यांच्या चर्चद्वारे स्थानिक स्वराज्याचे अधिकार मिळाले. चर्चच्या व्यवहारात त्यांनी हस्तक्षेप केला नाही. परंतु त्यांचे त्यावर नियंत्रण मात्र होते. ग्रीसमधील बहुतेक शहरांचे त्यांनी लष्करी ठाण्यांमध्ये रूपांतर केले. त्यामुळे ग्रीसचे प्राचीन सौंदर्य नष्ट झाले. खेड्यातील अनेक शेतकरी स्वतंत्रपणे वागू लागले. काही ग्रीक व्यापाऱ्यांचे वर्चस्व वाढले, कारण ग्रीक जहाजे भूमध्य समुद्रात व्यापार करीत असत. कॉन्स्टँटिनोपल तुर्की अंमलाखालीसुद्धा ग्रीक संस्कृतीचे केंद्रस्थान होते.

आधुनिक ग्रीस : (१८२१–पुढे). फ्रान्सची राज्यक्रांती, कमजोर तुर्की सत्ता व एकोणिसाव्या शतकातील जागतिक घडामोडी यांचा परिणाम होऊन ग्रीसमध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. २५ मार्च १८२१ रोजी ग्रीकांनी तुर्कांविरुद्ध उठाव केला आणि काही दिवसांतच स्वातंत्र्य जाहीर केले. पुढे सु. आठ वर्षे ते सतत तुर्कांविरुद्ध लढत होते. अनेक यूरोपीय देशांनी ग्रीसच्या लढ्यास सहानुभूती दर्शविली व ग्रेट ब्रिटन, रशिया, फ्रान्स वगैरे देशांनी लष्करी मदतही दिली. त्याच्या सीमाही ठरविण्यात आल्या. पुन्हा स्वतंत्र ग्रीक राज्य निर्माण झाले. बव्हेरियाचा प्रिन्स ऑथो याची या देशांनी राजा म्हणून निवड केली. तो पहिला ऑटो म्हणून १८३२ पासून राज्यकारभार पाहू लागला. १८४३ मध्ये एकतंत्री ऑटोविरूद्ध बंड झाले व १८४४ मध्ये ग्रीसला संविधानीय राजसत्तेची घटना देणे त्याला भाग पडले. पुढे १८६२ मध्ये त्याला राज्यत्याग करावा लागला. संविधानात्मक राजेशाही अस्तित्वात येऊन प्रिन्स जॉर्ज (डेन्मार्क) हा राजा म्हणून स्वीकारण्यात आला. १८६४ मध्ये ब्रिटनने आयोनियन बेटे ग्रीसला दिली. १८८१ मध्ये ग्रीसने बर्लिन काँग्रेसच्या ठरावाप्रमाणे तुर्कांकडून थेसाली मिळविले. क्रीट मिळविण्याचा ग्रीसचा प्रयत्न मात्र अयशस्वी झाला.

१९१२ च्या बाल्कन युद्धात ग्रीसने तुर्कस्तानविरुद्ध बल्गेरिया, सर्बीया, माँटनीग्रो वगैरेंची युती केली. त्यांनी तुर्कस्तानचा पराभव केला. ग्रीसला सलॉनिक बेट, मॅसिडोनियाचा काही भाग व क्रीटसह काही इजीअन बेटे मिळाली. या सुमारास पहिल्या जॉर्जचा खून झाला व त्याचा मुलगा पहिला कॉन्स्टंटीन गादीवर आला (१९१३).

पहिल्या महायुद्धाच्या (१९१४–१९) काळात ग्रीसने प्रथम तटस्थतेचे धोरण स्वीकारले, पण पंतप्रधान व्हेन्यिझेलॉस यास दोस्त राष्ट्रांतर्फे युद्धात सहभागी व्हावे, असे वाटत होते. यामुळे दोन गट पडले. व्हेन्यिझेलॉसच्या गटाने कॉन्स्टंटीनला बडतर्फ करून त्याचा मुलगा अलेक्झांडर यास गादीवर बसविले (१९१७). व्हेन्यिझेलॉस पंतप्रधान झाला. त्यांनी दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेतला. १९१९ च्या तहान्वये ग्रीसला स्मर्ना मिळाले. १९२o मध्ये अलेक्झांडर मृत्यू पावला आणि पुन्हा कॉन्स्टंटीन गादीवर आला. पुन्हा युद्ध सुरू झाले. तुर्कस्तानमध्ये केमाल अतातुर्क आला व त्याने ग्रीसकडून स्मर्ना परत मिळविले. १९२३ च्या लोझॅनच्या तहाने ग्रीसला तुर्कस्तानमधील सर्व प्रदेश सोडावा लागला. तसेच ग्रीसने तुर्कस्तानातील सु. पंधरा लाख ग्रीकांना ग्रीसमध्ये सामावून घेतले आणि तेवढेच तुर्की ग्रीस सोडून तुर्कस्तानात गेले. हे सर्व राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली झाले. दोन्ही देशांच्या सीमा ठरविण्यात आल्या.


महायुद्धानंतर संविधानात्मक राजेशाही असावी, की पूर्ण संसदीय लोकशाही असावी, असा प्रश्न निर्माण झाला. जनतेत दोन तट पडले. १९२४ मध्ये प्रजासत्ताकाची स्थापना झाली. १९२४ ते ३३ च्या दरम्यान ग्रीसच्या राजकीय क्षेत्रात सशस्त्र क्रांत्या, प्रतिक्रांत्या वगैरे उलाढाली होत राहिल्या. व्हेन्यिझेलॉस १९२८ मध्ये पंतप्रधान झाला. त्याने तुर्कस्तान, बाल्कन राष्ट्रे यांबरोबर मैत्री संपादण्याचा प्रयत्न केला.१९३३ च्या निवडणुकांनी पुन्हा मॉनर्किस्ट पक्ष सत्तारूढ झाला. व्हेन्यिझेलॉसच्या बंडखोर पक्षाचा १९३५ मध्ये पराभव होऊन दुसरा जॉर्ज पुन्हा गादीवर आला. मिटॅक्सस पंतप्रधान झाला आणि तोच सर्व राज्यकारभार पाहू लागला (१९३८).

दुसऱ्या महायुद्धाच्या (१९३९–४५) काळात ग्रीसने तटस्थता जाहीर केली. मुसोलिनीने ग्रीसचा युध्दतळासाठी उपयोग करणार म्हणून कळविले. याला मिटॅक्ससने नकार दिला. त्यामुळे इटलीने आक्रमण केले परंतु ग्रीसच्या फौजांची इटलीच्या फौजांना अल्बेनियात हुसकून लावले, तेव्हा जर्मनीने आक्रमण करून ग्रीसचा कबजा घेतला. ब्रिटिशांनी ग्रीसला मदत केली. तथापि जर्मन, इटालियन व बल्गेरियन फौजांनी ग्रीस पादाक्रांत केला. जर्मनीने तेथे कळसूत्री सरकार स्थापन केले. दोस्त राष्ट्रांनी ग्रीसमधून जर्मन फौजांना अखेर बाहेर पिटाळले. व्हर्सायच्या तहात ग्रीसला आणखी काही मुलूख मिळाला. दरम्यान ग्रीसमध्ये ई.एल्.ए.एस्. हा कम्युनिस्ट पक्ष व ई.डी.ई.एस्. हा रॉयलिस्ट पक्ष स्थापन झाले. ई.एल्.ए.एस्.ची सूत्रे रशियातून हलविली जाऊ लागली, तर ग्रीसचे पुनरूज्जीवन करण्याचे काम ई.डी.ई.एस्. या पक्षाने हाती घेतले. या दोन पक्षांमुळे देशात यादवी युद्धाचे वातावरण निर्माण झाले. ब्रिटनने आर्थिक साहाय्य देण्यास सुरुवात केली व १९४५ नंतर कम्युनिस्ट देशांना शह देण्याकरिता कम्युनिस्टेतर देशांना अमेरिका सढळ हाताने मदत करू लागली. ग्रीसला इतर दोस्त राष्ट्रांकडूनही आर्थिक साहाय्य होऊ लागले. १९४६ मध्ये निवडणुका झाल्या. कम्युनिस्टांना बेकायदेशीर ठरविण्यात आले. मॉनर्किस्ट पक्षास बहुमत मिळाले. १९४७ मध्ये दुसरा जार्ज मरण पावल्यामुळे पहिला पॉल राजा झाला. कम्युनिस्टांनी वेगळे तात्पुरते सरकार मार्कोस व्हफिएडस याच्या नेतृत्वाखाली स्थापन केले होते. १९४९ मध्ये कम्युनिस्ट बंड संपूर्णपणे चिरडण्यात यश आले. १९५२ च्या निवडणुकांत पॅपॅगोसच्या पक्षास बहुमत मिळून तो पंतप्रधान झाला. त्या वेळी स्त्रियांना प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला. ग्रीस नाटो या संघटनेचा सभासद झाला. १९५४ मध्ये सायप्रसने ग्रीसमध्ये विलीन करण्याची मागणी सायप्रसमधील ग्रीकांना केली. परंतु सायप्रसमधील तुर्की अल्पसंख्याकांनी त्याला विरोध केला. त्याचे ग्रीसमध्ये सामीलीकरण झाले नाही त्यामुळे दंगे वाढले आणि अखेर १९५९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सायप्रसचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. १९५५ मध्ये ग्रीसचा पंतप्रधान कारामानलिस झाला. या वेळी सर्व देशभर विद्युत्‌शक्तीचा प्रसार झाला. १९५८ मध्ये संसदेने कारामानलिसचा कार्यक्रम मान्य केला. राजाने जॉर्जांकोपौलॉस याची पंतप्रधान म्हणून निवड केली. परंतु नॅशनल रॅडिकल पक्षाच्या विजयानंतर कारामानलिस पंतप्रधान झाला. तो १९६१ पर्यंत पंतप्रधान होता. त्याने पंचवार्षिक योजना सुरू केली आणि ग्रीस यूरोपियन कॉमन मार्केटचा सभासदही झाला (१९६२).

१९६२ मध्ये पाँपेद्रूने सरकारवर टीकेची झोड उठविली. कारामानलिसने १९६३ मध्ये राजीनामा दिला. काळजीवाहू सरकार स्थापन होऊन पाँपेद्रू पंतप्रधान झाला, परंतु संसदेचा पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यास राजीनामा द्यावा लागला. १९६४ मध्ये निवडणुका होऊन तो पंतप्रधान झाला पण राजा व त्याच्या पक्षातील लोक यांमध्ये वाद होऊन पाँपेद्रूला पदच्युत करण्यात आले. याचा फायदा घेऊन काही लष्करी अधिकाऱ्यांनी अवचित सत्ता काबीज केली. तीन उच्च लष्करी अधिकाऱ्यांच्या त्रिकुटात सर्व सत्ता समाविष्ट झाली. १९६८ मध्ये पॅपॅडोपोलॉस यास पंतप्रधान करण्यात आले. काही अनुच्छेद वगळून त्याने नवीन संविधान अंमलात आणावे असे ठरले. १९७१ मध्ये मंत्रिमंडळात फेरफार झाले आणि ग्रीसचे सात प्रशासकीय विभाग पाडण्यात आले. प्रत्येकावर एक गव्हर्नर नेमण्यात आला.

लष्करशाहीच्या काळातच राजे कॉन्स्टंटीन यांनी दोन वेळा उठावाचा प्रयत्न केल्यामुळे १ जून १९७३ रोजी ग्रीसचे प्रजासत्ताक जाहीर करण्यात आले. नंतर जुलै १९७३ मध्ये सार्वमत घेण्यात येऊन प्रजासत्ताक अध्यक्षीय प्रणालीला लोकांची मान्यता असल्याचे जाहीर करण्यात आले.

परंतु हे सार्वमत कायदेशीर नव्हते अशी टीका करण्यात आली होती म्हणून कारामानलिस यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ८ डिसेंबर १९७४ रोजी सार्वमत घेण्याचे आश्वासन दिले होते आणि त्याप्रमाणे सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतात संविधानीय राजेशाहीविरुद्ध प्रजासत्ताक असे मतदान होऊन ६९% मते प्रजासत्ताकाला मिळाली. राजेशाहीचा संपूर्ण आणि कायमचा अस्त झाला. डिसेंबर १९७४ मध्ये झालेल्या सार्वमताने राजेशाहीचा प्रश्न कायमचा निकालात काढल्यामुळे ग्रीस संपूर्णपणे प्रजासत्ताक राष्ट्र झाले. जनतेची इच्छा सार्वभौम ठरली.

१७ नोव्हेंबर १९७४ रोजी ग्रीक पार्लमेंटच्या पहिल्या अधिवेशनापुढे भाषण करताना पंतप्रधान कारामानलिस यांनी नवे संविधान ही राष्ट्रीय आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. सरकारचे धोरण स्पष्ट करताना नव्या संविधानाची काही मूलभूत तत्त्वे त्यांनी सुचविली. नवे संविधान संपूर्णतया लोकशाही स्वरूपाचे असावे मात्र शासनाला त्वरित आणि फलदायक कार्यवाही करता येईल इतके अधिकार दिले जावेत, असे एक सूत्र कारामानलिस यांनी मांडले. या सूत्रानुसार शासकीय सत्ता मजबूत केली जाईल. मात्र त्यामुळे शासनाचे पार्लमेंटला असलेले उत्तरदायित्व किंचितही कमी होणार नाही, अशी खबरदारी घेतली जाईल.

या सूत्राशी सुसंगत असलेला व आतापर्यंतच्या राष्ट्रीय अनुभवातील धडे लक्षात घेऊन तयार केलेला नव्या संविधानाचा आराखडा पार्लमेंटला सादर करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

ही नवी घटना अद्यापि तयार झालेली नाही. म्हणून १९५२ च्या संविधानानुसार राज्यकारभार चालविला जात आहे.

देशपांडे, सु. र.

राजकीय स्थिती : जानेवारी १८२२ मध्ये ग्रीसने तुर्कांकडून स्वातंत्र्य मिळविले. त्या वेळेपासून ग्रीसला स्वतंत्र देश म्हणून आधुनिक युगात राजकीय अस्तित्व प्राप्त झाले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत ग्रीस दोस्त राष्ट्रांच्या साहाय्याने कसाबसा टिकून राहिला. दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रीसमध्ये गनिमी काव्याने लढणारे कम्युनिस्ट व राजनिष्ठ असे दोन गट पडले आणि यादवी युद्घास प्रारंम झाला. कम्युनिस्टांनी प्रतिसरकार स्थापन केले. प्रथम ब्रिटन व नंतर अमेरिका या राष्ट्रांच्या मदतीने देशभक्तांनी कम्युनिस्टांचा पाडाव केला आणि १९४९ मध्ये यादवी युद्ध संपले. १९४६ च्या सार्वमतानुसार राजा दुसरा जॉर्ज राज्यावर आला. तो वारल्यावर त्याचा भाऊ पहिला पॉल गादीवर आला. त्याच्यानंतर १९६४ मध्ये राजा झालेल्या कॉन्स्टंटीनला मंत्रिमंडळाशी मतभेद झाल्यामुळे देशत्याग करावा लागला. १९५o पासून १९६५ पर्यंत नऊ वेळा निवडणुका होऊनही ग्रीसला स्थिर सरकार लाभू शकले नाही व राज्यकारभार सेनाधिकाऱ्यांनाच चालवावा लागला. तथापि १९५o पासून देशाची आर्थिक स्थिती सुधारली. नांटो संघटनेचे पाठबळ मिळाले. तथापि अवचित सत्तांतरण, कम्युनिस्टांच्या कारवाया, सायप्रस प्रकरण, विद्यार्थ्यांची दंगल यांमुळे स्थिर सरकार लाभले नाही. तीन लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात सत्ता गेली व लष्करी अध्यक्ष प्रत्यक्ष कारभार पाहू लागला. राजा नामधारी राहिला. या लष्करी हुकूमशाहीला ग्रीसमधील राजकीय पक्षाचे पुढारी, विद्यार्थी व चर्च नेते यांचा विरोध होता. अथेन्सच्या आर्च बिशपने राजीनामा दिला. माजी पंतप्रधान कारामानलिस यांनी स्वेच्छेने देशांतर करून पॅरिस येथे आश्रय घेतला. विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सक्तीच्या लष्करी सेवेविरुद्ध उग्र निदर्शने केली पण ती निर्घृणतेने दडपून टाकण्यात आली. यामुळे जनतेतील असंतोष वाढला.


ज्यावेळी लष्करी क्रांती झाली त्यावेळी ग्रीसचे राजे कॉन्स्टंटीन हे रोममध्ये होते. लष्करी हुकूमशाही उलथून पाडण्याचे दोन अयशस्वी प्रयत्न काही आरमारी गटांनी केले, या प्रयत्नांमागे राजाची प्रेरणा आहे, असे लष्करी सत्ताधाऱ्यांना वाटले. त्यांनी ग्रीसचे प्रजासत्ताक जाहीर केले. मग १ जुलै १९७३ रोजी सार्वमत घेऊन या घोषणेला जनतेचे समर्थन आहे, असे दाखविले.

लष्करी सत्तेला खरा धक्का बसला तो सायप्रसमधील घटनांनी. १५ जुलै १९७४ या दिवशी सायप्रस नॅशनल गार्ड्‌सच्या ग्रीक अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष आर्च बिशप मॅकारीऑस यांना पदच्युत करून सत्ता काबीज केली आणि मिनोकोस सॅम्पसन यांना अध्यक्ष नेमले. सॅम्पसन हे सायप्रसच्या ग्रीसशी विलीनीकरणासाठी लढणारे बंडखोर होते. ते अधिकारावर आल्यामुळे सायप्रसचे स्वातंत्र्य नष्ट होऊन तेथील तुर्की अल्पसंख्याकांवर ग्रीकांची अधिसत्ता स्थापन होईल व सायप्रस बेटही ग्रीसलाच जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शक्यता निर्माण झाली. सायप्रसच्या प्रश्नावर ग्रीस व तुर्कस्तानचा संघर्ष होता म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सायप्रस वेगळे, स्वतंत्र व तटस्थ राष्ट्र बनविण्यात आले होते. मॅकारीऑसच्या उचलबांगडीमुळे या तटस्थतेला धोका निर्माण होताच तुर्की सैन्याने सायप्रसवर आकमण केले. कायरेनिया हे सायप्रसचे एकमेव बंदर आणि कायरेनिया व निकोशिया यांच्या दरम्यान तुर्की लोकवस्तीचा प्रदेश व्याप्त केला. अखेर १६ ऑगस्टला संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार युद्धविराम झाला. मिकॉस सायमन यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला व सायप्रसच्या लोकसभेचे अध्यक्ष क्लेराइडस यांना नवे सरकार बनविण्यास सांगण्यात आले. सायप्रसवरील तुर्की आक्रमणामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत ग्रीक सेनादलाच्या प्रमुखांनी त्यांनीच निर्माण केलेले ॲड्र्यूसोपुलोस सरकार बरखास्त करून नऊ प्रमुख नेत्यांनी राष्ट्रीय आणीबाणीचे राष्ट्रीय सरकार बनवावे, असे आव्हान केले. राष्ट्राध्यक्ष गिझिकिस यांनी देशांतर करून पॅरिसला स्थायिक झालेले माजी पंतप्रधान कारामानलिस यांनाही स्वदेशी परत येण्याचे आमंत्रण पाठविले. त्याप्रमाणे कारामानलिस परत आले व २५ जुलैला त्यांनी आपले नवीन सरकार बनविले. अशा रीतीने सात वर्षांच्या लष्करी राजवटीनंतर ग्रीसमध्ये पुन्हा एकदा नागरिकांचे म्हणजे जनतेच्या पसंतीचे सरकार स्थापन झाले. या प्रसंगी अथेन्समध्ये ग्रीक जनतेची जी प्रचंड निदर्शने झाली, ती १९४४ मध्ये नाझी गुलामीतून ग्रीस स्वतंत्र झाला, त्याप्रसंगी झालेल्या निदर्शनाइतकी मोठी होती. 

कारामानलिस यांच्या सरकारचे ग्रीसचे माजी राजे कॉन्स्टंटीन यांनी आणि त्यावेळचे तुर्की पंतप्रधान एकेविट यांनीही स्वागत केले. ग्रीस व तुर्कस्तान यांचे संबंध पुन्हा सुधारतील अशी आशा एकेविट यांनी व्यक्त केली.

नवीन सरकारने तत्काल लोकशाही अधिकार जाहीर केले. राजबंद्यांची सुटका केली. लष्करी राजवटीने स्थापन केलेल्या कैद्यांच्या छावण्या बंद केल्या. ज्यांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले होते, त्यांना ते परत देण्यात आले. लष्कराने बराकीत परत जावे व राज्यकारभारात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नये, या दोन अटी कारामानलिस यांनी परत येताना घातल्या होत्या. लष्कराने या दोन्ही अटी पूर्णपणे पाळल्या.

कारामानलिस यांनी लष्करी राजवटीने लागू केलेली १९६७ ची संविधानात्मक व्यवस्था रद्द केली व नवी राज्यघटना तयार होईपर्यंत १९५२ चे संविधान पुन्हा लागू केले. लष्करशाहीने १९७३ साली राजसत्ता बरखास्त केली होती. हा निर्णय त्यांनी तात्पुरता स्थगित केला. मात्र ग्रीक जनतेकडून या प्रश्नावर अंतिम निर्णय मिळेपर्यंत राष्ट्रप्रमुखाच्या जागी राजाऐवजी राष्ट्राध्यक्षच राहतील, अशी तरतूद केली.

१९६७ मध्ये पक्षीय राजकीय कार्याला बंदी घालण्यात आली होती, ती २३ सप्टेंबर १९७४ पासून उठविण्यात आली. १९४७ पासून कम्युनिस्ट पक्ष बेकायदा होता. त्याच्यावरील बंदीही उठविण्यात आली. मात्र हिंसात्मक मार्गाने प्रस्थापित लोकशाही राजवट उलथून सत्ता काबीज करण्याचा उद्देश कोणत्याही पक्षाच्या घटनेत नसावा, अशी अट घालण्यात आली.

ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान सेनादलातील व अन्य सुरक्षा दलांतील अनेक अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले. लष्करी राजवटीने नेमलेल्या अनेक मुलकी अधिकाऱ्यांनाही काढून टाकण्यात आले. अशा रीतीने लष्करशाही स्थापन करणारे लोक सत्तास्थानावर राहणार नाहीत, अशी खबरदारी कारामानलिस यांनी घेतली.

नोव्हेंबर १९७४ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. १९६४ नंतर म्हणजे दहा वर्षांनंतर झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत एकंदर सहा पक्षांनी भाग घेतला : (१) सेंटर युनियन-न्यू फोर्सेस हा लोकशाही समाजवादाचा पुरस्कार करणारा आणि राष्ट्रीय एकतेवर भर देणारा पक्ष आहे. (२) न्यू डेमॉक्रसी हा पंतप्रधान कारामानलिस यांचा पक्ष असून ग्रीसमध्ये निरोगी व कार्यक्षम लोकशाही स्थापन करणे हे या पक्षाचे ध्येय आहे. (३) पाँपेद्रू यांचा पान-हेलेनिक सोशॅलिस्ट मुव्हमेंट अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाचा पुरस्कार करणारा पक्ष असून संपत्तीचे व उत्पादन साधनांचे सामाजीकरण करण्यात यावे, अशी या पक्षाची भूमिका आहे. (४) युनायटेड लेफ्ट हा मॉस्कोला मानणाऱ्या व पाश्चिमात्य दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या जहालांचा संयुक्त पक्ष आहे. (५) नॅशनल डेमोक्रॅटिक युनियन हा पक्ष माजी संरक्षण मंत्री पेट्रास गेरू फाईलास यांनी स्थापन केलेला आहे. लष्करी सत्तेविरुद्ध मे १९७३ मध्ये जे आरमारी बंड करण्याचा प्रयत्न झाला, त्यात त्यांचा भाग होता, असा त्यांच्यावर आरोप होता. (६) नॅशनल रॉयलिस्ट युनियन हा सेनापती झेनेटिस यांचा पक्ष आहे. राजे कॉन्स्टंटीन यांना तत्काळ परत बोलावण्यात यावे असा प्रचार त्यांनी केला होता. कारामानलिस यांच्या पक्षाला जागा आणि मतदान या दोन्ही कसोटींवर निर्णायक बहुमत मिळाले. एकूण ३oo जागांपैकी कारामानलिस यांच्या न्यू डेमॉक्रसी पार्टीला २२o जागा व एकूण मतांच्या ५४·३७% मते मिळाली. त्यांच्या खालोखाल सेंटर युनियन-न्यू फोर्सेस या पक्षाला ६o जागा व २o·४२% मते पडली. २१ नोव्हेंबरला कारामानलिस यांनी आपले नवे सरकार स्थापन केले.


या नवीन सरकारने अधिकारावर आल्याबरोबर राजसत्तेच्या भवितव्यासंबंधी सार्वमत घेण्याचा निर्णय जाहीर केला. ८ डिसेंबरला हे सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतात एकंदर मतदात्यांपैकी ७५·५ टक्के मतदारांनी भाग घेतला. ६९·२ टक्के मतदारांनी राजपदविरहित लोकशाहीच्या व ३o·८ टक्के मतदारांनी राजपदसहित लोकशाहीच्या बाजूने मतदान केले. अशा रीतीने ग्रीसच्या राजेशाहीची अखेर झाली. माजी राजे कॉन्स्टंटीन यांनीही लंडन येथून पत्रक काढून देशात शांतता, सुबत्ता व राष्ट्रीय एकता नांदण्याची आवश्यकता आहे, असे निवेदन करून लोकमताने झालेल्या निर्णयाचा स्वीकार केला.

कारामानलिस यांनी लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात राजसत्तेचे निर्मूलन झाल्यामुळे आता खरीखुरी राज्यघटना प्रसृत करणे आवश्यक आहे, या नव्या राज्यघटनेने सरकारचे लोकसभेला असलेले उत्तरदायित्व अबाधित राखूनही त्वरित व फलदायक निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकारी शाखेला देण्यात येतील, असे आश्वासन दिले. 

आपल्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाची रूपरेषाही त्यांनी स्पष्ट केली. राष्ट्रीय स्वातंत्र्य, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर परराष्ट्र धोरणाची आखणी केली जाईल. भौगोलिक, राजकीय व वैचारिक दृष्ट्या ग्रीस हा पाश्चिमात्य देश आहे. संरक्षण व भौतिक सुबत्ता या दोन्ही उद्देशांसाठी ग्रीस पश्चिमी देशांबरोबर सहकार्य करू इच्छितो. नाटो कराराच्या लष्करी भागातून बाहेर पडण्याचा आणि ग्रीसमधील अमेरिकन तळ काढून घेण्याबद्दलचा निर्णय घेतला असला, तरी ग्रीस पश्चिमी देशांशी असलेले राजकीय, सांस्कृतिक व अन्य संबंध तोडू इच्छित नाही. यूरोपियन आर्थिक संघटनेत सहभागी होण्याची ग्रीसची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

सायप्रसच्या प्रश्नावर तुर्कांशी ग्रीसचा गंभीर संघर्ष आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. सायप्रसमध्ये लादलेली कोणतीही स्थिती ग्रीस मान्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्ष गिझिकिस यांनी राजीनामा दिल्यामुळे रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून स्टासिनोपोलुस हे बहुमताने निवडून आले. विरोधी पक्षांनी त्यांच्या निवडणुकीला विरोध केला कारण ते पंतप्रधानाच्या पक्षाचे होते. आपल्याच पक्षाचा अध्यक्ष निवडून वेगळ्या प्रकारे एकपक्षीय सत्ता रूढ करण्याचा प्रयत्न कारामानलिस करीत आहेत, असा त्यांचा आरोप होता.

२८ नोव्हेंबर १९७४ रोजी यूरोपीय समितीत (कौन्सिल ऑफ यूरोप) ग्रीसला पुन्हा प्रवेश देण्यात आला. १९६९ मध्ये यूरोपियन समितीने ग्रीसच्या लष्करी राजवटीवर मानवी हक्क दडपून टाकल्याबद्दल वारंवार टीका झाली, म्हणून ग्रीसने यूरोपियन संघटनेशी संबंघ तोडला होता.

कारामानलिस यांच्या सरकारने लष्करी उठाव व लष्करशाही स्थापन करण्याचे कारस्थान केल्याबद्दल माजी पंतप्रधान पापाद्रूपोलीस व त्याचे चौदा सहकारी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले.

ग्रीस-तुर्कस्तान यांच्यात इजीअन समुद्रातील तेलसंशोधनाच्या हक्काबद्दलही संघर्ष आहे. ग्रीस व तुर्कस्तान हे दोन्ही देश हा हक्क आपला आहे असे मानतात. हा वाद वाटाघाटीने सुटण्याची शक्यता नाही, असे वाटल्यावरून ग्रीस पंतप्रधान कारामानलिस यांनी विरोधी पक्षांची अनुमती घेऊन हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे हा वाद सोपवावा, अशी सूचना २७ जानेवारी १९७५ रोजी केली.

ग्रीसमध्ये आता लोकशाही व्यवस्था स्थिर झाल्यासारखी वाटते. अंतर्गत राजकीय अशांतता कमी झाली असून ग्रीसचे मुख्य प्रश्न आर्थिक व आंतरराष्ट्रीय संबंधाचे आहेत. चलनफुगवटा, भाववाढ व तेलाच्या भाववाढीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हे आर्थिक प्रश्न व तुर्कस्तानच्या आक्रमणानंतर सायप्रसमध्ये निर्माण झालेली परिस्थिती व इजीअन समुद्रातील तेलसंशोधनाच्या हक्काबद्दल तुर्कस्तानशी असलेला तंटा, हेच मुख्यतः ग्रीसचे आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत. १ डिसेंबर १९७४ रोजी सार्वमताने राजेशाही नष्ट होऊन ग्रीस प्रजासत्ताक राष्ट्र बनले. तथापि नवे संविधान तयार झालेले नाही. तोपर्यंत १९५२ च्या ११२ कलमी संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार चालविण्यात येत आहे. त्यातील मुख्य तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत : सर्वांना समान कायदा, आरोपीस न्यायालयासमोर दाखल होण्याचा हक्क, बेकायदा अटकेपासून बचाव, सभा व संघटनास्वातंत्र्य, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण, राजपद वंशपरंपरागत, पहिल्या जॉर्जच्या पुरुष-संततीला अग्रहक्क, राजा सर्वसंमत धर्मसंस्थेचा अनुयायी असला पाहिजे, त्याच्या गैरहजेरीत त्याचे अधिकार युवराजाकडे आणि युवराज अल्पवयीन असल्यास राणीकडे राहतील.

स्थानिक स्वराज्यसंस्था : या संविधानानुसार ग्रीसचे ५१ विभागांत (नोमॉई) विभाजन केले असून प्रत्येकावर नोमॉर्क नावाचा अधिकारी प्रमुख असतो. गृहमंत्री त्यांची नियुक्ती करतो.

तथापि १९६७ च्या क्रांतीने शासनव्यवस्थेत बराच बदल झाला. राज्यसत्ता लष्करी अंमलदाराच्या हाती गेली. नवीन शासन व्यवस्थेत (अ) राष्ट्रीय सभा (नॅशनल कौन्सिल), (ब) संसदीय सभा, (क) राष्ट्रीय शैक्षणिक सभा या संस्था निर्माण करण्यात आल्या. परिणामी शासनव्यवस्था संसदीय स्वरूपाची असली, तरी व्यवहारात लष्करी गटाचा एकछत्री अधिकार चालू आहे.

स्थानिक कारभार : हा बव्हंशी फ्रेंच पद्धतीवर आधारलेला आहे. गृहखात्याच्या अनुज्ञेने काही कर बसविण्याचे अधिकार नगरपालिकेला असतात पण प्रांतिक सेवांचा एकंदर खर्च राष्ट्रीय गृहखात्याच्या अंदाजपत्रकातूनच भागवला जातो. पालिकांच्या व नोमॉईच्या निवडणुका दर चार वर्षांनी होतात.

न्यायव्यवस्था : संविधानानुसार न्यायव्यवस्था स्वतंत्र असून राजाने वैध रीतीने नियुक्त केलेले न्यायाधीश न्यायदान करतात. वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आजीव असते आणि इतर न्यायाधीश अपराधी ठरल्याखेरीज काढून टाकता येत नाहीत. ॲरेऑपँगस या सर्वश्रेष्ठ न्यायालयाचे दिवाणी व फौजदारी विभाग आहेत. अपीलांची न्यायालये दोन्ही प्रकारचे दावे ऐकतात. प्रत्येक न्यायालयात शासकीय अभियोक्ता असतो. सवेतन न्यायाधीशांच्या (जस्टीस ऑफ पीस) अधिकारकक्षेतील ३५o स्थानिक न्यायालये आणि ४७ दंडाधिकारी न्यायालये कनिष्ठ पातळीवरील न्यायदान करतात. फ्रेंच पद्धतीप्रमाणे चौकशी, पुराव्याची छाननी आणि साक्षीदारांची तपासणी दंडाधिकारी करतो आणि खटला भरावयाचा की नाही हे तोच ठरवतो. तसे असल्यास प्रकरण सरकारी वकिलाकडे सोपवण्यात येते. नागरी आणि हत्यारबंद अशी दोन प्रकारची पोलीसदले गृहखात्याच्या अधिकाराखाली आहेत. त्यांची पुनर्रचना ब्रिटिश तज्ञांनी दुसऱ्या महायुद्धानंतर करून दिली.

संरक्षण : भूसेना, नौसेना व वायुसेना मिळून ग्रीसचे शस्त्रसज्ज दल तयार झाले आहे. २१ वर्षांवरील सर्व पुरूष नागरिकांना अनिवार्य सैनिकी सेवा, शिवाय सीमाप्रांतांच्या स्थानिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय गृहसंरक्षक दल. भूसेनेत एक चिलखती व अकरा पदाती विभाग मिळून अधिकारी व सैनिक एकूण सु. १,१८,ooo नौदलात १८,ooo एक संचारनौका, कित्येक विनाशिका, फ्रिगेट्स, पाणबुड्या आणि गौण नावा मिळून शंभरवर युद्धनौका. आरमारी ठाणी सॅलॅमिस व क्रीटच्या सौध उपसागरात स्कॅरॅमँगा येथे नाविक प्रशिक्षण विभाग : एकूण सु. १८,ooo नौसैनिक अधिकारी. वायुसेनेत २३,ooo सैनिक आणि ३oo विमाने, त्यांच्या दहा लढाऊ विमान तुकड्या अठ्ठाविसाव्या ॲलाइड टॅक्टिकल एअर फोर्समध्ये सामील (१९७२). संरक्षणावर अंदाजपत्रकातील ३o% खर्च केला जातो.


आर्थिक स्थिती : ग्रीसची अर्थव्यवस्था मूलतः कृषिप्रधान आहे. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर थोडीबहुत औद्योगिक प्रगती झालेली दिसते. १९६o साली एक विकासप्रकल्प जाहीर करण्यात आला. त्यात आर्थिक क्षेत्रातील सर्व विभागांच्या उन्नतीबरोबर एक मोठा खत कारखाना व डेल्फाय क्षेत्रातील बॉक्साइटचा विनियोग करण्यासाठी ॲल्युमिनियमचे कारखाने या मुख्य योजना आहेत. देशाचा चतुर्थांशच भाग शेतीयोग्य भूमीचा आहे. पण ४५% प्रजा शेती उद्योगात आहे. देश अन्नधान्याबाबत पूर्णपणे स्वावलंबी नाही, काही प्रमाणात गहू आणि इतर धान्ये आयात करावी लागतात. १९२४ मध्ये आणि पुन्हा १९५२ साली मोठ्या जमिनींचे छोट्या शेतकऱ्यांत वाटप झाल्यानंतरही एकेकाच्या वाट्याला o·६ हे. इतकाच तुकडा येतो. १९६o पासून ६,ooo हून जास्त शेती सरकारी संस्थांनी कर्ज, विक्री व यंत्रसामग्री या कामी शेतकऱ्यांना मदत दिली. अमेरिकेचे आर्थिक साहाय्य, दलदलींचा निचरा करून किंवा ताली घालून नवीन जमीन तयार करणे, पाटबंधारे बांधणे, खते व वाहने पुरवणे अशा रूपांनी लाभल्यामुळे शेतिमालाचे उत्पादन १९३o च्या दुप्पट होऊ लागले. गहू, बार्ली, ओट, मका, कलिंगडे, बटाटे, टोमॅटो, तंबाखू, कापूस, साखर, आल्फा-आल्फा, बीट, ऑलिव्ह, बेदाणा, मनुका, द्राक्षे, मोसंबी, लिंबे, सफरचंद, पीच इ. महत्त्वाची पिके आहेत. १९७o मध्ये ७,३o,ooo हे. क्षेत्र ओलिताखाली होते. ते वाढणे अवश्य आहे. १९६९ मध्ये ९५,३४२ ट्रॅक्टर व ७,३९२ कापणी यंत्रे होती. जमिनीच्या टंचाईमुळे तंबाखू, खिसमिस इ. निर्यातीने अधिक पैसे मिळवून देणारी पिके काढणे किफायतशीर ठरते. १९७o मध्ये ९८,ooo हे. क्षेत्रात अमेरिकन डॉ. १o·२ कोटी किमतीचे तंबाखूचे उत्पादन झाले. एकूण निर्यातीपैकी १७% किमतीची तंबाखू असते. विशिष्ट जातीच्या द्राक्षांपासून खिसमिस व बेदाणा उत्पादन मुख्यतः उत्तर पेलोपनीससमधील पट्रॅस व कॉरिंथच्या परिसरात होते. अन्य प्रदेशात, विशेषतः क्रीट, इजीअन व आयोनियन बेटांवर द्राक्षांचे उत्पादन व मद्यनिर्मिती होते, तथापि त्यांची निर्यात विशेष होत नाही. थेसाली, मॅसिडोनिया व थ्रेस विभागात गहू पिकतो. ईपायरस विभागात मका व बार्ली होतात. सखल किनारभागात व कॉर्फ्यू आदी बेंटावर ऑलिव्ह फळांचे महत्त्वाचे उत्पादन होते. जगात तिसऱ्या क्रमांकाची ऑलिव्ह तेलनिर्मिती ग्रीसमध्ये होते. दुसऱ्या महायुद्धानंतर मॅसिडोनिया, पेलोपनीसस, ईपायरस आणि मध्य ग्रीस येथे भाताचे पीक बरेच वाढवण्यात आले आहे. अल्कलाइन जमिनीतही तांदूळ पिकविण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. कपाशीचे पीक सेरेच्या आसमंतात, थेसाली व थ्रेसमध्ये होते.

१९४१ ते ४४ मध्ये इटालियनांनी व जर्मनांनी देश व्यापल्यामुळे आणि नंतर कम्युनिस्ट बंडाळीमुळे ग्रीसच्या पशुधनाची जबर हानी झाली होती पण १९६o नंतर परिस्थिती बरीच सुधारली. १९७१ मध्ये ९,८६,ooo गाई-बैल १o,ooo म्हशी ५,o४,ooo डुकरे ७६,८६,ooo मेंढरे ४१,८५,ooo शेळ्या २,१६,ooo घोडे १,७०,ooo खेचरे ३,४५,ooo गाढवे व २,९o,५o,ooo कोंबड्या व बदके होती. तथापि पशुपालन, गोसंवर्धन व कुक्कुटपालनाच्या बाबतीत देश मागेच आहे. पशुमांस बरेचसे यूगोस्लाव्हियातून आणि अंडी इतर देशांतून आयात करावी लागतात. १९७१ मध्ये गाय, हरिण, म्हैस यांचे मांस ८६,७७o मेट्रिक टन बकरी, कोकरे, बोकड इत्यादींचे मांस ९६,१५७ टन डुकरांचे मांस ६३,२१९ टन पक्ष्यांचे मांस ८८,४o६ टन डुकरांची खाद्य चरबी ४,९३६ टन गायींचे दूध ५,९६,५o९ टन म्हशींचे दूध ३,६o५ टन मेंढीचे दूध ४,७७,७७o टन शेळीचे दूध ३,६२,७२४ टन लोणी ६,५९६ टन चीज १,१८,१६o टन ताजी मलई ३,२o६ टन कोंबडीची अंडी १,o७,७११ टन असे उत्पादन झाले. देशातील कच्ची चामडी नीटपणे न सांभाळल्याने कातडी कमावण्याच्या धंद्याला ती अपुरी पडतात. घरोघर शेतकऱ्यांच्या बायका लोकर कातून हातमागावर रंगीबेरंगी कांबळी व बस्करे बनवितात. तोच एक ग्रामीण हस्तव्यवसाय आहे. पुरेशा जमिनीच्या अभावी अन्नपदार्थांबाबत स्वयंपूर्ण होणे शक्य नसल्याने, अधिक पाणी उपलब्ध करून घेऊन अधिक भूभाग शेतीयोग्य बनवणे, परकीय चलन मिळवणारी पिके सुधारून वाढवणे, अर्थव्यवस्था अधिक उद्योगप्रधान करून कृषी आणि उद्योग यांचा योग्य समन्वय साधणे अशा समस्यांना ग्रीस सध्या तोंड देत आहे. अस्थिर राजकीय परिस्थिती, कृषी व्यवसायाचा विकास निर्वेधपणे होण्याआड येत आहे.

वीज उत्पादन १९६४ साली ८·५ लाख किवॉ. होते, त्यापैकी जलविद्युत सु. तृतीयांश व बाकीचे लिग्नाइट कोळशाच्या इंधनावर औष्णिक. दुसऱ्या महायुद्धापूर्वी यूरोपमधील सर्वांत कमी वीजनिर्मिती ग्रीसमध्ये होती. १९५o नंतर अमेरिकेच्या आर्थिक मदतीने नवीन वीजघरे तयार झाली. मॅसिडोनियातील टॉलेमेइस आणि यूबीआतील आलीव्हेरीऑन येथील वीजघरे औष्णिक वीज उत्पादन करतात. ॲकिलोअस नदीवर क्रेमास्टा येथे १९६o नंतर बांधलेल्या जलविद्युत् केंद्राची उत्पादनक्षमता ४ लाख किवॉ. आहे व प्रत्यक्ष उत्पादन ३oo  कोटी किवॉ. ता. होऊ शकते. सार्वजनिक शक्तिमहामंडळाची १९७o मधील वीजउत्पादनक्षमता २३.५ लाख किवॉ. होती व १९७१ मधील वीजउत्पादन १,o६१ कोटी किवॉ. ता. होते व नैसर्गिक वायूंचे ८५ लक्ष घ.मी. होते. युद्धोत्तर कार्यार्थ आण्विक संशोधनासाठी १९६१ साली अयीत्रा पॅरॅस्केवी येथे डेमॉक्रिनॉस केंद्र स्थापन झाले आहे.

ख्रि. पू. पाचव्या शतकापासूनच लाव्ह्‌रीऑनजवळील खाणीतून शिसे, जस्त अशी धातुके काढली जात होती. देशातील सर्व खनिजांचे अजून पुरे निस्सारण झालेले नाही. दुसऱ्या महायुद्धामुळे आणि नंतरच्या यादवीने खाणधंद्याचे फार नुकसान झाले. १९३६ मधील उत्खननाचा अष्टांशही १९४८ मध्ये निघाला नाही. तथापि अमेरिकेच्या आर्थिक साहाय्याने यंत्रसामग्री पुन्हा बसवून खाणी चालू केल्यावर उत्पादन पूर्वीपेक्षाही वाढले. ग्रीसमध्ये २o,ooo चे वर खाणकामगार आहेत. कॅल्सिडिसीमधील आणि सेरिफॉस, कीथ्नॉस, सिफ्नॉस आणि स्कीरॉस बेंटांवरील खाणींतून मिळून लोहधातुके दीड लाख टनांवर निघाली (१९६४). येथील लोहधातुकांत ४४ से ५२% लोहांश असतो. नवीन पद्धतीने निकेल व लोह यांचे धातुक १९६५ मध्ये तयार होऊ लागले. इल्यूसिसचे पार्‌नॅसस पर्वतभागातले एकूण बॉक्साइट वर्षाला १९६o मध्ये ८,८४,ooo टन निघे ते १९६८ मध्ये १७,६७,३oo टन निघू लागले. ते बहुतेक ब्रिटनकडे सिमेंटसाठी निर्यात होत होते. १९६५ मध्ये ॲल्युमिनियमासाठी प्रक्रिया करावयाचा उद्योग निघाला आहे. कॅल्सिडिसीच्या आणि पेलोपनीससमधील एर्मीऑनीच्या खाणीमधून काढलेले पायराइट्स गाळून वर्षाला १ लाख टन गंधकांश निघतो. एकूण खनिजांपैकी ७५% खनिजे पायरइट्स, लोहधातुक, क्रोमाइट, कच्चे मॅग्नेसाइट आणि बॉक्साइट ही असतात. अँटिमनी, बॅराइट, थोडे सोने, लोह-निकेल, प्यूमिस, गंधक, सिरॅमिक माती, संगमरवर, संगजिरे, ॲस्बेस्टॉस, जिप्सम, चुनखडक व लिग्नाइट, थोडे तेल ही इतर खनिजे सापडतात. १९७१ चे खाणी उत्पादन हजार मेट्रिक टनात लिग्नाइट व ब्राउन कोल १o,८८७·३ लोहधातुक १,१६५·७ जस्त २७·१ बॉक्साइट २,८३३·३ क्रोमाइट ४६·४ चांदी (१,ooo कि. ग्रॅ.) ८९९·९ मीठ ११३·७ आयर्न पायराइट्स असे होते. भारी प्रतीचे एमेरी नॅक्सॉसजवळ सु. ५,ooo मे. टन मिळते पण त्याच्या बदली बनावट घर्षके निघाल्याने मागणी कमी झाली आहे. लिग्नाइट कोळशाचे उत्पादन वाढविण्यात आले. खनिज तेलासाठी कसून प्रयत्न झाल्यावर ते थोड्या प्रमाणात तुर्की सीमेजवळ थ्रेसमध्ये व अधिक आशादायी प्रमाणात मध्य ग्रीसच्या पश्चिम भागात क्लेसौरा येथे सापडत आहे.


दुसऱ्या महायुद्धात जळणासाठी झाडांची तोड होऊन वनप्रदेशांची हानी झाली, तथापि झाडे पुन्हा लावून जोपासण्याच्या व वनप्रदेशातील चराईवर निर्बंध घालण्याच्या कडक धोरणामुळे वार्षिक लाकूड उत्पादन २७ लाख घ.मी. गोलटे आणि ३ लाख घ.मी. कापीव लाकूड इतके होऊ लागले आहे. थोडेबहुत टर्पेंटाइन व कीऑस बेटावरील झुडपापासून एक प्रकारची राळ एवढेच वन्य पदार्थांचे उत्पादन. बरेचसे लाकूड, लगदा आणि वृत्तपत्रीय कागद आयात करावा लागतो.

आजूबाजूच्या समुद्रांत मासे भरपूर पण दुसऱ्या महायुद्धात मच्छीमारी नौका शत्रूने जप्त किंवा नष्ट केल्यामुळे धंदा बंद पडल्यासारखा होता. युद्धोत्तर अमेरिकेच्या मदतीने आधुनिक पद्धतीच्या मच्छीमार बोटींची संख्या बरीच वाढविण्यात आली आणि पकडलेले मासे शीतगृहात ठेवण्याची व डबाबंद करण्याची योजना व्यवस्थित आखल्यामुळे वितरण आणि विक्रीची सोय उत्तम झाल्याने १९३८ साली एकूण मागणी जी ३५,ooo टन होती ती १९६o नंतर ८o,ooo टनांपर्यंत वाढली. १९६८ मध्ये १६,४३५ कोळी मासे मारीत होते. १९७१ मध्ये ९६,३oo टन मासे यंत्रसज्ज बोटींतून पकडले गेले. स्पंज उत्पादन विशेषतः कालीम्नॉस येथे होते, १९७१ मध्ये उत्पादन ६३,३oo किग्रॅ. झाले. ते बहुतेक निर्यात होते.

उद्योग : देशात कपाशीखेरीज दुसरा काही कच्चा माल उपलब्ध नसल्याने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होणे अवघड दिसते. १९२o नंत्तर तुर्कांशी ग्रीक नागरिकांची अदलाबदल झाल्यावर स्थलांतरितांची मोठी संख्या देशात आली तेव्हा थोड्या मजुरीत कसबी कामगार मिळू लागले आणि कापड गिरण्यांसारख्या धंद्यातून त्यांचा उपयोग करून घेण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाअखेर ग्रीक उद्योगधंदे बंदच पडले होते पण १९५o नंतर अमेरिकेच्या आर्थिक साहाय्याने औद्योगिक उत्पादन युद्धपूर्व कालापेक्षा ८५ टक्क्यांनी अधिक करणे शक्य झाले. मुख्य कारखानदारी सूतकताई आणि कापड विणण्याची. १९६३ मध्ये ३o,ooo टन सुती धागा व १६ कोटी मीटरहून अधिक सुती कपडा तयार झाला. त्यामानाने इतर कापडांचे उत्पादन प्रमाण फार कमी होते. लोकर धागा १o हजार टन, कापड १ कोटी मीटर रेयॉन धागा २,९oo टन, कापड २८ लाख मीटर नायलॉन धागा ३८o टन. १९७१ मध्ये सुती, लोकरी व रेयॉन धागा एकूण ६७,४oo टन व एकूण कापड ३२, ooo टन झाले. पायरीअस येथील रसायन उद्योगसमूहाने १९६३ मध्ये ९१,ooo टन गंधकाम्ल, सु. २४ लाख टन सुपर फॉस्फेट्स व २,ooo टन कॉस्टिक सोडा इतके उत्पादन केले. अथेन्सच्या दुसऱ्या बाजूस आस्प्राँपिरगॉस येथील तेलशुद्धीकरण कारखान्यात १८,४५,ooo टन खनिज तेलजन्य पदार्थ तयार झाले. १९६३ साली इल्यूसिसजवळ तीन लाख टन उत्पादनक्षमतेचा पोलादलोखंडाचा जोड कारखाना चालू करण्यात आला. पायरीअसनजीक स्कॅरॅमँगा येथील नव्या नौकाबांधणी कारखान्यातून पहिली महासागरगामी नौका १९६o सालीच तयार झाली. इतर महत्त्वाचे उद्योग सिमेंट, डबाबंद भाज्या, फळे, फळांचा रस, बीर, मद्ये, सिगारेट, कातडी पादत्राणे, कृत्रिम लाकूड, कागद, प्लॅस्टिक रबरी वस्तू, रासायनिक अम्ले, रंग, औषधे, साबण, सौंदर्यप्रसाधने, जंतुनाशके, खते, काचेच्या वस्तू, तार इ. आहेत. १९६५ च्या कायद्याने देशाचे अथेन्स-पायरीअस, पट्रॅस, सलॉनिक, व्हॉलॉस, कव्हाल व ईराक्लीऑन असे सहा औद्योगिक विभाग करण्यात आले आहेत.

देशाचे निसर्गसौंदर्य, हवापाणी आणि प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे या आकर्षणांनी पर्यटन व्यवसायास भरपूर वाव असूनही रस्त्यांची व पथिकाश्रमांची उणीव असल्याने विकास पुरेसा नाही. १९४९ नंतर अमेरिकेच्या आर्थिक पाठिंब्याने राष्ट्रीय पर्यटन संघटनेने विज्ञापनव्यवस्था, परदेशात सूचनाकेद्रांची स्थापना, प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्ते-दुरुस्ती व त्यांची वाढ, निवासासाठी अधिक चांगल्या सोयी, नाट्योत्सव, मोटारसफरी व सागरसंचार अशा सुधारणांनी पर्यटनाचे प्रलोभन वाढवले. १९७१ मध्ये पर्यटनामुळे ३o·५ कोटी अमेरिकन डॉलर उत्पन्न मिळाले. त्यावर्षी यूरोपातून ११,२७,७६२ आणि उत्तर अमेरिकेतून ४,७९,८२२ पर्यटक ग्रीसमध्ये गेले होते. १९७२ मध्ये २७ लाखांहून अधिक प्रवासी आले व काही कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. १९७२ मध्ये हॉटेलांतून १,५१,४२o प्रवाशांची सोय होती.

कामगार, कामगार संघटना व कामगार कल्याण : १९७१ मध्ये आर्थिक दृष्ट्या कार्यकारी लोक ३२,८३,८८o म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ३७·४५% होते. त्यांपैकी शेती, पशुपालन, जंगल व मच्छीमारी यांत ४o·५१% खाणी व निर्मिती उद्योगात १७·o७% वीज, गॅस, पाणीपुरवठा यांत o·७३% बांधकामात ७·७६% व्यापार, उपाहारागृहे, हॉटेले यांत १o·६७% वाहतूक, साठा, दळणवळण यांत ६·४९% पैसा, विमा, मालमत्ता यांत २·३७% समाजकल्याण, वैद्यकीय सेवा यांत १२·४६% व इतर १·९४% होते. कामगारसंघटना कारखानेवार नसून प्रदेशवार आहेत. एका शहरातील एकाच उद्योगातील सर्व कामगार सामान्यतः एकाच संघटनेचे असतात. सबंध राष्ट्रातील एकाच उद्योगाचे संघसदस्य एक महासंघ (फेडरेशन) करतात. १९१८ मध्ये स्थापन झालेला ग्रीक सार्वत्रिक श्रमिक महासंघ हा देशातील कामगार चळवळीचा गाभा असून, त्यात ६५ श्रमिक केंद्रे आणि १७ संघटना आहेत. कामगार-व्यवस्थापक संबंधात शासन महत्त्वाची भूमिका घेते. वेतनाच्या सामूहिक वाटाघाटीसाठी वैध व्यवस्था आहे व संप बेकायदा नसले, तरी उभय पक्षांत मतैक्य न झाल्यास मध्यस्थीसाठी श्रमिक मंत्रालयाला हस्तक्षेप करता येतो. विवाद्य प्रश्न त्रिपक्ष लवादमंडळाकडे सोपवता येतात व त्यांचे निर्णय उभय पक्षांना बंधनकारक असतात. सामान्यतः आठवड्यात रोज ८ तास काम व एक दिवस रजा ही पद्धत पण श्रमिक मंत्रालयाच्या अनुज्ञेने कामाचे तास प्रसंगी ५६ पर्यंतही वाढवता येतात. १९६४ मध्ये ४४ तासांचा आठवडा होता. वार्षिक पगारी रजा व १४ वर्षांखालील मुलांना कामाची बंदी यांबाबत कायदे आहेत. नाताळासाठी महिन्याचा व ईस्टरसाठी पंधरवड्याचा पगार लाभांश म्हणून देण्याचा रिवाज आहे. बडतर्फीच्या पगाराचे प्रमाण धंद्यानुसार वेगवेगळे असते. कारखान्यातील कामगारांच्या स्वास्थ्यविषयक व अपघातनिवारक तरतुदी कायद्याने केल्या आहेत.

व्यापार, वाणिज्य इत्यादी : अंतर्गत व्यापार : मूळ व्यापारी शहरे अथेन्स, पायरीअस आणि सलॉनिक. येथे आयातनिर्यात व्यापाऱ्यांच्या मुख्य कचेऱ्या असून त्यांच्या शाखा इतर लहान शहरांतून आहेत. सलॉनिकचा आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळावा हा मुख्य व्यापारी वार्षिकोत्सव सप्टेंबरमध्ये तीन आठवडे भरतो.

यंत्रसामग्री, खनिज तेलपदार्थ, कपडा, कच्चा माल, वाहतुकीचे साहित्य, गव्हाचे पदार्थ, रासायनिक द्रव्ये, धातुके व खनिजे, लाकूड आणि प्राथमिक घडीव माल इत्यादींच्या आयातीवर देश अवलंबून असल्यामुळे ग्रीसचा व्यवहारशेष प्रतिकूल आहे. तंबाखू-पाने, शेती उत्पादन यांचे प्रमाण निर्यातीत विशेष असून त्याखालोखाल कपाशी, सुकी व ताजी फळे व ऑलिव्ह तेल यांची निर्यात होते. प. जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, इटली आणि कित्येक इतर देशांशी महत्त्वाचे व्यापारी करार करून ग्रीसने स्वदेशात स्थैर्य व जगात प्रतिष्ठा मिळविली आहे.

निर्यातीपेक्षा आयातमूल्य अधिक पडल्याने व्यापारातील आर्थिक तुटीचे ग्रीसचे दुखणे जुने आहे. १९७o-७१ मध्ये आयात अनुक्रमे ७,८७५ कोटी ड्राक्मा आणि ६,२o७·८ कोटी ड्रा. झाली आणि निर्यात अनुक्रमे १,९२७·६ कोटी ड्रा. व २,४६३·८ कोटी ड्रा. झाली. १९७o मध्ये प. जर्मनी, जपान, इटली, फ्रान्स, अमेरिका, स्वीडन, नेदर्लंड्स, बेल्जियम-लक्सेंबर्ग व रशिया यांच्याकडून प्रमुख आयात व प. जर्मनी, इटली, अमेरिका, यूगोस्लाव्हिया, नेदर्लंड्स, फ्रान्स व रशिया यांच्याकडे प्रमुख निर्यात झाली. १९७o मध्ये ग्रीक निर्यातीपैकी १६·६% सोव्हिएट गटांच्या राष्ट्रांकडे, ५·४% रशियाकडे व ४५·८% यूरोपीय सामाईक बाजारपेठ देशांकडे गेली. १९७o मध्ये अन्न व प्राणी, पेये, तंबाखू, रसायने, निर्मितिपदार्थ व कच्चा माल अशी निर्यातीची वर्गवारी होती. तंबाखूचे सर्वांत मोठे गिऱ्हाईक प. जर्मनी व रशिया हे होते. आयातीत यंत्रे व वाहतूक सामग्री, कच्चा माल ही ५o% होती. एकूण निर्यातीपैकी ४५% निर्यात निर्मिती उद्योगधंद्यांची असते व हे प्रमाण वाढते आहे.


१९२७ मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ ग्रीस ही मध्यवर्ती बँक शासननियंत्रित असून तिच्या ३,८८७·४ कोटी ड्रा. च्या नोटा १९७o मध्ये चलनात होत्या. ही बँक इतर बँकिंग व्यवहारही करते. नवा ड्रा. हे चलन असून त्याचे १oo लेप्टा असतात. १ नवा ड्रा. = १,ooo जुने ड्रा. तसेच ७२ नवा ड्रा.= १ पौंड व ३o नवा ड्रा. = १ अमेरिकन डॉलर असा विनिमय दर एप्रिल १९७४ मध्ये होता. १९४४ मध्ये आर्थिक स्थिती इतकी खालावली होती, की १ नवा ड्रा. = ५,ooo कोटी जुने ड्रा. होते. १९४६, ४९ व ५३ मध्ये पुन्हा दर बदलले व १९५४ मध्ये नवी नाणी आणि नोटा निघाल्या. अमेरिकेची मदत मिळाल्यामुळेच ग्रीस सावरला. १९७o साली सुवर्णसंचय व परदेशी चलननिधी २८·o४ कोटी अमेरिकन डॉलर इतके होते. देशातील सु. ७o% बँकिंगचे काम नॅशनल बँक ऑफ ग्रीस अँड अथेन्स ही व्यापारी बँक करते व तीच गहाणाचे व्यवहार करणाऱ्या नॅशनल मॉर्टगेज बँक ऑफ ग्रीसवर नियंत्रण ठेवते. आणखी सात व्यापारी बँका असून त्यांच्या शाखा सर्व मुख्य शहरांतून आहेत. आर्थिक विकास भांडवलपुरवठा करणारी ईडीएफ्‌ओ ही शासकीय संस्था उद्योगधंद्यांना मध्यमकालीन व दीर्घकालीन पत-कर्जे देते. अलीकडे सु. १o कोटी डॉलरमूल्याची अशी कर्जे दिलेली आहेत. या कर्जाखेरीज ग्रीसच्या अर्थव्यवस्थेतील सु. ३o कोटी डॉलर्स कर्जापैकी / रकमा मध्यवर्ती बँकेने दिल्या होत्या. खाजगी बँकांतील ठेवी बऱ्याच प्रमाणात वाढून १oo कोटी ड्राक्माहून जास्त झाल्या. त्यामुळे कर्जाऊ भांडवलपुरवठा वाढवणे सुलभ झाले. अल्पमुदतीच्या कर्जरोख्यांवर बँक ऑफ ग्रीसचा कसर दर १o% अधिक बँक दलाली २% आहे. इतर प्रकारच्या बँकांचे, विशेषतः व्यापारी व शेती बँकांचे, दर कमी आहेत. १९७o मध्ये एकूण बँकठेवी १o,७९४·१ कोटी ड्रा. व ऑगस्ट १९७२ मध्ये पोस्ट ऑफिस बचत बँकेत १४,५९९·३ कोटी ड्रा. होते.

१९५५ अखेर देशात १२६ विमासंस्था होत्या, त्यांपैकी ४४ ग्रीक व बाकीच्या परदेशी होत्या. त्यांच्यावर व्यापारमंत्रालयाची देखरेख असते. विम्याची कामे करणाऱ्या कंपऱ्या आयुर्विषयक १३, आगीच्या १११, सागरी ८८ व अपघात ६४ अशा आहेत. १९५१ मध्ये सात कोटी ड्राक्माचा आयुर्विमा चालू होता व सर्व कंपन्यांचे मिळून हप्ते जवळजवळ १४ कोटी ड्रा. होते. ग्रीसची शासकीय कृषी पेढी ग्रामीण विभागात विम्याची कामे करते.

शेअरबाजार : खिमँतिस्तेरिऑन या अथेन्सच्या शेअरबाजारात रोज सकाळी ११.३o से मध्यान्हापर्यंत फक्त अर्धा तास व्यवहार होतो. १९४९ मध्ये या बाजाराचे ३५ सदस्य होते आणि यादीवर ११५ कंपन्यांचे शेअर्स होते. पायरीअस येथे दाणाबाजार आहे. स्वदेश कर्जरोख्यांचे पैसे फेडणे शासनाने १९४o साली बंद केले. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर काढलेल्या ३o कोटी ड्राक्माच्या राष्ट्रीय विकास कर्जरोख्यांवर मात्र नियमितपणे व्याज देण्यात येते.

१९६५ मध्ये ग्रीसचा राष्ट्रीय जमाखर्च ड्राक्मा चलनात पुढीलप्रमाणे होता. जमा : एकूण २,६८५ कोटी पैकी प्राप्तिकर ३८७ कोटी, आयातकर ८५५ कोटी, एकाधिकार लाभ ४५ कोटी, विक्री, उलाढाल आणि अबकारी कर ६४५ कोटी, इतर कर ३९o कोटी, इतर आवक ३६३ कोटी. खर्च : एकूण ३,२१३ कोटी पैकी राष्ट्रीय कर्जावर व्याज १३८ कोटी, किंमत आणि कमाई स्थिर ठेवण्यासाठी पूरक अनुदान २१३ कोटी, संरक्षण ६oo कोटी, स्थानिक प्रशासनासाठी अनुदान ८४ कोटी, अन्य चालू खर्च १,५९o कोटी, मुलकी सरकारी भांडवल गुंतवणूक ४८o कोटी, भांडवल गुंतवणुकीसाठी अनुदाने व कर्जे १o८ कोटी. तूट ५२८ कोटी, परदेशी मदत १८ कोटी. राष्ट्रीय कर्ज : देशांतर्गत १,७१९ कोटी, परदेशी १,७o७ कोटी. भांडवल गुंतवणूक : १९५२ मध्ये सरकारने कायदा करून परदेशी भांडवल गुंतवणुकीस उत्तेजनार्थ आश्वासन दिले, की परदेशी भांडवलदारांची ग्रीसमधील मालमत्ता सरकारजमा होणार नाही. परदेशी भांडवल परत परदेशाला नेण्याची मुभा आहे आणि खास करमाफीही आहे. १९५८ पर्यंत जवळजवळ ३o कोटी डॉलर्सची परदेशी भांडवल गुंतवणूक ग्रीसमध्ये झाली होती, त्यांपैकी २o कोटी दीर्घ मुदतीसाठी व बाकीची अल्प मुदतीसाठी. अशा भांडवल गुंतवणुकीत परदेशस्थ ग्रीकांचा विशेषतः नौकाधिपांचाही १o कोटींवर हातभार लागला आहे.

दळणवळण : ग्रीसची बंदरे, लोहमार्ग, पूल, आगगाड्यांचे डबे व एंजिने या सर्वांचाच दुसऱ्या महायुद्धात विध्वंस झाला होता. युद्धोत्तर त्यांची दुरुस्ती, भरपाई, पुनर्रचना व सुधारणा होऊन सर्व वाहतूकसाधनांत पूर्वीपेक्षाही वाढ झाली. ३५,२५७ किमी. रस्त्यांपैकी ८,oo४ किमी. राष्ट्रीय व २७,२५३ किमी. प्रांतिक रस्ते आहेत. मुख्य राष्ट्रीय रस्ते अथेन्स ते सलॉनिक, सलॉनिकहून पश्चिमेस फ्लॉरिन, उत्तरेस एक्झोनईतून यूगोस्लाव्हियात, पूर्वेस कॉमॉतीनी आणि मरित्स नदीपार तुर्कस्तानकडे जातात. दुसरे रस्ते कॉरिंथ, कलमाई आणि पट्रॅसआयोनिया, अथेन्सपासून पश्चिमेस व आग्नेयीसही जातात. वाहने नेणाऱ्या तरी पट्रॅस ते इटलीतील ब्रिंडिसी बंदराला व ईगूमेनीत्सहून कॉर्फ्यू बेटाला जातात. कॉर्फ्यूतील उत्तम रस्ते, ते बेट ब्रिटिशांच्या ताब्यात असताना, झाले आहेत. ऱ्होड्झ बेटावरही चांगले रस्ते आहेत. १९७२ साली देशात ३,o२,४५५ मोटारी व १,३o,६२३ मालवाहू गाड्या व ११,५३३ बसगाड्या होत्या. लोहमार्ग २,५७१ किमी. वेगवेगळ्या रूंदीचे, बहुतेक राष्ट्रीय मालकीचे, शेजारच्या यूगोस्लाव्हिया, बल्गेरिया व तुर्कस्तान या देशांतील लोहमार्गांशी जोडलेले आहेत. नौकानयनात प्राचीन काळाप्रमाणेच आजही ग्रीस आघाडीवर आहे. त्याचा आर्थिक लाभही देशाला बऱ्याच प्रमाणात मिळत आहे. ग्रीक निशाणाखेरीज पनामा, अमेरिका, लायबीरिया व ब्रिटन यांच्या निशाणांखालीही ग्रीक जहाजांची मालवाहतूक चालते. त्यात तेलवाहू बोटी ठळक प्रमाणात आहेत. १९७२ मध्ये १o,२७,o२,ooo टनांची जहाजे ग्रीसच्या बंदरात आली. त्यांवर ५९·२ लाख टन माल चढविला व १,७७,७२,ooo टन उतरविला. ग्रीसच्या २,१२८ मालवाहू बोटी, २९७ प्रवास बोटी, ४२८ तेलवाहू नौका व १८२ इतर होत्या.

ऑलिंपिक एअरवेज या बव्हंशी ग्रीक मालकीच्या कंपनीकडे १९५७ पासून विमानवाहतुकीचे काम आहे. अथेन्स जगातील अन्य राजधान्यांना वायुमार्गांनी जोडले आहे. अंतर्गत विमान-वाहतूक अथेन्स व सलॉनिकहून कॉर्फ्यू, मिटिलीनी, लेम्नॉस, रोड्झ आणि क्रीट या ठिकाणांशी होते. १९७२ मध्ये देशात विमानसंचार ३·८१ कोटी किमी. झाला. वाहतूक २९६·४ कोटी उतारू किमी. ४·२ कोटी टन किमी. माल व ३९·६१ टन किमी. टपाल इतकी झाली. १९७२ मध्ये दूरध्वनी अंदाजे १४ लाखांवर आणि नभोवाणी परवाने २८ लाख होते. नभोवाणीची १२ केंद्रे राष्ट्रीय नियंत्रणाखाली आहेत. सलॉनिक येथे व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रक्षेपण केंद्र आहे व रूमानियातील बूकारेस्ट रेडिओवरून ग्रीक भाषेत कम्युनिस्ट प्रचाराचा भडिमार ग्रीसवर चालू असतो. १९७२ मध्ये दूरचित्रवाणी यंत्रे ८,५o,ooo होती. हेलेनिक नॅशनल रेडिओ व टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे शासकीय प्रक्षेपण केंद्र आहे.


लोक व समाजजीवन : प्राचीन ग्रीसचे वैभव ओसरल्यावर व पुन्हा बायझंटिनच्या पाडावानंतर वेळोवेळी अनेक मागास जमातींनी ग्रीसवर आक्रमणे केली. तथापि अधिक प्रगत अशा मुख्यतः हेलेनिक वंशाच्या स्थानिक प्रजेने आक्रमकांना पचवून घेतले. सहाव्या शतकानंतर दक्षिणेतील पेलोपनीससपर्यंत वेगवेगळ्या भागांतून स्थायिक झालेले स्लाव्ह फक्त स्थलनामांतूनच उरले. चौदाव्या शतकात ॲटिका, आर्गोलिस आणि सभोवारच्या कित्येक बेटांत येऊन वस्ती केलेल्या अल्बेनियनांनी आपली भाषा टिकवून ठेवली पण ग्रीसशी मात्र ते एकरूप झाले. व्लाक हे भटके मेंढपाळ मूळचे रूमानियातून दहाव्या शतकापासून येऊन मॅसिडोनिया, थेसाली आणि ईपायरसमध्ये राहू लागले. मॅसिडोनियात अनेक वंशांच्या प्रजेचे संमिश्रण होते पण १९२३ मध्ये तुर्कस्तान व बल्गेरिया यांच्याशी लोकसंख्येची अदलाबदल करून तद्देशीय लोकांऐवजी त्या त्या देशातील ग्रीक परत आणण्यात आले आणि नंतर यूगोस्लाव्हियाच्या सीमेनजीकच्या काही भागाखेरीज मॅसिडोनियात भाषिक आणि वांशिक एकजिनसीपणा आला. थ्रेसमध्ये मात्र अदलाबदलीतून वगळलेले बरेच मुसलमान शिल्लक आहेत. ते तुर्क आणि पोमॅक या दोन अगदी भिन्न वंशाचे असून तुर्क चौदाव्या शतकात जेते म्हणून येऊन राहू लागले आणि पोमॅक ख्रिस्तपूर्व काळातील थ्रेस वंशीयांचे वंशज म्हणविणारे, तुर्की अंमलात मुस्लिम झाले, पण ते बल्गेरियनसारखी स्लाव्ह बोली बोलणारे आहेत. १८२२ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून ग्रीसची लोकसंख्या सु. बारापट वाढली आहे. याच काळात देशाचे क्षेत्रफळही तिप्पट झाले. दर किमी. ला २६ लोक हे प्रमाण ६४ पर्यंत वाढले. प्रजेतील वाढ १९१७ च्या रशियन क्रांतीमुळे आलेल्या, १९१९ मध्ये नयीच्या तहानुसार बल्गेरियातून आलेल्या व १९२१-२२ च्या तुर्की-ग्रीस युद्धानंतर १९२३ च्या लोझॅन तहान्वये आलेल्या स्थलांतरितांमुळे झाली. १९२८ मध्ये ग्रीसमध्ये स्थलांतरित म्हणून आलेले ग्रीक नागरिक रशियातून ५८ हजार, बल्गेरियातून ४९ हजार व तुर्कस्तानमधून ११ लाख असे होते. भारी जननप्रमाण हेही लोकसंख्येच्या वाढीचे एक कारण आहे. ग्रीक भूमीवरील प्रजेच्या असह्य भारामुळे अगदी पूर्वीपासून ग्रीक लोक देशांतरास जात आले आहेत. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत रशिया, रूमानिया, हंगेरी, ईजिप्त अशा नजीकच्याच नव्हे, तर दूरदूरच्या देशांत जाऊन पैसा कमावून ग्रीकांनी तो आपल्या गरीब देशात सत्कारणी लावला आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या ३५ वर्षांत देशातील दशांश किंवा साडेचार लाखांवर लोक अमेरिकेला गेले. १९७१ मध्ये ५२·२% म्हणजे ४६,५७,४८९ लोक १o हजारांवर वस्ती असलेल्या शहरांतून, ३५% म्हणजे ३o,७२,३८३ लोक २,ooo पेक्षा कमी वस्तीच्या खेड्यांतून व ११·७% म्हणजे १o,२८,७६९ लोक २,ooo से ९,९९९ वस्तीच्या गावांतून राहत होते. १९७१ मध्ये १,४१,२२o जिवंत व १,९४o मृत बालके जन्मली. १,७३२ बालकांचे जन्म अवैध होते. ७०,६८८ विवाह व ७३,७९५ मृत्यू झाले. ६१,७४८ लोकांनी देशांतर केले व २४,७o९ आप्रवासी ग्रीसमध्ये आले. ग्रीक वंशाचे / लोक देशाबाहेर, पूर्व भूमध्य समुद्र भागात, सायप्रस इ. ब्रिटिश वसाहतींतून आणि अमेरिकादी इतर देशांत राहतात. सामाजिक वर्ग सामान्यतः व्यवसायनुसारी, कृषिजीवी बहुसंख्य ग्रामीण प्रदेशात औद्योगिक कामगार, कार्यालयाचे कर्मचारी, व्यापारउदमी, शासकीय सेवकवर्ग, सुशिक्षित व्यावसायिक आणि संरक्षक दलाचे लोक शहरांतून राहतात. १९६१ मध्ये बहुतेक म्हणजे ८१,१८,ooo ग्रीक लोक ख्रिस्ती धर्मांच्या ग्रीक ऑर्थडॉक्स चर्च (ग्रीक सनातनी धर्मसंस्था) या पंथाचे होते. त्यांचे उत्सव आणि सण ख्रिस्ती धर्माच्या आरंभ काळातल्यासारखेच आहेत. २५,ooo रोमन आणि ग्रीक कॅथलिक, १,o८,ooo मुस्लिम, १५,ooo प्रॉटेस्टंट, ५,८oo हिब्रू व बाकीचे इतर पंथीय होते. देशात धर्मस्वातंत्र्य आहे, परंतु ग्रीक सनातनी धर्मसंस्थेत ढवळाढवळ किंवा तिच्यात हस्तक्षेप अथवा तिची निंदानालस्ती यांस मनाई आहे. खेड्यातील लोकांची राहणी साधी आणि आहार गहू-रोटी, ऑलिव्ह, शेळीचे दूध, कांदा, पावटे, पालेभाजी, ताजा किंवा खारा मासा यांपैकी असतो. मांस दुर्मीळ. काटकसरी जीवनातही हौस आढळून येते. दगडमातीचे पांढऱ्या भिंतींचे लहान घर, जवळ एखादे बदामाचे किंवा डाळिंबाचे झाड, आसपास थोडी फुलझाडे, खिडक्यांतून एक-दोन कुंड्या, दुरून भरून आणलेले पाणी व जळणासाठी कोळशाच्या शेगड्या ही पद्धत सर्वत्र दिसते. गावाच्या चौकात दुकाने आणि उघड्यावर कॉफीपानगृहे, तेथे बसून दिवसाअखेर दाट, काळी, गोड कॉफी पाण्याच्या घुटक्यांबरोबर घेत सिगारेटचे झुरके ओढीत राजकारणावर आवेशाने चर्चा करणारे नागरिक गावोगाव आढळतात. उत्सवप्रसंगी समूहनृत्यात लोक भाग घेतात. ग्रीकांना कौटुंबिक जीवनाची आवड आहे. त्यांना मुलींपेक्षा मुले बरी वाटतात, कारण मुलींचा हुंडा द्यावा लागतो. शहरी जीवन इतर देशांतील शहरी जीवनासारखे. ग्रामीण गृहिणी घर टापटीपशीर ठेवतात आणि सुगरणपणाचा अभिमान बाळगतात. १९५९ पासून देशात मेट्रिक पद्धत सक्तीची झाली. १९२३ मध्ये देशात ग्रेगरियन पंचांग सुरू झाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर समाजकल्याण कार्यक्रमांची जबाबदारी शासनावर आली. ‘इका’ ही सामाजिक विमा संस्था कामगारांकडून वेतनाचा पंचमांश व मालकांकडून षष्ठांश भाग घेते. १९५६ साली संस्थेने १६३ कोटींवर निवृत्तिवेतन, १७ कोटींचे बेकारांना साहाय्य, ६३ कोटी आजाऱ्यांना मदत, ३२ कोटी अन्यप्रकारे मदत, २ कोटी विविध कार्यांना अनुदाने आणि ३५ कोटी संचालन खर्च मिळून सु. ३१२ कोटी ड्रा. व्यय समाजकल्याणार्थ केला. इकाचे सभासदत्व सर्व पगारदारांना सक्तीचे आहे. सदस्यसंख्या ६ लाखांवर. इकातर्फे होणाऱ्या तरतुदींत वैद्यकीय साहाय्य, वृद्ध, पंगू, निराधार, स्त्रिया, मुले व इतर अवलंबितांना वेतन, रोगग्रस्तांना रोख मदत, मर्तिकांचा खर्च इ. बाबींचा समावेश होतो.

१९७o मध्ये देशात ८५२ रुग्णालये व आरोग्यभुवने होती. त्यांत ५४,६३३ खाटा होत्या. १४,२६३ डॉक्टर व ४,३९५ दंतवैद्य होते.

भाषा व साहित्य : ग्रीक ही इंडो-यूरोपीय कुटुबांतील एक अत्यंत महत्वाची भाषा. ‘मायसीनियन ग्रीक’ ह्या नावाने ओळखले जाणारे, ग्रीक भाषेचे इ.स.पू. १४५o ते १२oo च्या दरम्यानचे रूप संशोधकांस उपलब्ध झाले आहे. हा ग्रीकचा जुन्यातला जुना पुरावा. त्यावरून ग्रीक भाषा ही ३,ooo हून अधिक वर्षांपूर्वींची आहे, असे दिसून येते. आयोनियन, ॲटिक, एओलियन, डोरिक ह्या ग्रीक भाषेच्या काही महत्त्वाच्या बोली. इ.स.पू. चौथ्या शतकापासून ‘कोइनेऽ’ ह्या ग्रीक भाषारूपाला सर्वमान्यता प्राप्त झाली. कोइनेऽ ही अथेन्सच्या बोलीवर आधारलेली होती व आयोनियनचा तिच्यावर प्रभाव होता. ग्रीकांनी सेमिटिक लिपी आत्मसात करून तिचा विकास केला. ग्रीक लिपी हे सेमिटिक लिपीचेच अधिक रेखीव रूप होय. ग्रीक ही सर्व यूरोपीय लिपींची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जननी होय. एकोणिसाव्या शतकात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्राचीन ग्रीक भाषेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नात कथार्युऔसा ही कृत्रिम भाषा तयार झाली, ती सरकारी व बौद्धिक लेखनासाठी वापरण्यात येते पण सामान्य लोकांना कळण्याइतकी ती सुबोध नाही. 


ग्रीक साहित्याचा इतिहास जवळजवळ ३,ooo वर्षांचा आहे. महाकाव्ये, भावकविता, नाट्यकृती, इतिहासग्रंथ तसेच तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ ह्यांनी प्राचीन ग्रीक साहित्य संपन्न असून पुढील पिढ्यांना अनुकरणीय वाटावेत, असे अभिजात वाङ्‌मयीन आदर्श त्यातून निर्माण झाले. महाकवी होमरकृत इलिअड  आणि ओडिसी  ही महाकाव्ये जगद्विख्यात आहेत. स्टिसिकोरस, बकिलिडीझ, पिंडर, आनाक्रेऑन, सॅफो, कोरिना ही प्राचीन ग्रीक भावकवी-कवयित्रींची नावे. एस्किलस, सॉफोल्कीझ युरिपिडीझ ह्यांनी श्रेष्ठ शोकात्मिका दिल्या. बायझंटिन किंवा पूर्व रोमन साम्राज्याच्या कालखंडात निर्माण झालेल्या ग्रीक साहित्यावर ख्रिस्ती धर्मप्रेरणांचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटलेला आहे. १४५३ नंतरचा काळ आधुनिक ग्रीक साहित्याचा. कोस्टिस पालामास, इथोआन्निस, सायकारीस, निकोस काझांटझाकीस, येऑर्यिऑस सेफेरीस, अलेक्झांड्रॉस पापाडिॲमॅटिस हे आधुनिक ग्रीक साहित्यिकांपैकी काही नामवंत. येऑर्यिऑस सेफेरीसला १९६३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. [→ ग्रीक साहित्य].

ग्रीसमधील ९५ दैनिकांपैकी अथेन्सची अक्रॉपलिस, ता निया, कॅथिमेरिनी  ॲथिनैकी  ही प्रमुख असून त्यांचा खप प्रत्येकी ३५,ooo वर आहे. सलॉनिकच्या एलिनिकॉस वोरास  या मध्यपक्षीय पत्रालाही चांगला खप आहे. बहुसंख्य वृत्तपत्रे हुजूरपक्षीय किंवा उदारमतवादी, समाजवादी फार थोडी व बेताच्या खपाची. इतर नियतकालिकांत चिनाइका  हे देशातील सर्वाधिक (१,१o,ooo) खपाचे स्त्रियांचे पाक्षिक, ॲक्तिनेस  हे ख्रिस्ती संस्कृती-प्रचारार्थ विविध विषयांचे पाक्षिक आणि टेक्निका क्रॉनिका  हे तंत्रसंबंधी व आर्थिक प्रश्नांना वाहिलेले पाक्षिक यांचा अंतर्भाव होतो.

नगरपालिकांची, ग्रामीण व विविध समाजीयांची ग्रंथालये ग्रीसभर पसरलेली. शिक्षण मंत्रालयाची सहा फिरती पुस्तकालये व चित्रप्रदर्शक विभाग दूरदूरच्या भागात संचार करतात. त्याच मंत्रालयावर सार्वजनिक शासकीय ग्रंथालयांची जबाबदारी आहे, पैकी सर्वांत महत्त्वाचे अथेन्स येथील बॅलिॲनेऑज राष्ट्रीय ग्रंथालय असून सर्वांत मोठे लोकसभेचे आहे. विद्यापीठांच्या ग्रंथालयांखेरीज इतर शिक्षणसंस्था, मंत्रालये, संघटना इत्यादिकांच्या संग्रहांपैकी कृषिसंस्थेची व रसायनज्ञांची ग्रंथालये उल्लेखनीय आहेत.

शिक्षण : १९६३ पासून सर्व पातळ्यांवर शिक्षण मोफत आहे. सहा वर्षांचे प्राथमिक शिक्षण साडेपाचव्या वर्षी सुरू होते. डिसेंबर १९७o मध्ये ९,६२o सार्वजनिक प्राथमिक शाळांतून ८,७२,६०८ विद्यार्थी, ६४५ खासगी प्राथमिक शाळांतून ६५,२३८ विद्यार्थी, ३९८ सायंकालीन शासकीय पाठशाळांतून ८,४२५ विद्यार्थी होते. प्राथमिक शिक्षक २८,५३६ होते. ५,o४७ बालक मंदिरांतून ८२,८८४ मुले होती. तीन वर्षांच्या माध्यमिक शिक्षणानंतर आणखी तीन वर्षांचा शिक्षणक्रम क्लासिकल किंवा प्रॅक्टिकल यांपैकी निवडता येतो. पहिल्यात क्लासिक्सवर व दुसऱ्यात गणित व सायन्स यांवर भर असतो. डिसेंबर १९७o मध्ये ९१८ माध्यमिक शाळांतून (जिम्नॅशियम) ४,o२,९९४ मुले व १२,४६९ शिक्षक, २३४ खासगी जिम्नॅशियममध्ये ५२,९१o विद्यार्थी व १,५o२ शिक्षक होते. ३o५ सार्वजनिक तांत्रिकी व व्यावसायिक खासगी शाळांतून २८,९१२ विद्यार्थी होते. १९७o मध्ये ग्रीसमध्ये अथेन्स विद्यापीठ – २३,७o८ विद्यार्थी थेसालोनायकी विद्यापीठ – २४,५९५ विद्यार्थी यॉआनीन विद्यापीठ – १,८३७ विद्यार्थी (१९६९) पट्रॅस विद्यापीठ – १,२२३ विद्यार्थी (१९६९) उच्च शिक्षणाच्या ५ प्रशाळा असून व्यापारी आणि आर्थिक शिक्षणशाळा–५,४७o विद्यार्थी राज्यशास्त्र शाळा – ५,८३२ विद्यार्थी अथेन्सचे कृषिविद्यालय – १,२१५ विद्यार्थी अथेन्स थेसालोनायकी औद्योगिक शाळा – ७,२३६ विद्यार्थी ललितकला विद्यालय – २७६ विद्यार्थी १५ शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांतून २३२ प्राध्यापक व २,५२४ विद्यार्थी अशी उच्च शिक्षणाची परिस्थिती होती. दहा वर्षांवरील वयाच्या लोकांत १९६१ मध्ये १८% निरक्षर होते, पैकी पुरुषांत ८% होते. १९७२ च्या अंदाजाप्रमाणे १२% निरक्षरता होती. अथेन्समधून पंधरा दैनिके व सोळा नियतकालिके, सलॉनिकहून सहा दैनिके व एक नियतकालिक आणि कॉरिंथ व पट्रॅस येथून प्रत्येकी तीन दैनिके निघतात.

प्रमुख कौतुकालये अथेन्स येथे पाच असून शिवाय प्रांतांतून आठ व बेटांवरून सात आहेत. बहुतेक पुरातत्त्वविषयक अठरा छोटी संग्रहालये स्थानिक महत्त्वाच्या वस्तूंची आहेत. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण मुलांच्या निम्म्याहून कमी. समतोल अर्थव्यवस्थेसाठी योजनापूर्वक शिक्षण कसे द्यावे, ही तूर्त ग्रीसची शिक्षणविषयक समस्या आहे.

कला, क्रीडा : ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षे ज्या वास्तुशिल्पाच्या आणि मूर्तिशिल्पाच्या कृती झाल्या, त्या पाश्चात्त्यांच्या शिल्पकलांना आजही प्रमाणभूत आहेत. ग्रीक शिल्पावर सुरुवातीस आधीच्या पुरातन ईजिप्शियन शिल्पकलेची छाया होती पण लवकरच ग्रीसची स्वतंत्र प्रतिभा विकसित झाली. प्राचीन नगरराज्यांच्या काळातील शिल्पाचे परिपूर्ण सौंदर्य अलेक्झांड्रियन युगातून मग रोमन प्रभुत्वाच्या दिवसातून, नंतर बायझंटिन कालखंडातून आणि अखेर तुर्की जमान्यातून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत कायम राहिले. चित्रकला प्राचीन काळच्या कॉरिंथ प्रदेशातील मृत्तिकापात्र-नक्षीकामापासून परिणत होऊन भित्तिचित्रांतून विकसित होत बायझंटिन कालखंडात वैभवपूर्ण स्वरूपात अवतरली. तुर्की अंमलात ग्रीक चित्रकला धार्मिक विषयात टिकून राहिली. स्वातंत्र्योत्तर तिच्यावर पाश्चात्त्य शैलीचा पगडा बसला. ग्रीसच्या भौगोलिक स्थानाचा परिणाम तेथील पाश्चात्त्य व पौर्वात्य कलांचा संगम, हा होय. विशेषतः संगीतात हा दोन प्रवृत्तींचा समन्वय व विरोधही दिसून येतो. संगीताचे हे दुहेरी स्वरूप प्राचीन काळापासून आढळते. या ऐतिहासिक द्वंद्वांचा परिणाम दिसून येतो. आजचे ग्रीक संगीत लोकांचे धार्मिक व अभिजात संगीत मिळून बनले आहे. प्राचीन ग्रीक विद्या-कलांच्या अधिदेवतांत तर्प्सिकोरी या नृत्याच्या अधिष्ठात्री देवतेचा समावेश आहे. प्राचीन ग्रीक नाटकांतील समूहगीतांबरोबर समूहनृत्यांचा भागही महत्त्वाचा होता. त्यातील नृत्य-नर्तकी देवतांचे मुखवटे घालून करीत. अभिजात नृत्यकला लोकनृत्यात अजूनही टिकून आहे. मात्र तिच्यावर शेजारच्या देशांची छाप आहे.

प्राचीन अभिजात ग्रीक नाटक अजूनही जगाचे डोळे दिपवीत असता एकोणिसाव्या शतकात नवस्वतंत्र ग्रीकांनी नाट्यकलेचे पुनरुज्जीवन करून असामान्य श्रेणीचे नाट्यप्रयोग सादर केले. रशियातील ओडेसा, रूमानियातील बूकारेस्ट, आयोनियन बेटे व प्रत्यक्ष ग्रीसची भूमी येथे नाट्यकलेसाठी वेगवेगळ्या समूहांनी केलेल्या प्रयत्नांची फलश्रुती उच्च प्रतीच्या नाट्यनिर्मितीत झाली. या कलेत ग्रीस आजही आघाडीवर आहे. चित्रपटनिर्मितीला ग्रीसमध्ये सुरुवात झाली असून १९६४ मध्ये संपूर्ण लांबीचे शंभरहून अधिक चित्रपट निघाले आणि ते सु. ७oo कायम व ९oo हंगामी प्रेक्षागृहांत ६ कोटी लोकांनी पाहिले. ग्रीसमध्ये १,४oo चित्रपटगृहे आहेत.

ख्रि.पू. ७७६ मध्ये सुरू झालेल्या मैदानी शर्यतींचे चतुर्वार्षिक फड ऑलिंपिक गेम्स, ही ग्रीसची क्रीडाजगताला थोर देणगी आहे. या शारीरिक पटुत्वाच्या चढाओढी चौथ्या शतकात रोमन बादशाह थिओडिसिअस याने थांबवल्या. फ्रान्समधील एका उमरावाच्या प्रयत्नांनी १८९८ मध्ये त्या पुन्हा चालू करण्यात आल्या. सुरुवातीस झ्यूस या प्रमुख ग्रीक देवाच्या उत्सवाप्रीत्यर्थ फक्त ग्रीक नागरिकांसाठी असलेल्या या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. तेव्हापासून मात्र जगातील सर्व लोकांना त्या खुल्या राहिल्या. आधुनिक ग्रीक या चढाओढीतून चमकत नसले तरी शरीरबळ कसोटीचे विविध खेळ ते हौसेने खेळतात. सर्वसामान्य लोकांत विविध धार्मिक सण व उत्सव हेच मनोरंजनाचे मुख्य कार्यक्रम असतात. अशा प्रसंगी समूहनृत्ये, समूहगायन, मिरवणुका इ. प्रकारांनी शहरांना व खेड्यांना जत्रांचे स्वरूप येते आणि उल्हसित नागरिकांच्या झुंडींनी रस्ते फुलून जातात.


महत्त्वाची स्थळे : ग्रीस भूमीवरील व भोवतालच्या बेटांवरील प्राचीन शिल्पावशेष, सुंदर निसर्गदृश्ये व सुखद हवामान यांकडे आकृष्ट होऊन अनेक यूरोपीय व अमेरिकन हौशी प्रवासी तेथे दरसाल हिवाळ्यात येत असतात. त्यांच्या सोयीसाठी विमानाने, समुद्रातून, रेल्वेने आणि रस्त्यांवरून वाहतूक सुलभ करण्याची ग्रीक सरकार पराकाष्ठा करीत आहे. हॉटेले व अन्य निवासव्यवस्था, माहिती कचेऱ्या आणि मार्गदर्शक याही तरतुदी तयार असतात. अथेन्सखेरीज प्रमुख शहरे सलॉनिक, पायरीअस, पट्रॅस व कॉरिंथ ही असून ती बंदरेही आहेत. प्रेक्षणीय प्राचीन शिल्पावशेष अथेन्सप्रमाणेच डेल्फाय, कॉरिंथ, एपिडॉरस, स्पार्टा, ऑलिंपिया या ठिकाणी आणि क्रीट, यूबीआ, कीऑस इ. बेटांवर आहेत. कॉर्फ्यू बेट विश्राम निवासाच्या दृष्टीने रमणीय आहे. ग्रीसच्या भूमिवर व बेटांवरून अनेक स्थळे, विशेषतः धार्मिक वास्तू, बायझंटिन कलाकौशल्याची साक्ष देतात. ईशान्य ग्रीसच्या थेसाली प्रांतात कॅल्सिडिसी द्वीपकल्पाच्या एका टोकाला ॲथॉस पर्वतावरील मठांतून मध्ययुगीन ग्रीक सनातन ख्रिस्ती धर्मसंस्थेचे स्वरूप जसेच्या तसेच कायम टिकून राहिलेले दिसते.

पाश्चात्त्य संस्कृतीची मूलभूमी यूरोपीयांच्या विद्या, कला, विज्ञान, तत्त्वज्ञानादी सर्व वैचारिक अंगांचे उगमस्थान व जगातील मानवजीवनावर जास्तीत परिणाम घडवून आणण्याच्या शक्तींचे आद्यपीठ, असे ग्रीसचे वर्णन करता येईल. सारे जग समृद्ध करणारा अडीच-तीन हजार वर्षांपूर्वींच्या ऐश्वर्याचा वारसा अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतर एकोणिसाव्या शतकात पुन्हा मिळवून ग्रीक राष्ट्र नव्या दमाने आधुनिक काळात इतर देशांच्या बरोबरीला आले आहे. 

ओक, शा. नि.


ग्रीस

ग्रीस ग्रीस ग्रीसमॅसिडोनियन बालिका

ग्रीक कोळ्याचा परिसर, टोलोनग्रीसच्या ग्रामीण भागातील पाणवठाअथेन्स येथील राजवाडाअथेन्सच्या राष्ट्रीय संग्रहालयातील प्राचीन अभिजात शिल्पाकृतीग्रीक खेड्यातील धान्याची मळणी, बाजूला प्राचीन झ्यूस-मंदिराचे अवशेषअधीना मीनाइआच्या प्राचीन मंदीराचे अवशेष, डेल्फायआपोनियन द्वीपसमूहातील कॉर्फ्यू बेटाचा एक भागइस्टर सणातील मिरवणूक-दृश्य, अथेन्स