बसरा : इराकमधील इतिहासप्रसिद्ध शहर व एकमेव मोठे बंदर. लोकसंख्या ३,७०,८७५ (१९७० अंदाज). हे इराणच्या आखातापासून सु. १२१ किमी. आत शट अल् अरब नदीच्या पश्र्चिम तीरावर वसले आहे. अल् आशार नदी शट अल् अरबला नैऋत्येकडून मिळते. संगमापासून तीन  किमी.  वर  बसरा, संगमावर  आशार  आणि  सहा  किमी.  वर माकिल वसले आहे. माफिल हे बसऱ्याचे आधुनिक बंदर व आशार हे जुने बंदर व व्यापारी केंद्र आहे.

शट अल् अरब नदीवरील बसरा शहराचा भाग

हे शहर खलिफा पहिला उमर याने ६३८ मध्ये अझ् झुबैर येथे वसविले. हारून अल् रशोदच्या कारकीर्दीत (७८६ ते ८०९) बसरा अतिशय भरभराटलेले होते. अरेबियन नाइट्स ह्या सुप्रसिद्ध ग्रंथात या तत्कालीन वैभवशाली नगरीचे निर्देश केल्याचे दिसते. परंतु अब्बासी खिलाफतीच्या अस्तानंतर त्याचेही महत्त्व कमी होत गेले. १६६८ मध्ये तुर्कांनी ते काबीज केले. १७२०-५२ या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बसऱ्यात आपले ठाणे उभारले. एकोणिसाव्या शतकात बगदादपर्यतच्या जलवाहतुकीचे नौकातरण-केंद्र म्हणून बसऱ्याचा विकास झाला. पहिल्या महायुद्धात बसऱ्याला पुन्हा एकदा इराक व भारत ह्यांमधील दळणवळणाचे बंदर म्हणून महत्त्व मिळाले. ह्या काळात शहर व बंदर ह्या दोहोंमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. १९१४ मध्ये माकिल येथे आधुनिक बंदराच्या बांधकामास आरंभ झाला. १९३० मध्ये इराकच्या ताब्यात बंदराचे बांधकाम व साहित्य देण्यात आले. दुसऱ्या महायुद्धामुळे बसऱ्याचे महत्त्व वाढले. १९४१ च्या इराकी बंडामुळे बसरा पुन्हा प्रकाशात आले. या काळात रशियाला लष्करी व इतर रसद पुरविण्यासाठी बसऱ्याचा फार मोठा वापर करण्यात आला. परंतु नंतरच्या काळात त्याचे महत्त्व पुष्कळच कमी झाले.

 

आशार या भागात आधुनिक सार्वजनिक व व्यापारी इमारती आहेत. माकिल येथे पाश्र्चिमात्य लोकांची निवासस्थाने आहेत. बसरा शहरातील उष्ण व दमट हवामान आणि शहराजवळच असलेल्या मोठ्या दलदलीमुळे येथे राहणे अतिशय त्रासाचे असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान सु. १५ सेंमी. आहे. खजूर हे प्रमुख उत्पन्न असून पैशाचे पीक, स्थानिक लोकांचे अन्न व ‘आराक’ मद्य अशा तिन्ही गोष्टींसाठी त्याचा उपयोग करण्यात येतो.

बसरा हे अतिशय समृद्ध अशा कृषिक प्रांताचे केंद्र असल्याने येथून शेतमाल, लोकर, सतरंज्या, गोंद, कापूस, चामडी, तेल आणि प्राणी ह्यांची निर्यात होते. मेंढ्या, शेळ्या, बकऱ्या व उंट ह्यांची ही मोठी बाजारपेठ आहे. येथे व्हिस्की, आराक आणि कॉर्डिअल या मद्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. खनिज तेलशुद्धीकरणासाठी बसरा प्रसिद्ध असून या शहरापासून इराणच्या आखातावरील फाओ बंदरापर्यंत नळांनी तेलवाहतूक करण्यात येते. बगदाद रेल्वेचे ते अंतिम स्थानक असून येथून यूरोप व आशियातील सर्व भागांकडे हवाई वाहतूक चालते. दर्यावर्दी सिंदवादच्या सफरींत बसरा शहराचे विशेष महत्त्व आहे. सफरीनंतर तो याच शहरी परतत असे. ‘बसरा मशिदी’ चे मिनार इतिहासप्रसिद्ध आहेत. सुमेरियन व बॅबिलोनियन बांधकामाची काही वैशिष्टये तीत दिसून येतात. शहरात इतरही इतिहासप्रसिद्ध मशिदी आहेत. 

गद्रे, वि. रा.