स्येनफ्वेगोस : वेस्ट इंडीजमधील क्यूबा बेटावरील एक प्रमुख औद्योगिक शहर व बंदर. लोकसंख्या १,६४,९२४ (२०१२). क्यूबाच्या दक्षिण मध्य भागात असलेल्या स्येनफ्वेगोस उपसागराच्या किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. हाव्हॅना या क्यूबाच्या राजधानीपासून आग्नेयीस सु. २२५ किमी. अंतरावर हे शहर आहे.

१४९४ मध्ये क्रिस्तोफर कोलंबस येथील उपसागरात आला होता परंतु १७३८ पर्यंत येथे कायमस्वरूपी वसाहतीची स्थापना झाली नव्हती. चाचेगिरीपासून संरक्षण करण्यासाठी तेथील उपसागराच्या तोंडाशी कास्तिलो दे जग्वा या किल्ल्याची उभारणी करण्यात आली (१७४०—४५). प्रत्यक्षात या शहराची स्थापना १८१९ मध्ये लुइझिॲनावरून आलेला फ्रेंच कर्नल लूइस दि क्लोउट याने फर्नांदिना दे जग्वा या नावाने केली. १८२४ मध्ये येथे १,२३८ एवढी लोकवस्ती होती. १८२५ मध्ये वादळामुळे या ठिकाणाचा विध्वंस झाला. त्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात येऊन या ठिकाणाचा शोध लावण्यात सहभागी असलेला होसे स्येनफ्वेगोस याच्या स्मरणार्थ याचे स्येनफ्वेगोस असे नामकरण करण्यात आले.

स्येनफ्वेगोसचा परिसर समृद्ध कृषी प्रदेश असून येथे ऊस, कॉफी, तंबाखू, तांदूळ इ. उत्पादने घेतली जातात. येथे साखरनिर्मिती, कॉफी व तंबाखूवरील प्रक्रिया, मद्यनिर्मिती, लाकूडकाम, मासे डबाबंदीकरण, रसायन आणि खतनिर्मिती इ. उद्योग चालतात. या बंदरातून साखर व मळी यांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. हे शहर रस्ते व लोहमार्गाने देशातील महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडले आहे. कोळंबी पकडण्यासाठी जाणाऱ्या क्यूबाच्या अनेक बोटी या बंदरातून जातात. येथे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे.

स्येनफ्वेगोस हे क्यूबामधील एक सुनियोजित सुंदर शहर असून त्यात रुंद रस्ते, आकर्षक इमारती, अनेक उद्याने व प्रेक्षणीय स्थळे आहेत. म्यूनिसिपल पॅलेस, चर्च आणि टेरी थिएटर्स ह्या येथील प्रेक्षणीय वास्तू आहेत. २००५ मध्ये युनोस्कोने या शहराचा जागतिक वारसास्थळांत समावेश केला आहे.

निगडे, रेखा