मेकाँग नदी : आग्नेय आशियातील एक प्रमुख व आशिया खंडातील लांबीने सातव्या क्रमांकाची (लांबी ४,१८० किमी.) उत्तर-दक्षिणवाहिनी नदी. ईशान्य तिबेटच्या पठारी भागात सिंधू, ब्रह्मपुत्रा, इरावती या नद्यांच्या उगमस्थानाजवळच ३३ उ. अक्षांश व ९४° पू. रेखांशावर, टांगला पर्वतरांगेच्या उतारावर उगम पावणारी ही नदी चीन, ब्रह्मदेश, लाओस, थायलंड, कांपुचिया (ख्मेर प्रजासत्ताक) व व्हिएटनाम या सहा देशांशी संबंधित आहे. ही नदी तिबेटी भाषेत द्झा चू या नावाने, तर चिनी भाषेत लान्द्झांग ज्यांग आणि थाई व इंग्लिश भाषांत मेकाँग या नावांनी ओळखली जाते.

मेकाँग नदी

टांगला पर्वतरांगेपासून प्रथम आग्नेय दिशेने व नंतर चीनच्या युनान प्रांतातून दक्षिणेस वाहणारी ही नदी सुरुवातीच्या सु. ३२२ किमी. प्रदेशात ५,०९० मी.वरून ३,०४८ मी. पर्यंत खाली येते. या प्रदेशात ती सॅल्वीन आणि यांगत्सी नद्यांना समांतर वाहते. चीनच्या सिक्याँग भागात या नदीवर लोखंडी झुलता पूल असून तो इतिहासकाळातील पूर्व चीनकडून पश्चिमेस ल्हासाकडे जाणाऱ्या लमाणमार्गावर आहे. युनान प्रांतात खोल दऱ्या व अनेक द्रुतवाह तसेच बाउशान येथे ‘बर्मा रोड’ ओलांडल्यावर पुढे ही नदी पूर्वीच्या ⇨इंडोचायनामध्ये प्रवेश करते. ब्रह्मदेश, लाओस व थायलंड यांच्या सरहद्दीवरून पूर्वेस व नंतर लाओसमधील ल्वांग प्राबांग शहराजवळ दक्षिणेस वळून लाओसच्या वायव्य भागातून थायलंडच्या सरहद्द पर्यंत वहात जाते. पुढे बरेच अंतर थायलंड व लाओस यांच्या सरहद्दीवरून वहात जाऊन नैर्ऋत्य लाओसमधील लहानलहान टेकड्यांमधून वाट काढत व अनेक द्रुतवाह ओलांडून ती सु. २२ मी. खाली येते आणि कांपुचियामध्ये प्रवेश करते. या देशाच्या मध्यपूर्व भागातून उत्तर-दक्षिण वहाताना तिने काँपाँग सॉमच्या उत्तरेकडील विस्तीर्ण बेसाल्टी पठारातून आपला मार्ग काढला आहे. पुढे या देशाच्या प्नॉमपेन या राजधानीजवळ तिला उजवीकडून टॉनले सॅप नदी मिळते. या नदीमुळे मेकाँगला उन्हाळ्यात टॉनले सॅप सरोवरातून पाणीपुरवठा होतो, तर पावसाळ्यात मेकाँग नदीचे पाणी सरोवरात जाते. या शहराजवळूनच बासाक नदी हा मेकाँगच्या त्रिभुज प्रदेशातील मुख्य फाटा सुरू होतो. कांपुचियातून पुढे ही नदी व्हिएटनामच्या दक्षिण भागात प्रवेश करते. या भागात या नदीने सु. १,९४,२५० चौ. किमी.चा त्रिभुज प्रदेश तयार केला असून त्यामधून अनेक मुखांनी ही नदी दक्षिण चिनी समुद्राला जाऊन मिळते. मेकाँगच्या त्रिभुज प्रदेशात अनेक कालवे काढण्यात आले असून तेथील भातशेती महत्त्वाची आहे.

कांपुचिया व व्हिएटनाम यांमध्ये मेकाँगच्या काठावर गाळ साचून नैसर्गिक बांध तयार झाले आहेत. या भागातील नदीकाठचा सखल प्रदेश सस.पासून सु. २ ते १० मी.पर्यंत उंच आहे. विस्तृत व सुपीक अशा या भागात लोकवस्तीही दाट आहे. व्हिएटनाममधील विंगलाउंग, कांत, लाउंगसुयेन ही शहरे अत्यंत दाट लोकवस्तीची आहेत. हो-चि-मिन्ह सिटी हे व्हिएटनाममधील शहर या त्रिभुज प्रदेशाच्या पूर्वेस आहे. समुद्रापासून अंतर्भागात सु. ५५० किमी. पर्यंत ही नदी नौसुलभ असून प्नॉमपेन हे या नदीवरील महत्त्वाचे बंदर आहे. कांपुचियाच्या उत्तरेलाही काही भागात ही नदी वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. नदीच्या खालच्या टप्प्यातील धबधबे वीजनिर्मितीसाठी उपयुक्त असून संयुक्त राष्ट्रांतर्फे १९६० मध्ये नदीखोऱ्याचा विकास करण्याच्या दृष्टीने या भागात अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. व्हिएटनाम युद्धात या नदीच्या त्रिभुज प्रदेशाचे खूप नुकसान झाले.

मेकाँग नदीमुळे इंडोचायनामधील डोंगराळ वनप्रदेशाच्या सौंदर्यात भर पडली आहे. या भागात ही नदी उष्ण प्रदेशीय जंगलांतून वाहते. जून ते ऑक्टोबर या काळात मॉन्सूनमुळे नदीला मोठे पूर येऊन बाजूच्या प्रदेशात पाणी पसरते. ऑक्टोबर ते मे या काळात पाणी कमी होऊन नदीपात्रापुरते मर्यादित असते. टॉनले सॅप सरोवरातील पाणीपुरवठ्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी फार कमी होत नाही. नाम था, नाम हो (लाओस ); ची नदी, मून नदी (थायलंड); काँग, सन, स्रेपॉक, सी, स्टुंग सेन (कांपुचिया) इ. मेकाँग नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. युंगकिंगहुंग (चीन); ल्वांग प्राबांग, व्ह्यँत्यान, पॅक्से (लाओस); क्रेत्ये, काँपाँग चाम, प्नॉमपेन (कांपुचिया); चाऊ फू, लाउंगसुयेन, विंगलाउंग, कांत, मीतॉ, खान हुंग, (व्हिएटनाम ) इ. शहरे या नदीकाठावरील औद्योगिक, व्यापारी व वाहतूककेंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. [→ ख्मेर प्रजासत्ताक; थायलंड ].

चौंडे, मा. ल.

चित्रसंदर्भ :

https://www.britannica.com/place/Mekong-River