हीब्रन : इझ्राएल-जॉर्डन यांदरम्यान असलेल्या जॉर्डन नदीच्या पश्चिमेकडील वेस्ट बँक भागातील इझ्राएलच्या आधिपत्याखालील प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक शहर. हे पॅलेस्टाइनच्या पश्चिम विभागात ज्यूडीया पर्वतरांगेत जेरूसलेमपासून नैर्ऋत्येस ३० किमी.वर वसलेले आहे. लोकसंख्या २,५०,००० (२०१२ अंदाज) . यास अल् खली (देवाचा मित्र- दयाळू) असेही म्हणतात. अल् खली म्हणजे बायबलच्या जेनसिस नावाच्या भागात वर्णिलेला पहिला ज्यू प्रेषित अब्राहम याचे येथे इ. स. पू. २००० मध्ये वास्तव्य होते. त्या वेळी या शहराचा कर्ज्याथ आर्बा ( चारही बाजूंनी तटबंदीने वा पर्वताने वेढलेले शहर) असा उल्लेख केला जाई. इ. स. पू. १००० च्या सुमारास पॅलेस्टाइनमधील ज्यूडा जमातीचा राजा डेव्हिड याने येथून आपली सत्ता स्थापण्यास प्रारंभ केल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. मुहम्मद पैगंबरांच्या जेरूसलेमकडे जाण्याच्या मार्गावरील हे थांब्याचे, विश्रांतीचे ठिकाण होते, अशी इस्लाम धर्मीयांची श्रद्धा आहे. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांच्या महत्त्वाच्या तीर्थ-स्थळांत या शहराचा समावेश होतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हीब्रन हे मुस्लिम-अरब शहर होते आणि ज्यू धर्मीय येथे अल्पसंख्य होते. १९२९ मध्ये ज्यू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगली उद्भवल्या. त्यांत ज्यू धर्मीयांची जीवितहानी झाली. अरबांनी १९३६–३९ मध्ये ज्यूविरोधात उठाव केल्याने बहुसंख्य ज्यू धर्मीयांनी येथून स्थलांतर केले. १९२०–४८ पर्यंत हे शहर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते. पहिल्या अरब-इझ्राएल युद्धानंतर (१९४८-४९) हे जॉर्डनच्या अखत्यारीत आले. त्यास इझ्राएलचा विरोध होता. १९६७ मध्ये उद्भवलेल्या सहादिवसीय युद्धा-नंतर पॅलेस्टाइनचा पश्चिम भाग इझ्राएलच्या ताब्यात आला. त्यात हीब्रनचा समावेश होता. या वेळी अनेक ज्यू धर्मीयांचे हीब्रन येथे पुनर्वसन करण्यात आले. पुढे १९९७ मध्ये हीब्रन करारानुसार इझ्राएलने हीब्रनचा ८०% ताबा सोडला व तो प्रदेश पॅलेस्टाइनला परत दिला. ज्या भागात ज्यू धर्मीयांची वस्ती आहे, त्यावर इझ्राएलचा अंमल आहे. त्यामुळेच हीब्रन इतर शेजारील प्रदेशाप्रमाणेच मुस्लिम-ज्यू संघर्षाचे केंद्र बनले आहे. 

 

हीब्रन परिसरात अनुकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली जाते. त्यात द्राक्षे, अंजीर इ. फळांच्या मोठ्या बागा आढळतात. येथे उत्पादित द्राक्षांपासून वाइननिर्मितीचे अनेक उद्योग संकेंद्रित झाले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन काळात हीब्रन हे व्यापारी मार्गावर वसलेले होते. त्यामुळे शहरास उद्योग-व्यापाराची परंपरा लाभली आहे. वेस्ट बँकमधील व्यापाराचे अत्यंत गजबजलेले केंद्र म्हणून याची ओळख आहे. येथील दगडाच्या खाणी प्रसिद्ध असून त्यांतून संगमरवराचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. चामड्यांच्या वस्तू, काच, मातीची भांडी यांचे निर्मितिउद्योग येथे आहेत. हीब्रन हे उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र असून हीब्रन विद्यापीठ हे कला, धर्म, शास्त्रविषयक अभ्यासक्रम राबविते. पॅलेस्टाइन पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीद्वारे अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. द रशियन ऑर्थोडॉक्स मॉनॅस्ट्री, ओक ऑफ अब्राहम, जेकॉब सिनेगॉग ही येथील प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. 

आजगेकर, बी. ए.